विवेचन सारांश
दैवी आणि आसुरी संपत्तीची लक्षणे

ID: 2483
मराठी
रविवार, 26 फेब्रुवारी 2023
अध्याय 16: दैवासुरसम्पद्विभागयोग
1/2 (श्लोक 1-9)
विवेचक: गीता विशारद श्री श्रीनिवास जी वर्णेकर


परंपरेनुसार प्रार्थना आणि दीपप्रज्वलनाने विवेचनाचा शुभारंभ झाला. परमपूजनीय गोविंददेव गिरीजी महाराज आणि सर्व साधकांना वंदन करण्यात आले. गुरुवंदना, श्रीकृष्णनमन, ज्ञानेश्वर महाराज, भारतमाता, भगवद्गीता आणि वेदव्यासांना वंदन करून विवेचनाला सुरुवात झाली.

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः।
गुरूर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ।।

ॐ कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने॥
प्रणत: क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम:॥

नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहम् |
पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमाळन्दिवल्लभम् ||

रत्नाकराधौतपदां हिमालयकिरीटिनीम्‌
ब्रह्मराजर्षिरत्नाढ्याम् वन्दे भारतमातरम्‌ ||

ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं
व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतं |
अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीमष्टादशाध्यायिनीं
अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीं || 1 ||

नमोऽस्तु ते व्यास विशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र |
येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः || 2 ||

आपण खूप भाग्यवान आहोत. कारण आपल्याला भारत मातेच्या कुशीत जन्म घेऊन, भगवद्गीतेचा अभ्यास करण्याची सुसंधी लाभली आहे. भगवद्गीतेबरोबरच उपनिषदे आणि इतर धार्मिक ग्रंथ वाचण्याचे भाग्य आपल्याला मिळाले आहे. धर्म म्हणजे काय याची विस्तृत माहिती यामध्ये स्पष्ट केली आहे. धर्म म्हणजे कर्तव्य करणे. आपली नित्य, नैमित्तिक कर्म व्यवस्थित करून मनुष्य नराचा नारायण बनू शकतो. परंतु यासाठी सद्गुणांचा अभ्यास करून ते कोणते आहेत हे समजून घ्यायला हवे.
नवव्या अध्यायात भगवंत म्हणतात - 
मोघाशा मोघकर्माणो मोघज्ञाना विचेतसः।
राक्षसीमासुरीं चैव प्रकृतिं मोहिनीं श्रिताः।९.१२।।
ज्यांची आशा व्यर्थ, कर्मे निरर्थक आणि ज्ञान फुकट असे विक्षिप्त चित्त असलेले अज्ञानी लोक राक्षसी, आसुरी आणि मोहिनी प्रकृतीचाच आश्रय करून राहतात.

महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः।
भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्।।९.१३।।
परंतु हे कुंतीपुत्रा! दैवी प्रकृतीचा आश्रय घेतलेले महात्मे मला सर्व भूतांचे सनातन कारण आणि अविनाशी अक्षर स्वरूप जाणून अनन्य चित्ताने युक्त होऊन निरंतर भजतात.

इथे भगवंतांनी दैवी आणि आसुरी शब्दांचा प्रयोग केला आहे. वास्तविक भगवद्गीता पंधराव्या अध्यायात संपते. या अध्यायात भगवंत आपल्याला गुह्यतम ज्ञान सांगतात. पण सोळाव्या अध्यायात भगवंत दैवी आणि आसुरी गुणांविषयी विस्ताराने सांगतात. 
या अध्यायात दैवी संपत्ती कोणती आणि आसुरी संपत्ती कोणती याचे विभाजन भगवंत करतात. कोणते सद्गुण अंगी बाळगावे हे सविस्तरपणे सांगतात म्हणूनच या अध्यायाचे नाव  "दैवासुरसम्पद्विभागयोग " आहे. या महालात निरनिराळे कक्ष आहेत. त्यातील पहिल्या कक्षात दैवी गुणांचे वर्णन आहे आणि असा एक कक्ष आहे त्यात आसुरी गुणांचे वर्णन केले आहे. कोणते गुण आपण स्वीकारायचे आणि कोणत्या गुणांचा त्याग करायचा हे भगवंत सांगतात.


16.1

श्रीभगवानुवाच
अभयं(म्) सत्त्वसंशुद्धिः(र्), ज्ञानयोगव्यवस्थितिः।
दानं(न्) दमश्च यज्ञश्च, स्वाध्यायस्तप आर्जवम्।।16.1।।

श्री भगवान म्हणाले, भयाचा पूर्ण अभाव, अंत:करणाची पूर्ण निर्मळता, तत्वज्ञान करता ध्यानयोगात निरंतर दृढ स्थिति आणि सात्विक दान, इंद्रियांचे दमन, भगवान, देवता आणि गुरुजनांची पूजा, तसेच अग्निहोत्र इत्यादी उत्तम कर्माचे आचरण, त्याप्रमाणे वेदशास्त्रांचे पठन-पाठन, भगवंताच्या नामाचे व गुणांचे किर्तन, स्वधर्माचे पालन करण्यासाठी कष्ट सोसणे आणि शरीर व इंद्रियांसह अंत:करणाची सरलता.

या ठिकाणी भगवंत सद्गुणांची यादी देतात. भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायात स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगितली आहेत.
बाराव्या अध्यायात भक्तांचे गुण सांगितले आहेत.
अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च।
निर्ममो निरहङ्कारः समदुःखसुखः क्षमी।।१२.१३।।
जो कोणत्याही प्राण्याचा द्वेष न करणारा, स्वार्थरहित, सर्वांवर प्रेम करणारा व अकारण दया करणारा, माझेपणा व मीपणा नसलेला, सुखात व दुःखात समभाव असलेला आणि क्षमाशील म्हणजे अपराध करणार्‍यालाही क्षमा करणारा असतो; तसेच जो योगी नेहमी संतुष्ट असतो, ज्याने शरीर, मन व इंद्रिये ताब्यात ठेवलेली असतात, ज्याची माझ्यावर दृढ श्रद्धा असते, तो मन व बुद्धि मलाच अर्पण केलेला माझा भक्त मला प्रिय आहे.

तेराव्या अध्यायात ज्ञानी भक्ताची लक्षणे सांगितली आहेत.
अध्यात्मज्ञाननित्यत्वं तत्त्वज्ञानार्थदर्शनम्।
एतज्ज्ञानमिति प्रोक्तमज्ञानं यदतोन्यथा।।१३.१२।।
अध्यात्मज्ञानात नित्य स्थिती आणि तत्त्वज्ञानाचा अर्थ जो परमात्मा त्यालाच पाहणे हे सर्व ज्ञान होय आणि याउलट जे असेल, ते अज्ञान होय, असे म्हटले आहे.

चौदाव्या अध्यायात गुणातीताची लक्षणे भगवंत सांगतात. त्याचप्रमाणे या अध्यायात दैवी सद्गुणांचे  वर्णन केले आहे.

अभय- दैवी सद्गुणांमधील पहिला गुण 'अभय' हा आहे. याला सर्व सद्गुणांचा सेनापती असे म्हणतात. निर्भय याचा अर्थ कोणाची भीती नसणे. अभय म्हणजे मला कोणाची भीती नाही आणि माझी कोणाला भीती नाही. यासंदर्भात एक कथा सांगितली जाते. संत तुकाराम भंडाऱ्याच्या टेकडीवर भजन गाण्यासाठी रोज जात. सुरवातीला जेव्हा त्यांचे भजन सुरू होई तेव्हा तेथील पक्षी घाबरून उडून जात. पण जसजशी रोज त्यांना याची सवय झाली आणि लक्षात आले की 'यांच्या पासून आपल्याला भीती नाही' तसे ते निर्भय होऊन तिथे स्वच्छंद बागडायला लागत.

भोगे रोग भयं कुले चुत्यी भयं विते न्रुपालाद भयं
मौने देन्य भयं बले रिपु भयं रुपे जराया भयं
शास्त्रे वाद भयं गुणे खल भयं काये कृतांताद भयं
सर्व वस्तु भयान्वितम भुवि न्रुनाम वैराग्य मेवा भयं।

अर्थात भोगांत रोगाचे भय, कुलभ्रष्ट होण्याचे भय, धनवानाला राजाचे भय, मौनात दैन्याचे भय, बलवानाला शत्रुचे भय, रूपवानाला वृधावस्थेचे भय, ज्ञानवानाला वाद विवादाचे भय, गुणवानाला दुष्टांचे भय, देहाला काळाचे भय अशा सर्व गोष्टी मनुष्याला भयभीत करतात पण एक मात्र वैराग्यात अभय आहे.

सत्व संशुद्धी - सत्व याचा अर्थ अंतकरणाची संशुद्धी. अंतःकरणाचे चार भाग आहेत. मन, बुद्धी, चित्त, अहंकार. हे सगळे शुद्ध व्हावेत. मनामध्ये चुकीचे विचार यायला नकोत.

ज्ञान योग व्यवस्थिति :- या ठिकाणी ज्ञानाचा अर्थ आत्मज्ञान आहे. आपले काही ज्ञान उपजीविकेचे असते आणि काही ज्ञान आत्मज्ञान असते. मी कोण आहे? मी कोठून आलो? मला काय करायचे आहे? मला मनुष्य जन्म का मिळाला? मनुष्य जन्म मिळाल्यावर माझ्याकडून कोणती अपेक्षा आहे? मी म्हणजे देह नसून आत्मा आहे हे ज्ञान मिळाल्यावर मला ज्ञानप्राप्ती झाली असे म्हणता येईल. ज्ञानाची साधना करताना संतांच्या वचनांचे श्रवण करणे, ते समजून घेऊन त्याचे मनन करणे आणि ते समजल्यावर निदीध्यासात राहणे ही सगळी सद्गुणांची लक्षणे आहेत. हे सगळे एकदम होणार नाही. त्यासाठी साधना करावी लागेल.
आत्मा वा अरे द्रष्टव्यः श्रोतव्यो मन्तव्यो निदिध्यासितव्यः । (बृहदारण्यकोपनिषद् २-४-५)
अरे! हा आत्माच पाहण्या (जाणण्या) योग्य आहे, ऐकण्या योग्य आहे, मनन करण्यायोग्य आहे तसेच निदिध्यासन (ध्यान) करण्यायोग्य आहे.

दान - दान म्हणजे देणे. गीतेच्या १७ व्या अध्यायात दानाचे तीन प्रकार सांगितले आहेत. सात्विक, राजसी आणि तामसी. मला सृष्टी कडून सगळ्या गोष्टी मिळाल्या आहेत तेव्हा त्या बदल्यात मी पण सृष्टीला काहीतरी द्यायला हवे याला दान म्हणतात. दान नेहमी आदरपूर्वक सन्मानपूर्वक द्यावे. उजव्या हाताने दिलेले दान डाव्या हाताला समजू नये. मला सृष्टीने दिले आहे तेव्हा कोणतीही गोष्ट मी एकट्याने न खाता दुसऱ्याला मी देईन, हे सात्विक दान आहे. फळाच्या अपेक्षेने जे दान दिले जाते ते राजसी असते. उपकाराच्या भावनेने तुच्छतेने फेकून जे दान दिले जाते ते तामसी दान असते.

दम -
इंद्रिय आणि त्यांच्या विषयांचा संयोग वियोग होताना दिसतो. त्यामुळे सुखदुःखाची अनुभूती होते. आपण त्यात आसक्त होऊन राहतो. इंद्रियांवर नियंत्रण ठेवून, आसक्तीचा त्याग करणे याला दम म्हणतात.

यज्ञ -
यज्ञ याचा अर्थ कोणत्याही अपेक्षेशिवाय आपले कर्तव्य कर्म करणे. तिसऱ्या अध्यायात याचे सविस्तर वर्णन आलेले आहे. सगळ्यांचा उत्कर्ष तेव्हाच होईल जेव्हा प्रत्येक जण आपापला यज्ञ व्यवस्थित करेल.

स्वाध्याय- 
शास्त्र समजणे आणि स्वतः ते कंठस्थ करणे याला स्वाध्याय म्हणतात. भगवद्गीता शिकून त्याचा अर्थ समजून त्याचे चिंतन मनन करणे हा स्वाध्याय आहे. त्याच्याशी जोडले जाऊन सुखदुःख सहन करणे म्हणजे स्वाध्याय.

तप -
स्वधर्माचे पालन करताना जे कष्ट आपण सहन करतो त्याला तप म्हणतात. जीवनात जय पराजय, सुख दुःख, लाभ हानी इत्यादी घडत असतात. या सर्वांतील द्वंद्व सहन करणे म्हणजे तप.

आर्जवम -
आर्जवम म्हणजे मनाची सरलता. बाह्य आणि अंतरंगात एकाच प्रकारचे वर्तन असावे.
 
 

16.2

अहिंसा सत्यमक्रोध:(स्), त्यागः(श्) शान्तिरपैशुनम् ।
दया भूतेष्वलोलुप्त्वं(म्), मार्दवं(म्) ह्रीरचापलम्।।16.2।।

काया-वाचा-मनाने कोणालाही कोणत्याही प्रकारे दुःख न देणे,यथार्थ व प्रिय भाषण, आपल्यावर अपकार करण्यारावरही न रागावणे, कर्माच्या ठिकाणी कर्तेपणाचा व अभिमानाचा त्याग, अंतःकरणात चंचलता नसणे, कोणतीही निंदा वगैरे न करणे, सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी निर्हेतुक दया, इंद्रियांचा विषयांशी संयोग झाला तरी त्यांच्याविषयी आसक्ति न वाटणे, कोमलता, लोकविरुद्ध व शास्त्रविरुद्ध आचरण करण्याची लज्जा, निरर्थक हालचाली न करणे.

अहिंसा- आपल्या कृतीद्वारे कोणालाही न दुखवणे याला अहिंसा म्हणतात. अहिंसा परमो धर्मा : l असे असले तरी काही परिस्थितीत हिंसा करावीच लागते. कर्तव्याच्या दृष्टीने कोणाची हिंसा करावी लागणे ही अहिंसाच आहे. दहशतवादी आणि मारेकऱ्यांना थांबवण्यासाठी जर मारावे लागले तर ती अहिंसाच आहे. एखाद्या गुन्हेगाराला न्यायाधीश फाशीची शिक्षा देतो. हा न्याय अहिंसा आहे. मात्र इतर परिस्थितीत काया, वाचा आणि मनाने कुणाला दुखवू नये.
ज्ञानेश्वर माउली म्हणतात,
तैसें साच आणि मवाळ । मितले आणि रसाळ ।
शब्द जैसे कल्लोळ । अमृताचे ॥ २७० ॥
त्याप्रमाणे खरे आणि मऊ (कोणास न खुपणारे) मोजके परंतु सरळ, त्याचे बोलणे म्हणजे जशा काही अमृताच्या लाटाच. ॥१३.२७०॥

सत्यम् - नेहमी खरे बोलणे हे तप आहे.

एक संस्कृत वचन आहे
सत्यं ब्रूयात् प्रियं ब्रूयात् न ब्रूयात् सत्यं अप्रियम्।
प्रियं च नानृतं ब्रूयात् एष धर्म: सनातन:।।
 
सत्य बोलावे, प्रिय बोलावे, सत्य परंतु अप्रिय बोलू नये. प्रिय परंतु असत्य बोलू नये; हाच सनातन धर्म आहे.
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात "मी अनेक जन्मे सत्य बोलल्याने ज्ञानेश्वरी लिहू शकलो."

अक्रोध -  क्रोध यायला नको. परंतु कधीकधी क्रोध आणणे आवश्यक असते. आई आपल्या मुलाला मारते, तो राग मुलाच्या कल्याणासाठी, हितासाठीच असतो. मात्र विनाकारण क्रोध करू नये.
शेक्सपिअर म्हणतो - I must be cruel to be kind, दुसऱ्याच्या हिताकरिता क्रोध आणावा लागतो.

त्याग - आपले कर्तव्य करताना कर्तुत्वाचा त्याग करायला हवा. यासाठी कार्य झाल्यावर ते परमेश्वराला अर्पण करावे.

शांती- अंत:करण शांत राहिले तरच व्यक्ती ध्यान करू शकते. मनाची चंचलता नष्ट करणे हा एक सद्गुण आहे.

अपैशुनम् -
कोणाविषयी वाईट विचार करू नये. दुसऱ्याचे दुःख बघून स्वतःलाही दुःख होणे हे सद्गुणी माणसाचे लक्षण आहे.

दया भूतेषु -
मनात सर्व भूतमात्रांविषयी दयेचा भाव असावा. ही दैवी संपत्ती आहे. आद्य शंकराचार्य ईश्वराची आराधना करताना म्हणतात "माझ्यातला अविनय निघून जावो, माझे दुर्गुण दूर होवो आणि माझ्या अंतःकरणात दया निर्माण होवो."

अलोलुपत्वम् - सुंदर दृश्य दिसल्यावर त्याकडे आकर्षित होणे याला आसक्ती म्हणतात. ही आसक्ती नसणे याला अलोलुपत्वम् म्हणतात.

मार्दवम् -
 अंत:करणाची कोमलता म्हणजे हृदय मऊ असणे हे सद्गुणी  पुरुषाचे लक्षण आहे.
एका सुभाषितात म्हटले आहे -
सज्जनस्य हृदयं नवनीतं यद्वदन्ति कवयस्तदलीकम् ।
अन्यदेहविलसत्परितापात सज्जनो द्रवति नो नवनीतम् ॥
सज्जनांचे हृदय लोण्यासारखे असते असे कवि म्हणतात ते खोटे आहे. (कारण) दुसर्‍याला होणार्‍या दुःखामुळे सज्जन पाघळतो पण लोणी नाही.

ऱ्हिरचापलम् - वाईट काम करताना, शास्त्राविरुद्ध वागताना लाज वाटली पाहिजे. ऱ्हिर म्हणजे मर्यादांचे पालन. चंचलतेने व्यर्थ क्रिया केल्या जातात. लज्जा माणसाचा उत्तम दागिना आहे. आपल्या वागण्यावर बंधन ठेवायला हवे.
अनावश्यक कार्यात लागल्याने आपल्या कडून उत्तम कार्य होऊ शकत नाही.


16.3

तेजः क्षमा धृतिः(श्) शौचम्, अद्रोहो नातिमानिता।
भवन्ति सम्पदं(न्) दैवीम्, अभिजातस्य भारत।।16.3।।

तेज, क्षमा, धैर्य, बाह्यशुद्धी, कुणाविषयीही शत्रुत्व न वाटणे आणि स्वतःविषयी मोठेपणाचा अभिमान नसणे. ही सर्व अर्जुना! दैवी संपत्ती घेऊन जन्मलेल्या माणसाची लक्षणे आहेत.

तेज - तेज हा सद्गुण संतांच्या जवळ असतो. याच्यामुळे दुष्ट लोक सुद्धा सुधारतात.

क्षमा - 
सदगुणांना धारण करताना जवळ क्षमाशील वृत्ती असावी. चुका करणाऱ्यांना क्षमा करावी. न्यायाधीश न्याय देताना जो चुकला त्याला शिक्षा करतो हे त्याचे कर्तव्य आहे. इथे त्याला क्षमा दाखवून चालणार नाही. मात्र कितीही त्रास दिला तरी ज्ञानेश्वर महाराजांसारखे संत दृष्टांना क्षमा करतात.

धृती -
याचा अर्थ धारण करण्याची क्षमता(धैर्य). एखाद्या गोष्टीला सामोरे जाताना संयम राखणे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे अफजल खान जेव्हा शिवाजी महाराजांवर चाल करून आला तेव्हा त्याने वाटेतील सर्व मंदिरे उध्वस्त केली. तुळजापूरच्या मंदिरात आल्यावर हे मंदिर उध्वस्त करताना शिवाजी महाराजांना राग येईल असे अफजलखानाला वाटले. मात्र शिवाजी महाराजांनी प्रसंग पाहून स्वतःचा क्रोध आवरला, धैर्य राखले. यालाच धारण शक्ती म्हणतात.

शौच -
याचा अर्थ स्वच्छता, शुद्धता आणि पवित्रता आहे. स्वच्छता अंतरंगाची आणि बाह्य स्वरूपाची असते. याचा दुसरा अर्थ शुद्धता आहे. एका पेल्यात स्वच्छ पाणी आहे पण ते शुद्ध असेलच असे नाही. त्यात बॅक्टेरिया असू शकतात. तिसरा अर्थ पवित्रता असा आहे. गंगाजल हे शुद्ध असते, स्वच्छ असते आणि पवित्र असते. आपले अंतरंग ही गंगाजलाप्रमाणेच असावे.
मलनिर्मोचनं पुंसां जलस्नानं दिने दिने ।
सकृतद्गीताम्भसि स्नानं संसारमलनाशनं ।।
ज्याप्रमाणे शरीर स्वच्छ करण्यासाठी आपण रोज आंघोळ करतो त्याचप्रमाणे अंतःकरणाच्या शुद्धीसाठी रोज भगवद्गीता किंवा इतर अध्यात्मिक ग्रंथांचे वाचन करावे. अशा ग्रंथांचे वाचन मनन चिंतन करून ते आचरणात आणण्याचा प्रयत्न केल्यास अंतःकरणाची शुद्धता मिळते.

संत नामदेव महाराज म्हणतात,

नामा म्हणे ग्रंथश्रेष्ठ ज्ञानदेवी  एक तरी ओवी अनुभवावी 

अद्रोह - म्हणजे कोणाविषयीही शत्रुता न बाळगणे.

नातिमानीता - स्वतःविषयी थोडा अभिमान जरूर असावा पण गर्व नसावा. स्वाभिमान आणि अभिमान यात फरक आहे. मीच मोठा आहे असा अभिमान नसावा.
अद्रोह नातिमानीता दृष्टीने कोणाच्या प्रति वैरभाव नसावा. रावणाच्या वधानंतर प्रभू रामचंद्रांनी विभीषणाला त्याचा अंत्यसंस्कार करायला सांगितले. तो तयार नव्हता. तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणाले "मृत्यूनंतर वैरभाव संपतो. तेव्हा तू अंत्यसंस्कार कर."
अशा प्रकारे दैवी संपत्ती धारण करणाऱ्या व्यक्तीचे वर्णन या श्लोकांमध्ये आले आहे. आता पुढील श्लोकात आसुरी संपत्ती कोणती याचे वर्णन आले आहे.

16.4

दम्भो दर्पोऽभिमानश्च, क्रोधः(फ्) पारुष्यमेव च।
अज्ञानं(ञ्) चाभिजातस्य, पार्थ सम्पदमासुरीम्।।16.4।।

हे पार्था! ढोंग, घमेंड, अभिमान, राग, कठोरपणा आणि अज्ञान ही सर्व असुरी संपत्ती घेऊन जन्मलेल्या पुरुषाची लक्षणे आहेत.

दंभ - आता भगवंत आसुरी संपत्तीकडे येतात आणि त्या अवगुणांचे वर्णन करतात. आसुरी संपत्तीचे पहिले लक्षण दंभ आहे. आपल्या जवळ जे नाही ते दाखवण्याचा प्रयत्न करणे याचा अर्थ दंभ

दर्प -
मनुष्य मोठा झाल्यावर, मोठ्या पदावर गेल्यावर आणि संपन्न अवस्थेत गेल्यावर त्याला अभिमान होणे याला दर्प म्हणतात. बोलण्यात अभिमान आल्यास त्याला दर्पोक्ती असे म्हणतात. असा भाव मनात सुद्धा यायला नको.

अभिमान-
यामध्ये वृथाभिमान येतो. याचा अर्थ जे नाही ते दाखवणे.

क्रोध- 
क्रोध म्हणजे राग येणे. प्रतिकूलता आल्यावर क्रोध येतो. स्वामी विवेकानंद शिकागो येथे बोटीतून जात असताना त्यांच्यासोबत दोन व्यक्ती बोलत होत्या. त्यांनी सुरुवातीला विवेकानंदांना मूर्ख असे म्हटले. पण स्वामी विवेकानंदांनी त्याकडे लक्ष दिले नाही. पुढे टिंगल करता-करता ते भारतमातेबद्दल अपशब्द बोलायला लागले. त्यावेळी मात्र विवेकानंद चिडले आणि त्यांनी त्यांचा कान पकडून म्हटले की "देशाचा अपमान मी कदापी सहन करणार नाही." त्यांनी क्रोधावर विजय मिळवला होता पण मातृभूमीच्या प्रेमामुळे त्यांना राग आला.

पारुष्य-
कठोरतेचे वर्तन म्हणजे पारूष्य. याच्या उलट मार्दव आहे.

अज्ञान- सद्सद्विवेकबुद्धीचा अभाव म्हणजे अज्ञान. कोणते काम करावे, कोणत्या कामापासून निवृत्त व्हावे हे न समजणे म्हणजे अज्ञान.
अशाप्रकारे ढोंग, घमेंड, अभिमान, राग आणि कठोरपणा ही आसुरी  पुरुषांची लक्षणे आहेत.

16.5

दैवी सम्पद्विमोक्षाय, निबन्धायासुरी मता।
मा शुचः(स्) सम्पदं(न्) दैवीम्, अभिजातोऽसि पाण्डव।।16.5।।

दैवी संपदा मुक्तिदायक आणि आसुरी संपदा बंधनकारक मानली आहे.,म्हणून हे अर्जुन,तू शोक करू नकोस, कारण तू दैवी संपदा घेऊन जन्मला आहेस.

दैवी संपत्ती मोक्षापर्यंत नेते आणि आसुरी संपत्ती अधोगतीकडे नेते. ती आपल्याला बंधनात टाकते. आपण बंधनात राहूनही मुक्त कसे व्हावे हे आपल्याला भगवद्गीता शिकवते. अर्जुनाला माहित होते की तो बंधनात-मोहात अडकलेला आहे. तो आपले प्रतिनिधित्व करतो आहे. अशावेळी श्रीकृष्ण त्याला समजवतात तुझ्या मध्ये सद्गुण अभिजात रूपात आहेत. आपल्यामध्ये सुद्धा काही अंशी दैवी संपत्तीचे गुण आहेत. त्यामुळे आपल्याला भगवद्गीता शिकण्याची प्रेरणा मिळालेली आहे. ही आपल्यावरची भगवद्कृपा आहे.

16.6

द्वौ भूतसर्गौ लोकेऽस्मिन्, दैव आसुर एव च।
दैवो विस्तरशः(फ्) प्रोक्त, आसुरं(म्) पार्थ मे शृणु।।16.6।।

हे अर्जुना! ह्या जगात मनुष्यसमुदाय दोन प्रकारांचे आहेत. एक दैवी प्रकृतीचे आणि दुसरे आसुरी प्रकृतीचे. त्यापैकी दैवी प्रकृतीचे विस्तारपूर्वक सांगितले. आता तू आसुरी प्रकृतीच्या मनुष्यसमुदायाबद्दलही माझ्याकडून सविस्तर ऐक.

भगवान सृष्टीचे दोन प्रकारात विभाजन करतात. सृष्टीत दैवी आणि आसुरी या दोन स्वरूपाचे लोक राहतात. या जाती नसून मनोवृत्ती आहेत. आपण आसुरी संपत्ती किंवा आसुरी गुण कोणते ते व्यवस्थित समजून घ्यायला हवे. अशा गुणांचा त्याग करायला हवा. समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोधात मूर्खांची लक्षणे सांगितली. दासबोधाला आधुनिक वेद असे म्हणतात. ती मूर्खता आपल्यात यायला नको म्हणून दक्षता घ्यायला हवी. त्यासाठी संत सत्पुरुषांच्या विचारांचे श्रवण करायला हवे. त्याचप्रमाणे आसुरी गुण आपल्यात येऊ नये यासाठी ते समजून त्यासाठी प्रयत्नशील राहायला हवे.

16.7

प्रवृत्तिं(ञ्) च निवृत्तिं(ञ्) च, जना न विदुरासुराः।
न शौचं(न्) नापि चाचारो, न सत्यं(न्) तेषु विद्यते।।16.7।।

असुरी स्वभावाचे लोक प्रवृत्ति आणि निवृत्ति दोन्हीही जाणत नाहीत. त्यामुळे त्यांच्या ठिकाणी अंतर्बाह्य शुद्धी असत नाही. उत्तम आचरण असत नाही आणि सत्य भाषणही असत नाही.

आसुरी संपत्तीचे लोक प्रवृत्ती आणि निवृत्ती जाणत नाहीत. काय करावे याला प्रवृत्ती म्हणतात आणि काय करू नये याला निवृत्ती म्हणतात. कधी कधी आपल्याला याचे ज्ञान होते पण त्याप्रमाणे वागणे होत नाही.
'जानामि धर्मं न च मे प्रवृत्तिः जानाम्यधर्मं न च मे निवृत्तिः। केनापि देवेन हृदि स्थितेन यथा नियुक्तोस्मि तथा करोमि॥'
अर्जुन आणि दुर्योधन दोघेही द्रोणाचार्यांकडे शिकले. दोघांचे गुरु एकच होते. दुर्योधन वरील श्लोकात म्हणतो, "मी धर्म काय हे जाणतो परंतु माझी ती प्रवृत्ति नाही. मी अधर्म काय हे देखील जाणतो पण मला त्यापासून निवृत्त होता येत नाही."  दुर्योधनाला असे वाईट वागू नये ते समजत होते पण "त्या विचारांपासून मी निवृत्त होऊ शकत नाही" असे दुर्योधन म्हणाला.

आपली अवस्था दुर्योधनासारखी होऊ नये यासाठी सद्ग्रंथांचे वाचन, भगवद्गीतेचे वाचन करायला हवे. मला सगळे समजले आहे हे अज्ञान आहे. आसुरी लोक सत्यपालन करत नाहीत. त्यांचे आचार, विचार शुद्ध नसतात. ते अपवित्र असतात. थोडक्यात स्वच्छ-शुद्ध व पवित्र गोष्टींचा अभाव आसुरी लोकांमध्ये असतो.


16.8

असत्यमप्रतिष्ठं(न्) ते, जगदाहुरनीश्वरम्।
अपरस्परसम्भूतं(ङ्), किमन्यत्कामहैतुकम्।।16.8।।

ते आसुरी स्वभावाचे मनुष्य असे सांगतात की हे जग आश्रयरहित, सर्वथा खोटे आणि ईश्वराशिवाय आपोआप केवळ स्त्रीपुरुषांच्या संयोगातून उत्पन्न झाले आहे. म्हणूनच केवळ 'काम' हेच त्याचे करण आहे. त्याशिवाय दुसरे काय आहे?

भगवान म्हणतात "हे अर्जुना! हे जगत आपले आश्रयस्थान आहे हे त्यांना समजत नाही. ते जगदीश्वराला मानत नाहीत."
डॉक्टर आपले मन दाखवू शकत नाही पण मन आहे हा आपला विश्वास आहे. आसुरी लोक 'ही सृष्टी केवळ स्त्री-पुरुष संयोगातून, कामभावनेच्या आकर्षणातून निर्माण झालेली आहे' असे मानतात आणि त्यामुळे ते तिचा विनाश करण्यासाठी प्रवृत्त होतात. आज-काल स्त्री पुरुषांमधील चांगले संस्कार कमी झाले आहेत. 
Live in relationship एवढेच त्यांना माहीत असते. कामनांमुळे प्रजोत्पत्ती होते असे विचार आसुरी प्रवृत्तीच्या लोकांचे असतात. वास्तविक विवाहधर्म आपल्या संस्कृतीत आदर्श मानला आहे.

16.9

एतां(न्) दृष्टिमवष्टभ्य, नष्टात्मानोऽल्पबुद्धयः।
प्रभवन्त्युग्रकर्माणः, क्षयाय जगतोऽहिताः।।16.9।।

ह्या खोट्या ज्ञानाचा अवलंब करून ज्यांचा स्वभाव भ्रष्ट झाला आहे आणि ज्यांची बुद्धी मंद आहे असे सर्वांवर अपकार करणारे क्रूरकर्मी मनुष्य केवळ जगाच्या नाशाला समर्थ होतात.

आसुरी लोकांचा असा दृष्टिकोन असल्याने, ते याच विचाराच्या आश्रयाने चालतात. मी कोण आहे आणि कशासाठी या पृथ्वीतलावर आलो आहे याचे चिंतन ते करीत नाही. फक्त drink, eat and merry  एवढेच त्यांना माहीत असते. जगाचे अहित करणारे, जगाचा विनाश करणारे दहशतवादी हे असेच असतात. दुसऱ्यांना मारून स्वतः आनंदी होणारे आणि जगाचा नाश करण्यासाठी कार्यरत राहणारे हे असुर असतात. संपूर्ण जीवन वस्तूंचा संग्रह करण्यासाठी, पैसे कमावण्यासाठी हे लोक घालवतात. या उलट सज्जन लोक सर्वांच्या हिताचा विचार करतात.
अशाप्रकारे भगवान आपल्याला दैवी आणि आसुरी संपत्ती युक्त लोकांची लक्षणे सांगून असे सांगतात की जर आपल्यात काही आसुरी गुण असतील तर आपण त्यांना दूर करून दैवी गुण धारण करावे. आजचे सगळे विचार परमात्म्याच्या चरणी अर्पण करून विवेचनाची सांगता झाली आणि प्रश्नोत्तरांना सुरुवात झाली.

प्रश्न उत्तरे -
१- सतीश दादा
- मी गीता शिकतो आहे तेव्हा मी माझ्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्यायला हवे का?
 उत्तर- भगवद्गीतेच्या सतराव्या अध्यायात हे विस्तृतपणे सांगितले आहे. ज्याप्रमाणे शरीराला पोषणासाठी खाद्य लागते तसेच सगळ्या इंद्रियांचेही खाद्य असते. गीतारुपी गंगेचे जल प्राशन केल्यास विवेक जागृती होऊन काय खावे आणि काय खाऊ नये हे समजते. त्यानुसार मनाला सावध करून, चुकीचे खाऊ नये.
भगवंत आपल्या अंतरंगी वसलेले आहेत व तेच वारंवार आपल्याला योग्य-अयोग्य काय याचा इशारा देत असतात. 
अंतर में स्थित रहकर, मेरी बागडोर पकड़े रहना|
निपट निरंकुश चंचल मन को, सावधान करते रहना ||

२- प्रफुल्लजी - प्रभवंत्युग्रकर्माण: अर्थ काय?
उत्तर- क्रूर कर्म करण्यासाठी प्रवृत्त होणारे, दुसऱ्यांचे अहित करणारे, बलात्कार करणारे वगैरे असा याचा अर्थ आहे.

३.१- प्रमोद जी - क्षमा करणे हा सद्गुण आहे असे तुम्ही सांगितले. क्षमा करणे केव्हा योग्य असते हे समजावून सांगा.
उत्तर- कर्तव्य करताना जर मारावे लागले तर हे अयोग्य नसून क्षमाच आहे. जसे चुकल्यावर आई मुलाला मारते. ते मारणे त्याच्या कल्याणासाठीच असते.
३.२- मी कधी कधी गीता वाचतो कधी वाचत नाही असे माझ्याकडून का घडते?
उत्तर- माणूस हा स्वभावतःच आळशी आहे. एखाद्या दिवशी जरी असे झाले तरी दुसऱ्या दिवसापासून नियमितपणे वाचन करावे. एखादे चंचल बालक सतत घराबाहेर पळते त्याला आई पकडून घरात आणते. तसेच आपणही चंचल मनाला स्थिर करून मार्गावर आणावे. सहाव्या अध्यायात हीच गोष्ट भगवंतांनी सांगितली आहे. नियमित अभ्यासाने हे साधेल.

अशाप्रकारे आजचे सुंदर विवेचन प्रश्नोत्तरानंतर संपले.
।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।