विवेचन सारांश
ॐ तत् सत् चे महत्त्व

ID: 4606
मराठी
रविवार, 31 मार्च 2024
अध्याय 17: श्रद्धात्रयविभागयोग
3/3 (श्लोक 16-28)
विवेचक: गीता विशारद डॉ आशू गोयल जी


प्रार्थनेने विवेचनाला सुरुवात झाली.
भगवंताच्या कृपेने आपल्या सर्वांचा भाग्योदय झाला आहे, ज्यामुळे आपण आपल्या मानवजन्माचे सार्थक करण्यासाठी गीतेच्या मार्गावर मार्गस्थ झालो आहोत. आपले या जन्मीचे, पूर्वजन्मीचे किंवा आपल्या पूर्वजांचे पुण्यफळ किंवा एखाद्या जन्मी एखाद्या संत महात्म्याची कृपादृष्टी आपल्यावर झाली त्यामुळे आपण गीतेच्या अभ्यासासाठी निवडले गेलो आहोत.
सतराव्या अध्यायाचे निरूपण दोन आठवड्यापासून आपण करत आहोत.
यो यच्छ्रद्ध: स एव स: || १७.३|| ज्याची जशी श्रद्धा तसे त्याचे व्यक्तिमत्त्व असे भगवंतांनी सांगितले. एखाद्या युवकाला इलेक्ट्रोनिक उपकरणे, क्रीडा यात रुची असते, दुसरा अभ्यासासोबत घरच्यांना व्यवसायात मदत करतो, आणि गीता परिवाराप्रमाणे काही युवक-युवती सुंदर श्लोक उच्चारण आणि विवेचनही करतात. त्यांना बघून ते पूर्व जन्मीचे योगी असल्याची खात्री पटते. जशी श्रद्धा तसे व्यक्तिमत्त्व घडते. ज्ञानेश्वर महाराजांनी सोळाव्या वर्षी लिहिलेली ज्ञानेश्वरी, आदि शंकराचार्यांनी संपूर्ण देशाला एकसंध करून बौद्ध विचारांपासून हिंदू विचारांकडे पुनः प्रेरित करण्यासाठी केलेले प्रचंड कार्य किंवा स्वामी विवेकानंदांचे जीवन हे आजही आपल्यासाठी आदर्श आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी एकविसाव्या वर्षी, आदि शंकराचार्यांनी बत्तिसाव्या वर्षी आणि स्वामी विवेकानंदांनी वयाच्या एकोणचाळीसाव्या वर्षी आपली जीवनयात्रा संपवली. इथे या सर्वांची कमी वये, रूप, वाणी असे सर्व मुद्दे गौण ठरतात. त्यांची जशी श्रद्धा होती तसे त्यांचे व्यक्तिमत्त्व घडले हाच केवळ महत्त्वाचा मुद्दा.
हीच गोष्ट समजावताना स्वामी विवेकानंद म्हणतात – मनुष्य विचारशील प्राणी आहे. तो जसा विचार करतो तसाच तो बनतो. हे एकदा समजले की, आपल्या विचारांची खोली का वाढवावी हे लक्षात येते. केवळ मौजमजा हवी, जास्त खोलात जाऊन का विचार करावा अशी वृत्ती असेल तर जीवनाचा स्तरदेखील उथळ राहील. गेल्या आठवड्यात समजून घेतलेले यज्ञ, दान, तप केले नाही तर आयुष्य निम्न स्तरावरच राहील.
Without high virtues we cannot have high level of life. –उच्च विचारसरणी असेल तरच उच्च जीवन शक्य आहे.
शारीरिक (१७.१४) आणि वाणीच्या (१७.१५) तपानंतर भगवंत मानसिक म्हणजे मनाच्या तपाबद्दल सांगत आहेत.

17.16

मनः(फ्) प्रसादः(स्) सौम्यत्वं(म्), मौनमात्मविनिग्रहः|
भावसंशुद्धिरित्येतत्, तपो मानसमुच्यते||17.16||

मनाची प्रसन्नता, शांत भाव, भगवत्चिंतन करायचा स्वभाव, मनाचा निग्रह आणि अंतःकरणातील भावांची पूर्ण पवित्रता हे मनाचे तप म्हटले जाते.

प्रसाद - मंदिरात दर्शनानंतर दिला जाणारा खाण्याचा पदार्थ म्हणजे प्रसाद असे आपल्याला वाटते. मात्र संकृतमध्ये प्रसाद म्हणजे प्रसन्नता (Happiness). तर मग मंदिरात दिल्या जाणार्‍या पदार्थाला प्रसाद का म्हणतात? मंदिरात जाऊन त्या देवाचे दर्शन घेऊन दान देणे, नवस फेडणे आणि त्याला प्रसन्न करणे हा दर्शनामागचा हेतू असतो. देवाच्या प्रसन्नतेचा भाग पेढे, साखर आदि प्रसादाच्या भौतिक रूपात स्थापित करून आपल्याला सांगितले जाते की, देव तुमच्यावर प्रसन्न आहेत. त्यामुळे प्रसादाचा स्वाद महत्त्वाचा नसतो आणि त्याचा अनादर करू नये कारण तो देवाची प्रसन्नता आहे असे मानले जाते.
अनुकूल- प्रतिकूल दोन्ही परिस्थितीत प्रसन्नतेचा समान भाव राखणे हे तप असते. केवळ अनुकूल परिस्थितीत प्रसन्न राहणारे मन नेहमी प्रसन्न राहू शकत नाही. मात्र दोन्ही परिस्थितींचा विचार न करता जो कायम आनंदात स्थिर असतो, त्याची प्रसन्नता कोणत्याही प्रसंगात वाढत किंवा घटत नाही. नुकसान झाले, चोरी झाली तरी अशा मनुष्याच्या मनातली प्रसन्नता कमी होत नाही. ज्याची प्रसन्नता भौतिक साधनांवर अवलंबून आहे – मला काहीतरी मिळाले, कोणीतरी भेटले, काहीतरी घडले तरच मी प्रसन्न होईन – परिस्थितीच्या अशा संयोग वियोगावर ज्याच्या प्रसन्नतेचे सूत्र आधारित असते, त्याला मानसिक तप करणे शक्य नाही. मनाच्या प्रासादिक स्थितीमुळे जीवनातल्या घटनांचा प्रभाव मनाच्या सहजतेवर पडत नाही. याला भगवंत मानसिक तप म्हणतात.
घशाचा कर्करोग झालेला असताना देखील रामकृष्ण परमहंसांच्या चेहर्‍यावर त्याची वेदना न जाणवता नेहमी स्मित हास्य असे. त्यांचे शिष्य नरेंद्रांनी (स्वामी विवेकानंद) जेव्हा त्यांना विचारले की, हे कसे शक्य आहे? त्यावर त्यांनी उत्तर दिले की, पीडा शरीराला होते. त्याकडे मी लक्ष देत नाही. मात्र ही मानसिक तपाची अत्यंत उच्च स्थिती आहे. सामान्य दृष्ट्या आपल्याला हे अशक्य वाटू शकते. मात्र छोट्या-छोट्या बर्‍यावाईट गोष्टी सहन करण्याची क्षमता आपल्यात आहे का हे आपण तपासून पाहू शकतो. थोडे जरी मनाविरुद्ध झाले तर आपण ते बाजूला सारून पुढे जातो की, त्यात अडकून बसतो, सगळ्यांना सांगत राहतो, इतरांवर त्याचा राग काढतो हे तपासून पाहूया.

सौम्यत्व – कुटुंबातील काही जणांचे वागणे, बोलणे, चेहरा यात कठोरता असते. अशा लोकांच्या सहवासात सहसा कोणाला राहायला आवडत नाही. कठोरता म्हणजे सौम्यत्वाचा अभाव. आपली उपस्थिती इतरांना आकर्षित करणारी हवी. आपली वाणी, स्वभाव, व्यवहार, स्वरूप यातून कोणतीच हिंसा, कठोरता, कपट, खोटेपणा वाटता कामा नये. काही जणांना भेटूनच मन शांत होते. त्यांचा चेहरा, शांत व्यक्तित्व, सरळ स्वभाव इतरांना शांत करतो. इतरांच्या चुकीच्या गोष्टी जो सहिष्णू सहन करतो तोच सौम्य असतो.

मौन – इथे वाणीने मौन राहणे हा अर्थ अपेक्षित नाही तर मौन म्हणजे मनन. ऐकलेले प्रवचन, विवेचन, केलेला स्वाध्याय यातून जे मुद्दे मनाला भावतात, ते बराच काळ मनात घोळणे म्हणजे मनन. जे ऐकले ते आवडून तात्पुरती प्रशंसा केली, मात्र थोड्या वेळानंतर ते मनात टिकलेच नाही तर त्याचा काय उपयोग! चांगल्या गोष्टींचे मनन करण्याचा स्वभाव बनला तर वाईट गोष्टींचे मनन करण्यासाठी वेळ शिल्लक राहत नाही. मनाला नेहमी वाईट गोष्टींचे चिंतन करायची सवय असते. इतरांच्या बाबतीत घडलेल्या एखाद्या बर्‍या वाईट घटनेबद्दल आपल्याला अर्धवट काही माहिती मिळाली तर आपले मन त्याला आपल्यापुरत्या मागच्या पुढच्या लिंक जोडून त्याचा विचार करत बसते. अशा नकारात्मक गोष्टींच्या कड्या जोडण्याऐवजी सकारात्मक गोष्टींचे चिंतन करावे. त्यामुळे मानसिक तप होईल. वाईट गोष्टींचा विचार करण्यास वेळ शिल्लक राहणार नाही. विवेचनातील एखादा सिद्धांत, दृष्टांत, श्लोक, चौपाई, कथानक जे काही आवडले असेल त्याची मनात वारंवार उजळणी करा. दही घुसळून लोणी काढले जाते तसे विचारांचे मंथन करा.

आत्मविनिग्रह – मौन म्हणजे नकारात्मक गोष्टींचे चिंतन करण्यापासून स्वतःला रोखणे. जे नाही करायचे त्याचा निषेध करणे. इतरांबद्दल मी वाईट बोलणार नाही, ऐकणार नाही, विचार करणार नाही. दुसर्‍यांबद्दल चुकीची चविष्ट बातमी घेऊन कोणी आला तर ऐकण्यास सरळ नकार द्यावा. कारण ती ऐकून आपण स्वतःचे कसे भले करणार? हा सर्व नकारात्मक कचरा आत जाण्यापासून रोखण्याचा निग्रह करणे म्हणजे आत्मविनिग्रह. कुटुंबातील एखाद्याच्या वागण्याबद्दल आपण अपुर्‍या माहितीच्या आधारावर मनातल्या मनात कथानक रचून त्यावर चिंतन करत बसतो. त्याच्या आधारावर त्याच्यासाठी एकतर्फी निर्णय घेऊन त्याला चुकीचे ठरवतो. त्यात आपलेच नुकसान आहे. आत्मविनिग्रह न केल्याने असे होते. दुसर्‍यांच्या दोषांचे चिंतन आपण का करावे? इतर लोक आपल्याबद्दल चांगला वाईट काय विचार करतात याचा विचार करत राहणे यात बुद्धीमानता नाही.

भावसंशुद्धी – मनाची प्रसन्नता --> मौन -->आत्मविनिग्रह हे स्तर पार केले की भावसंशुद्धीची स्थिती प्राप्त होते. ती थेट मिळणार नाही. आपले मन कसे आहे? त्यातील विचार चांगले आहेत की वाईट हे पाहावे. सिग्मुंड फ्रॉइड (Sigmund Freud) या मानसशास्त्रज्ञाने एक सूत्र दिले की, मनात येणारे वाईट विचार प्रामाणिकपणे कागदावर लिहून कोणालाही न दाखवता, न सांगता नंतर फाडून फेकून द्यावे. जितकी पाने लिहायची तितकी लिहावी. असे करणे मात्र दहा लाखात एकालाच जमते. इतरांमध्ये ही हिम्मत नाही. कारण मन नेहमी वाईट विचारांनी भरलेले असते. अशा गोष्टी उघड व्यक्त करण्याची देखील लज्जा वाटते. असे अपवित्र मन पवित्र केले तर तो मनाचा संयम आहे.
बालकांडात पुष्पवाटिका प्रसंगात जेव्हा रामाने सीतेला दुरून पाहिले तेव्हा मनात दाटलेल्या भावना लक्ष्मणाला सांगताना ते म्हणतात, की सीतेला पाहून माझ्या मनात प्रीती जागृत झाली आहे. मात्र,
रघुबंसिन्ह कर सहज सुभाऊ। मनु कुपंथ पगु धरइ न काऊ॥
मोहि अतिसय प्रतीति मन केरी। जेहिं सपनेहुँ परनारि न हेरी||
रघुवंशीयांचा स्वभाव आहे की त्यांचे मन चुकीच्या मार्गावर जात नाही. माझ्या मनाने जागेपणीच काय तर स्वप्नातही कधी परस्त्रीवर दृष्टी टाकली नाही.
म्हणून ते मर्यादा पुरुषोत्तम आहेत. स्वप्नातही जो विचार आला नाही तो जागेपणी आज का येत आहे याबाबतीतही ते दक्ष आहेत की काही चुकीचे घडू नये. भावासोबत चर्चा करताना त्यांना भीती नाही की तो काय विचार करेल. कारण मनात सत्यता, भावशुद्धी आणि प्रामाणिक चरित्र आहे.
मनाची प्रसन्नता, सौम्यत्वाचा भाव, मनन करण्याचा स्वभाव, मनाचा निग्रह करण्याचा स्वभाव, अंतःकरणाला पवित्र करण्याचा प्रयास या पाच बाबतीत जो सदैव प्रयत्नशील असतो तो मनाने तप करतो.
शारीरिक, वाचिक आणि मानसिक तप हे सात्त्विक, राजसिक आणि तामसिक असतात. ते कसे हे भगवंत पुढे सांगतात.

17.17

श्रद्धया परया तप्तं(न्), तपस्तत्त्रिविधं(न्) नरैः|
अफलाकाङ्क्षिभिर्युक्तैः(स्), सात्त्विकं(म्) परिचक्षते||17.17||

फळाची इच्छा न करणाऱ्या योगी पुरुषांकडून अत्यंत श्रद्धेने केलेल्या वर सांगितलेल्या तिन्ही प्रकारच्या तपाला सात्विक तप म्हणतात.

जो फळाची अपेक्षा न करता कर्तव्य म्हणून योग्य कार्य करतो (अफलाकाङ्क्षि) असे योगी परम श्रद्धेने (वरील श्लोकात सांगितल्याप्रमाणे) तीन प्रकारची तपे करतात, त्याला सात्त्विक तप म्हटले जाते. शारीरिक, वाचिक आणि मानसिक तप फलरहित श्रद्धेने केल्यास ते सात्त्विक तप ठरते.

17.18

सत्कारमानपूजार्थं(न्), तपो दम्भेन चैव यत्|
क्रियते तदिह प्रोक्तं(म्), राजसं(ञ्) चलमध्रुवम्||17.18||

जे तप सत्कार, मान व पूजा होण्यासाठी तसेच दूसऱ्या काही स्वार्थासाठीही स्वभावाप्रमाणे किंवा पाखंडीपणाने केले जाते, ते अनिश्चित तसेच क्षणिक फळ देणारे तप येथे राजस म्हटले आहे.

कर्म केल्यावर त्याबदल्यात सत्कार होईल, प्रशंसा होईल, लोक मान देतील, पूजनीय मानतील अशा स्वार्थी भावनेने तप केले किंवा दांभिकतेने, केवळ इतरांना दाखवण्यासाठी (मनात नसताना) केलेले तप राजसिक तप असते. त्याचे फळ हे क्षणिक असते.

17.19

मूढग्राहेणात्मनो यत्, पीडया क्रियते तपः|
परस्योत्सादनार्थं(म्) वा, तत्तामसमुदाहृतम्||17.19||

जे तप मुर्खतापूर्वक हट्टाने, मन, वाणी आणि शरीराला कष्ट देऊन किंवा दुसऱ्याचे अनिष्ट करण्यासाठी केले जाते, ते तप तामस म्हटले गेले आहे.

जेव्हा मूर्खतेने, हट्टाने, स्वतःचे मन, वाणी आणि शरीराला पीडा देऊन किंवा दुसर्‍यांचे अहित व्हावे या भावनेने तप केले जाते ते तामस तप असते. व्रत - उपवासांचे पालन हे शास्त्रविधीनुसार किंवा ज्ञानी गुरूंच्या मार्गदर्शनाप्रमाणे न करता स्वतःच्या मनाप्रमाणे करणे चुकीचे आहे. जसे की, महिनाभर केवळ घोटभर दूध पिऊन उपवास करणे असे मनमर्जीचे विधी हे शास्त्रमान्य नाहीत. अशाने काही लाभ तर होणारच नाही उलट देहाला आजार जडतील, प्रतिकारशक्ती कमी होईल.
तीन प्रकारच्या दानाबद्दल भगवंत पुढे सांगत आहेत.

17.20

दातव्यमिति यद्दानं(न्), दीयतेऽनुपकारिणे|
देशे काले च पात्रे च, तद्दानं(म्) सात्त्विकं(म्) स्मृतम्||17.20||

दान देणेच कर्तव्य आहे', ह्या भावनेने जे दान देश, काळ आणि पात्र मिळाली असता उपकार न करणाऱ्याला दिले जाते, ते दान सात्विक म्हटले गेले आहे.

दान देण्याचा अहंकार वाटला तर ती भावना चुकीची आहे. देणे हे माझे कर्तव्य आहे. देणारे आणि घेणारे अशा दोन गटात माझी पात्रता जर देण्याची असेल, तर माझ्याकडे गरजेपेक्षा जे जास्त आहे ते देणे हे माझे कर्तव्य आहे. माझ्याकडे खूप कपडे आहेत तर ज्यांच्याकडे याची कमतरता आहे त्यांना द्यावे. यात आपण कोणावर उपकार करत नाही. Sharing what we have extra. नाही दिले तर ती चोरी ठरेल. कर्तव्यभावनेने देश, काळ आणि पात्रतेचा विचार करून बदल्यात काही हवे याचा विचार न करता (अनुपकारणे) अशा पाच भावनेने केले जाणारे दान हे सात्त्विक दान असते.
देश – कोणत्या ठिकाणी दान केले जात आहे ते ठिकाण. तीर्थस्थळी केले जाणारे दान श्रेष्ठ असते असे मानले जाते. कोरोना काळात लोग रस्त्याने गावी जात असताना त्यांना केले गेलेले अन्नदान, दुष्काळ, पूर, भूकंप अशा बिकट परिस्थितीत विस्थापितांना आवश्यक सामग्रीचे दान दिले तर ते दानासाठी योग्य स्थळ असते.
काळ – कोरोना, महामारी, दुष्काळ आदि आपत्तीची वेळ
पात्रता – दानासाठी कोण किती पात्र आहे याचा विचार करणे. आपल्या घरी काम करणार्‍याला काही दिले तर तो बदल्यात कामी येईल असा विचार केला जातो. कोणाला दिले तर आपला फायदा होईल याचे गणित मांडले जाते. आपल्या आजूबाजूच्यांना तर नक्की द्यावे. मात्र बदल्यात लाभाची अपेक्षा ठेवू नये. यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कोणी कितीही वाईट असला, हजारोंना मारणारा दहशतवादी असला तरी तो अन्नपाणी आणि औषधे यासाठी अपात्र नाही. तो उपाशी असेल तर त्याला अन्न दिले पाहिजे. इतर गोष्टीत पात्रतेचा विचार करावा.
स्वतःच्या सोयीचा विचार केला तर देश, काल, पात्रता यांचा विचार होत नाही. त्यांचा विचार करण्यासाठी आपल्याला तप करावे लागते. किती द्यावे याचेही काही नियम आहेत.

बृहस्पतीनीती नुसार उत्पन्नाचा दशमांश म्हणजे दहावा भाग दान करावा. उदाहरणार्थ एक लाख उत्पन्न असेल तर दहा हजार दान करावे. शुक्रनीती प्रमाणे उत्पन्नाच्या वीस टक्के दान करावे असे सांगितले आहे. ज्याची जशी योग्यता तसे दान द्यावे. संत महंत सांगतात की, आपल्या रोजच्या एकवीस हजार सहाशे श्वासांमधील एकवीसशे साठ श्वास तरी देवाच्या नामस्मरणासाठी द्यावे.
आपल्याजवळ देण्यासारखे काहीच नाही मग दान कसे देणार असे वाटू शकते. मात्र ते नेहमीच सत्य नसते. हे खालील सुंदर कथेतून जाणून घेऊया.

एकदा एका राज्यात दुष्काळ पडायला सुरुवात झाली. सज्जन, धार्मिक आणि प्रजाहितदक्ष राजाने कुलगुरूंच्या सल्ल्याप्रमाणे यज्ञ करण्याबद्दल राज्यात दवंडी पिटवली. त्या यज्ञामुळे देवता प्रसन्न होऊन पावसाचा वर्षाव करतात. भव्य यज्ञासाठी राजकोशातून व्यवस्था केली जाणार होती. मात्र ज्याची जशी योग्यता असेल त्याने तन, मन, धनाने तशी सेवा द्यावी असे प्रजेला सांगण्यात आले. यथा राजा तथा प्रजा असल्याने राजाच्या सज्जनतेमुळे प्रजादेखील हिरीरीने पुढे आली. मोठ्या व्यापार्‍यांनी आपल्याकडील संपत्तीच्या तिजोर्‍या यज्ञासाठी खुल्या केल्या.  इतर लोक अन्य सेवा देण्यासाठी पुढे आले. महिनाभराच्या यज्ञानंतर त्याच्या पूर्णाहुतीला पावसाचा वर्षाव होऊन यज्ञ सफल झाला. यज्ञभूमीवरील महिन्याभराच्या मुक्कामानंतर वेगवेगळ्या गावातून जमलेले लोक परतू लागले. त्या जमावातील एका साधूला असे जाणवले की, आजूबाजूला ऊन आहे मात्र एक ढग आपल्या डोक्यावर सावली देत आपल्यासोबत येत आहे. आपल्या समूहातील कोणाच्यातरी सेवेवर यज्ञदेवता प्रसन्न झाले असतील असे त्यांनी सर्वांना सांगितले. साधू असल्याने तुमच्याचमुळे असे होत असणार असे सर्व लोक म्हणाले. मात्र त्याचे प्रमाण बघण्यासाठी साधू महाराज जमावापासून लांब जाऊन उभे राहिले. त्यांच्या डोक्यावर ऊन होते कारण आकाशातला ढग जमावाच्याच डोक्यावर स्थिर होता. मग लोकांना वाटले की, ज्या व्यापार्‍याने सर्वात अधिक नऊ पेट्या धनाचे दान केले होते, त्याची पुण्याई असणार. मात्र त्या व्यापार्‍याच्या मते त्याने पापकर्म करून कमावलेले ते धन शुद्ध व्हावे या स्वार्थी भावनेने दान केले होते. लोकांच्या आग्रहाखातर तो देखील जमावापासून दूर उभा राहिला. मात्र ढग त्याच्या मागे आला नाही. हळूहळू लोक आपआपल्या घरी परतू लागले. सुरवातीच्या शंभर दीडशे लोकांमधील मोजके काही शिल्लक राहिले. मात्र सावली देणारा ढग अजूनही त्यांच्या डोक्यावर होता. त्यांच्या मनात उत्कंठा जागृत झाली. आपल्यामध्ये कोण पुण्यशाली आहे हे माहीत करून घेण्यासाठी त्यांनी एकेक करून गटापासून लांब उभे राहण्याचा प्रयोग केला.

शेवटी एक वृद्धा आणि साधू एवढेच शिल्लक राहिले. साधूची परीक्षा आधीच झाली असल्याने वृद्धाच पुण्यशील आहे हे कळताच सर्वांनी तिला प्रणाम केला. तिने यज्ञात काय अर्पण केले असे तिला विचारले. भांबावून ती गरीब वृद्धा म्हणाली, “मला सांगताना देखील लज्जा वाटते. राजाने एवढ्या आपुलकीने सर्वांना आवाहन केले मात्र माझ्याजवळ काहीच नाही या भावनेने मी तीन दिवस रडले. मग काही तरी हातभार लागावा म्हणून घरातून निघताना एक नकली नाणे दारामागे सापडले. सर्वांच्या नकळत तेच मी यज्ञाच्या धनराशीमध्ये टाकले. यज्ञस्थळी दिवसभर जे काम पडेल ते करून जो प्रसाद मिळत असे, तो अर्धा ग्रहण करून उरलेला प्रसाद यज्ञ स्थळाबाहेरील पशूंना खाऊ मी घालत असे. याव्यतिरिक्त मी काहीच केले नाही.” साधू म्हणाला, “नकली नाणे किंवा तुझ्या जेवणातला अर्धा हिस्सा एवढेच तुझे योगदान होते असा विचार करू नकोस. हा व्यापारी ज्याने नऊ पेट्या दान केल्या, त्याच्या घरी शंभर पेट्या धन असतील, त्यातल्या त्याने केवळ नऊ दिल्या. आम्ही सर्वांनी काही ना काही दिले. मात्र आमची पुंजी फार कमी झाली नाही. मात्र तू तर तुझे सर्वस्व अर्पण केलेस . तुझ्याकडचे एक नाणे अशी तुझी सगळी पुंजी तू अर्पण केलीस. जेवण देखील अर्धे दान केलेस. यामुळे यज्ञनारायण प्रसन्न का होणार नाही?”

आपण किती दिले यापेक्षा आपण आपल्या पात्रतेप्रमाणे दिले की नाही हे महत्त्वाचे आहे. मंदिरात शेकडो हजारो रुपयांचे दान करणारे खूप असतात. मात्र एखादा गरीब जेव्हा त्याच्याकडील शिल्लक असलेली शेवटची नोट मोठ्या भक्तीभावाने अर्पण करतो त्यापेक्षा श्रेष्ठ दान दुसरे नाही. कारण तो आपले सर्वस्व दान करत असतो. स्वतः अर्धपोटी जेवून इतरांना दान दिले तर दानाच्या वेगळ्या स्तरावर आपण पोहचू. असे दान सात्त्विक दान असते.


17.21

यत्तु प्रत्युपकारार्थं(म्), फलमुद्दिश्य वा पुनः|
दीयते च परिक्लिष्टं(न्), तद्दानं(म्) राजसं(म्) स्मृतम्||17.21||

परंतु जे दान क्लेशपूर्वक प्रत्युपकाराच्या हेतूने किंवा फळ नजरेसमोर ठेवून दिले जाते, ते राजस दान म्हटले आहे.

गणपती, नवरात्रीच्या सणासाठी वर्गणी मागायला आलेल्यांसोबत रकमेची घासाघीस करून इच्छा नसताना वर्गणी दिली जाते. हे दान आनंद आणि प्रसन्नतेचे नाही तर क्लेशपूर्वक केलेले आहे. प्रत्युपकार म्हणजे मंदिरात सहज प्रवेश मिळेल, लोक सत्कार करतील, देणगीदार म्हणून फलकावर नाव नोंदवले जाईल या अपेक्षेने दान देणे.
फलमुद्दिश्य – दानाच्या बदल्यात विशिष्ट फळ मिळेल या आकांक्षेने दान करणे.
वरील सर्व प्रकारची दाने ही राजसिक आहेत.
प्रसिद्धी मिळावी, नाव व्हावे या अपेक्षेने केलेले दान चुकीचे आहे, त्यापेक्षा दान दिले नाही तरी चालेल अशी टीका बर्‍याचदा केली जाते. मात्र हे राजस दान वाईट आहे असे भगवंत कुठेच सांगत नाहीत. सात्त्विक दान, राजसिक दान अशी विविध स्तरात विभागणी करून ते सांगत आहेत. एखादा बँकेत मुदतठेव (Fixed Deposit) करतो आणि दुसरा आलेला चेक रोख रकमेत वटवतो. कोणाला बदल्यात काहीच न घेता केवळ पुण्यसंचय हवा असतो तर एखाद्याला सत्कार, मान अशी त्वरित फळाची अपेक्षा असते. स्वतः काहीच न करता इतरांनी केलेल्या अशा राजस दानाची निंदा करणे चूक आहे. तामस दानापासून दूर राहावे. मात्र काहीच न देण्यापेक्षा काहीतरी देणे ते राजस असले तरी एकवेळ चांगलेच मानता येईल.

17.22

अदेशकाले यद्दानम्, अपात्रेभ्यश्च दीयते|
असत्कृतमवज्ञातं(न्), तत्तामसमुदाहृतम्||17.22||

जे दान सत्काराशिवाय किंवा तिरस्कारपूर्वक अयोग्य ठिकाणी, अयोग्य काळी आणि कुपात्री दिले जाते, ते दान तामस म्हटले गेले आहे.

अतिशय उपेक्षा किंवा तिरस्काराच्या भावनेने इतरांना दिलेले दान हे तामसीक असते. अयोग्य ठिकाणी, अयोग्य वेळी, अपात्र व्यक्तीला दिलेल्या दानाचा यात समावेश होतो.
जे मिळालेल्या दानाचा सदुपयोग करतील अशा निवडक संस्था, मंदिरे यांना दान द्यावे. मात्र या मुद्द्यावर दान देणे टाळू नये.
बुद्ध एका गावात भिक्षा मागण्यासाठी गेले असता एका घरातील स्त्रीने त्यांना अर्वाच्य भाषेत शिव्या देऊन हाकलून लावले. दुसर्‍या दिवशीही तसाच प्रकार घडला. तेव्हा त्यांचा शिष्य म्हणाला की, उद्यापासून आपण या स्त्रीचे घर टाळून दुसर्‍या रस्त्याने जाऊया. मात्र तथागत बुद्धांनी आपले कार्य सोडले नाही. पुन्हा काही दिवस तसेच घडल्याने शिष्याने कारण विचारले. तेव्हा बुद्ध म्हणाले, “त्या स्त्रीने तिचा शिव्या देण्याचा स्वभाव सोडला नाही तर मी माझा भिक्षा मागण्याचा स्वभाव का सोडू? ती तामसिक असली तरी मी माझी सात्त्विक वृत्ती का त्यागावी? भिक्षा मागणे हे माझे कर्तव्य आहे.” सातव्या दिवशी जेव्हा बुद्ध पुन्हा तिच्या घरापाशी पोचले, तेव्हा ती तावातावाने घराबाहेर आली आणि तिरस्काराने चुलीतली राख बुद्धांच्या झोळीत टाकली. रोज केवळ शिव्या मिळत होत्या. आज तर आधीच्या घरामध्ये मिळालेली झोळीतील भिक्षादेखील राखेमुळे खराब झाल्याने शिष्याला वाईट वाटले. मात्र तिरस्काराने का होईना, काहीतरी देण्यासाठी तिचा हात आज वर झाला म्हणून बुद्ध आनंद साजरा करू लागले. कारण हळूहळू तिचे संस्कार नक्कीच बदलतील हे त्यांना ठाऊक होते. पंधराव्या दिवशी तिने बुद्धांच्या दिशेने चपाती फेकून मारली. तिच्या देण्यात उपेक्षा आणि तिरस्कार होता. मात्र काहीच न देणार्‍यापेक्षा ती चांगली आहे. म्हणून नेहमी देण्याचा स्वभाव असावा.

17.23

ॐ तत्सदिति निर्देशो, ब्रह्मणस्त्रिविधः(स्) स्मृतः|
ब्राह्मणास्तेन वेदाश्च, यज्ञाश्च विहिताः(फ्) पुरा||17.23||

ॐ' , तत्, सत् अशी तीन प्रकारची सच्चिदानंदघन ब्रह्माची नावे सांगितली आहेत. त्यापासून सृष्टीच्या आरंभी ब्राह्मण, वेद आणि यज्ञादी रचले गेले आहेत.

इथे भगवंत एका नवीन सिद्धांताचे निरूपण करत आहेत.




– ओंकार अक्षर, प्रणव, ब्रह्म, निर्गुण, साकार, माया, ओंकार आदि विविध नावे आहेत.
ॐ अक्षर लिहिले तर ते साकार असते. मात्र सर्व लोक त्याला साकार रूपात बघत नाही. त्याचे विना अक्षर रूपात चिंतन केले तर ते निराकार बनते. ॐ हे अक्षर आणि शब्द दोन्हीही आहेत हे त्याचे वैशिष्ट्य आहे. त्याचा ध्वनी शब्दातीत आहे. त्या ध्वनीला नादब्रह्म म्हणतात. संसाराचा प्रभव- प्रलय- पुन्हा प्रभव अशी निरंतर यात्रा सुरू आहे. सर्व संप्रदायांत (शैव, वैष्णव, शाक्त आदि) इतर बाबतीत मतभेद असले तरी ॐ मान्यतेबाबत सर्वांमध्ये एकमत आहे. सर्व भारतीय दर्शने ॐ ला मानतात.
ॐ गणेशाय नमः, ॐ नमः शिवाय, ॐ श्री परमात्मने नमः असे प्रत्येक देवतेच्या पूजनात आधी ॐ? का असतो?
A,B,C,D अशा २६ अक्षरांबद्दल (alphabets) कोणी म्हणाले की, मी केवळ H ला अक्षर मानतो इतर नाही तर ते मूर्खपणाचे ठरेल. त्याचप्रमाणे मी केवळ गणेशाला मानतो, विष्णूला नाही. शिवाला मानतो म्हणून रामाला नाही तर ते योग्य नाही. या सर्वांना मिळून ॐ बनतो म्हणून तो अग्रस्थानी आहे. कोणत्याही देवतेच्या स्तुतीत ॐ असले की त्याला पूर्णता येते.
देवनागरीमध्ये ॐ ला अ, उ, म आणि हलंत (्) अशा चार भागात विभागले जाते. त्याच्या उच्चारणाचे चार भाग आहेत- अकार, उकार, मकार आणि हलंत (्)
अकार – याचा शब्द वैखरी. जो बोलता येतो, ऐकू येतो असा हा शब्द. हा स्थूल असून उच्चार कंठातून होतो. देवता ब्रह्म, जागृत स्थिती, कार्य उत्पत्ती होते, करण कर्मेंद्रिय आणि गुण रजोगुण आहे.
उकार – शब्द मध्यमा. उच्चारण केले तर कंठातून हृदयात पोचतो. अकारापेक्षा याचा स्वर सूक्ष्म आहे. विष्णू देवता, स्थिती स्वप्न, पुष्टीचे कार्य, ज्ञानेंद्रिय करण आणि हा सत्त्वगुणी आहे.
मकार – याचा उच्चार कंठ किंवा हृदयातून न होता नाभीतून होतो. रूप कारण (संकल्प मात्र) आहे. रामतीर्थ यांना एकदा मनात सरबत पिण्याची इच्छा झाली आणि एक शेठ हातात लिंबू, साखर घेऊन त्यांच्याकडे आले. केवळ संकल्पाने त्यांना सिद्धी झाली. शंकर देवता, सुषुप्ती स्थिती, संहाराचे कार्य, अंतःकरण याचे कारण आणि तमोगुणी आहे.
हलंत (्) – याचा शब्द परा म्हणजे ज्याला शब्द, उदाहरण यापैकी कशातही समजावून देता येत नाही.
जद्यपि ब्रह्म अखंड अनंता। अनुभव गम्य भजहिं जेहि संता। -रामचरितमानस
[मला प्रगाढ भक्ती, वैराग्य, सत्संग आणि तुमच्या चरणकमळांचा अतूट स्नेह प्राप्त व्हावा. परंतु तुम्ही अखंड आणि अनंत ब्रह्म आहात. जे केवळ अनुभवाने जाणून घेता येते आणि संत ज्याचेच भजन करतात.]

ज्याचे हलंत सिद्ध होते त्याचे समष्टीवर नियंत्रण येते. १४०० वर्षांचे चांगदेव महाराज एकदा ज्ञानेश्वर महाराजांची कीर्ती ऐकून वाघावर बसून त्यांच्याकडे आले. लोक हतप्रभ होऊन बघत राहिले. ज्ञानेश्वर महाराजांना निरोप मिळताच ते म्हणाले, आपण त्यांच्या स्वागतासाठी जाऊया. छोटी मुक्ता म्हणाली, “आपण कसे जाणार? ते तर वाघावर बसून येत आहेत. आपल्याकडे तर काहीच नाही.” सर्व भावंडे त्यावेळी एका भिंतीवर बसली होती. ज्ञानेश्वर महाराजांनी त्या भिंतीला आदेश दिला आणि ती चालू लागली. चांगदेव महाराज वाघावरुन उतरून म्हणाले, “माझ्या सर्व सिद्धी व्यर्थ आहेत. १४०० वर्ष तप करून मी केवळ या सजीव वाघाला काबूत आणले. तुम्ही केवळ सोळा वर्षाचे आहेत आणि या निर्जीव भिंतीला देखील नियंत्रणात आणले.”
हलंतचे रूप शून्य, देवता ब्रह्म आहे. जागृत, स्वप्न, सुषुप्ती यांच्या पार असलेली तुरीय याची स्थिती आहे. कार्य सत्ता, अस्तित्व करण आणि तिन्ही गुणांच्या पलीकडे हा गुणातीत आहे.
असा हा ओंकार संपूर्ण आहे. त्याला अग्रस्थानी ठेवल्याने सर्व कार्य सिद्धीस जातात. ॐचा जप केवळ संन्याशांनी करावा. इतरांनी ॐ शांति शांति शांति असा जप करावा. वेदव्यासांनी गीतेतील अध्यायांच्या अखेरीस पुष्पिकेत ॐ तत् सत् असे टाकले आहे. त्याचे कारण श्लोकांचे पठण करताना प्रमादाने, जाणूनबुजून काही चूक झाली तर त्याचा दोष आपल्याला लागत नाही. म्हणून संतमहात्मे देखील विवेचनानंतर ॐ तत् सत् म्हणून समापन करतात.

तत् - जो मन आणि इंद्रियान्द्वारे ग्राह्य आहे, समजून घेता येतो( इदं ) आणि जे मन आणि इंद्रियांच्या पलीकडे आहे (अदः) या दोघांना जोडले तो तत् असतो. ज्याला आपण मानतो, जसे की गुरु, एखादा विग्रह, एखादा मंत्र हा आपल्यासाठी तत् असतो. हा अनित्य आहे. एकं ब्रह्म द्वितीयो नास्ति (आदि शंकराचार्य) भगवंताच्या स्वरूपाला ज्या अधिष्ठानात प्रतिरूप केले जाते ते तत् असते.

सत् – शब्दाचे दोन अर्थ आहेत. एक म्हणजे सत्त्व – अनादि-अनंत (everlasting, eternal) जे बदलत नाही आणि दुसरा अर्थ म्हणजे सत्य (essence ,truth).
आदि सच जुगादि सच, है भी सच, नानक होसी भी सच। जे आधी होते तेही सत्य होते, आता आहे तेही सत्य आहे,नंतर असेल तेही सत्यच राहील. तोच परमेश्वर आहे.
ॐ तत् सत् म्हटले की बाकी काही शिल्लक नसते.


17.24

तस्मादोमित्युदाहृत्य, यज्ञदानतपः(ख्) क्रियाः|
प्रवर्तन्ते विधानोक्ताः(स्), सततं(म्) ब्रह्मवादिनाम्||17.24||

म्हणून वेदमंत्रांचा उच्चार करणाऱ्या श्रेष्ठ पुरुषांच्या शास्त्राने सांगितलेल्या यज्ञ, दान व तपरुप क्रियांचा नेहमी 'ॐ' या परमात्म्याच्या नावाचा उच्चार करुनच प्रारंभ होत असतो.

लोकांना प्रश्न पडतो की, मंत्र जप कसा करावा- करू नये हे कुठे लिहिले आहे? मी तर मनमर्जीने करेन. त्याचे उत्तर भगवंत या श्लोकात देतात. यज्ञ, दान, तप आदि क्रिया करताना वेदशास्त्रात सांगितल्याप्रमाणे ओम किंवा ओंकार सहित वेद मंत्राचा शास्त्रात सांगितलेल्या नियमांप्रमाणे जप केला जातो.

17.25

तदित्यनभिसन्धाय, फलं(म्) यज्ञतपः(ख्) क्रियाः|
दानक्रियाश्च विविधाः(ख्), क्रियन्ते मोक्षकाङ्क्षिभि:||17.25||

तत्' या नावाने संबोधिल्या जाणाऱ्या परमात्म्याचेच हे सर्व आहे, या भावनेने फळाची इच्छा न करता नाना प्रकारच्या यज्ञ, तप व दानरुप क्रिया कल्याणाची इच्छा करणाऱ्या पुरुषांकडून केल्या जातात.

तत् ची व्याख्या यात केली आहे.

17.26

सद्भावे साधुभावे च, सदित्येतत्प्रयुज्यते|
प्रशस्ते कर्मणि तथा, सच्छब्दः(फ्) पार्थ युज्यते||17.26||

सत्' या परमात्म्याच्या नावाचा सत्य भावात आणि श्रेष्ठ भावात प्रयोग केला जातो. तसेच हे पार्था! उत्तम कर्मातही 'सत्' शब्द योजला जातो.

जे उत्तम आहे त्याला सत् म्हटले जाते. सत्कर्म(उत्तम कर्म), सत्संग(चांगला संग), सद्भावना(उत्तम भावना), सदुपयोग (श्रेष्ठ उपयोग).

17.27

यज्ञे तपसि दाने च, स्थितिः(स्) सदिति चोच्यते|
कर्म चैव तदर्थीयं(म्), सदित्येवाभिधीयते||17.27||

तसेच यज्ञ, तप व दान यांमध्ये जी स्थिती (आस्तिक बुद्धी) असते, तिलाही सत् असे म्हणतात आणि त्या परमात्म्यासाठी केलेले कर्म निश्चयाने 'सत्' असे म्हटले जाते.

जे कर्म भगवंतासाठी, त्याला प्रसन्न करण्यासाठी केले जातात ते सत्कर्म बनतात.
या अध्यायाचा पाया ज्या बाबतीत अर्जुनाने प्रश्न केला होता, त्या श्रद्धेच्या मुद्द्यावर भगवंत पुन्हा येतात आणि शेवटची अट पुढील श्लोकात सांगतात.

17.28

अश्रद्धया हुतं(न्) दत्तं(न्), तपस्तप्तं(ङ्) कृतं(ञ्) च यत्|
असदित्युच्यते पार्थ, न च तत्प्रेत्य नो इह||17.28||

हे अर्जुना! श्रद्धेशिवाय केलेले हवन, दिलेले दान, केलेले तप आणि जे काही केलेले शुभ कार्य असेल, ते सर्व 'असत्' म्हटले जाते. त्यामुळे ते ना इहलोकात फलदायी होत ना परलोकात.

श्रद्धेशिवाय केलेले यज्ञ, दान, तप हे असत् बनते. या तिन्ही कर्मांना असत् पासून सत् बनवण्यासाठी जे तत्त्व आहे ते म्हणजे श्रद्धा. अशी श्रद्धेची श्रेष्ठता सांगून भगवंत अध्यायाची सांगता करतात.
हरी नामसंकीर्तन करून विवेचनाची सांगता झाली.

प्रश्न उत्तरे

पद्मिनी ताई-
प्रश्न – बर्‍याचदा शांत राहावं असे वाटत असले तरी समोरच्याचा व्यवहार, चुकीचे वर्तन अपशब्द बोलण्यास भाग पाडतात. मात्र त्यामुळे स्वतःचे मन अस्थिर होते. यातून कसे बाहेर पडावे?
विवेचक – दुसर्‍याला अपशब्द बोलून त्याला आपला मुद्दा पटेलच याची शाश्वती नसते. तार्किक दृष्ट्या आपला मुद्दा पटवून देता येतो. आपण काही बोललो अथवा नाही तरी समोरच्याचा स्वभाव बदलत नाही. त्यामुळे वाईट बोलून आपण स्वतःला अशांत का करावे? स्वतःला शांत ठेवणे हे आपल्या हातात आहे. समोरच्याचा व्यवहार आपल्याला अपशब्द बोलायला भाग पाडतो यात सत्यता नाही. त्यात खरा मुद्दा अपेक्षेचा आहे. समोरच्याचा व्यवहार आपल्या अपेक्षेपेक्षा भिन्न असतो म्हणून आपण रागावतो. भगवंतांनी आपल्याला केवळ स्वतःचे मन आणि वाणी यांच्यावर नियंत्रण करण्याची ताकद दिली आहे. जगातील इतरांचे मन आणि वाणी बदलण्याची ताकद आपल्यात नाही.

स्वाती ताई-
प्रश्न- दान दिल्यावर वाटणार्‍या अहंकारापासून कसे दूर राहावे?
विवेचक – देणे हे आपले कर्तव्य आहे. नाही दिले तर ती चोरी आहे. रोजच्या जेवणातील काही हिस्सा आपण पशू, कीटक यांनाही देतो. शेतातून घरी नेताना धान्य जर रस्त्यावर सांडले तर त्यावर जगणार्‍या साधू संतांचा त्यावर अधिकार आहे या भावनेने ते तसेच दान केले जाते. जीवन व्यक्तिगत नसून समष्टी साठी असते. त्यामुळे आपल्या प्रत्येक कर्मात दुसर्‍याच्या अधिकाराचा विचार करण्यात आला आहे. भगवंतांनी दिलेले कौशल्य, धन संपत्ती यावर समाजाचा अधिकार असतो. उपकाराच्या भावनेने दान दिल्यास त्यात अहंकार असतो. त्यात चूकीचे काही नाही. ते दान राजसिक असते. त्यात कर्तव्य भावना आली तर अहंकार नष्ट होऊन ते सात्त्विक दान बनते.

शिवराज दादा -
प्रश्न – ॐ , तत्, सत् याचा अर्थ पुन्हा एकदा सांगाल का?
विवेचक – ॐ म्हणजे पूर्ण ब्रह्माचे आरंभिक स्वरूप. त्याला आपण कोणत्या स्वरुपात बघतो, कोणत्या नावाने पुकारतो ते म्हणजे तत् – विष्णु, राम, शक्ती ज्या रूपात बघायचे ते तत्. सत् – तोच सत्य आहे, बाकी सर्व असत्य आहे. ॐ तत् सत् म्हटले म्हणजे सर्व गोष्टी त्यात पूर्ण होतात.  ब्रह्मांडामध्ये दिसणार्‍या - न दिसणार्‍या, अनुभवास येणार्‍या- न येणार्‍या, मन आणि इंद्रियांना जाणवणार्‍या – त्यांच्या पलिकडच्या त्या सर्व गोष्टी यात पूर्ण होतात.

नीलम ताई –
प्रश्न
- भागवत जाणून घेण्यासाठी कोणते पुस्तक आहे?
विवेचक - गीता प्रेस प्रकाशनाचे श्रीमद्भागवत महापुराण.

सूर्यकांत दादा-
प्रश्न - ॐ बद्दल माहिती देणार्‍या चित्रातील ‘करण’ म्हणजे काय
विवेचक – करण म्हणजे साधन.

समारोपाची प्रार्थना आणि हनुमान चालीसेने सत्राची सांगता झाली.
।।श्रीकृष्णार्पणमस्तु ।।