विवेचन सारांश
अविनाशी, अमृत, ब्रह्माश्रयी त्रिगुण
मागील सप्ताहात आपण चौदाव्या अध्यायातील आठ श्लोकांचे चिंतन केले. या अध्यायाचे नावच आहे ‘गुणत्रयविभागयोग’, म्हणजे तीन गुणांबद्दल चे सविस्तर विवेचन. हे तीन गुण म्हणजेच सत्त्व, रज, तम. ही संपूर्ण प्रकृती या तीन गुणांनीच बनली आहे. जे काही आपण पाहतो, ऐकतो, आकलन करून घेतो, समजून घेऊन उपयोगात आणायचा प्रयत्न करतो ते सर्व ज्ञान या तीन गुणांवरच आधारित आहे. भूतलावर जेवढ्या व्यक्ती आहेत, जे आकाशव्यापी ग्रह, तारे, नक्षत्र आहेत, जी वृक्षवेली, नद्या इत्यादी चराचर जड प्रकृती आहे, ती सर्व काही या त्रिगुणांनीच युक्त आहे. स्वयम् ब्रह्मदेवसुद्धा या त्रिगुणांचीच निर्मिती आहेत. प्रश्न असा येतो की, हे तीन प्राथमिक गुण या सर्वांच्या निर्मितीचे मूळ कसे होऊ शकतात?
एका छोट्या उदाहरणावरून समजून घेऊया _
कधीतरी एखाद्या महत्त्वाच्या बाबीसाठी आपल्याला कलर प्रिंट काढावी लागते. जेव्हा आपण कलर प्रिंट पाहतो तेव्हा लक्षात येतं की त्या एवढ्या अशा छोट्या उपकरणामधून विविध रंगछटा असलेले चित्र प्रिंट होऊन आलेले आहे. आपल्या मनात स्वाभाविकच असा प्रश्न उपस्थित होतो की, या यंत्रामध्ये विविध रंगछटा समाविष्ट केल्या असाव्यात का? प्रत्यक्ष उपकरणाची रचना पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की या कलर प्रिंट मध्ये केवळ C, M, Y, K ( श्याम, मॅजेंटा, येलो व ब्लॅक ) असे रंग समाविष्ट केलेले आहेत. केवळ या चार रंगांच्या सहाय्याने सोळा मिलियन रंगछटांची निर्मिती केली जाते. छोट्या आकाराच्या, कमी किमतीच्या प्रिंटर मधून इतक्या विविध रंगछटांची निर्मिती होते. अधिक क्षमतेच्या प्रिंटर मधून याहून जास्त रंगछटा निर्मिल्या जातात. विशेष म्हणजे हे उपकरण मानवनिर्मित आहे. मनुष्यनिर्मित अशा उपकरणामधून करोडो विविध रंगछटांची निर्मिती होऊ शकते तर या प्रचंड सृष्टीचा निर्माता भगवंत या तीन मूळ तत्त्वांच्या सहाय्याने केवढी प्रचंड निर्मिती करू शकेल याची कल्पनाच केलेली बरी.
आज आपण कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल, झूम अशा विविध साधनांचा उपयोग करून असंख्य रंगछटा निर्माण करू शकतो. या सर्व आधुनिक साधनांची स्क्रीन केवळ R, G, B (रेड, ग्रीन & ब्ल्यू ) या तीन मूळ रंगांनी बनविलेली आहे. आपण अनुभवतो की या केवळ तीन मूळ रंगांवरून रंगांची निर्मिती केली जाते त्याचप्रमाणे सत्त्व, रज, तम या तीन मूलभूत गुणांवर या संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली गेली आहे. यापैकी एखादे तत्त्व सुद्धा पूर्णपणे लोप पावू शकत नाही किंवा एखादे तत्त्व पूर्णतः (शंभर टक्के) व्यापून रहात नाही. या तीनही तत्त्वांचा योग्य मिलाप होत असतो. कोणत्याही पदार्थ, वस्तू, कल्पना, व्यक्ती, परिस्थितींची या तीन गुणांशिवाय निर्माण होऊच शकत नाही. या तीन गुणांच्या मात्रा वेगवेगळ्या असू शकतात परंतु एक मात्र निश्चित आहे की ना कोणी शून्य असतो ना कोणी शंभर टक्के परिपूर्ण असतो. या विवेचनासाठी आणखी एक सोपे उदाहरण पाहूया _.
पाक कौशल्य स्पर्धा ठेवली. हजार महिलांना बटाट्याची भाजी आणि पोळी बनवायला सांगितले. सर्वांना एकाच कंपनीचे गव्हाचे पीठ, एकाच प्रकारचे बटाटे, एकाच कंपनीचे मसाले दिले गेले. पदार्थ बनविल्यानंतर परीक्षण केले असता असे दिसून येते की प्रत्येकीने बनविलेल्या पदार्थाची चव वेगवेगळी होती. वास्तविक पदार्थ एकसारखे म्हटल्यानंतर पदार्थाची चवही एकसारखीच असायला पाहिजे, परंतु वास्तवात असे घडत नाही. विविध महिलांनी बनवलेले पदार्थ पहायलाही वेगवेगळे दिसतात आणि चवीलाही वेगवेगळे लागतात कारण पदार्थ एकच असला तरी बनविण्याची पद्धती वेगळी असल्यामुळे त्या पदार्थाच्या रंग, रूप, चव यामध्ये स्वाभाविकरीत्या बदल होणारच. हीच बाब भगवंताच्या सृष्टी निर्मितीबाबत ही लागू पडते.
या तीन गुणातला कोणताही गुण समाप्त होऊ शकत नाही. उदाहरणार्थ तमोगुण पूर्णपणे काढून टाकायचा ठरवला तरीही तो पूर्णपणे समाप्त होऊ शकत नाही किंवा सत्त्वगुणी असलेली व्यक्ती निरंतर, सातत्याने सत्त्वगुणीच राहते असेही दिसून येत नाही. आपण आपल्या स्वतःचे परीक्षण केले तरीही आपल्याला समजून येते की संपूर्ण दिवसभरात आपल्यात एकच एक गुण दिसून येवू शकत नाही. समजा आपण अतिशय सत्त्वगुणी आहोत तरीही प्रसंगानुसार आपल्यातला रजोगुण वा तमोगुण अचानक वाढलेला दिसतो. रोज नामस्मरण एकाग्रतेने करणाऱ्या आपल्या स्वतःलाच एखादे दिवशी महत्प्रयासानेही आपले मन नामजपात लागत नाहीय असा अनुभव येऊ शकतो. आपण मात्र म्हणत राहतो की का कोणास ठाऊक आज मनच लागत नाही. या मागचे खरे कारण असते की प्रत्येक क्षणाला आपल्या मनातले विचार बदलत राहतात आणि कधीकधी या विचारांना नियंत्रित करणे आपल्याला अशक्य होते. एखादी व्यक्ती एखाद्या क्षणी आपले सर्वस्व समर्पित करायला तयार होते तर एखाद्या क्षणी एखाद्या क्षुल्लक कारणावरून टोकाचा वैरभाव निर्माण होणारी भांडणे होतात. मग हे गुण ओळखायचे तरी कसे? भगवंत म्हणतात _
14.9
सत्त्वं(म्) सुखे सञ्जयति, रजः(ख्) कर्मणि भारत।
ज्ञानमावृत्य तु तमः(फ्), प्रमादे सञ्जयत्युत॥14.9॥
भगवंत सांगत आहेत की एखादी व्यक्ती कोणत्या वेळी, कोणत्या गुणांनी युक्त आहे हे कसे ओळखायचे? जेव्हा मनुष्य सुखात असेल, आंतरिक आनंदात असेल, संतुष्ट असेल तेव्हा तो मनुष्य सत्त्वगुणी आहे हे समजून घ्यावे. कोणत्याही बाह्य सुखासीन प्रवृत्तींचा आधार न घेता अंतर्मनाच्या उर्मीने आनंदीत बनलेला मनुष्य संतुष्ट, समाधानी वा तृप्त दिसतो म्हणजेच तो सत्त्वगुणी आहे हे समजून घ्यावे. त्या क्षणी त्याच्यात सत्त्वगुणाचा अधिक प्रभाव झालेला आहे हे ओळखावे.
जी व्यक्ती अतिशय चंचल असते, ज्या व्यक्तीच्या हाताला क्षणभर ही शांतता नसते, सतत कोणता ना कोणता चाळा चालू असतो, ज्या व्यक्तीला एकाच वेळी विविध कर्म प्रवृत्ती आकर्षित करीत असतात अशा व्यक्ती रजोगुणी आहेत हे ओळखावे. अशा व्यक्ती स्थिर व शांत न बसता पाय हलवतील, पदराशी, केसांची चाळा करत रहातील, किंचितशा आवाजानेही कान टवकारतील असे विविध क्षुल्लक स्वरूपाचे चाळे या व्यक्ती सतत करीत राहतात कारण त्यांच्यात रजोगुणाचा अधिक प्रभाव असतो.
तिसरा गुण आहे तमोगुण. भगवंत म्हणतात, हा गुण 'ज्ञानम् आवृत्तम्' म्हणजेच हा तमोगुण ज्ञानालाच झाकून टाकतो. सगळ्या कृतींना निष्क्रिय बनवितो. या गुणामुळे आळशीपणा वाढून निष्क्रियता येते. एखादे काम करायचे, आता त्वरित करायचे असे मनाने ठरवूनसुद्धा शरीर, इंद्रिये साथ देत नाहीत, ते काम नंतर करूयात म्हणून पुढे ढकलले जाते हिंदीमध्ये ‘अभी नही तो कभी नही ' असा छान शब्दप्रयोग आहे जो तमोगुणाचे नेमके वर्णन करू शकतो.
भगवंतांजवळ यावरही उपाय आहे
रजस्तमश्चाभिभूय, सत्त्वं(म्) भवति भारत।
रजः(स्) सत्त्वं(न्) तमश्चैव, तमः(स्) सत्त्वं(म्) रजस्तथा॥14.10॥
सर्वद्वारेषु देहेऽस्मिन्, प्रकाश उपजायते।
ज्ञानं(म्) यदा तदा विद्याद्, विवृद्धं(म्) सत्त्वमित्युत॥14.11॥
या श्लोकात भगवंतांनी 'सर्वद्वारेषु देहेस्मिन' असा उल्लेख केलेला आहे. पाचव्या अध्यायात याच संदर्भात भगवंत, ‘नवद्वारे पुरे देही’ असा उल्लेख करतात. इथे पुरुष या संज्ञेचा अर्थ शरीर धारण करणारा जीवात्मा असा होतो. नवद्वारांमध्ये पाच ज्ञानेंद्रिये व चार अंत:करणांचे अंत:करणचतुष्ट्य यांचा समावेश आहे. इंद्रियांद्वारे काय करायचे व काय नाही करायचे, काय पहायचे व काय नाही पाहायचे, काय ऐकायचे व काय नाही ऐकायचे, कोणत्या वस्तूला स्पर्श करावयाचा कोणत्या वस्तूला स्पर्श नाही करायचा या सर्वांसंबंधीची स्पष्टता म्हणजे विवेकशक्ती. सामान्य मनुष्याचे मन संदिग्ध असते. कार्पण्यदोष पहतस् स्वभाव: म्हणजेच अनेक गोष्टींबाबत केवळ ऊहापोह असतो. असते. ही संदिग्धता दूर करून या इंद्रियांमध्ये, अंतःकरणामध्ये, देहामध्ये चेतना व विवेकशक्ती जागृत होतात. यामुळेच सत्त्वगुण वाढतो असे भगवंत म्हणतात.
लोभः(फ्) प्रवृत्तिरारम्भः(ख्), कर्मणामशमः(स्) स्पृहा।
रजस्येतानि जायन्ते, विवृद्धे भरतर्षभ॥14.12॥
रजोगुणामुळे असंतोष वाढतो. पुष्कळ अंशाने कितीही धन मिळाले तरीही थोड्या अंशाने न मिळालेल्या धना बद्दल एखादी व्यक्ती नाराज असते. असंतुष्ट असते. धनाचा लोभ, पदाचा लोभ या लोभाच्या हव्यासापायी मिळालेल्या बाबींची संतुष्टता, समाधान जाऊन आणखी जादाच्या लोभाची असंतुष्टता निर्माण होते. येनकेन प्रकारे अप्राप्य गोष्टी प्राप्त करण्याची प्रवृत्ती बळावते. घरात गाडी आली परंतु भावाची गाडी त्याहीपेक्षा मोठी आहे हे पाहिल्यानंतर आपण घेतलेल्या गाडीचा आनंद मावळून गेला. कामना वाईट नाहीत परंतु त्या पूर्ण करण्यासाठी वापरले जाणारे वाम मार्ग वाईट आहेत. न्याय युक्त मार्गाने मिळवलेले धन, यश हे गृहस्थांसाठी हानिकारक नाहीत परंतु लोभाच्या आकर्षणातून प्राप्त झालेले धन, प्राप्त करून घेतलेले यश हे निश्चितच हानिकारक आहे. जो सत्त्वगुणी असतो त्याचे नेत्र पटल स्थिर असतात. या उलट जो रजोगुणी असतो त्याचे नेत्र चंचल असतात. जशी दृष्टी तशी सृष्टी म्हणून दृष्टी बदला, दृष्टिकोन आपोआप बदलतो. स्पृहा या शब्दाचा अर्थ आहे अत्याधिक विषय वासना. उदाहरणार्थ एक लाडू खाल्ला, वासना बळावली परंतु पाच दहा वर्षानंतरही त्या मागे खाल्लेल्या लाडूची चव आठवणे म्हणजे स्पृहा. स्पृहा रजोगुणाला पुष्टी देते.
अप्रकाशोऽप्रवृत्तिश्च, प्रमादो मोह एव च।
तमस्येतानि जायन्ते, विवृद्धे कुरुनन्दन॥14.13॥
यदा सत्त्वे प्रवृद्धे तु, प्रलयं(म्) याति देहभृत्।
तदोत्तमविदां(म्) लोकान्, अमलान्प्रतिपद्यते॥14.14॥
रजसि प्रलयं(ङ्) गत्वा, कर्मसङ्गिषु जायते।
तथा प्रलीनस्तमसि, मूढयोनिषु जायते॥14.15॥
कर्मणः(स्) सुकृतस्याहुः(स्), सात्त्विकं(न्) निर्मलं(म्) फलम्।
रजसस्तु फलं(न्) दुःखम्, अज्ञानं(न्) तमसः(फ्) फलम्॥14.16॥
इथे भगवंतांना सुचित करायचं आहे की सत्त्वगुण वाढला तर ज्ञान येईल, सुख प्राप्त होईल, वैराग्य भाव येतील. रजोगुण वाढला तर दुःख भोगावे लागतील आणि तमोगुणाच्या वाढीने केवळ अज्ञान प्राप्त होईल. जेवढी आपली वृत्ती असमाधानी असेल तेवढे आपण अधिक दुःखी असतो. दुःखावेगाने रजोगुण वाढत राहतो. विरुद्ध टोकाच्या वृत्तीने तमोगुणाची वृद्धी झालेली दिसून येते. जी व्यक्ती मानसिकदृष्ट्या समाधानी असते, मग भले ती व्यक्ती श्रीमंत नसेल, त्या व्यक्तीला मोठं घर नसेल, गाडी बंगल्याचा सोस नसेल. मुलं सुनांकडून त्यांचा सांभाळ व्हावा अशी इच्छा नसेल, कोणत्याही मान मरातबाची अपेक्षा नसेल तर अशा व्यक्ती केवळ आपले कर्तव्य कर्म करीत राहतात आणि नेहमी प्रसन्नमुख, आनंदी असतात.
सत्त्वात्सञ्जायते ज्ञानं(म्), रजसो लोभ एव च।
प्रमादमोहौ तमसो, भवतोऽज्ञानमेव च॥14.17॥
ऊर्ध्वं(ङ्) गच्छन्ति सत्त्वस्था, मध्ये तिष्ठन्ति राजसाः।
जघन्यगुणवृत्तिस्था, अधो गच्छन्ति तामसाः॥14.18॥
नान्यं(ङ्) गुणेभ्यः(ख्) कर्तारं(म्), यदा द्रष्टानुपश्यति।
गुणेभ्यश्च परं(म्) वेत्ति, मद्भावं(म्) सोऽधिगच्छति॥14.19॥
या पुढील श्लोकातून भगवंतांनी एक वेगळीच बाजू मांडली आहे. तिन्ही गुणांवर आधारित परंतु त्यांच्यापेक्षाही एक वेगळीच बाजू इथे दिसून येते.
गुणानेतानतीत्य त्रीन्, देही देहसमुद्भवान्।
जन्ममृत्युजरादुःखै:(र्), विमुक्तोऽमृतमश्नुते॥14.20॥
भगवंतांच्या या सांगण्यावरून अर्जुनाच्या मनात एक प्रश्न येतो. तो विचारतो _
अर्जुन उवाच
कैर्लिंगैस्त्रीन्गुणानेतान्, अतीतो भवति प्रभो।
किमाचारः(ख्) कथं(ञ्) चैतांस्, त्रीन्गुणानतिवर्तते॥14.21॥
हे प्रभू कृपया करून मला यासंबंधी सांगावे. अर्जुनाला याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे. अशा पुरुषाबद्दल त्याला आश्चर्य वाटते म्हणून अत्यंत आश्चर्याने व उत्सुकतेने तो भगवंतांना विचारत आहे.
अर्जुनाच्या या प्रश्नावर भगवंत अत्यंत प्रसन्न झाले. समजून घेण्याचा अधिकारी असलेल्या अर्जुनाला त्यांनी अशा पुरुषाबद्दल सांगितले.
श्रीभगवानुवाच
प्रकाशं(ञ्) च प्रवृत्तिं(ञ्) च, मोहमेव च पाण्डव।
न द्वेष्टि सम्प्रवृत्तानि, न निवृत्तानि काङ्क्षति॥14.22॥
श्लोक क्रमांक २२ ते २५ यामध्ये भगवंतांनी गुणातीत पुरुषाच्या वेगवेगळ्या गुणांच्या व्याख्या दिलेल्या आहेत सत्त्व, रज आणि तम या तीन गुणांच्या प्राप्तीने अशा व्यक्तीला द्वेष होत नाही. यातून मुक्त झालो असा आनंदही तो व्यक्त करत नाही किंवा या गुणांच्या प्राप्तीचा हव्यासही त्या व्यक्तीला कधी नसतो. अशा प्रकारचे निर्विकारभाव असलेली ती व्यक्ती असते. निर्विकार व्यक्तीला सुखकारक गोष्टीचा अत्यानंद होत नाही किंवा त्याच्याच सोबत घडलेल्या एखाद्या दुःखद प्रसंगाचा त्याला खेदही होत नाही.
अशा निर्विकार प्रकारच्या व्यक्तीच्या आणखी काही गुणांबद्दल भगवंत सांगत आहेत.
उदासीनवदासीनो, गुणैर्यो न विचाल्यते।
गुणा वर्तन्त इत्येव, योऽवतिष्ठति नेङ्गते॥14.23॥
एकदा तुकाराम महाराजांनी दोन्ही मुठीत माती घेतली. एक मुठ एका बाजूला आणि दुसरी मुठ दुसऱ्या बाजूला फेकून दिली. शिष्यांनी त्यांना अशा कृतीचे कारण विचारले. तुकाराम महाराज म्हणाले, एक मूठ होती ज्यांनी माझा गौरव केला, हार गुच्छ देऊन सत्कार केला, माझे कौतुक केले, सन्मान केला या त्यांच्या कृत्याचा अहंकार व अभिमान मला वाटू नये, हे सत्कार वगैरे मृत्तिकेप्रमाणे तुच्छ समजण्यासाठी मी फेकून दिली. दुसरी मूठ त्या लोकांसाठी होती जे माझा द्वेष करतात. ज्यांना माझा सन्मान, गौरव आवडत नाहीत. जे सतत माझी निंदानालस्ती, टवाळी, आलोचना, टीकाटिप्पणी करीत असतात ते माझ्यासाठी या मृत्तिकेप्रमाणे क्षुल्लक, क्षूद्र आहेत, नगण्य आहेत हे त्यांना कळावे म्हणून दुसऱ्या मुठीतली माती फेकली. ना मला अपमान करणाऱ्यांचा द्वेष आहे ना सन्मान करणाऱ्यांबद्दल अत्यंत जिव्हाळा. दोन्ही बाबतीत समवृत्ती असलेला मी उदासीन आहे.
अर्थात जो साक्षी रूप राहून, गुणांकडून विचलित केला जाऊ शकत नाही, जो अचल स्थिर असतो आणि गुणच गुणात वावरत आहेत असे समजून जो सच्चिदानंदघन परमात्म्यात एकरूप होऊन राहतो, निश्चल, स्थिर राहतो असा तो गुणातीत. उदासीन.
डोळ्यांनी भाकरी पाहिली, हातांनी उचलून घेतली, मुखाने खाल्ली गेली, पोटाने पचविली या सर्वात मी कुठे काय केले? हा प्रश्न आहे. भगवंताने शरीर दिले आहे, वृत्ती दिली आहे. अवयव आपापले काम करतात मग यात मी कुठे येतो? हे प्रश्न ज्याला पडतात तो आपल्या शरीराचे व्यवहारही त्रयस्थपणे पाहत राहतो. आपल्याकडे राम नाम घेण्याची पद्धत आहे. ज्या व्यक्ती हे राम नाम घेतात त्या व्यक्ती स्वतःबद्दल बोलताना सुद्धा त्रयस्थपणे बोलत असतात. त्या व्यक्ती म्हणत असतात, माझा राम जाईल, रामाला भूक लागली आहे, राम जेवेल. वास्तविक या सर्व वाक्यातील जाण्याची, जेवण्याची वगैरे कृती ती व्यक्ती स्वतःच करत असते परंतु स्वतःला राम संबोधून करत असते. या व्यक्ती सामान्य माणसांप्रमाणे स्वतःला संबोधत नाहीत त्यांचे बोल हे गुणातीताचे बोल असतात. पराकोटीच्या उच्च स्तराचे असतात.
समदुःखसुखः(स्) स्वस्थः(स्), समलोष्टाश्मकाञ्चनः।
तुल्यप्रियाप्रियो धीर:(स्), तुल्यनिन्दात्मसंस्तुतिः॥14.24॥
भगवद्गीतेमधला एक सुंदर शब्द या श्लोकात आहे, 'समलोष्टाश्मकाञ्चनः’
व्यवहारात आपण म्हणतो की सर्वांना समान न्याय हवा. आपल्या सर्व धर्मग्रंथातूनही समभाव सांगितलेला आहे. कुत्र्यांमध्ये ही विश्वरूप पहा, भगवंताचा अंश पहा असे सांगितलेले आहे. एक उदाहरण घेऊया - कुत्रा भुकेला आहे, वडील भुकेले आहेत, आई भुकेली आहे सर्वांची भूक सारखीच म्हणजे सम दर्शन. परंतु आपले प्रत्येकाबरोबरचे वर्तन, व्यवहार निरनिराळे आहेत. कुत्र्याला आपण आपल्या सोबत डायनिंग टेबलवर जेवायला घालत नाही. घराबाहेर त्याला जेवायला देतो. डायनिंग टेबलवरसुद्धा वडिलांचे जेवण निराळे, आईसाठीचे निराळे, गुरुजींसाठींचे निराळे, मुलांसाठीचे निराळे असे वर्तन व व्यवहार आपण ठेवतो. आपली नेमकी चूक होते कुठे तर आपण समवर्तन आणि समदर्शन यामध्ये गल्लत करतो. ज्याप्रमाणे आपण आपल्या मातापित्यांशी वर्तन करतो तसेच वर्तन आपण इतर मातापित्यांशी करतो का? जर आपले वर्तन सर्वांशी समान असेल तर त्याला समवर्तन असे म्हटले जाईल. पण व्यवहारात अशा वागण्याला फारसे महत्व दिले जात नाही.
सम दर्शन म्हणजे समानता. महात्मा गांधीजींच्या जीवनातील एक प्रसंग :-
स्नानासाठी त्याकाळी साबणाऐवजी एखादा गुळगुळीत दगड वापरला जायचा. एकदा प्रवास करताना गांधीजींच्या स्नानातला तो दगड नजरचुकीने प्रवासातल्या सामानात बांधून घ्यायचा विसरला. दुसऱ्या दिवशी स्नान करताना त्या दगडाची आठवण झाली. मीरा बेनने गांधीजींना त्याबद्दल सांगितले. दुसरा एखादा तशाच प्रकारचा दगड त्या गावातून घेऊन येण्याची तयारी दाखवली. अशा प्रकारचा दगड कुठेही उपलब्ध होऊ शकला असता परंतु मूल्यहीन असलेल्या अशा क्षुल्लक वस्तूंसाठीही गांधीजींसारखे संत महात्मे विशिष्ट मूल्य ठरवितात. त्यांच्या लेखी प्रकृतीतील कोणतीही कमी महत्त्वाची वस्तूसुद्धा अतिशय मौल्यवान ठरते. अगदी साध्या दगडाऐवजी तो दगड सोन्याचा असता तरीही त्यांच्या दृष्टिकोनात कोणताही फरक पडला नसता कारण त्यांच्या दृष्टीने दोन्ही गोष्टींचे मूल्य तेच होते. अखेर ज्या गावात तो दगड विसरलेला होता तिथे जाऊन तो आणावा लागला. तात्पर्य थोर विभूतींसाठी सोने, माती आणि दगड यांचे मूल्य एकच असते. जरी तिन्हींच्या किमतीत फरक असला तरीही त्यांची दृष्टी समान असते. आपल्यासारख्या सामान्य व्यक्तींचे समदर्शन त्या वस्तूच्या किमतीवर, मूल्यावर अवलंबून असते. या उलट संत महात्मे त्या वस्तूच्या उपयुक्ततेवरून त्यांचे मूल्य ठरवतात म्हणून त्यांचा दृष्टिकोन हा समदर्शनी आहे असे आपण म्हणू शकतो.
मानापमानयोस्तुल्य:(स्), तुल्यो मित्रारिपक्षयोः।
सर्वारम्भपरित्यागी, गुणातीतः(स्) स उच्यते॥14.25॥
मां(ञ्) च योऽव्यभिचारेण, भक्तियोगेन सेवते।
स गुणान्समतीत्यैतान्, ब्रह्मभूयाय कल्पते॥14.26॥
१. व्यवहार : सत्त्वगुणात संतुष्ट, रजोगुणात असंतुष्ट, तमोगुणात संतोष आणि असंतुष्ट दोन्ही प्रकारचा.
सत्यम् प्रियम् हितम् च यत्॥
महाभारतात एक सूत्र येते,
सत्यम् ब्रुयात् प्रियम् ब्रुयात् न ब्रुयात् सत्यम् अप्रियम्॥
काही व्यक्ती अशा थाटात बोलतात की मी बोलणारच कारण माझं खरं आहे, ज्याला राग यायचा असेल त्याला येऊ दे अशा व्यक्ती रजोगुणी असतात. खरं बोलणं, सत्य बोलणं कुणालाही सलत नाही सलतो तो बोलण्याचा ढंग. म्हणून सत्य, प्रिय, हितकर असेच बोलावे.
ऐसी वाणी बोलिए, मन का आपा खोय।
औरन को शीतल करे, आपहु शीतल होय।।
ही सत्त्वगुणीची भावना असते तर रजोगुणी म्हणतो -
ऐसी वाणी बोलिए, सबसे झगड़ा होय।
उससे झगड़ा न करे, जो मुझसे तगड़ा होय।।
रजोगुणी व्यक्ती भांडण तंट्याचं कारण शोधत राहतात. रस्त्यावरून जाताना जरी गाडी धडकली नाही तरी न धडकलेल्या गाडीसाठी ही जर गाडी धडकली असती तर अशाप्रकारे भांडण उकरून काढतात. ज्या गोष्टीशी आपला काही संबंध नाही त्या गोष्टीतूनही भांडण, दुसऱ्याचा पाणउतारा करण्यासाठी भांडण, दुसऱ्याचे महत्त्व कमी करण्यासाठी भांडण. अशाच यांच्या भांडणाला सीमाच नसते हे रजोगुणी असतात या रजोगुणींना दुसऱ्यांना कमी लेखायची सवय असते. सर्वांना सत्त्वगुणी व्यक्ती प्रिय असतात, त्यांच्याशी बोलावे असे वाटते परंतु रजोगुणी आणि तमोगुणी व्यक्तीशी कोणतेही कसलेही संबंध ठेवायला मन तयार होत नाही. तमोगुणी लोकांचे वागणे बोलणे अतिशय अप्रिय, अहितकारी असते.
सत्त्वगुणी व्यक्तीचे घर अतिशय स्वच्छ टापटीप असणारे, शुद्धतापूर्ण, वातावरणास अनुकूल, पवित्र भाव दर्शविणारे असे असते. रजोगुणी व्यक्तीचे घर विलासतापूर्ण असते. घरातील प्रत्येक गोष्टीचे प्रदर्शन करण्याची त्यांची हौस असते. किमती सामान कोण कोणत्या ठिकाणाहून आणलेल आहे याचा त्यांना अभिमान असतो. अनेक महागड्या वस्तूंचा, निरुपयोगी वस्तूंचा भरणा त्यांच्या घरात असतो. घराबद्दल त्यांच्या घमेंडीच्या भावना असतात. तमोगुणी व्यक्तीचे घर अतिशय अव्यवस्थित, घरात सर्वत्र गबाळ ग्रंथी कारभार, अस्ताव्यस्तता, अस्वच्छता अपवित्रता अशा नकारात्मक बाबींनी भरलेले असते. अशा व्यक्तींच्या घरात जाणेही नकोसे वाटते.
रिपु सन करेहु बतकही सोई॥
अर्थात ते म्हणाले, असे बोल ज्याने आपले हित होईलच पण शत्रूचेही कल्याणच होईल. सर्वांना हितकारक होईल असे बोलावे. रजोगुणी व्यक्ती अपना काम बनता, भाड़ में जाए जनता। अशा विचाराच्या, केवळ कामाशी मतलब राखणाऱ्या असतात. आपल्याला त्या कामातून काय मिळणार याचा सतत विचार करतात. आपल्या फायद्याचे असेल तेच काम अशा व्यक्ती पाहतात. तमोगुणी व्यक्ती आपली लाभ हानी पहात नाही, दुसऱ्यांचेही पहात नाही. किंबहुना दुसऱ्यांचे नुकसान करण्याकडेच यांची प्रवृत्ती असते. जसं धान्यावर पडणाऱ्या गारांचा वर्षाव त्या धान्याचा नाशच करतो कशी ह्या तमोगुणी व्यक्तींची वृत्ती असते.
सत्त्वगुणी वृत्तींना धर्माबद्दल अत्यंत आदर असतो. त्यांची वृत्ती ही सेवाभावी असते. परोपकारी असते. धर्मपालन करणारी असते. आपल्यामुळे कोणाचेही नुकसान होऊ नये याची जाणीव असते. रजोगुणी व्यक्ती केवळ दंभ, केवळ काम केल्याचा देखावा, थोडसं काम केलं तरी मोठेपणा सांगण्याची बढाई या त्यांना रुची असते तमोगुणी व्यक्ती मुद्दाम चुका करून, एखाद्याचे जास्तीत जास्त नुकसान कसे होईल हे पहात असतात. एखाद्याचे वाईट झाले की यांना आनंद वाटत असतो. यांची वृत्ती आसुरी असते.
सत्त्वगुणी वृत्ती आवश्यक गोष्टींना महत्त्व देणारी असते. ज्या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत त्यासंबंधी त्यांना कोणत्याही प्रकारचा लोभ नसतो. आपल्या गरजेनुसार, आवश्यक तेवढेच मिळवायचे, हव्यास करावयाचा नाही अशी वृत्ती असते. रजोगुणी व्यक्तींना इच्छा अतिशय महत्त्वाच्या वाटतात. अनेक अप्राप्य, असाध्य गोष्टींचा हव्यास, अशा गोष्टींच्या प्राप्तीची इच्छा त्यांच्या मनात नेहमीच असते कोणत्याही मार्गाने आपल्या इच्छापूर्तीचा अशा व्यक्ती प्रयत्न करीत असतात. तमोगुणी व्यक्ती सर्वांसाठीच घातक असतात. दुसऱ्यांच्या इच्छा कशा पूर्ण होऊ शकणार नाहीत अशा प्रकारच्या विघ्न संतोषी व्यक्ती म्हणजे तमोगुणी व्यक्ती होत.
या श्लोकातला 'अव्यभिचारी भक्तीयोग’ हा सुद्धा प्राय: चिंतनशील शब्द आहे. असे भाव असतात, अरे मी तर रामभक्त आहे मी भगवान शंकराची पूजा कशी करू? किंवा मी शिवभक्त आहे तेव्हा विष्णूंची पूजा कशी करू?
भगवंतांच्या पूजेसाठी प्रथम आपण समर्थ आहोत की नाही हे पाहावे. आपण नाम, गोत्र वगैरे निरर्थक गोष्टीत अधिक रस घेतो. जो मुख्य भक्तीचा भाव हवा त्यामध्ये आपण कमी पडतो भगवंतांच्या मते हा व्यभिचार आहे असा व्यभिचार भगवंतांना मान्य नाही. आपल्या बल, बुद्धी, अधिकार, संपत्ती यांच्या जोरावर केलेली पूजा ही व्यभिचारी भक्ती होय. या उलट भगवंतांबद्दल समदृष्टी ठेवून केली जाणारी पूजा ही अव्यभिचारी भक्ती होय. कितीही सामर्थ्यवान असले तरी आपली बुद्धी, बल, अधिकार, संपत्ती या सर्व गोष्टी भगवंतांच्या भक्तीच्या तुलनेत कस्पटासमान आहेत. अनेक उदाहरणे आपण पाहतो की जेव्हा व्यक्तीचे सामर्थ्य अपुरे पडते तेव्हा त्याला भगवंताची आठवण होते. रामचरितमानस मधला एक दोहा _
ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम्, अमृतस्याव्ययस्य च।
शाश्वतस्य च धर्मस्य, सुखस्यैकान्तिकस्य च॥14.27॥
एकदा एका व्यक्तीने एका संतांना विचारले, भगवत गीतेचे सार काय आहे? त्या संतांनी एका वाक्यात सांगितले, 'शरणागती ' भगवंत स्वतः म्हणतात, मामेकम् शरणम् व्रज. भगवंत म्हणतात, समस्त चराचरसृष्टीचा आशय मीच आहे ही बाब ज्याच्या ध्यानात आली त्याने मला, माझ्या परमात्मा स्वरूप रूपाला प्राप्त करून घेतले.
|| ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु ||
हरी शरणं, हरी शरणं या भजनाने विवेचनाची सांगता झाली.
प्रश्नोत्तर चर्चा
संजना दीदी
प्रश्न: भगवान अर्जुनाला गीताज्ञान सांगत असताना इतर रथी महारथी काय करीत होते?
उत्तर: कृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद चालू असताना इतर वीर युद्धाच्या इतर तयारी मध्ये गुंतलेले होते. जाणून-बुजून त्यांच्या संवादात लक्ष घालण्याचे विचार त्यांच्या मनात आले असतील किंवा नसतील ही. शिवाय कृष्ण अर्जुन यांचा संवाद दिव्य स्वरूपातला होता.
सपना दीदी
प्रश्न: आपल्या जीवनाचा उद्देश काय असावा?
उत्तर: मनुष्य जीवनाचा एक मात्र उद्देश आहे मोक्षप्राप्ती. परंतु केवळ एवढी एकच गोष्ट गृहीत धरायची नाही कारण शेकडो गोष्टी आपण सोबत घेऊन फिरत असतो असे किती काळ आपण भरकटतच राहणार आहोत याचा मनाशी विचार करावा. शिवाय अनुकूलता असताना या विषयावर फारसे चिंतन होत नाही कारण उद्वेग नसतो. परंतु प्रतिकूलता आली की मी का जगत आहे, यापेक्षा या यातनातून भगवंतांनी मला सोडवलं तर बरं अशा प्रकारचे प्रश्न, असे उद्वेगाचे विचार मनात निर्माण होऊ लागतात. जीवनाला दु:खालय म्हटलेले आहे. करोडो दुःखातून, पुनरपी जननम् पुनरपी मरणम्, यातून सुटण्यासाठी मोक्षप्राप्तीचे ध्येय, भगवत्प्राप्तीचे ध्येय मनात ठेवले पाहिजे. मोक्षप्राप्ती होईपर्यंत सेवा धर्म हा मार्गही योग्य आहे.
शीला दीदी
प्रश्न: नियंताचा अर्थ काय? सूत्रात्मा म्हणजे काय ?
उत्तर: सर्वांचे नियंत्रण करणारा तो नियंत्रक. भगवंत सर्व सृष्टीचे नियंत्रण करतो म्हणून भगवंताला नियंता असे म्हटले आहे. सूत्रात्मा याचा अर्थ आहे मुख्य सूत्रधार. सृष्टीचा मुख्य सूत्रधार भगवंत हाच आहे.
चित्रा दीदी
प्रश्न: तब्येत चांगली राखण्यासाठी कोणता अध्याय म्हणावा?
उत्तर: ज्या अध्यायात भोजन, भजन, नामजप यासंबंधी सांगितले आहे तो अध्याय म्हणावा. व्यवहारामध्ये भोजन कमी, भजन अधिक अशी वृत्ती ठेवावी. तसं पाहिलं तर प्रकृती स्वास्थ्यासाठी दररोज रामरक्षा म्हणावी.
पवन दीदी
प्रश्न: पूजा कोणाची करावी?
उत्तर: आपल्या मनात कोणाबद्दल अधिक श्रद्धा असेल त्याच देवाची पूजा करावी. आपण जर शिवभक्त असाल तर शिवाची पूजा करावी एवढेच नव्हे तर भगवद्गीतासुद्धा त्या शिवभक्तीच्या श्रद्धेने वाचावी. पूजेमध्ये श्रद्धा भाव अधिक महत्त्वाचा.
मालती दीदी
प्रश्न: आपण विवेचनादरम्यान जी गीते सांगता ती कोणत्या पुस्तकातली आहेत?
उत्तर: तुलसीदासरचित तुलसी रामायण मधील चौपाईंचा संदर्भ विवेचनादरम्यान घेतला जातो. वाल्मीकिरामायण मधील काही श्लोक यांचाही संदर्भ घेतला जातो. गीता प्रेसने या सर्व पुस्तकांच्या आवृत्ती प्रकाशित केलेल्या आहेत.
प्रश्न: सर्वांमध्ये तीनही गुण आहेत, तेव्हा कोणती व्यक्ती कोणत्या गुणाची हे कसे ओळखायचे?
उत्तर: आपल्या स्वतःच्या व्यवहारातच आपण तीन गुणांचा अनुभव घेतो. जर आपल्याला सत्त्वगुण वाढवायचा असेल तर बाकी इतर रजोगुण व तमोगुण यांचे महत्त्व कमी केले पाहिजे. हे काम आपले आपल्यालाच करावे लागते. अत्यंत जागरूकतेने आपल्याला सत्त्वगुणांची जोपासना करावी लागते. यासाठी सतत चिंतन मनन यांचा उपयोग होतो.
विश्वनाथ जी
प्रश्न: गुणातीत कसे होऊ शकतो?
उत्तर: वास्तविक गुणातीत म्हणजे सत्त्वगुणाची वाढ असं ढोबळमानाने आपण म्हणू शकतो. ही एक प्रकारची साधना आहे आणि या साधनेतून सिद्धी प्राप्त होते. रजोगुण व तमोगुण कमी करून सत्त्वगुणांची वाढ करणे ही एक दीर्घ प्रक्रिया आहे, साधना आहे. सत्त्वगुणात स्थिर राहण्यासाठी गुरु कृपा, ईश्वर कृपा जरुरी आहे. सत्त्वगुणवाढीचे प्रयत्न केले पाहिजेत. त्याच्या पलीकडे भगवत कृपेने आपण सिद्धी प्राप्त करून घेऊ शकतो.
प्रश्न: जपमाळ कोणत्या देवाची व कशी जपावयाची?
उत्तर: जर तुमच्या गुरूंनी तुम्हाला बीजमंत्र दिला असेल आणि जपसंख्या सांगितली असेल त्या मंत्राचा जप करावयाचा. इतर कोणत्या देवाचा नाम जप करायची इच्छा असेल त्यानुसार आपण नामजप करू शकतो. वास्तविक ज्या मंत्राने आपले मन परमात्म्याची एकरूप होते तो मंत्र जप श्रेष्ठ आहे म्हणून गुरु मंत्राचा जप करणे अधिक श्रेयस्कर आहे. बीज मंत्राचा माला जप करावा पूजा करतानाही मला जप करावा.
प्रश्न: रविवारी जर द्वादशी असेल तुळशीला पाणी घालावयाचे की नाही?
उत्तर: जर आपला विशिष्ट नेम असेल तर रविवारी तुळशीला पाणी नाही घातले तरी चालते तुळशीला पाणी न घालण्यासंबंधी कोठेही उल्लेख नाही. एकादशी, द्वादशी या दिवशी तुळशी पत्र तोडू नये, तुळशीला स्पर्श करू नये असे शास्त्र सांगते. तेव्हा पाणी घातले तरी चालेल नाही घातले तरी चालेल.
प्रश्न: मनाची चंचलता कमी करून स्थिरता कशी आणावी
उत्तर: मनाची चंचलता कमी करण्यासाठी साधन उपाय अभ्यास म्हणून करावयाचे आहे. सोबत वृत्तीमध्ये वैराग्य भावना आवश्यक आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये आपला मोह हा बाधक ठरतो त्या मोहावर नियंत्रण करावे. कधी कधी कर्तव्यपालनाच्या धावपळीत यामध्ये बाधा येऊ शकते त्यामुळे सतर्क राहून, जागरूक राहून साधना करावी. प्रत्येक साधनेत निश्चय पाहिजे. संतांची जीवन चरित्रे वाचून त्यातून काही शिकावे.
प्रश्न :लहान मुलांना मोबाईल पासून कसे रोखावे?
उत्तर: आज सर्वांच्या पुढे हे एक आव्हान बनले आहे. पालक म्हणून कधी कधी दबाव तंत्राचा अवलंब करावा. लहान मुलांना पुरस्काराचे प्रलोभन असते. तेव्हा त्यांना अशा प्रकारची प्रलोभने दाखवून मोबाईलपासून दूर करावे. चांगल्या पुस्तकांच्या वाचनाची गोडी लावावी. विविध मार्गांचा अवलंब युक्ती प्रयुक्तीने करावा.
समारोपाच्या प्रार्थनेनंतर विवेचन सत्राची सांगता झाली.
|| ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु ||