विवेचन सारांश
चित्तशुद्धी आणि निर्मम बुद्धीतून विकारांवर काबू
आजचा दिवस विशेष आहे. आपल्या परमपूज्य स्वामीजींनी 'हर घर गीता, हर कर गीता' हा मंत्र आपल्याला दिला. तर आजच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या प्रसंगी आपल्या माननीय पंप्रधानांनी आपल्याला 'हर घर तिरंगा' हा देशप्रेमाचा मंत्र दिला आहे. भगवद्गीतेचा अर्थ समजून घेऊन जीवन सफल करण्यासाठी आपण उत्सुक झालो आहोत. गीतेचा अभ्यास, चिंतन, मनन करण्याची प्रेरणा आपणास होते आहे हे आपल्या पूर्व जन्मांची पुण्याई, संतांचे आशिर्वाद व भगवंताची कृपा यामुळे शक्य झाले आहे.
तिसऱ्या व चौथ्या अध्यायात आपण कर्मयोगाचा विचार केला. आता पाचव्या अध्यायात आपण कर्मसंन्यास योगाचा विचार करतो आहोत. पाचव्या अध्यायात आतापर्यंत कर्मयोगी तेरा विविध प्रकारची कर्मे कशी करतो हे पाहिले . या तेरा कर्मांमध्ये पाच प्रकारची कर्मे ज्ञानेंद्रियांची, पाच कर्मेंद्रियांची असतात. या शिवाय निद्रा, श्वसन आणि पापण्यांची हालचाल अशी आणखीन तीन मिळून तेरा कर्मे होतात. कर्मयोगी सर्व कर्मे गुणागुणेषु वर्तन्त या भावनेने करतो. दहाव्या श्लोकात कमळाच्या पानाचे उदाहरण दिले होते. कमळ पाण्यात राहून सुद्धा जसे अलिप्त असते त्याप्रमाणे कर्मयोगी वरील सर्व प्रकारची कर्मे करून सुद्धा त्यात रमत नाही, अलिप्त राहतो.
5.11
कायेन मनसा बुद्ध्या, केवलैरिन्द्रियैरपि।
योगिनः(ख्) कर्म कुर्वन्ति, सङ्गं(न्) त्यक्त्वात्मशुद्धये॥5.11॥
युक्तः(ख्) कर्मफलं(न्) त्यक्त्वा, शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम्꠰
अयुक्तः(ख्) कामकारेण, फले सक्तो निबध्यते॥5.12॥
सर्वकर्माणि मनसा, सन्न्यस्यास्ते सुखं(म्) वशी।
नवद्वारे पुरे देही, नैव कुर्वन्न कारयन्॥5.13॥
तर या कथेतील दोघे मित्र अविज्ञात आणि पुरंजन यांचे गुण त्यांच्या नावाला साजेसे होते. अविज्ञात म्हणजे ज्याच्याविषयी कसलीही माहिती मिळत नाही, ज्ञान होत नाही असा. त्याप्रमाणेच या अविज्ञाताच्या जन्माविषयी, त्याच्या कर्माविषयी, त्याच्या विचारांविषयी, मनातील भावनांविषयी कोणालाच फार काही माहिती नव्हते. दुसरा होता पुरंजन, पूर अधिक अंजन म्हणजे पुरात किंवा नगरात राहणारा. आता हे दोघे मित्र होते. एक दिवस पुरंजन अविज्ञाताला म्हणाला की मित्रा तुला तर कसलीच इच्छा होत नाही, तू एकदम शांत स्वभावाचा आहेस पण मला मात्र फिरायला जायची इच्छा होते आहे. मी खूप दूर काही काळासाठी फिरायला जायचा विचार करतो आहे. त्यावर अविज्ञात म्हणाला ठीक आहे मित्रा, तुला जायचे तर तू जा पण मी इथे तुझी वाट बघतो आहे हे ध्यानात असू दे. मला विसरू नकोस. पुरंजन म्हणाला मित्रा तू माझा अत्यंत जवळचा आहेस, मी तुला कसा विसरेन. झाले, पुरंजन यात्रेला निघाला. त्याने नगरांना भेटी दिल्या, अनेक लेणी, सुंदर सुंदर राजवाडे बघितले. निरनिराळ्या प्रकारची वने, वृक्ष, सरोवरे बघत तो मार्गक्रमण करत राहिला. काही काळाने त्याला एक अत्यंत भव्य किल्ला आणि त्यावरील प्रासाद दिसला. तीन मजली प्रासाद अतिशय सुंदर होता. त्याला नऊ दरवाजे होते. दोन दरवाजे खाली होते. मधल्या मजल्यावर एकही दार नव्हते. सर्वात वरच्या मजल्यावर सात द्वारे होती. पुरंजन प्रासादात गेला. आत शोभेच्या असंख्य वस्तू होत्या. प्रासाद अतिशय उत्तम रीतीने सजवलेला होता. तिथे एक सुंदर स्त्री तिच्या सेवकांबरोबर राहत होती. ते सेवक तिची सर्व कामे करत. शिवाय तिच्याकडे एक पंचमुखी सर्प होता. त्या सुंदर स्त्रीला आणि तिच्या त्या वैभवाला पाहून पुरंजन भुलला. तो तिच्यात आसक्त झाला. त्याने तिला लग्नाची मागणी घातली. तिनेही त्याची मागणी स्वीकारली. पुरंजन आनंदीत झाला. त्याने तिचे नाव विचारले. ती म्हणाली मला नाव नाही. पुरंजन म्हणाला हरकत नाही आजपासून मी पुरंजन तर तू माझी पुरंजनी. दोघेही प्रासादात संसार करू लागले. काही वर्षे लोटली. पुरंजन पुरंजनी मध्ये पुरता गुरफटला, तो ती म्हणेल ते, ती म्हणले तसेच वागत असे. तिच्या तालावर सर्व काही चालू होते. एकदा तिथे एक अत्यंत कुरूप म्हातारी आली. 'जरा' तिचे नाव. तिने प्रासाद बघितला. ती पुरंजनाला म्हणाली तुमचे भवन फार सुंदर आणि मोठे आहे, मला पण इथे राहू द्या. त्यावर तो म्हणाला माझे घर, माझी पत्नी, आमचे सर्व दास-दासी इतकेच काय तर आमच्याकडील पंचमुखी सर्प देखील सुंदर आहेत. इथे तुझ्यासारख्या कुरूप व्यक्तीचे काय काम. तू इथून चालती हो. जरेने खूप विनवणी करून देखील पुरंजनाने तिला हाकलून दिले. जरा तिथून आपला भाऊ चण्डवेग याच्याकडे गेली. ती म्हणाली मला त्या प्रासादात राहायचे आहे, तू काही कर. चण्डवेगाने ३६५ गोऱ्या आणि ३६५ काळ्या सैनिकांची फौज उभी केली. जरा म्हणाली अरे चण्डवेगा तो किल्ला मजबूत आहे. अनेक बलाढ्य सैनिक आणि दास दासी त्याच्या रक्षणासाठी सदैव सज्ज आहेत, तुझी ही छोटी फौज तो किल्ला जिंकायला पुरी पडेल का. त्यावर चण्डवेग म्हणाला जरे तू चिंता करू नकोस माझे सैनिक संख्येने कमी असतील, दिसायला दुबळे वाटतील पण ते कधीही हार मानणार नाहीत. जरा आपल्या भावाचे सैन्य घेऊन किल्ल्यावर चालून गेली. रोज सैनिक जात आणि हल्ला करत, काही ना काही नुकसान करून परत येत. कधी एखादा बुरुज ढासळे, कधी एखादी वीट निसटे, कधी संरक्षक जाळीचे नुकसान होई. पुरंजन पुरंजनी झालेले नुकसान आपल्या सेवकांच्या मदतीने रोज दुरूस्त करत. पण जरेचे सैन्य रोज काहीतरी उपद्रव करत राही, ते हार मानत नसत. असेच चालू राहिले आणि अखेरीस किल्ल्याचे सैन्य कमी पडू लागले आणि एक दिवस त्यांचा पाडाव झाला. जरेने किल्ल्याचा ताबा घेतला आणि ती किल्ल्यावर राहू लागली. जरेबरोबर तिथे राहणे काही पुरंजनाला पसंत नव्हते. तो दुःखाने झुरत चालला आणि एक दिवस त्या दुःखाने त्रस्त होऊन पुरंजनाने प्राणत्याग केला. प्राण सोडते समयी पुरंजनीचे आपल्या मागे कसे होईल या विचारात त्याला मरण आले. आता मरते समयी जो विचार, इच्छा असते त्याप्रमाणे जन्म प्राप्त होतो या न्यायाने त्याला एका स्त्रीचा जन्म प्राप्त झाला. या स्त्रीचा विवाह झाला, पुढे तिच्या पतीचा मृत्यु झाला आणि ती स्त्री सती जाण्यासाठी आपल्या पतीबरोबर चितेवर चढली.
इकडे खूप काळ मित्राची वाट पाहत असलेला अविज्ञात मित्राच्या शोधासाठी निघाला आणि तो शोधत शोधत जिथे स्त्री जन्मातील पुरंजन चितेवर आरूढ झालेला होता तिथे आला. अविज्ञाताने त्याच्या दिव्य शक्तीने ही स्त्री म्हणजे पुरंजन आहे हे ओळखले. त्याने त्या स्त्री ला तिच्या पूर्व जन्माविषयी सर्व सांगितले. ते सर्व ऐकून ती स्त्री आणि अविज्ञात तिथून निघाले आणि आपल्या नगरात परत आले आणि सुखाने राहू लागले.
बहिर ऋषींनी नारदांना विचारले महाराज ही काय कथा आहे मला काही बोध झाला नाही. नारद म्हणाले मुनीवर हा पुरंजन आणि अविज्ञात म्हणजे जीवात्मा आणि परमात्मा आहेत. सुरूवातीला हे मित्र एकत्र असतात. पुढे जीवात्मा परमात्म्याला सोडून जातो. तो वेगवेगळ्या योनींमधून प्रवास करत शेवटी मनुष्य योनीच्या नऊ द्वारे असलेल्या शरीरात प्रवेश करतो. त्यातली खालची दोन द्वारे म्हणजे लिंग आणि गुदद्वार. वरती जी सात दारे आहेत त्यात दोन डोळे, दोन कान, दोन नासिका आणि एक तोंड येते. बुद्धी ही त्यात निवास करणारी पुरंजनी होय. कर्मेंद्रिये आणि ज्ञानेंद्रिये हे तिचे दास दासी तिच्या तालावर नाचतात. पंचमुखी सर्प म्हणजे पंच तन्मात्रा जे पंच ज्ञानेंद्रियांचे विषय आहेत. या बुद्धी मध्ये जीवात्मा आसक्त होतो आणि तो या नवद्वाराच्या मानव शरीर रूपी प्रासादात अडकतो. जरा म्हणजे वृद्धापकाळ. चाळिशीनंतर जरा या प्रासादावर साद देऊ लागते. एखादा केस पांढरा होतो, कुठे सुरकुत्या दिसू लागतात. जीवात्म्याला हे आवडत नाही. ही जरा जेंव्हा तिच्या भावाकडे म्हणजे काळाकडे जाते तेंव्हा तो भाऊ ३६५ गोरे आणि ३६५ काळे सैनिक पाठवतो. हे सैनिक म्हणजे ३६५ दिवस आणि रात्र. हे सतत हल्ला करत राहतात. मनुष्य शरीराची डागडुजी करत राहतो पण म्हातारपण काही टळत नाही. शेवटी जरा देहाचा ताबा घेते. जीवात्मा काम बुद्धी च्या चिंतनात म्हणजे पुरंजनीच्या चिंतनात अखेर देह सोडतो, तो अविज्ञाताला म्हणजे परमात्म्याला विसरतो. कामनेप्रमाणे जन्म या न्यायाने पुढील जन्म प्राप्त होतो. पुढे कुठल्या तरी संतांच्या आशिर्वादाने अविज्ञात मदतीला येतो. संतांची वचने, सत्कर्मे काही ना काही करून तो पुरंजनाला त्याच्या मूळ स्वरूपाची आठवण देत राहतो. अखेरीस जन्म, जरा आणि मृत्यु या चक्रातून पुरंजन रूपी जीवात्म्याची सुटका होते आणि त्याचे आणि परमात्म्याचे म्हणजे अविज्ञाताचे मिलन होते.
इथे भगवंत म्हणतात ज्याचे अंतःकरण त्याच्या ताब्यात आले तो मनाने सर्व कामनांचा आणि कर्मांचा त्याग करतो.
न कर्तृत्वं(न्) न कर्माणि, लोकस्य सृजति प्रभुः।
न कर्मफलसंयोगं(म्), स्वभावस्तु प्रवर्तते॥5.14॥
याप्रमाणेच भगवंत म्हणतात की मी प्रकृतीच्या मदतीने एक सर्वंकष पद्धत तयार केलेली आहे. त्यानुसार प्रत्येकाला आपल्या कर्माप्रमाणे फळ मिळते. यात मी ढवळाढवळ करत नाही.
नादत्ते कस्यचित्पापं(न्), न चैव सुकृतं(म्) विभुः।
अज्ञानेनावृतं(ञ्) ज्ञानं(न्), तेन मुह्यन्ति जन्तवः॥5.15॥
ज्ञानाचा अभाव म्हणजे अज्ञान. कोणाला आपण ज्ञान देऊ शकतो, अज्ञान देऊ शकत नाही. तसेच प्रकाश दानासाठी दिवा लावतात, अंधार करण्यासाठी कुठले उपकरण नसते. अंधाराला स्वतःचे अस्तित्व नसते. प्रकाशाचा अभाव म्हणजे अंधार. ढग जसे सूर्याला झाकतात तसे अज्ञानाने ज्ञान झाकलेले असते.
ज्ञानेन तु तदज्ञानं(म्), येषां(न्) नाशितमात्मनः।
तेषामादित्यवज्ज्ञानं(म्), प्रकाशयति तत्परम्॥5.16॥
तद्बुद्धयस्तदात्मान:(स्), तन्निष्ठास्तत्परायणाः।
गच्छन्त्यपुनरावृत्तिं(ञ्), ज्ञाननिर्धूतकल्मषाः॥5.17॥
विद्याविनयसम्पन्ने, ब्राह्मणे गवि हस्तिनि।
शुनि चैव श्वपाके च, पण्डिताः(स्) समदर्शिनः॥5.18॥
इहैव तैर्जितः(स्) सर्गो, येषां(म्) साम्ये स्थितं(म्) मनः।
निर्दोषं(म्) हि समं(म्) ब्रह्म, तस्माद् ब्रह्मणि ते स्थिताः॥5.19॥
न प्रहृष्येत्प्रियं(म्) प्राप्य, नोद्विजेत्प्राप्य चाप्रियम्।
स्थिरबुद्धिरसम्मूढो, ब्रह्मविद् ब्रह्मणि स्थितः॥5.20॥
सर्व पांडव धर्माने वागणारे होते पण फक्त युधिष्ठीरालाच धर्मराज म्हणतात. महाभारतात एक कथा आहे. एकदा पांडव वनातून चालले होते. त्यांना खूप तहान लागली होती. वाटेत त्यांना एक तलाव दिसला. ते सर्वजण तलावाकडे पाणी पिण्यास गेले. एका यक्षाकडे त्या तलावाची मालकी होती. पांडवांना तिथे आलेले पाहून तो यक्ष प्रकट झाला आणि म्हणाला तुम्हाला जर या तलावाचे पाणी प्यायचे असेल तर माझ्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. त्यानंतरच मी तुम्हाला पाणी पिऊ देईन. उत्तरे न देता पाणी प्याल तर तुम्हास मृत्यु येईल. सहदेव, नकुल, भीम आणि अर्जुन कोणासही यक्षाची ही मागणी मान्य नव्हती. यक्षाच्या परवानगी शिवाय त्याच्या प्रश्नांची उत्तरे न देताच हे चारही भाऊ पाणी प्यावयास गेले आणि तात्काळ मृत्युस प्राप्त झाले. आता युधिष्ठिर पुढे आला. त्याच्या चारही भावांचा मृत्यु झाला होता, त्याची तहानही शामली नव्हती. यक्षाच्या परवानगीखेरीज पाणी पिता येणार नव्हते. या परिस्थितीत युधिष्ठिर डगमगला नाही, तो शांत राहिला, उद्विग्न झाला नाही. त्याने शांत चित्ताने यक्षाच्या शंभर प्रश्नांची उत्तरे दिली. यक्ष प्रसन्न झाला तो म्हणाला हे युधिष्ठिर, तुझ्या उत्तरांवर मी खूष झालो आहे. तुझ्या कुठल्याही एका भावाला मी जीवन दान देतो. तू सांग मी कोणाला जिवंत करू. अशा प्रसंगी साधारण मनुष्याने व्यवहार्य विचार केला असता आणि जे सर्वात ताकतवान होते अशा भीम आणि अर्जुन यांपैकी कोणालातरी जिवंत करा असे विनवले असते. पण युधिष्ठिराने तसे केले नाही. त्याने यक्षाकडे सहदेवाचे प्राण मागितले. यक्ष या मागणीने आश्चर्यचकित झाला. त्याने याचे कारण विचारले. यावर युधिष्ठिर म्हणाला, महाराज माझ्या दोन माता आहेत. मी कुंती मातेचा पुत्र आहे. माद्री मातेचे दोन्ही पुत्र मृत झाले आहेत. माद्री मातेने तिच्या पुत्रांना विश्वासाने माझ्या हवाली केले होते. तिचा एक तरी पुत्र जिवंत असावा असे मला वाटते म्हणून मी सहदेवासाठी जीवदान मागितले. हे ऐकून यक्ष प्रसन्न झाला आणि त्याने चारही पांडवांना जीवदान दिले.
या प्रसंगात विचार करण्यासारखी अत्यंत महत्त्वाची गोष्ट ही आहे की आलेल्या संकटाने युधिष्ठिर डगमगले नाहीत, उद्विग्न झाले नाहीत आणि अत्यंत स्थिर बुद्धीने विचार करू शकले म्हणून त्यांना धर्मराज म्हणतात.
बाह्यस्पर्शेष्वसक्तात्मा, विन्दत्यात्मनि यत्सुखम्।
स ब्रह्मयोगयुक्तात्मा, सुखमक्षयमश्नुते॥5.21॥
ये हि संस्पर्शजा भोगा, दुःखयोनय एव ते।
आद्यन्तवन्तः(ख्) कौन्तेय, न तेषु रमते बुधः॥5.22॥
शक्नोतीहैव यः(स्) सोढुं(म्), प्राक्शरीरविमोक्षणात्।
कामक्रोधोद्भवं(म्) वेगं(म्), स युक्तः(स्) स सुखी नरः॥5.23॥
योऽन्तःसुखोऽन्तरारामः(स्), तथान्तर्ज्योतिरेव यः।
स योगी ब्रह्मनिर्वाणं(म्), ब्रह्मभूतोऽधिगच्छति॥5.24॥
लभन्ते ब्रह्मनिर्वाणम्, ऋषयः क्षीणकल्मषाः।
छिन्नद्वैधा यतात्मानः(स्), सर्वभूतहिते रताः॥5.25॥
हे अत्यंत सुंदर भजन परमश्रद्धेय प्रतिकजी महाराजांचे आहे.
कामक्रोधवियुक्तानां(म्), यतीनां(म्) यतचेतसाम्।
अभितो ब्रह्मनिर्वाणं(म्), वर्तते विदितात्मनाम्॥5.26॥
स्पर्शान्कृत्वा बहिर्बाह्यांश्, चक्षुश्चैवान्तरे भ्रुवोः।
प्राणापानौ समौ कृत्वा, नासाभ्यन्तरचारिणौ॥5.27॥
यतेन्द्रियमनोबुद्धि:(र्), मुनिर्मोक्षपरायणः।
विगतेच्छाभयक्रोधो, यः(स्) सदा मुक्त एव सः॥5.28॥
भोक्तारं(म्) यज्ञतपसां(म्), सर्वलोकमहेश्वरम्।
सुहृदं(म्) सर्वभूतानां(ञ्), ज्ञात्वा मां(म्) शान्तिमृच्छति॥5.29॥
तनु धनु भवन सुहृद परिवारा ।।
सबकी ममता ताग बटोरी ।
मम पद मनही बांधी वर डोरी ।।
जननी, जनक, बंधू, सूत, दारा, तन, धन, भवन, मित्र, परिवार अशा दहा ठिकाणी आपले ममत्व असते. इथे मन गुंतते. कोणाचे आई, वडिलांमध्ये तर कोणाचे पत्नी व मुलामध्ये, कोणाचे संपत्ती मध्ये, घरामध्ये तर कोणाचे परिवारामध्ये ममत्व असते. तुळसीदासजी म्हणतात या सर्व ममत्वाच्या दोऱ्यांचे पेड करून एकत्र बांधा आणि ती एक दोरी भगवंताच्या चरणी अर्पण करा म्हणजे ममत्व आपोआप सुटेल.
इथे आजचे विवेचन पूर्ण झाले. यानंतर एक मिनिटाच्या नाम संकीर्तनानंतर सत्राची सांगता झाली.
।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।