विवेचन सारांश
त्याज्य आसुरी गुण युक्त मनुष्यांची लक्षणे, त्यांची अधोगती आणि अधोगतीची कारणे

ID: 1981
Marathi - मराठी
रविवार, 27 नोव्हेंबर 2022
अध्याय 16: दैवासुरसम्पद्विभागयोग
2/3 (श्लोक 9-24)
विवेचक: गीता विदूषी सौ वंदना जी वर्णेकर


गुरु वंदना, सरस्वती वंदना, गीता वंदना आणि व्यासपीठ वंदना करून सत्राचा प्रारंभ झाला.

गुरुब्रह्मा गुरुविष्णुः गुरुदेवो महेश्वरः।
गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ॥
नमामि सद्गुरुं शान्तं प्रत्यक्षं शिवरूपिणम् ।
शिरसा योगपीठं मुक्तिकामर्थसिद्धम् ॥

प्रथम स्तरामध्ये आपण सर्वांनी आपल्या गीताभ्यासाचा आरंभ भक्ती योग नामक बाराव्या अध्यायाने केला आहे. हा भक्तियोग म्हणजे श्रीमद्भगवद्गीतेचे जणू गर्भगृह आणि नंतरचा पुरुषोत्तम योग नामक पंधरावा अध्याय हा श्रीकृष्णांचे संपूर्ण दर्शन घडवणारा!

या दुसऱ्या स्तरावर आपण सोळावा दैवासुरसंपद्विभागयोग हा अध्याय अभ्यासत आहोत. हा महत्त्वाचा अध्याय आहे. हा अध्याय जाणून घेतल्याशिवाय श्रीमद्भगवद्गीतेचे सिद्धांत समजणार नाहीत असे गुरुदेव स्वामी गोविंद देव गिरिजींचे सांगणे आहे. मोहरूपी महिषासुराचे निर्दालन करणे हा श्रीमद्भगवद्गीतेचा प्रतिपाद्य मंत्र आहे आणि ज्यांचा अंगीकार करायला हवा ते दैवी आणि ज्यांचा त्याग केला पाहिजे ते आसुरी या गुणसंपदा जाणून घेतल्या पाहिजेत. उत्तम गुण अभ्यासे येती असे समर्थ रामदास स्वामींनी म्हटले आहे. दैवी गुणसंपत्ती याची देही दु:खापासून मुक्ती मिळवून देते तर आसुरी गुणसंपत्ती आणखी दु:खांमध्ये जखडून टाकते.

फक्त तीन श्लोकांमध्ये सर्व दैवी गुणसंपत्तीचे कथन आले आहे. दैवी गुणसंपत्ती युक्त माणसंच कमी असतात. पाच पांडवांचे बालपण वनात ऋषिमुनींच्या सन्निध्यात गेले, त्यांनी आपल्या मातापित्यांना तपस्वी जगताना अनुभवले. ते दैवी गुणसंपत्तीने युक्त होते. हस्तिनापूरात वैभवात जीवन व्यतीत झालेले आसुरी गुणसंपत्तीयुक्त कौरव संख्येने जास्त होते.

पहिलाच दुर्गुण दंभ - (ढोंग, दिखाऊपणा) हा सांगितला. दोष मान्य केला तर वाफेसारखा नाहीसा होतो, पण लपवला तर वाढत जातो. गुणही लपवला तर वाढत जातो. आसुरी प्रकृतीच्या लोकांची सत्कर्म करण्याची प्रवृत्ती नसते आणि ते दुष्कर्म करण्यापासून निवृत्त होत नसतात. हे लोक आपल्याकडे दैवी गुण असल्याचा देखावा करू लागतात. पण असा देखावा केल्याने त्यांच्यातील ढोंगीपणाचा दोष ते झाकतात आणि त्याने हा दोष वाढत जातो. हळुहळु या लोकांचा विवेक नाहीसा होतो आणि चांगल्या वाईटातला फरक कळेनासा होतो. याने शुचिता संपुष्टात येते आणि सत्यावरचा विश्वास ढळू लागतो. मग असे आसुरी प्रकृतीचे लोक जगाचे कारण ईश्वर आहे हे न मानणारे व जग स्त्रीपुरुष संबंधातून निर्माण झाले आहे असे मानणारे होतात. 

16.9

एतां(न्) दृष्टिमवष्टभ्य, नष्टात्मानोऽल्पबुद्धयः।
प्रभवन्त्युग्रकर्माणः, क्षयाय जगतोऽहिताः।।16.9।।

ह्या खोट्या ज्ञानाचा अवलंब करून ज्यांचा स्वभाव भ्रष्ट झाला आहे आणि ज्यांची बुद्धी मंद आहे असे सर्वांवर अपकार करणारे क्रूरकर्मी मनुष्य केवळ जगाच्या नाशाला समर्थ होतात.

या लोकांची जीवन दृष्टी यावज्जीवेत सुखं जीवेत, ऋणं कृत्वा घृतं पिबेत या चार्वाक वचनासारखी असते. अर्थात, जोवर आयुष्य आहे तोवर खा, प्या मजा करा, वेळ पडली तर ऋण काढून सण साजरे करा अशी यांची वृत्ती असते. अशा चुकीच्या सिद्धांतानुसार जगणारे, विवेकबुद्धी नष्ट झालेले, क्रुरकर्मा आणि सर्वांचे अहित करणारे हे लोक जगाच्या विनाशासाठीच उत्पन्न झाले आहेत.



16.10

काममाश्रित्य दुष्पूरं(न्), दम्भमानमदान्विताः।
मोहाद्गृहीत्वासद्ग्राहान्, प्रवर्तन्तेऽशुचिव्रताः।।16.10।।

ते दंभ, मान आणि मदाने युक्त असलेले मनुष्य कोणत्याही प्रकारे पूर्ण न होणाऱ्या कामनांचा आश्रय घेऊन अज्ञानाने खोटे सिंद्धांत स्वीकारून भ्रष्ट आचरण करीत जगात वावरत असतात.

इच्छा कधीच समाप्त होत नाहीत. एक इच्छा पूर्ण झाली की दहा निर्माण होतात. त्यामुळे त्यांना दुष्पुर म्हटले आहे. इच्छापूर्ती करायच्या मागे लागलेले लोक स्वतः भ्रमित होतात आणि इतरांना भ्रमित करतात. हे लोक सर्व ऐहिक सुखांच्या मागे लागतात. ते आपली संपत्ती, सत्ता याचे प्रदर्शन आणि दुरुपयोग करतात. यांचे अनुसरण करणाऱ्या चांगल्या लोकांची सुद्धा याने दिशाभूल होते आणि ते ही वाममार्गाला लागतात. आपली भौतिक संपत्ती इथेच सोडून केवळ आपली सत्कर्मे, बुद्धी बरोबर घेऊन आपण जातो याचा या माणसांना विसर पडतो. आपली स्वतःची राहती जागा नसलेले दिवंगत पंतप्रधान शास्त्रीजी आणि आपली मिळकत दान करून टाकणारे दिवंगत राष्ट्रपती ए.पी. जे. अब्दुल कलाम असे निस्पृह नेते विरळाच.

16.11

चिन्तामपरिमेयां(ञ्) च, प्रलयान्तामुपाश्रिताः।
कामोपभोगपरमा, एतावदिति निश्चिताः।।16.11।।

तसेच ते आमरणांत असंख्य चिंताचे ओझे घेतलेले, विषयभोग भोगण्यात तत्पर असलेले 'हाच काय तो आनंद आहे' असे मानणारे असतात.

इच्छा कधीच संपत नाहीत. त्यामुळे चिंता वाढत जातात. मरेपर्यंत त्या इच्छा आणि त्यामुळे वाढत रहाणार्‍या चिंतांचे ओझे बाळगत असूनही कामोपभोग हाच यांना परम पुरुषार्थ वाटतो.

16.12

आशापाशशतैर्बद्धाः(ख्), कामक्रोधपरायणाः।
ईहन्ते कामभोगार्थम्, अन्यायेनार्थसञ्चयान्।।16.12।।

शेकडो आशांच्या पाशांनी बांधले गेलेले ते मनुष्य काम-क्रोधात बुडून जाऊन विषयभोंगांसाठी अन्यायाने द्रव्यादी पदार्थांचा संग्रह करण्याचा प्रयत्न करीत असतात

इच्छांच्या कधीही न संपणाऱ्या जंजाळात हे लोक अडकतात. अपेक्षित फळ मिळाले नाही किंवा इच्छा पूर्तीच्या मार्गात अडथळे येऊ लागले की मग क्रोध उत्पन्न होतो.  कर्मयोग नामक तिसर्‍या अध्यायात काम आणि क्रोध मनुष्याचे कसे सर्वात मोठे वैरी आहेत हे विषद केले आहे. DESIRE IS THAT STATE OF MIND WHICH IS ALWAYS EMPTY असे बोलले जाते. एकदा मन कामनामय झाले की त्यात बाकी काही राहूच शकत नाही.

16.13

इदमद्य मया लब्धम्, इमं(म्) प्राप्स्ये मनोरथम्।
इदमस्तीदमपि मे, भविष्यति पुनर्धनम्।।16.13।।

ते विचार करीत असतात की मी आज हे मिळविले आणि आता मी हा मनोरथ पूर्ण करिन.माझ्याजवळ हे इतके द्रव्य आहे आणि पुन्हासुद्धा हे मला मिळेल.

हे लोक सतत मी काय मिळवलं, काय मिळवेन याच्याच विचारात असतात. याचा अर्थ मनुष्याने कामना बाळगूच नये असा काही भगवद्गीतेचा संदेश आहे असे नाही. सातव्या ज्ञानविज्ञान योग नामक अध्यायात भगवान म्हणतात की प्रत्येक जीवात असलेली धर्मसंमत कामना मी आहे. ही धर्मसंमत कामना कोणती तर ती सर्वांच्या कल्याणाची असायला हवी.
हजारो वर्षांपूर्वी महर्षी कणाद यांनी सर्वांगीण प्रगती स्पष्ट करताना सांगितले होते, यतो अभ्युदय नि:श्रेयस सिद्धि: स धर्म: ज्याद्वारे अभ्युदय म्हणजे भौतिक आणि नि:श्रेयस म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्या सर्व प्रकारची प्रगती साधली जाते तो धर्म!

16.14

असौ मया हतः(श्) शत्रु:(र्), हनिष्ये चापरानपि।
ईश्वरोऽहमहं(म्) भोगी, सिद्धोऽहं(म्) बलवान्सुखी।।16.14।।

या शत्रूला मी मारले आणि त्या दुसऱ्या शत्रूंनाही मी मारीन. मी ईश्वर आहे, ऐश्वर्य भोगणारा आहे. मी सर्व सिद्धींनी युक्त आहे आणि बलवान तसाच सुखी आहे.

जे आपल्या इच्छापूर्तीच्या आड येतात, ते शत्रू मानले जातात आणि त्यांचा नाश करणं आवश्यक बनतं आणि असे शत्रुंचा नाश करता करता आपण शक्तिमान, आपण ईश्वर असा भ्रम होऊ लागतो.

या भ्रमाचे वर्णन करताना ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटले आहे:-
हे मारिले वैरी थोडे । आणीकही साधीन गाढे ।
मग नांदेन पवाडें । येकलाचि मी ॥ ३५२ ॥
आजपर्यंत (शत्रू) मारले परंतु हे थोडे असून आणखीही बलाढ्य (शत्रु) संधी साधून मारीन. मग मीच एकटा महत्वाने नांदेन. ॥१६-३५२॥

मग माझी होतील कामारीं । तियेंवांचूनि येरें मारीं ।
किंबहुना चराचरीं । ईश्वरु तो मी ॥ ३५३ ॥
जे माझे दास होतील त्याशिवाय इतरांना मी मारीन. फार काय सांगावे ? चराचरात ईश्वर जो आहे तो मी आहे. ॥१६-३५३॥

16.15

आढ्योऽभिजनवानस्मि, कोऽन्योऽस्ति सदृशो मया।
यक्ष्ये दास्यामि मोदिष्य, इत्यज्ञानविमोहिताः।।16.15।।

मी मोठा धनिक आणि मोठ्या कुळात जन्मलेला आहे. माझ्यासारखा दुसरा कोण आहे ? मी यज्ञ करीन, दान देईन, मजेत राहीन. अशाप्रकारे अज्ञानाने मोहित झालेले, अनेक प्रकारांनी भ्रांत चित्त झालेले, मोहाच्या जाळात अडकलेले आणि विषयभोगांत अत्यंत आसक्त असे आसुरी लोक महा अपवित्र नरकात पडतात.

आढ्य म्हणजे धनसंपन्न! धनिक असणे वाईट नाही, पण त्याला त्या धनसंपन्नतेची घमेंड असू नये. अभिजन म्हणजे उच्च कुळातील जन्म, आपल्या संपत्तीची व कुळाची घमेंड असलेला मनुष्य सतत भांडण ओढवून घेत असतो. घमेंडखोर मनुष्याचे तप आणि यज्ञ निव्वळ दिखाऊ असतात. तपाचे व यज्ञाचे फळ तप करणार्‍याचा स्वभाव आणि उद्दिष्ट यावर अवलंबून असते.
तप आणि यज्ञ तर रावण, कुंभकर्ण आणि बिभीषण या तिघाही दानव बंधूंनी केले होते. पण त्यांच्या स्वभावधर्मातील भेदामुळे रावणाचे तप राजसिक, कुंभकर्णाचे तप तामसिक, बिभीषणाचे सात्त्विक होते आणि त्यांना त्यांच्या तपाप्रमाणे तपाचे फळ मिळाले.

16.16

अनेकचित्तविभ्रान्ता, मोहजालसमावृताः।
प्रसक्ताः(ख्) कामभोगेषु, पतन्ति नरकेऽशुचौ।।16.16।।

भ्रांतचित्त झालेले मोहाच्या जाळ्यात अडकलेले, विषयभोगात आसक्त झालेले आसुरी महापातकी लोक अपवित्र अशा नरकात पडतात आणि अनंत यातना भोगतात.

सतत आपल्या मनातील इच्छापूर्तींच्या संकल्पांनी चित्त भरकटलेले आणि त्यामुळे मोहाच्या जाळ्यात अडकलेले, विषयभोगांत अति आसक्त झालेले लोक नरकात म्हणजेच तशाच प्रकारच्या लोकांच्या सहवासात येतात.
भगवद्गीतेचा अभ्यास, तिचा प्रचार या ध्येयाने पछाडलेले गीता प्रेसचे संस्थापक कै. हनुमान प्रसाद पोद्दार इतके निस्पृह बनले होते की त्यांनी भारतरत्न पुरस्कार विनम्रतापूर्वक नाकारला होता. कुठलेही पद आणि प्रतिष्ठा याच्या आसक्ती मध्ये त्यांना अडकायचे नव्हते. कारण सत्कर्माची आसक्ती देखील वाईट मार्गाला नेऊ शकते.  

16.17

आत्मसम्भाविताः(स्) स्तब्धा, धनमानमदान्विताः।
यजन्ते नामयज्ञैस्ते, दम्भेनाविधिपूर्वकम्।।16.17।।

ते स्वतःलाच श्रेष्ठ मानणारे घमेंडखोर लोक धन आणि मान यांच्या मदाने उन्मत्त होऊन केवळ नावाच्या यज्ञांनी पाखंडीपणाने शास्त्रविधिहीन यज्ञ करतात.

आत्मसंभावित म्हणजे केवळ स्वतःचाच विचार, स्वतःचेच गुणगान गाण्याची अर्थात आत्मप्रौढीची प्रवृत्ती असणारी व्यक्ती. मनुष्याचा हा सर्वात मोठा दुर्गुण असतो.
अर्जुनाला खांडववन अग्नीच्या भक्ष्यस्थानी दिल्यामुळे अग्नीने त्याला गांडीव धनुष्य भेट दिले होते. अर्जुनाला ते अतिशय प्रिय होते आणि त्या गांडीव धनुष्याचा अपमान करणार्‍याला मृत्युदंड देणं आणि ते करू न शकल्यास स्वतः अग्निकाष्ठांचे भक्षण करणं अशी त्याने घोर प्रतिज्ञा केली होती.
कुरुक्षेत्रावर झालेल्या युद्धात कर्णाने युधिष्ठिराला पराभूत केले पण कुंतीला दिलेल्या वचनानुसार (अत्यंत भेदक शब्दात युधिष्ठिराचा अपमान करून) त्याने युधिष्ठिराला जीवदान दिले. या अपमानाने व्यथित झालेल्या युधिष्ठिराने अर्जुन असूनही ही वेळ कशी येते हा प्रश्न विचारताना गांडीव धनुष्याचा अपमान केला. त्यामुळे अर्जुन संतप्त झाला पण थोरल्या भावाचा वध करण्याऐवजी तो अग्निकाष्ठांचे भक्षण करायला सिद्ध झाला. हा पेचप्रसंग सोडविण्यासाठी श्रीभगवानांनी अर्जुनाला आत्मस्तुती करायला सांगितले कारण आत्मस्तुती ही आत्महत्येसमानच असते.
स्वतःला श्रेष्ठ मानणारे लोक अविधिपूर्वकम् म्हणजे अन्याय्य मार्गाने उन्नती करू पहातात. उन्नती करावी पण ती विधिपूर्वक, न्याय्य मार्गाने करावी. मोठेपणा विसरावा. विद्या विनयेन शोभते.

16.18

अहङ्कारं(म्) बलं(न्) दर्पं(ङ्), कामं(ङ्) क्रोधं(ञ्) च संश्रिताः।
मामात्मपरदेहेषु, प्रद्विषन्तोऽभ्यसूयकाः।।16.18।।

ते अहंकार,बळ, घमेंड, कामना आणि क्रोधादिकांच्या आहारी गेलेले आणि दुसऱ्यांची निंदा करणारे पुरुष आपल्या व इतरांच्या शरीरात असलेल्या मज अंतार्यामीचा द्वेष करणारे असतात.

अहंकार या शब्दाच्या विविध छटा आहेत. केवळ मी आहे ही आपल्या अस्तित्वाची जाणीव हा शुद्ध अहंकार तर स्वतःची प्रौढी मिरवणे हा अशुद्ध अहंकार इथे अभिप्रेत आहे.
ठाकूर रामकृष्ण देव सांगत की  संत महात्मे जेव्हा मी असे बोलतात तेव्हा तो कसलीही बाधा नसलेला आपल्या अस्तित्वाची जाणीव असलेला शुद्ध अहंकार असतो. जिथे आत्मप्रौढी असते तेव्हा तो अशुद्ध अहंकार असतो.

16.19

तानहं(न्) द्विषतः(ख्) क्रूरान् , संसारेषु नराधमान्।
क्षिपाम्यजस्रमशुभान्, आसुरीष्वेव योनिषु।।16.19।।

त्या द्वेष करणार्‍या, पापी, क्रूरकर्मे करणार्‍या नराधमांना मी संसारात वारंवार आसुरी योनीतंच टाकतो.

ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः किंवा सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो या शब्दांत भगवंतांनी ठिकठिकाणी जीवात असलेले स्वतःचे अस्तित्व सांगितले आहे. पण जीवाला त्यांचा विसर पडतो. स्वतःची क्षमता विसरल्यामुळे आलेला न्यूनगंड आपल्यातील परमात्म्याचा आणि इतर जीवांना तुच्छ लेखण्याच्या प्रवृत्तीतून आलेला अहंगंड इतरांतील परमात्म्याचा अपमान करत असतात.

16.20

आसुरीं(य्ँ) योनिमापन्ना, मूढा जन्मनि जन्मनि।
मामप्राप्यैव कौन्तेय, ततो यान्त्यधमां(ङ्) गतिम्।।16.20।।

हे अर्जुना! ते मूढ मला प्राप्त ना होता जन्मोजन्मी आसुरी योनीतच जन्मतात. उलट त्याहूनही अति नीच गतीला प्राप्त होतात. अर्थात घोर नरकांत पडतात.

या श्लोकात अत्यंत कठोर शब्दांत भगवंतांनी जाणिव करून दिली आहे की जशी ज्यांची कर्मे, तशाच प्रकारच्या वातावरणात त्यांना पुढील जन्म मिळतो. पेरलेल्या बीजाप्रमाणे रोपटे येते, पर्जन्य केवळ पूरक आहे त्याचप्रमाणे जसे कर्म, तसा पुढील जन्म; ईश्वर केवळ निमित्तमात्र आहेत. गुरुदेव सांगतात चित्रगुप्त नांवाचा छुपा cctv camera सर्वांची कर्मे टिपत असतो. त्यामुळे कुठलेही कर्म लपून रहात नाही. या नियमाला अपवाद म्हणजे चांगल्या संस्कारांची स्थापना करण्यासाठी भक्त प्रल्हाद यांचा दैत्य कुळात जन्म झाला होता.

16.21

त्रिविधं(न्) नरकस्येदं(न्), द्वारं(न्) नाशनमात्मनः।
कामः(ख्) क्रोधस्तथा लोभ:(स्), तस्मादेतत्त्रयं(न्) त्यजेत्।।16.21।।

काम क्रोध आणि लोभ ही तीन प्रकारची नरकाची दारे आत्म्याचा नाश करणारी अर्थात त्याला अधोगतीला नेणारी आहेत. म्हणूनच त्या तिन्ही चा त्याग करावा.

अर्जुनाच्या निमित्ताने भगवंतांनी सर्वांनाच काम, क्रोध आणि लोभ ही नरकाची तीन द्वारे आहेत याची जाणीव करून दिली आहे. तसंही या तीन गोष्टींमुळे मनुष्याला वाईट संगत लागते. HEAVEN IS GOOD COMPANY, HELL IS BAD COMPANY.
स्वामी विवेकानंदांना
एकाने विचारले की वाईट गोष्टींचे अस्तित्व का असते? स्वामीजींनी त्याला resonance म्हणजेच स्वरतरंगांचे उदाहरण दिले. खोलीतील एका वाद्याच्या झंकाराचे तरंग अन्य वाद्यात ऐकू येतात तद्वतच चांगले अथवा वाईट तरंग प्रक्षेपित अथवा ग्रहण केले जातात.

16.22

एतैर्विमुक्तः(ख्) कौन्तेय, तमोद्वारैस्त्रिभिर्नरः।
आचरत्यात्मनः(श्) श्रेयस् , ततो याति परां(ङ्) गतिम्।।16.22।।

हे अर्जुना! या तिन्ही नारकांच्या दारांपासून मुक्त झालेला पुरुष आपल्या कल्याणाचे आचरण करतो. त्याने तो परम गती मिळवतो. अर्थात मला येऊन मिळतो.

दुसऱ्या अध्यायात आपल्यासाठी श्रेय म्हणजे कल्याणकारी काय आहे हे सांगण्याची विनंती अर्जुनाने भगवंतांना केली. इथे त्या प्रश्नाचे उत्तर मिळते - काम, क्रोध आणि लोभ यांच्या आहारी जाऊ नये.

16.23

यः(श्) शास्त्रविधिमुत्सृज्य, वर्तते कामकारतः।
न स सिद्धिमवाप्नोति , न सुखं(न्) न परां(ङ्) गतिम् ।।16.23।।

जो मनुष्य शास्त्राचे नियम सोडून स्वतःच्या मनाला वाटेल तसे वागतो त्याला सिद्धी मिळत नाही, परम गती मिळत नाही आणि सुखही मिळत नाही.

श्रेय आणि प्रेय माणसाला कळणार कसे? नदीचे दोन किनारे तिच्या पात्राला नियंत्रित ठेवतात. शास्त्रविधीच्या म्हणजेच शास्त्राच्या नियमांच्या दोन किनार्‍यांमध्ये जीवनाचा प्रवाह नियंत्रित ठेवला नाही तर माणसाला त्याचे श्रेय आणि प्रेय कळणार नाही आणि तो भरकटत जाऊन दु:खी होईल.
आर्य चाणक्य शासकीय कामासाठी शासनाने पुरवलेल्या तेलाचा दिवा आणि व्यक्तीगत कामासाठी स्वतः विकत घेतलेल्या तेलाचा दिवा वापरत असत.

16.24

तस्माच्छास्त्रं(म्) प्रमाणं(न्) ते, कार्याकार्यव्यवस्थितौ।
ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं(ङ्), कर्म कर्तुमिहार्हसि।।16.24।।

म्हणून तुला कर्तव्य आणि अकर्तव्य यांची व्यवस्था लावण्यात शास्त्रच प्रमाण आहे, असे जाणून तू शास्त्र विधीने नेमलेले कर्मच करणे योग्य आहे.

जीवनात सगळीकडे नियमांचे महत्त्व आहे. सृष्टीच्या चक्राचे काही नियम आहेत तर व्यावहारिक जीवनात प्रत्येक ठिकाणी जसे की वीज, वैद्यकीय सेवा, न्यायसंस्था; सगळ्या गोष्टी नियमानुसार चालत असतात. काय करावे आणि काय करू नये हे समजत नसेल तर शास्त्राच्या नियमांचे किनारे करून त्यांच्या मर्यादेत जीवन जगावे.

माऊली म्हणतात,
शास्त्र म्हणेल सांडावे। ते राज्यही तृण मानावे।

प्रश्नोत्तर सत्र
प्रश्न
जया पै काम आणि लोभ यात काय फरक आहे?
उत्तर आपल्याला ज्याची आवश्यकता आहे ती गोष्ट हवी असे वाटणे ही साधी इच्छा, काम. ही स्वाभाविक प्रेरणा आहे. पण आवश्यकता नसतानाही केवळ इतरांकडे आहे ते मला हवे हा लोभ असतो.

प्रश्न
मधु सिखवाल
ज्यांना वाईट सवयी आहेत अशांच्या सहवासात आल्याने मनुष्य त्यांच्या कर्मात लिप्त होतो का?
उत्तर ज्यांना वाईट सवयी आहेत अशांच्या सहवासात आल्याने जर मनुष्याच्या अंतरंगावर काही अनिष्ट परिणाम होत नसेल तर तो त्यांच्या कर्मात लिप्त होत नाही. वाईट सवयी असलेले निकटवर्तीय असले तरच त्यांना नियंत्रित करता येते आणि अशा वेळी जरूर नियंत्रित करावे. पण सर्वांनाच नियंत्रित करता येत नाही.

ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां(य्ँ) योगशास्त्रे
श्रीकृष्णार्जुनसंवादे दैवासुरसम्पद्विभागयोगो नाम षोडशोऽध्याय:।।