विवेचन सारांश
कर्म, अकर्म आणि विकर्म यांतील सूक्ष्म भेद.

ID: 2287
मराठी
शनिवार, 14 जानेवारी 2023
अध्याय 4: ज्ञानकर्मसन्यासयोग
2/3 (श्लोक 11-20)
विवेचक: गीता विशारद डॉ आशू गोयल जी


मधुर प्रार्थनेने व दीपप्रज्वलनाने सत्राची सुरुवात झाली. संक्रांतीच्या शुभपर्वानिमित्त विवेचकांनी सर्व साधकांना शुभेच्छा दिल्या. आसेतु हिमाचल  कन्याकुमारी पर्यंत संपूर्ण भारतात हे पर्व साजरे केले जाते. गुजरातेत उत्तरायण, दक्षिणेकडे पोंगल, बिहारमध्ये बिहू ,इत्यादी विविध नावांनी हा उत्सव ओळखला जातो. आता संक्रांती विषयी थोडी माहिती जाणून घेऊया. भारतात चंद्राच्या स्थितीवर आधारित दिनदर्शिका पूर्वापार तयार केली जाते, तर रोमन दिनदर्शिका सूर्याच्या स्थितीनुसार बनवली जाते. संक्रांत हा एकच असा सण आहे, जो दोन्ही दिनदर्शिकांनुसार एकाच दिवशी येतो. दर ७२ वर्षांनी तो एक दिवस पुढे जातो. जसे, १८६३ सालामध्ये संक्रांत बारा जानेवारी रोजी होती व पूर्वीची काही वर्षे आपण १४ जानेवारीला ती साजरी करत होतो. आता ते पर्व आपण १५ जानेवारीला साजरे करतो. या दिवशी प्रयाग तीर्थक्षेत्री स्नान करण्याला फार महत्त्व आहे. या काळात देवता प्रयाग तीर्थावर येतात, असे मानले जाते. या दिवसापासून चाळीस दिवस प्रयागक्षेत्री राहून साधक, नियम व अनुशासन यांचे पालन करीत, तपस्या करतात. यास कल्पवास असे म्हणतात. ही एक महान परंपरा आहे. ही परंपरा हजारो वर्षांपासून चालू आहे. माघ महिन्यात तेथे १०० कि.मी.इतक्या मोठ्या परिसरात दोन लाख तंबू उभारले जातात. कडाक्याची थंडी असूनही हजारो साधक या माघ मेळाच्या निमित्ताने तेथे जमतात. रामायण महाभारत यांतील कथा व सत्संगाचे आयोजन केले जाते. गोस्वामी तुलसीदासजींनी रामचरित मानसमध्ये बालकांडात याचे सुंदर वर्णन केले आहे.

भरद्वाज मुनि बसहिं प्रयागा। तिन्हहि राम पद अति अनुरागा॥
तापस सम दम दया निधाना। परमारथ पथ परम सुजाना॥
भरद्वाज मुनि प्रयागक्षेत्री निवास करतात. त्यांचे प्रभू रामचरणी अत्यंत प्रेम आहे. ते तपस्वी, समबुद्धी, जितेंद्रिय, दयानिधान आणि परमार्थ मार्गात अत्यंत सुजाण आहेत.

माघ मकरगत रबि जब होई। तीरथपतिहिं आव सब कोई॥
देव दनुज किंनर नर श्रेनीं। सादर मज्जहिं सकल त्रिबेनीं॥
माघ महिन्यात जेंव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेंव्हा सर्वजण तीर्थराज प्रयागक्षेत्री येतात. देवता, दैत्य, किन्नर आणि मनुष्य सर्व आदरपूर्वक त्रिवेणी स्नान करतात.

पूजहिं माधव पद जलजाता। परसि अखय बटु हरषहिं गाता॥

भरद्वाज आश्रम अति पावन। परम रम्य मुनिबर मन भावन॥
वेणीमाधवाच्या चरणकमलांची पूजा करतात. अक्षयवटाच्या स्पर्शाने त्यांचे शरीर पुलकित होते. भरद्वाज ऋषींचा आश्रम खूप पवित्र, अत्यंत रमणीय आणि श्रेष्ठ मुनींना भावणारा आहे.

तहाँ होइ मुनि रिषय समाजा। जाहिं जे मज्जन तीरथराजा॥
मज्जहिं प्रात समेत उछाहा। कहहिं परसपर हरि गुन गाहा॥
तीर्थराज प्रयागक्षेत्री स्नान करून सर्व ऋषि-मुनींचा समुदाय भरद्वाज ऋषींच्या आश्रमात एकत्र येतो. प्रातःकाली सर्व उत्साहपूर्वक स्नान करतात आणि भगवंताच्या गुणांची परस्परांमध्ये चर्चा करतात.

ब्रह्म निरूपन धरम बिधि बरनहिं तत्त्व बिभाग।
कहहिं भगति भगवंत कै संजुत ग्यान बिराग॥
ब्रह्मतत्त्वाचे निरूपण, धर्मविधान आणि तत्त्वविभागांचे वर्णन करतात. ज्ञान-वैराग्य युक्त भगवद्भक्ती चे कथन करतात.

एहि प्रकार भरि माघ नहाहीं। पुनि सब निज निज आश्रम जाहीं॥
प्रति संबत अति होइ अनंदा। मकर मज्जि गवनहिं मुनिबृंदा॥
अशा प्रकारे ते माघमहीनाभर स्नान करतात आणि मग सर्व आपापल्या आश्रमात परत जातात. दर वर्षी तिथे असाच आनंदोत्सव होतो. मकर स्नान करून मुनिवृंद परततो.

अशाच प्रकारे प्रत्येकाने जीवनात एक तरी कल्पवास करीन, असा संकल्प करावा. संक्रांतीपर्वात केलेले दानकर्म अनेक पटींनी पुण्यदायी ठरते. अशा या कल्याणकारी पर्वाचा आपण लाभ करून घेतला पाहिजे.
मागील सत्रात आपण पाहिले की दहाव्या श्लोकापर्यंत भगवंतांनी आपला परिचय दिला आहे. आता त्या पुढील श्लोकांचा अर्थ जाणून घेऊ.

4.11

ये यथा मां(म्) प्रपद्यन्ते, तांस्तथैव भजाम्यहम्।
मम वर्त्मानुवर्तन्ते, मनुष्याः(फ्) पार्थ सर्वशः॥4.11॥

हे अर्जुना! जे भक्त मला असे भजतात, मीही त्यांना तसाच भजतो. कारण सर्वच मानव सर्वप्रकारे माझ्याच मार्गाचे अनुसरण करतात.

भाव मुख्यत्वे पाच प्रकारचे आहेत-सख्य, दास्य, वात्सल्य, कांत आणि शांत. मित्रतेचा भाव तो सख्य भाव, दास ज्या भावाने भक्ती करतो तो दास्य भाव होय. मातृत्वाचा भाव वात्सल्याचे उदाहरण आहे. प्रेमभाव हा कांत भाव म्हणून ओळखला जातो. ऋषिभाव हा शांत भाव होय. यापैकी कोणत्याही भावाने भक्ती करा, त्याचे फळ जरूर मिळते. जो मनुष्य ज्या भावनेने एखाद्या गोष्टीकडे पाहतो, तसा त्याला साक्षात्कार होतो. एक उदाहरण पाहू. एक हलवाई होता. तो जिलबी बनवून विकत असे. त्याबरोबरच मोठ्या मडक्यात दही पण विकायला ठेवत असे. एके दिवशी तो जिलब्या तळत असताना एक कावळा सारखा दह्याच्या मडक्याजवळ येऊन दह्यात चोच मारण्याचा प्रयत्न करीत होता. हलवायाने उलथणीच्या सहाय्याने त्याला सात ते आठ वेळा हाकलले. नंतर मात्र कावळ्याच्या लक्षात आले की तो झारा आपल्यापर्यंत पोहोचतच नाहीये. हे पाहून त्याची भीड चेपली व तो त्या मडक्याच्या काठावर बसूनच राहिला. हलवायाने हकलले तरी तो दूर जाईना. हलवायाने रागारागाने जवळचे एक भांडे उचलून कावळ्याच्या दिशेने फेकले. योगायोगाने नेम बरोबर लागला व कावळ्याचा शिरोघात झाला. कावळा मरून पडला. आपल्या हातून हत्या घडली, या भावनेने हलवाई उदास झाला, रडू लागला व काम बंद करून बसून राहिला. एक साधू हे सर्व पहात होता. साधूने तेथील भिंतीवर एक वाक्य लिहिले, 'काग दही पर जान गवायो'. एक पांथस्थ, जो नुकताच चुकीच्या कागदावर सह्या केल्यामुळे बँकेने निलंबित केलेला कर्मचारी होता, तेथून जात होता. त्याने हलवायाला विचारले, की आज दुकान बंद आहे का? हलवायाने भिंतीकडे बोट दाखवले. त्या बँक कर्मचाऱ्याने ते वाक्य 'कागद ही पर जान गवायो', असे वाचले. त्याला वाटले की हे आपल्याला उद्देशून लिहिलेले दिसते. तो खजील होऊन तेथून निघून गेला. नंतर काही वेळाने अजून एक युवक तेथून जात होता. त्याने ते वाक्य 'का गदही पर जान गवायो' असे वाचले व त्यालाही वाटले की हे आपल्याबद्दलच लिहिले असावे. त्याने नुकतेच एका विजातीय मुलीशी लग्न केले होते. कडक स्वभावाच्या त्याच्या वडिलांना ते मान्य नसल्याने त्यांनी त्याला घरात घेतले नव्हते, परंतु प्रेमळ स्वभावाच्या आईने मात्र नवीन सुनेला प्रेमाने काही दागिने दिले. पण घरात थारा न दिल्यामुळे रात्री ते दोघे एका हॉटेलमध्ये राहिले. सकाळी तो युवक जागा झाला, तेव्हा त्याच्या लक्षात आले की पत्नी दागिने घेऊन गायब झाली आहे.
एकाच वाक्याचा अर्थ तीन वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या लोकांनी वेगवेगळा वाचला कारण त्यांचा भावसंदर्भ वेगवेगळा होता.
भगवंत सांगतात, ज्या भावनेने जो मला शरण येईल, तसे फळ मी त्याला देतो. एक सुंदर भजन आहे. असे भजन क्वचितच आढळते, जे भगवंत आपल्या भक्तासाठी गात आहेत.

भाव का भूखा हूँ मैं, बस भाव ही एक सार है |
भाव से मुझ को भजे तो, उसका बेडा पार है ||
अन्न धन अरु वस्त्र भूषण, कुछ न मुझको चाहिए |
आप हो जाये मेरा बस, पूरण यह सत्कार है ||
भाव बिन सुना पुकारे, मैं कभी सुनता नहीं |
भाव की एक टेर ही, करती मुझे लाचार है ||
भाव बिन सब कुछ भी दे तो, मै कभी लेता नहीं |
भाव से एक फुल भी दे, तो मुझे स्वीकार है ||
जो भी मुझ मे भाव रख कर, आते है मेरी शरण |
मेरे और उस के ह्रदय का, एक रहता तार है ||

दुर्योधनाने राजेशाही थाटमाट करून श्रीकृष्णांना जेवावयास बोलावले, परंतु विदुरजींबरोबरच मी भोजन करीन, असे श्रीकृष्णांनी त्याला सांगितले. गजेंद्राने एक फूल अर्पण केले आणि भगवंत धावून आले.
गीतेच्या नवव्या अध्यायात एक श्लोक आहे,
पत्रं पुष्पं फलं तोयम्,यो मे भक्त्या प्रयच्छति|
तदहं भक्त्युपर्हुतम्, अश्नामि प्रयतात्मनः|
याचा अर्थ भक्त जी काही छोट्यात छोटी वस्तू सुद्धा भक्तीने अर्पण करतो, तेव्हा मी त्याचा प्रीतीपूर्वक स्वीकार करतो. परमेश्वराला वस्तू काय अर्पण करणार! सर्वकाही परमेश्वराचेच तर आहे. परंतु भाव मात्र आपला असतो. परमेश्वराला तुम्ही कोणत्या नावाने पुकारता, ते महत्त्वाचे नसून त्यामागील भाव महत्त्वाचा असतो. भगवंत भावाचा भुकेला आहे.

4.12

काङ्क्षन्तः(ख्) कर्मणां(म्) सिद्धिं(म्), यजन्त इह देवताः।
क्षिप्रं(म्) हि मानुषे लोके, सिद्धिर्भवति कर्मजा॥4.12॥

या मनुष्य लोकात कर्माच्या फळाची इच्छा करणारे लोक देवतांची पूजा करतात. कारण त्यांना कर्मापासून उत्पन्न होणारी सिद्धी लवकरच मिळते.

इथे देवता व भगवान यांतील फरक लक्षात घेतला पाहिजे. इष्ट देवतेची आराधना करून लवकर सिद्धी प्राप्त करून घेता येते. देवता वरदान देताना हानी किंवा लाभाची पर्वा करत नाहीत, जसे ब्रह्माने कुंभकर्णाला सहा महिने निद्रेचे वरदान दिले. देवतांची तपस्या केल्यावर भक्ताला इच्छित वर त्यांना द्यावाच लागतो, परंतु भगवान मात्र पित्यासमान आहेत. त्यांना भक्ताच्या कल्याणाची पर्वा आहे. पित्याकडे मुलाने जर मोबाईल मागितला, तर पिता विचार करेल, की खरंच मुलाला त्याची जरुरी आहे का?, मोबाईल दिल्याने अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊन मुलाचे नुकसान तर होणार नाही ना?. दुकानदाराला मोबाईलच्या किमती इतके पैसे मिळाले की तो मोबाईल मुलाच्या स्वाधीन करेल. देवता या दुकानदारासारख्या समजाव्यात व भगवान हे परमपिता समजावेत म्हणून भगवंतांचीच आराधना नेहमी करावी.

4.13

चातुर्वर्ण्यं(म्) मया सृष्टं(ङ्), गुणकर्मविभागशः।
तस्य कर्तारमपि मां(म्), विद्ध्यकर्तारमव्ययम्॥4.13॥

ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या चार वर्णांचा समूह, गुण आणि कर्म यांच्या विभागाने मी निर्माण केला आहे. अशा रीतीने या सृष्टीरचना इत्यादी कर्मांचा मी कर्ता असूनही मला- अविनाशी परमात्म्याला तू वास्तविक अकर्ताच समज.

या श्लोकाबद्दल नेहमी अनर्थ निर्माण करून दुरुपयोग केला जातो व प्रक्षोभक विधाने केली जातात. त्यामुळे भगवंतांना या श्लोकातून काय सांगायचे आहे, हे नीट समजून घेतले पाहिजे. संपूर्ण सृष्टी ही ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र या चार वर्णांनी बनलेली आहे. सृष्टीतील प्रत्येक घटकाचे, गुण व क्रमानुसार या चार वर्णांमध्ये विभाजन होते. उदाहरणार्थ, गुणांनुसार पक्ष्यांमध्ये कबूतर हे ब्राह्मण आहे तर कावळा हा शूद्र आहे. कुत्र्याच्या योनी मधील एखादा कुत्रा मर्सिडीज गाडीतून मालकाबरोबर फिरेल तर दुसरा एखादा कुत्रा गल्लीत अन्नासाठी भटकत राहील. त्याच्या पूर्वकर्मानुसार त्याला तशी स्थिती प्राप्त होईल. याच सृष्टीतील पाषाण हा एक घटक आहे. कुशल मूर्तिकाराला दगडाच्या पुलिंगत्वाची वा स्त्रीलिंगत्वाची योग्य जाण असते. ती ओळखून तो मूर्तीसाठी योग्य पाषाणाची निवड करतो. दक्षिणेकडे एका मंदिरात एक मूर्ती अर्धवट अवस्थेत घडवलेली आहे. नवख्या मूर्तिकाराला त्या पाषाणाचे लिंग बरोबर न समजल्याने मूर्ती हवी तशी न घडल्याचे सांगितले जाते.
उत्तर कांड मध्ये एक श्लोक आहे-
एक पिता के बिपुल कुमारा। होहिं पृथक् गुन सील अचारा॥
कोउ पंडित कोउ तापस ग्याता। कोउ धनवंत सूर कोउ दाता॥1॥

कोउ सर्बग्य धर्मरत कोई। सब पर पितहि प्रीति सम होई॥
कोउ पितु भगत बचन मन कर्मा। सपनेहुँ जान न दूसर धर्मा॥2॥

एकाच पित्याचे अनेक पुत्र एकसारखे नसतात. गुणकर्माने ते भिन्न असतात.
एखादा क्षत्रिय तपस्या करून ब्राह्मणही होऊ शकतो. राजा कौशिक ने तपश्चर्या केली व ऋषित्व प्राप्त केले. पुढे तो राजर्षी म्हणून ओळखला जाऊ लागला. त्यानंतर त्याने महर्षित्व व ब्रह्मर्षित्वही प्राप्त केले. तेच पुढे विश्वामित्र ऋषी म्हणून ओळखले गेले. महाभारतात कर्ण हा सूतपुत्र होता. दुर्योधनाने त्याला अंगदेशचे राजपद देऊन क्षत्रियत्व बहाल केले व त्यामुळे राजकुमारांच्या स्पर्धेमध्ये भाग घेण्याची संधी त्याला मिळाली. कर्मामुळे वर्ण परिवर्तन शक्य आहे, हे यावरून दिसून येते. पूर्वकर्मानुसार विविध योनींमध्ये जन्म मिळतो. त्याबरोबरच कर्म करण्याचा अधिकार भगवंतांनी दिलेला आहे. कर्म करून श्रेष्ठत्व प्राप्त करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. गजेंद्र व जटायू यांनी प्राप्त योनीमध्येच मोक्ष मिळवल्याचे उदाहरण आहे.

4.14

न मां(ङ्) कर्माणि लिम्पन्ति, न मे कर्मफले स्पृहा।
इति मां(म्) योऽभिजानाति, कर्मभिर्न स बध्यते॥4.14॥

कर्मांच्या फळाची मला इच्छा नाही. त्यामुळे मला कर्मांचे बंधन होत नाही. अशाप्रकारे जो मला तत्त्वतः जाणतो, त्यालाही कर्मांचे बंधन होत नाही.

गुणकर्मानुसार चातुर्वर्ण्य मीच निर्माण केले आहेत परंतु कर्मफलाचा मी विचारही करत नाही, हे तत्व जो जाणतो त्याला कर्म बाधत नाही.

4.15

एवं(ञ्) ज्ञात्वा कृतं(ङ्) कर्म, पूर्वैरपि मुमुक्षुभिः।
कुरु कर्मैव तस्मात्त्वं(म्), पूर्वैः(फ्) पूर्वतरं(ङ्) कृतम्॥4.15॥

पूर्वीच्या मुमुक्षूंनीसुद्धा असे जाणूनच कर्मे केली आहेत. म्हणून तूही पूर्वजांकडून नेहमीच केली जाणारी कर्मेच कर.

माझा जन्म व कर्म दोन्ही दिव्य आहेत. तुम्हाला सुद्धा कर्म करण्याचा अधिकार व स्वातंत्र्य प्राप्त आहे . तुम्ही सुद्धा दिव्य कर्म करू शकता.

4.16

किं(ङ्) कर्म किमकर्मेति, कवयोऽप्यत्र मोहिताः।
तत्ते कर्म प्रवक्ष्यामि, यज्ज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात्॥4.16॥

कर्म काय आणि अकर्म काय याचा निर्णय करण्याच्या बाबतीत बुद्धिमान पुरुषही संभ्रमात पडतात. म्हणून ते कर्माचे तत्व मी तुला व्यवस्थित समजावून सांगेन. ते कळले की तू अशुभापासून म्हणजेच कर्मबंधनातून सुटशील.

इतरेजनांच्या कर्माविषयी तुलना अथवा निर्णय करण्यापेक्षा स्वतःचे कर्म तत्वतः जाणून घेणे हे महत्त्वाचे आहे.

4.17

कर्मणो ह्यपि बोद्धव्यं(म्), बोद्धव्यं(ञ्) च विकर्मणः।
अकर्मणश्च बोद्धव्यं(ङ्), गहना कर्मणो गतिः॥4.17॥

कर्माचे स्वरुपही जाणले पाहिजे आणि अकर्माचे स्वरुपही जाणले पाहिजे. तसेच विकर्माचे स्वरुपही जाणले पाहिजे. कारण कर्माचे तात्विक स्वरुप समजण्यास कठीण आहे.

कर्म या विषयाला बरेच आयाम आहेत, ज्यावरच त्याचे फळ कधी, कुठे, केव्हा व कसे मिळेल हे ठरते. ही कर्मगती अत्यंत गहन आहे. ती तू तत्वतः समजून घे.
१.पदार्थ + क्रिया. हे प्रकृतीचे स्वरूप आहे. पदार्थ उत्पन्न होतात, नाश पावतात. क्रिया आरंभ होते व पूर्ण होते. प्रकृती कायम बदलत राहते.
२.क्रिया-कर्म. क्रिया करताना 'मी करतो', असा कर्तेपणाचा भाव निर्माण होतो, तेव्हा ते कर्म बनते.
३.विधि-निषेध. जे कर्म शास्त्रानुसार होते ते विधि कर्म व जे शास्त्रातील नियम झुगारून केले जाते ते निषिद्ध कर्म.
४.शुभ-अशुभ. निषिद्ध कर्मामध्ये देखील शुभ, अशुभ कर्म घडून येते. स्मशानात जाणे हे अशुभकर्म मानले जाते, परंतु विधिनुसार ते करावेच लागते. मंदिरात परमेश्वर दर्शनासाठी जाणे हे शुभ कर्म आहे. परंतु स्नान न करता देवालयात जाणे, हे निषिद्ध कर्म मानले जाते. विधिकर्म हे शुभ व निषिद्ध कर्म हे अशुभ मानले जाते, जसे स्नान न करता मंदिरात जाणे अशुभकर्म आहे.
५.कायिक-मानसिक-वाचिक.  काया, वाचा व मन या तीन गोष्टी कर्म घडण्यास सहाय्यभूत असतात. सत् युगात मनात आलेला पापी विचार हा सुद्धा पापकारक ठरत असे. परंतु कलियुगात मात्र मनात आलेला पापी विचार पापास कारणीभूत ठरत नाही व मनाने चांगला विचार केल्यास पुण्यही प्राप्त होते.
गोस्वामी तुलसीदासजींनी म्हटलेच आहे. -
कलि कर एक पुनीत प्रतापा।मानस पुन्य होहिं नहिं पापा।।
६.सात्विक-राजस-तामस.  वर उल्लेख केलेले सर्व कर्म हे या तीन श्रेणीमध्ये ओळखले जाते.
७.संचित-क्रियमाण-प्रारब्ध.  पूर्व जन्मीचे कर्म हे संचित. संचितच प्रारब्ध बनून या जन्मी भोगावे लागते. क्रियमाण म्हणजे या जन्मी वर्तमानात आपल्याकडून घडणारा पुरुषार्थ. एक सोपे उदाहरण घेऊ. बँकेत आपण वेगवेगळ्या मुदतीच्या मुदत ठेवी ठेवतो. एखादी मुदत ठेव तीन वर्षांनी मॅच्युअर झाली. हे क्रियमाण झाले असे समजावे. क्रियमाण म्हणजे भोगत असलेले भोग व वर्तमानातील पुरुषार्थ. क्रियमाण आपल्या पुरुषार्थानुसार कमी-अधिक होत  राहते. आपल्या मृत्यूसमयी जे क्रियमाण शिल्लक राहते, ते पुढल्या जन्मीचे संचित ठरते.
८.कर्मयोग-निष्काम कर्मयोग-कर्म संन्यास योग.  परमात्मप्राप्तीसाठी कर्म केले जाते तो कर्मयोग. निष्काम कर्मयोगात कर्मफलाचा त्याग होतो. कर्मसंन्यास योगात कर्तेपणाचा भाव समाप्त होतो.
९.नित्य-नैमित्तिक-काम्य-निषिद्ध-प्रायश्चित्त-उपासना.  आपण सर्वजण या सहा प्रकारांनी कर्म करीत असतो. पाचव्या अध्यायातील आठव्या व नवव्या श्लोकामध्ये वर्णन केल्याप्रमाणे पहाणे, ऐकणे, स्पर्श करणे, वास घेणे, भोजन करणे, चालणे, झोपणे, इत्यादी सर्व नित्य कर्मे होत. विद्यार्थी अभ्यास करतात, गृहिणी भोजन बनवते, इत्यादी आपल्या वाट्याला आलेले कर्म हे नैमित्तिक कर्म होय. आपल्याला एखाद्या गोष्टीची इच्छा होते व त्या इच्छापूर्तीसाठी आपण जे कर्म करतो ते काम्य कर्म होय पूजा-पाठ करणे, यज्ञ करणे ही काम्य कर्मे होत. जे कर्म शास्त्राला अनुसरून नाही, ते निषिद्ध कर्म. निषिद्ध कर्माचा परिणाम टाळण्यासाठी जे कर्म केले जाते, ते प्रायश्चित्त कर्म. परमेश्वरा जवळ बसून त्याचे ध्यान केले जाते, ती उपासना.
१०.कर्म-अकर्म-विकर्म.  कर्म म्हणजे सामान्य कर्म. ज्यावेळी तीव्र आसक्ती निर्माण होते व खोटे बोलून किंवा बेईमानी करून एखादे कर्म केले जाते, ते विकर्म. अकर्म हा एक योग आहे. हा गीतेचा मूळ भाव आहे. अकर्म समजून घेणे, हे कल्याणकारी आहे .एका सोप्या उदाहरणाद्वारे अकर्म म्हणजे काय हे समजून घेऊया. गाडीचे इंजिन म्हणजे कामना समजूयात. गाडीचे चालणे म्हणजे क्रिया समजूयात. घाट चढताना गाडीचे इंजिन चालू करून गिअर टाकावा लागतो तेव्हा गाडी घाट चढू शकते. उतारावर मात्र गाडीचे इंजिन बंद करून सुद्धा गाडी चालू शकते. इंजिन म्हणजे कामना.जीवनातही अशी स्थिती येते जेव्हा कामना समाप्त होते, कर्म आपोआप होत राहते.

जीवनात जेव्हा भक्तीचा सत्संग मिळतो तेव्हा कामना समाप्त होते. कर्तेपण नाहीसे होते व नियत कर्म चालूच राहते. यालाच अकर्म म्हणतात. 
भक्ताकडे कर्तृत्व भाव नसतो, कर्मफळाची अपेक्षा नसते. तो भगवंताच्या कार्यात फक्त निमित्त होतो. एका भक्ताने गायलेले सुंदर भजन इथे उद्धृत केले आहे.

मेरा आपकी कृपा से, सब काम हो रहा है।
करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है॥

पतवार के बिना ही, मेरी नाव चल रही है।
हैरान है ज़माना, मंजिल भी मिल रही है।
करता नहीं मैं कुछ भी, सब काम हो रहा है॥

तुम साथ हो जो मेरे, किस चीज की कमी है।
किसी और चीज की, अब दरकार ही नहीं है।
तेरे साथ से गुलाम, अब गुलफाम हो रहा है॥

मैं तो नहीं हूँ काबिल, तेरा पार कैसे पाऊं।
टूटी हुयी वाणी से, गुणगान कैसे गाऊं।
तेरी प्रेरणा से ही, सब ये कमाल हो रहा हैं॥

मुझे हर कदम कदम पर, तूने दिया सहारा।
मेरी ज़िन्दगी बदल दी, तूने करके एक इशारा।
एहसान पे तेरा ये, एहसान हो रहा है॥

तूफ़ान आंधियों में, तूने ही मुझको थामा।
तुम कृष्ण बन के आए, मैं जब बना सुदामा।
तेरे करम से अब ये, सरेआम हो रहा है॥

मेरा आपकी कृपा से, सब काम हो रहा है।
करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है॥

इथे भक्त श्रीकृष्णाला म्हणतो आहे की भगवंता तूच कर्ता आहेस. भक्त म्हणतो, माझे नाव होते आहे पण करणारा तू आहेस. तो म्हणतो, माझी नाव वल्ह्याशिवाय नदीपार होते आहे, काही केल्याविनाच ध्येय साध्य होत आहेत. भगवंताच्या असण्याने त्याला सर्व काही मिळाले आहे आणि आता कसलीच गरज उरली नाही. तो पुढे म्हणतो, "भगवंता मी तुझे गुणगान करण्यास असमर्थ आहे तरी माझ्या बोबड्या बोलाने गातो आहे." प्रत्येक वेळी त्याचा एकमेव आधार असणाऱ्या भगवंतांचा, त्याचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकणाऱ्या भगवंतांचा तो ऋणी आहे. तो म्हणतो, "भावसागरातील वादळातून तूच मला वाचवलेस. जेंव्हा मी सुदामा झालो तेंव्हा तूच श्रीकृष्ण होऊन धावलास." तो पुनः पुन्हा गातो की कन्हैय्या तूच कर्ता आहेस आणि नाव मात्र माझे होते आहे. 

असेच आणखीन एक श्री. हनुमानप्रसादजी पोद्दार यांचे एक सुंदर भजन आहे.

कर प्रणाम तेरे चरणों में लगता हूं अब तेरे काज ।
पालन करने को आज्ञा तब मैं नियुक्त होता हूं आज ॥

अन्तर में स्थित रह मेरी बागडोर पकड़े रहना ।
निपट निरंकुश चंचल मन को सावधान करते रहना ॥

अन्तर्यामी को अन्तः स्थित देख सशंकित होवे मन ।
पाप वासना उठते ही हो, नाश लाज से वह जल भुन ॥

जीवों का कलरव जो दिन भर सुनने में मेरे आवे ।
तेरा ही गुनमान जान मन प्रमुदित हो अति सुख पावे ॥

तू ही है सर्वत्र व्याप्त हरि ! तुझमें यह सारा संसार ।
इसी भावना से अन्तर भर मिलूं सभी से तुझे निहार ॥

प्रतिपल निज इन्द्रिय समूह से जो कुछ भी आचार करूं ।
केवल तुझे रिझाने, को बस तेरा ही व्यवहार करूं ॥

इथे देखील भक्त म्हणतो, भगवंता तूच कर्ता करविता आहेस, तुझ्या चरणकमलाशी राहून मी तुझे कार्य कारेन. तूच मला मार्ग दाखव आणि माझ्या चंचल मनाला सावध राहण्यास मदत कर. तूच माझ्या इच्छा आणि वासनांचा नाश करण्यास मदत कर. सर्व प्राणिमात्रांच्या गुंजारवातून तुझेच गुणगान माझ्या श्रवणी पडो. सर्वांभूती तूच आहेस याची प्रचिती मला येवो. माझ्या इंद्रियांद्वारे जे काही व्यवहार होतात ते माझ्याकडून फक्त तुझ्या रंजनासाठी होवो.

ज्या कार्यासाठी माझी नियुक्ती परमेश्वराने केली आहे ते कर्म मी करत आहे, या भावनेने जे कर्म होते ते अकर्म.

4.18

कर्मण्यकर्म यः(फ्) पश्येद्, अकर्मणि च कर्म यः।
स बुद्धिमान्मनुष्येषु, स युक्तः(ख्) कृत्स्नकर्मकृत्॥4.18॥

जो पुरुष कर्मामध्ये अकर्म पाहील आणि अकर्मामध्ये कर्म पाहील, तो मनुष्यांमध्ये बुद्धिमान होय आणि तो योगी सर्व कर्मे करणारा आहे.

ही गोष्ट समजण्यास कठीण आहे. एका कथेद्वारे ही जाणून घेऊ.
जंगलात एक तपस्वी महात्मा राहत असत. त्यांनी पोपटाचे एक अनाथ पिल्लू पाळले होते. एकदा जंगलात भयंकर तूफान आले, तेव्हा साधू आसरा शोधत जवळच्या गावात पोहोचले. संपूर्ण गावही नदीच्या पुराने वेढले होते. दूर एका टेकडीवर एक मिणमिणता दिवा दिसत होता. साधू महाराज त्या दिशेने गेले. एक गणिका शृंगार करून झोपडीच्या दारात उभी होती. साधू महाराज आपल्या झोपडीत आसरा घेणार नाहीत व आपल्या हातचे अन्नही  ग्रहण करणार नाहीत, हे जाणून गणिकेने त्यांना समोरच्या झोपडीत थांबण्यास सांगितले व कोरडा शिधा त्यांना पोहोचवला. साधू महाराज प्रसन्न झाले व काही दिवस तेथे राहिले. ते रोज गणिकेला ईश्वराच्या गोष्टी सांगत. सत्संगतीचा गणिकेवर परिणाम झाला व तिने साधुमहाराजांना दीक्षा देण्याची विनंती केली. साधुमहाराजांनी तिला सांगितले, की आधी तू या पोपटाला राम राम म्हणायला शिकव. असे सांगून दीक्षा देण्याचे त्यांनी टाळले. गणिका त्या पोपटाला घेऊन आपल्या झोपडीत आली व रोज दिवसभर त्याला 'राम राम' बोल म्हणून शिकवू लागली. इकडे साधूचे लक्ष रोज गणिका काय करते, तिच्याकडे कोण कोण येते, जाते याकडेच लागून राहिले. एके दिवशी गणिकेला साप चावला व ती जोराने विव्हळली. ते ऐकून साधुमहाराज धावले. परंतु ते ठेच लागून डोक्यावरच पडले व गतप्राण झाले. तिकडे गणिकाही मरण पावली. यमाच्या दरबारात साधूने पाहिले, तर गणिका रांगेत त्यांच्यापुढे उभी होती. शेवटचे दहा दिवस तिच्या मुखातून राम नामाचा जप होत होता. त्यामुळे चित्रगुप्ताने दिव्यलोकांत तिला पाठवले. अंतसमयी साधूने गणिका का विव्हळली, याचे चिंतन करीत प्राण सोडला होता त्यामुळे त्याला पुन्हा धरतीवरच पुनर्जन्म मिळाला. साधूने जीवनभर तपस्या केली तरी अंतकाळच्या भावाने त्याचे आयुष्यभराचे अकर्म कर्म झाले आणि त्याला पुन्हा तपस्या करण्यासाठी पुनर्जन्म घ्यावा लागला. गणिका मात्र जीवनभर आपल्या वाट्याला आलेले कर्म पार पाडत राहिली. अंतकाळी साधूच्या वचनावर श्रद्धा ठेवून राम राम म्हणत पोपटाला शिकवत राहिली. अंतकाळी घेतलेल्या रामनामाने तिचे कर्म देखील अकर्म झाले. तिचा अंतसमयीचा भाव तिला दिव्य लोक प्रदान करून गेला.
कोरोना काळामध्ये अगरवाल समाजातर्फे जेवणाच्या थाळ्या हॉस्पिटलमध्ये पोचवल्या जात असत. काही लोकांनी त्यांना मदत करण्याची इच्छा प्रदर्शित केली, तेव्हा अगरवाल समाजाने त्यांना शंभर थाळ्या पोहोचवण्यासाठी दिल्या. परंतु त्या लोकांनी आपल्या राजकारणी पक्षाचे नाव लावून त्या थाळ्यांचे वाटप केले. बघावयास गेले तर हे पुण्य कर्म दिसते, परंतु अशाप्रकारे दुसऱ्यांचे श्रेय आपल्या नावावर घेणे हे पाप कर्मच होय.

4.19

यस्य सर्वे समारम्भाः(ख्), कामसङ्कल्पवर्जिताः।
ज्ञानाग्निदग्धकर्माणं(न्), तमाहुः(फ्) पण्डितं(म्) बुधाः॥4.19॥

ज्याची सर्व शास्त्रसंमत कर्मे कामनारहित व संकल्परहित होत असतात, तसेच ज्याची सर्व कर्मे ज्ञानरुप अग्नीने जळून गेली आहेत, त्या महापुरुषाला ज्ञानी लोकही ‘पंडित’ म्हणतात.

कर्म करता करता अकर्माची व्याख्या जाणून जो अकर्म करू लागतो, त्याची भगवान स्तुती करतात.

4.20

त्यक्त्वा कर्मफलासङ्गं(न्), नित्यतृप्तो निराश्रयः।
कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि, नैव किञ्चित्करोति सः॥4.20॥

जो पुरुष सर्व कर्मांमध्ये आणि त्यांच्या फलांमध्ये आसक्ती पूर्णपणे टाकून तसेच सांसारिक आश्रय सोडून देऊन परमात्म्यात नित्य तृप्‍त असतो, तो कर्मांमध्ये उत्तमप्रकारे वावरत असूनही वास्तविक काहीच करीत नाही.

निष्काम कर्म करणारे योगी तीन प्रकारचे असतात. कर्मयोगी हे कर्माला यज्ञ मानून ते करत असतात. ज्ञानयोगी हे जड व चेतन यातील फरक जाणून घेतात व विवेक बुद्धीने कर्म करतात. भक्तियोगी हे सर्व कर्मे श्रीकृष्णांना अर्पण करतात व अशा प्रकारे ते तिघेही परमपदाला पोहोचतात.


प्रश्नोत्तरे
१.निर्मलाजी - मंदिरामध्ये आरतीसाठी थांबतो. परंतु पूर्ण लक्ष का लागत नाही?.
तुमचे मन संसारात व्यग्र असते व तुम्ही मंदिरामध्ये फक्त क्रिया करता. मन सावधान करण्याचा अभ्यास करा. अभ्यास आणि वैराग्य याने मन ताब्यात  ठेवता येते.

२.के.डी सिंगजी - विकर्म निषिद्ध आहे का?
हो. निश्चितच. चहा पिण्याची सवय आहे. जर चहा नाही मिळाला, तर चोरून चहा प्यायला. म्हणजेच आसक्ती इतकी तीव्र आहे .मग हे कर्म निषिद्ध होणारच. 

३.बजरंगजी - विकर्म म्हणजे पाप?
असंच काही निश्चित म्हणू शकणार नाही. गोष्ट अशी आहे की आसक्तीमुळे जी गोष्ट करण्यायोग्य नाही ती केली जाते तेंव्हा ते विकर्म होते.

४.मंजूजी - आजकाल कशातच मन लागत नाही. त्यासाठी काही उपाय सांगावा.
परमेश्वराविषयी ज्यांना प्रेम आहे अशा लोकांच्या संगतीत राहावे. चांगली पुस्तके वाचावीत. सत्संग करावा. टीव्ही पहात असाल तर सासू सुनेची खडाजंगी न पाहता, संस्कार, आस्था ही चॅनेल्स पहावीत. यामुळे वृत्ती चांगली बनते. दिवसभर नामजप करावा.

५.विमलाजी - आपण सांगितल्याप्रमाणे संक्रांतीच्या दिवशी दान करू शकलो नाही तर काय करावे? नंतर केले तर चालते का?
संक्रांतीच्या पर्वाचे महत्त्व असते. त्यादिवशी दानाचा संकल्प सोडून दानाची वस्तू अथवा धन वेगळे ठेवून द्यावे व नंतर सोयीनुसार त्याचे दान करावे. हे सर्व परमेश्वराची इच्छा मानून करावे.

६.सुमितजी - योग, प्राणायाम आध्यात्मिक शक्ती जागृत करतात. सिद्धी मिळवण्यासाठी गृहस्थ काय करू शकतात?
अध्यात्म मार्गावर चालणारे लोक सिद्धींना अडथळाच समजतात. कुंडली जागृत करून देणारी आठ अथवा पंधरा दिवसांची शिबिरे ,या गोष्टी ठीक नव्हेत. ही दीर्घकाळची साधना असते. त्यात नियम पालन कटाक्षाने करावे लागते. मन, शरीर पूर्णपणे संयमित करावे लागते.

७.आशाजी - काही कामे अशी असतात, की ती स्वतः करावीच लागतात. मग त्यावेळी भाव कसा ठेवावा?
पहिली गोष्ट म्हणजे जे काम करतो ते शरीराने करतो हे लक्षात घ्यावे. आई, पत्नी, सून या रूपांमध्ये माझे जे दायित्व आहे, त्यानुसार कामाची पूर्ती करावी. कर्तेपणाचा त्याग करावा. कर्मफलाचाही विचार करू नये.

८.कांताजी - जर भावच महत्वपूर्ण असतो, तर मग सुतक असताना पूजा पाठ का करत नाहीत?
शुभ कर्म करताना शास्त्राचे संविधान लक्षात घ्यावेच लागते. विद्यार्थी शाळेत शिकण्याच्या भावनेनेच जातो. तरी नियमाप्रमाणे त्याला शाळेचा गणवेश घालावाच लागतो. तसेच आहे हे.

९.अंजूजी - गीता परिवाराशी जोडले गेल्यानंतर मी पूर्वी ज्या संस्थेत काम करत होते, तेथे आता माझे मन लागत नाही. त्यामुळे वाईट वाटते.
आयुष्यात वेगवेगळे टप्पे असतात. संस्थेमध्ये सामाजिक काम करणे, हा तुमच्या आयुष्यातील पहिला टप्पा होता. लहान मुलांना आपण खेळणी देतो. मोठी झाल्यावर त्या खेळण्यांविषयीची त्यांची आसक्ती निघून जाते .जेव्हा एखादे मोठे प्रयोजन मिळते, तेव्हा छोट्या प्रयोजनांविषयी आस्था राहत नाही. तुम्ही तुमचा कार्याविषयीचा भाव मजबूत ठेवा. ही एक साधना आहे. एखाद्या कार्याशी तुम्ही मनाने चांगले जोडले जाता, तेव्हा काही कालावधीनंतरही  तुम्ही पुन्हा त्या कार्याशी निमग्नपणे जोडले जाऊ शकता.

१०.शशीभैय्या - लोक पशुपक्षी पाळतात हे पाप आहे की पुण्य?
शास्त्रानुसार फक्त गाईचे पालन करणे हे पुण्य कर्म सांगितले आहे. पक्ष्यांना पिंजऱ्यामध्ये ठेवणे ही अयोग्यच गोष्ट आहे. गोष्टीत सांगितल्याप्रमाणे साधू महाराजांनी पोपट पाळला होता परंतु त्यांनी त्याला पिंजऱ्यात ठेवले नव्हते. तो मुक्त होता. केवळ तो अनाथ असल्यामुळे साधू महाराजांनी दया भावाने त्याचे पालन केले होते.

११.मेखलाजी - आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे, तर मग मी चुकीचे काम कसे करू शकेन?
हे पहा, विद्युत दिव्याच्या आतमध्ये इलेक्ट्रिसिटी असते. ही त्या बल्बची चेतना आहे. बल्ब मध्ये बिघाड झाल्यास आग लागू शकते. तसेच जड शरीरात कर्म करण्याची शक्ती परमात्मा देतो. त्या शक्तीचा उपयोग किंवा दुरुपयोग करण्याचे स्वातंत्र्य आपल्याकडे आहे.

१२.गोविंदजी - व्यापारात नफा कमावणे हे कोणते कर्म ओळखले जाते?
हे नैमित्तिक कर्म आहे. हे धर्मानुसार आहे. परंतु नफेखोरी करणे, जरुरीपेक्षा जास्त नफा मिळवणे, काळा धंदा करणे हे विकर्म आहे.

समापन प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली.