विवेचन सारांश
महत्वपूर्ण आणि गोपनीय असे विज्ञानसहित ज्ञान

ID: 2543
मराठी
रविवार, 12 मार्च 2023
अध्याय 9: राजविद्याराजगुह्ययोग
1/2 (श्लोक 1-10)
विवेचक: गीता विशारद श्री श्रीनिवास जी वर्णेकर


प्रथेनुसार प्रार्थना व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. गुरुवंदनेने विवेचनास प्रारंभ झाला. प्रथम सर्व साधकांचे अभिवादन केले गेले. आपण सर्वजण भाग्यवान आहोत, ज्यायोगे भगवद्गीतेचे चिंतन व मनन आपण करत आहोत. ज्या नवव्या अध्यायाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत, तो अध्याय संत ज्ञानेश्वरांचा अत्यंत प्रिय असा अध्याय आहे. संजीवन समाधी घेतेवेळी त्यांनी हाच अध्याय समोर उघडून ठेवला होता. श्री ज्ञानेश्वरीतील या  अध्यायाचा सुरुवातीचाच श्लोक आहे.-
तरी अवधान एकलें दीजे । मग सर्वसुखासि पात्र होईजे ।
हें प्रतिज्ञोत्तर माझें । उघड ऐका ॥ १ ॥
श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, – अहो श्रोते हो तर तुम्ही एकवेळ श्रवणाकडे लक्ष द्या, म्हणजे मग सर्व सुखाला पात्र व्हाल. हे माझे उघड प्रतिज्ञेचे बोलणे ऐका. ॥९-१॥
संत ज्ञानेश्वर महाराज प्रतिज्ञापूर्वक सांगत आहेत की अत्यंत लक्षपूर्वक व एकाग्रतेने ऐका. मग सुखाची वाट तुमचीच आहे. भगवद्गीतेतील मध्यावरचा हा अध्याय अत्यंत महत्त्वपूर्ण असून ध्यानपूर्वक त्याचे चिंतन मनन करणे हे आपले कर्तव्य आहे.

9.1

इदं(न्) तु ते गुह्यतमं(म्), प्रवक्ष्याम्यनसूयवे।
ज्ञानं(व्ँ) विज्ञानसहितं(य्ँ), यज्ज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात्॥9.1॥

श्रीभगवान म्हणाले, दोषदृष्टीरहित अशा तुला भक्ताला हे अतिशय गोपनीय विज्ञानासहित ज्ञान पुन्हा नीटपणे सांगतो. ते जाणल्याने तू दुःखरूप संसारापासून मुक्त होशील.

भगवंत अर्जुनाला हृदयस्थ असे अत्यंत गोपनीय ज्ञान सांगत आहेत. सर्वसाधारणपणे आपल्या निकटवर्तीयालाच गुह्यतम गोष्ट सांगितली जाते. भगवंतांसाठी अर्जुन हा असाच सखा आहे. अर्जुनाला माध्यम बनवून त्यांनी सर्वांसाठी गीता सांगितली आहे. आपणही अर्जुनासारखेच निकटवर्ती व भाग्यशाली आहोत. त्यामुळेच आपण या अध्यायाचा अभ्यास करीत आहोत. 'अनसूयवे' हे विशेषण भगवंत अर्जुनाला उद्देशून म्हणत आहेत. समोरच्या मनुष्यामध्ये दोष नसतानाही त्याच्यातील दोष बघण्याची प्रवृत्ती म्हणजेच मत्सरी प्रवृत्ती. अर्जुनाचा स्वभाव मात्र दोषदृष्टिरहित आहे. त्याचे मन स्वच्छ आहे. या योग्यतेमुळेच भगवान त्याला ज्ञानविज्ञानाच्या गोष्टी सांगत आहेत. सातव्या अध्यायाचा  विषयच ज्ञान विज्ञान योग आहे. साखर गोड आहे, संगीत सुमधुर आहे हे माहीत झाले, हा ज्ञानाचा विषय झाला. विज्ञानाचा अर्थ दोन प्रकारे सांगता येईल.- 
१.प्रकृती विषयी विशेषत्वाने जाणणे किंवा अधिक खोलात शिरून त्याविषयीचा अभ्यास करणे. आपल्या शरीरातील अवयव कसे काम करतात, आकाशातील ग्रह व तारे पृथ्वीपासून किती दूर आहेत, इत्यादी विषयांचा सखोल अभ्यास.
२.विशेषज्ञानाची अनुभूती घेणे. संत रामदासांनी  'पाहणे आपणासि आपण' अशी विज्ञानाची व्याख्या केली आहे. संचार ज्ञान म्हणजेच आत्मज्ञान. स्वतः स्वतःला जाणून घेणे हे देखील विज्ञानच आहे.
ज्ञान आणि विज्ञानातील फरक समजून घेतला पाहिजे. एक पांढराशुभ्र रसदार गोड असा गोड पदार्थ आहे. रसगुल्ला या नावाने आपण त्याला ओळखतो. जिभेवर ठेवून त्याच्या चवीची अनुभूती घेतो तेव्हा आपल्याला विशेष आनंद होतो. तसेच 'मी कोण आहे?' हे सैद्धांतिकदृष्ट्या (theoratically)जाणणे व प्रत्यक्ष अनुभव घेणे यात फरक आहे.
शरीर म्हणजे मी नव्हे. शुद्ध आत्मतत्त्व वेगळे आहे. ही अनुभूती मी तुला देईन असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. हा भेद जाणून घेतल्याने या अस्थिर जगात सर्व दुःखांपासून तू मुक्त होशील. 'मोक्षसे अशुभात्' असे भगवंत सांगत आहेत. बंधन हे अशुभ आहे. या जगात शरीराचे बंधन आहे, संसाराचे बंधन आहे, भावनेचे बंधन आहे. या सर्वांमधून तू मुक्त होऊन जाशील. 'सं सरति' म्हणजे संसार. संसार हा सतत बदलत असतो. एका पाश्चात्य तत्त्ववेत्त्याने  म्हटले आहे.-
You cannot wash hands again in the same river.
नदीच्या त्याच पाण्यात तुम्ही पुन्हा हात धुवू शकत नाही. नदी हा प्रवाह आहे. नदी सतत वाहत असते. जगात सतत बदल होत असतात. आपल्या शरीरात सुद्धा प्रत्येक क्षणी नवीन पेशी निर्माण होत असतात व जुन्या पेशी नष्ट होत असतात. या परिवर्तनशील जगात स्थिर गोष्ट एकच आहे ती म्हणजे ज्ञान.

9.2

राजविद्या राजगुह्यं(म्), पवित्रमिदमुत्तमम्।
प्रत्यक्षावगमं(न्) धर्म्यं(म्), सुसुखं(ङ्) कर्तुमव्ययम्।।9.2।।

हे विज्ञानासहित ज्ञान सर्व विद्यांचा राजा, सर्व गुप्त गोष्टींचा राजा, अतिशय पवित्र, अतिशय उत्तम, प्रत्यक्ष फळ देणारे, धर्मयुक्त, साधन करण्यास फार सोपे आणि अविनाशी आहे.

ज्ञानासहित विज्ञानाची विशेषणे येथे भगवंतांनी सांगितली आहेत. हे विशेष ज्ञान म्हणजे सर्व विद्या आणि गोपनीय गोष्टींचा राजाच आहे. आत्मज्ञान प्राप्त करून देणारी ती अध्यात्म विद्या आहे. ही अत्यंत पवित्र आहे. चौथ्या अध्यायात म्हटलेच आहे.-
 न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते|
या जगात ज्ञानासारखे पवित्र करणारे खात्रीने दुसरे काहीही नाही.
हे उत्तम आणि सर्वश्रेष्ठ असे विज्ञान आहे. ही सर्व विशेषणे ऐकून अर्जुनाला वाटले की हे सर्व समजण्यास कितीतरी कठीण व अवघड असेल. तेव्हा भगवंत त्याला दिलासा देतात की 'प्रत्यक्षावगमन्' म्हणजे तू स्वतः करून बघ, अनुभव घे आणि त्याचे फळ प्राप्त करून घे. हे 'धर्म्य' म्हणजे कर्तव्य करण्यायोग्य असे कर्म आहे आणि फळ म्हणजेच 'सुसुखम्' म्हणजे हे ज्ञान सुखदायी आहे, आनंददायी आहे. तसेच ते 'अव्यय' म्हणजे अविनाशी आहे. ते कधीच कमी होत नाही, जुने होत नाही, दूषित होत नाही. नित्य नूतन असे हे ज्ञान कितीतरी महत्त्वपूर्ण आहे. म्हणून हे अर्जुन तू सावधान होऊन ऐक.

9.3

अश्रद्दधानाः(फ्) पुरुषा, धर्मस्यास्य परन्तप।
अप्राप्य मां(न्) निवर्तन्ते, मृत्युसंसारवर्त्मनि।।9.3।।

हे परंतपा! या वर सांगितलेल्या धर्मावर श्रद्धा नसलेले पुरुष मला प्राप्त न होता मृत्युरूप संसारचक्रात फिरत राहतात.

श्रद्धा ही अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट आहे. तीन प्रकारच्या श्रद्धांचे वर्णन १७ व्या अध्यायात केले आहे. श्रद्धेनेच ज्ञानाची कवाडे उघडली जातात. चौथ्या अध्यायात म्हटलेच आहे.-
श्रद्धावाँल्लभते ज्ञानम् अर्थात श्रद्धाळू माणूस ज्ञान मिळवतो.
अणुऊर्जेचा शोध लागण्यापूर्वी अणू ही एक संकल्पना होती. त्याचे घटक व स्वरूप अज्ञात होते. शास्त्रज्ञांनी त्या कल्पनेवर विश्वास ठेवून सातत्याने प्रयोग केले, तेव्हा अणुमधील ऊर्जेचा शोध लागला.
शिक्षकांनी बिंदू या शब्दाची व्याख्या सांगितली की ज्याला लांबी रुंदी व उंची नाही असा एक 'क्ष' हा बिंदू मानावा. तेव्हा विद्यार्थ्याने विचारले की जे अस्तित्वातच नाही ते मी कसे मानू? त्यावर शिक्षकांनी त्याला सांगितले की बिंदू या कल्पनेवर तुला श्रद्धा ही ठेवावीच लागेल. अन्यथा तुला भूमिती शिकताच येणार नाही. भगवंत सांगतात की जे विश्वास ठेवत नाहीत त्यांना माझी प्राप्ती होणे शक्य नाही. ते या संसारात दिशाहीन भटकत राहतात. शोक (दुःख), भय (भविष्याविषयी चिंता) व मोह (वासना, इच्छा) यांत गुंतून जन्ममरणाच्या चक्रात पुन्हा पुन्हा जन्म घेत राहतात.
काही शास्त्रे ही गोमुखी सिंहाप्रमाणे असतात. गाईच्या मुखाप्रमाणे पुढे दिसायला सोज्वळ, सरळ परंतु पार्श्वभागी सिंह असावा अशी कठीण, सामना करायला अवघड अशी वाटतात. परंतु भगवद्गीता मात्र याच्या उलट म्हणजे सिंहमुखी गोमाता आहे असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही. सुरुवातीला उच्चारणास अवघड वाटणारे श्लोक प्रयत्नाने सोपे वाटू लागतात व समजण्यास कठीण वाटणारे अर्थ ते जाणण्याचा प्रयत्न केल्यावर सहज समजू लागतात.

मी सांगितलेले जर आचरणात आणशील तर सर्वकाही सोपे सुलभ होऊन जाईल असे भगवंत सांगत आहेत.

9.4

मया ततमिदं(म्) सर्वं(ञ्), जगदव्यक्तमूर्तिना।
मत्स्थानि सर्वभूतानि, न चाहं(न्) तेष्ववस्थितः।।9.4।।

जसे पाण्याने बर्फ परिपूर्ण भरलेले असते, तसे मी निराकार परमात्म्याने हे सर्व जग पूर्ण व्यापलेले आहे. तसेच सर्व भूते माझ्यामध्ये संकल्पाच्या आधारावर राहिलेली आहेत. पण वास्तविक मी त्यांच्यामध्ये राहिलेलो नाही.

मी माझ्या अव्यक्त रूपाद्वारे हे विश्व व्यापले आहे. या विश्वाच्या कणाकणामध्ये मी व्याप्त आहे. परंतु अव्यक्त रूपात असल्याने मी दिसू शकत नाही. उदाहरणार्थ हवेमध्ये ऑक्सिजन आहे, हायड्रोजन आहे, कार्बन आहे. हे सर्व अव्यक्त असल्याने आपण पाहू शकत नाही. परंतु एका पेल्यामध्ये बर्फाचा खडा टाकला तर थोड्या वेळाने त्याच्या बाहेरील बाजूस पाणी जमा होते. हे वायूचे प्रकट रूप आहे. तसेच भगवंतही प्रकट होतात  कसे ते आपण पुढे पाहूच.
जे निर्माण होते ते भूत. हे विश्व निर्माण झाले आहे. पृथ्वी पूर्वी नव्हती, आता आहे. घरे पूर्वी नव्हती, आता आहेत. म्हणजेच सृष्टीतील सर्व घटक हे निर्माण झालेले आहेत. हे सर्व जीव माझ्या ठायी आहेत. परंतु मी त्यांच्या ठायी नाही. हे कसे शक्य आहे बरे? मजेदार गोष्ट आहे. आदि शंकराचार्य यांचे एक वचन आहे.-
सत्यपि भेदापगमे नाथ तवाहं न मामकीनस्त्वं।
सामुद्रो ही तरंग:, क्वचन समुद्रों न तारंग:।।
समुद्रामध्ये लाटा आहेत परंतु लाटांमध्ये समुद्र आहे का? नाही.
मातीचा घडा बनतो तेव्हा माती हे कारण असते. सोन्याचा दागिना बनतो तेव्हा सोने हे कारण असते. परंतु माती म्हणजे मातीचा घडा नसतो किंवा सोने म्हणजे सोन्याचा दागिना नसतो. तसेच हे विश्व ही परमेश्वराची निर्मिती आहे. समुद्रात लाटा निर्माण होतात. समजा लाटा नसल्या तरी समुद्र असणार आहेच. दुधामध्ये लोणी असते परंतु लोण्यामध्ये दूध नसते. तसेच विश्वनिर्मितीचे कारण भगवंत आहेत. परंतु विश्वात भगवंत नाहीत. ते या भौतिक जगाहून निराळे आहेत.

9.5

न च मत्स्थानि भूतानि, पश्य मे योगमैश्वरम्।
भूतभृन्न च भूतस्थो, ममात्मा भूतभावनः।।9.5।।

ती सर्व भूते माझ्या ठिकाणी राहिलेली नाहीत. परंतु माझी ईश्वरी योगशक्ती पहा की, भूतांना उत्पन्न करणारा व त्यांचे धारण-पोषण करणारा असूनही माझा आत्मा वास्तविकपणे भूतांच्या ठिकाणी राहिलेला नाही.

हे समजण्यास थोडे कठीण आहे. ही सर्व सृष्टी उत्पन्न करूनही तो परमेश्वर त्याहून वेगळा आहे, निराळा आहे. त्याची लीला पहा. जग अस्तित्वात असतानाही तो आहे आणि नसतानाही तो आहेच. हा ईश्वरीय योग आहे. सोने आहे म्हणून सोन्याचा दागिना आहे. तसेच माझ्यामुळेच सर्व प्राणिमात्र आहेत व मीच त्यांना धारण केले आहे.
आपण पायांनी चालतो तेव्हा पृथ्वी आपल्याला धारण करत असते. सूर्याच्या गुरुत्व शक्तीमुळे पृथ्वी धारण केली जाते व सूर्याभोवती निर्धारित कक्षेत फिरत राहते. सूर्याला, किंबहुना अशा अनेक सूर्यांना परमेश्वराच्या शक्तीने धारण केले आहे. रमण महर्षींना एकाने विचारले परमेश्वर तर दिसत नाही पण तुम्ही तर म्हणता तो सर्वत्र आहे, ते कसे? त्यावर रमण महर्षींनी एका कागदावर God is no where अर्थात परमेश्वर कुठेही नाही असे लिहिले. नंतर त्यांनी w ची जागा थोडी बदलून लिहिले God is now here अर्थात परमेश्वर इथेच आहे. हा बघण्याच्या दृष्टीकोनातील फरक आहे.

जाणून घेतले तर ईश्वराचे स्वरूप समजून येईल.

9.6

यथाकाशस्थितो नित्यं(व्ँ), वायुः(स्) सर्वत्रगो महान्।
तथा सर्वाणि भूतानि, मत्स्थानीत्युपधारय॥9.6॥

जसा आकाशापासून उत्पन्न होऊन सर्वत्र फिरणारा महान् वायू नेहमी आकाशातच राहतो, त्याचप्रमाणे माझ्या संकल्पाने उत्पन्न झाल्यामुळे सर्व भूते माझ्यात राहतात, असे समज.

आकाश अनंत आहे. त्याचे मोजमाप कोणीही करू शकत नाही. केवळ आकाशच ते सांगू शकेल. परमात्मा सुद्धा स्वतःच स्वतःबद्दल सांगू शकतात. इथेच आकाशाची उपमा देत भगवंतांनी अर्जुनाला स्वतःचा परिचय देण्यास प्रारंभ केला आहे. आकाशात वायू ज्याप्रमाणे स्थित असतो त्याप्रमाणे सर्व भूतमात्र माझ्यामध्ये स्थित आहेत. आकाशात ढग येतात, जातात. इंद्रधनुष्य दिसते, नाहीसे होते. आकाशाला याने काहीही फरक पडत नाही. ते निर्लेप राहते. तसेच भगवंत या भौतिकसृष्टीहून अलिप्त आहेत, जरी सर्व भूतमात्र त्यांच्यामधे स्थित आहेत.

9.7

सर्वभूतानि कौन्तेय, प्रकृतिं(य्ँ) यान्ति मामिकाम्।
कल्पक्षये पुनस्तानि, कल्पादौ विसृजाम्यहम्॥9.7॥

हे अर्जुना! कल्पाच्या शेवटी सर्व भूते माझ्या प्रकृतीत विलीन होतात आणि कल्पाच्या आरंभी त्यांना मी पुन्हा उत्पन्न करतो.

ही सृष्टी, प्रकृती आपण पाहू शकतो म्हणून तिचे अस्तित्व आपण मान्य करतो. परंतु ते निर्माण करणाऱ्याला मात्र आपण मानत नाही. प्रलयकाळी ही सृष्टी नष्ट होते. कल्पांत होतो, तेव्हा प्रलय होतो. कल्प म्हणजे ब्रह्माजींचा एक दिवस. हा एक दिवस म्हणजेच १००० चतुर्युगे. एक चतुर्युग म्हणजे ४३,२०,००० वर्षे. तेवढीच मोठी त्यांची रात्र असते. त्यानंतर पुन्हा सर्व सृष्टी प्रकट होते. अशा प्रकारे हे विलीनीकरण व पुनः प्रकटीकरण ज्या परमात्म्यामध्ये होते त्या परमात्म्याला आपल्याला जाणायचे आहे.

9.8

प्रकृतिं(म्) स्वामवष्टभ्य, विसृजामि पुनः(फ्) पुनः।
भूतग्राममिमं(ङ्) कृत्स्नम्, अवशं(म्) प्रकृतेर्वशात्।।9.8।।

आपल्या मायेचा अंगीकार करुन प्रकृतीच्या ताब्यात असल्यामुळे पराधीन झालेल्या या सर्व भूतसमुदायाला मी वारंवार त्यांच्या कर्मानुसार उत्पन्न करतो.

प्रकृतीमुळेच आपण बंधनात आहोत. आपले शरीर बंधनात आहे. आपल्याला श्वास घ्यावा लागतो, भोजन घ्यावे लागते. वास्तविक हे बंधन आहेही व नाहीही हे आपण पुढे जाणून घेऊ. शरीर हे एक साधन परमेश्वराने दिले आहे. त्या माध्यमाच्या सहाय्यानेच आपण कर्तव्य करीत असतो.
शरीरमाद्यं खलु धर्म साधनम्| अर्थात शरीर हेच धर्माचे पहिले आणि उत्तम साधन आहे.
शरीराकडेही लक्ष द्यावेच लागते. तरच कर्तव्य नीट करता येते.
भूतमात्रांचा हा समूह स्वतंत्र नाही, परतंत्र आहे. तो पुन्हा पुन्हा व्यक्त आणि अव्यक्त होत असतो.

9.9

न च मां(न्) तानि कर्माणि, निबध्नन्ति धनञ्जय।
उदासीनवदासीनम्, असक्तं(न्) तेषु कर्मसु।।9.9।।

हे अर्जुना! त्या कर्मात आसक्ती नसलेल्या व उदासीनाप्रमाणे असलेल्या मज परमात्म्याला ती कर्मे बंधनकारक होत नाहीत.

आता असा प्रश्न पडतो की मग हा प्रलय, हे व्यक्त अव्यक्त होणे यामुळे परमेश्वराच्या हातून काही बंधन निर्माण होते का?, तर याचे उत्तर नाही असे आहे. भगवंत म्हणतात की प्रकृतिवशात होणाऱ्या या कर्मांमुळे मी कोणत्याही बंधनात येत नाही. मी मुक्त आहे. असेच आपल्याही बाबतीत आहे. केवळ आपण अज्ञानी असल्याने हे जाणत नाही.
विजेमुळे बल्ब पेटतो, फ्रिज चालतो. त्या विजेच्या मागे तिचा स्त्रोत असतो जेथून विद्युतप्रवाह येतो व या विजेच्या वस्तू काम करतात. आपलेही स्वरूप असेच आहे. चैतन्य हे कारण आहे ज्यामुळे शरीर कार्य करते. वास्तविक मी काहीच करत नाही. चैतन्याच्या अस्तित्वामुळे ते होत राहते. पाचव्या अध्यायातील श्लोकात हे स्पष्ट केले आहे.-
नैव किंचित्करोमीति मुक्तो मन्येत तत्ववित्।
पश्यंशृण्वन्स्पृशंजिघ्रन्नश्नन्गच्छन्स्वपंश्वसन् ।।
सांख्य योगी म्हणतो, मी काहीच करत नाही. ऐकणे, बोलणे, भोजन करणे, चालणे, झोपणे या सर्व क्रिया इंद्रियांद्वारा होत असतात.
उदासीन म्हणजे 'उत् आसन'- उच्चासनावर स्थित. आपण जेव्हा एखाद्या उंच इमारतीवरून खालची रहदारी पाहतो तेव्हा आपण त्या रहदारीचा भाग नसतो. तसेच परमेश्वर या सृष्टीपासून दूर स्थित आहेत. त्यांना येथील संसाराविषयी आसक्ती नाही.

9.10

मयाध्यक्षेण प्रकृतिः(स्), सूयते सचराचरम्।
हेतुनानेन कौन्तेय, जगद्विपरिवर्तते।।9.10।।

हे अर्जुना! माझ्या अधिष्ठानामुळे प्रकृती चराचरासह सर्व जग निर्माण करते. याच कारणाने हे संसारचक्र फिरत आहे.

भगवंत स्वतःला अध्यक्षाची उपमा देत आहेत. अध्यक्षांच्या उपस्थितीत कामकाज व्यवस्थित चालू राहते. जसे हे सृष्टीचे चक्र (ग्रह, तारे, आकाशगंगा) अव्याहतपणे फिरत आहे. राष्ट्रप्रमुख नसेल तर देशाचा कारभार व्यवस्थित चालणार नाही. परमात्म्याशिवाय या विश्वाचा पसारा अनावर होईल. ज्याप्रमाणे विश्वाचे हे कार्य भगवंताच्या अस्तित्वाने चालू आहे, त्याप्रमाणे शरीराचे कार्यही चैतन्याच्या अस्तित्वामुळे चालू आहे. भगवंतांना जाणण्याची ही विद्या पुढील सत्रात आपण शिकणारच आहोत.
आजचा अभ्यास कृष्णार्पणमस्तु|

प्रश्नोत्तरे
१. तेजस्विनी दीदी - श्रीकृष्ण सर्व शक्तिमान आहे तर मग सर्व देवांना वेगवेगळे का पूजले जाते?
पुढच्याच श्लोकात याचे स्पष्टीकरण भगवंत देत आहेत. 'मूढजन मनुष्य रुपात वावरणाऱ्या मला सामान्य मनुष्य समजतात.' परमेश्वर व्यक्तही आहेत व अव्यक्तही आहेत. ते हव्या त्या रूपात प्रकट होऊ शकतात. एकदा स्वामी रामकृष्णांचे दोन शिष्य भांडत होते.  एक जण म्हणत होता की परमात्मा निर्गुण निराकार व गुणातीत आहे. तर दुसरा म्हणत होता की परमात्मा सगुण साकार आहे. तेव्हा रामकृष्णांनी पहिल्याला विचारले की तुझा परमात्मा सर्व शक्तिमान आहे का? तो हो म्हणाला. दुसऱ्यालाही विचारले की तुझा सगुण साकार परमात्मा सर्व शक्तीमान आहे का? तेव्हा तो सुद्धा हो म्हणाला. मग रामकृष्णांनी दोघांनाही समजावले की जर तो सर्व शक्तीमानच आहे तर निर्गुण निराकार असा तो सगुण साकार होऊ शकतो व सगुण साकार असा तो निर्गुण रूपातही येऊ शकतो हे खरे आहे ना?
परमात्मा कधी एखाद्या संताच्या रूपात प्रकट होतो तर कधी दुर्गेच्या रूपात प्रकट होतो किंवा भारत मातेच्या रूपातही प्रकट होतो. मथितार्थ असा की त्याच्या रूपामध्ये अडकून राहू नये. त्याला जाणणे हे महत्त्वाचे आहे.

२. भट्टजी - आमची क्षमता अपुरी आहे. आम्ही विज्ञान कधीतरी पूर्ण शिकू शकू का?
तसे पाहता हे ज्ञान अनावश्यक आहे. त्यापासून लाभ काही नाही. क्रिकेटमध्ये सर्वात जास्त षट्कार कोणी केले? ग्रह तारे पृथ्वीपासून किती दूर आहेत?, इत्यादी प्रश्नांची उत्तरे जाणून खरा लाभ काही होतो का? परंतु आत्मज्ञान म्हणजे 'मी कोण आहे', हे जाणणे, हे खरे ज्ञान आहे. व्यवहार करण्यापुरते विज्ञान अवश्य शिकून घ्यावे. निष्ठेने शिकावे.

३. अभिषेक जी - अ) तुम्ही सांगितलेत की प्रत्येक गोष्टीत श्रद्धा, विश्वास ठेवावा लागतो. तर शास्त्रज्ञ सुद्धा भगवान आहे ही संकल्पना मानतात का?
हो. म्हणून तर स्वीडनमध्ये जो अणुप्रयोग चालू आहे, त्याला 'गाॅड पार्टिकल' असे नाव दिले आहे. विज्ञान हे तर्काच्या कसोटीवर पुढे जाते व प्रयोगाने सिद्ध होते. विज्ञानाला सुद्धा अंतिम सत्याचा शोध घ्यायचा आहे. शास्त्रज्ञ या भौतिक जगात तो शोध घेत आहेत. विश्वास, श्रद्धा ठेवली तर नक्की परमेश्वराची अनुभूती येईल. मन आपण दाखवू शकतो का? नाही. पण मन आहे हा अनुभव घेतो की नाही!
ब) प्रकृती कर्म करते असे म्हणतात. तर मग आपल्याकडून दुष्कर्म होते ते प्रकृती द्वाराच होते का?
जेव्हा आपल्याकडून चूक होते तेव्हा आपण चूक झाली असे म्हणतो व चांगले कार्य घडते तेव्हा मात्र मी केले असे म्हणतो. कार्य करण्यासाठीची ऊर्जा किंवा शक्ती ही परमात्म्याची आहे. पण इच्छा ही मनुष्याची असते. जीव हा जोपर्यंत शरीराशी जोडलेला आहे तोपर्यंत ही इच्छा, आकांक्षा, आसक्ती कर्म घडण्यास कारण बनते. जोपर्यंत 'मी' समाप्त होत नाही तोपर्यंत परमात्मशक्तीचे दर्शन घडत नाही.

४. सायली दीदी - चौथ्या व पाचव्या श्लोकाबद्दल मनात गोंधळ निर्माण होतो.
हे समजण्यास कठीणच आहे. वायु आकाशात आहे. परंतु असे सुद्धा आकाश आहे जिथे वायू नाही. सर्व सृष्टीला निर्माण करणाऱ्या त्याने संपूर्ण जग व्यापले आहे तरी तो त्या ठिकाणी नाही. असा सर्वात मिळून जो आहे त्याला जाणावयाचे आहे.
यानंतर आभार प्रदर्शन झाले व समापन प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली.