विवेचन सारांश
सगुण भक्ती श्रेष्ठ

ID: 3375
मराठी
शनिवार, 29 जुलै 2023
अध्याय 12: भक्तियोग
1/2 (श्लोक 1-11)
विवेचक: गीता विशारद डॉ आशू गोयल जी


परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरीजी महाराजांना वंदन करुन सर्व साधकांचे स्वागत करण्यात आले. परंपरेप्रमाणे प्रार्थना आणि दीप प्रज्वलन झाले.
वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम्।
देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्॥
योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियम्।
धर्म संस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगतगुरुम्॥
जगद्गुरू श्रीकृष्णांना वंदन करून, गुरुचरणी नतमस्तक होऊन विवेचनाला सुरुवात झाली. भगवंतांच्या मंगल कृपेने आपण गीता शिकतो आहोत, आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो आहोत. भगवद्गीता हा विश्वातील सर्वात लहान पण सर्वांत प्रभावी ग्रंथ आहे. गीता प्रेसने काडेपेटीच्या आकारात, इतकेच नाही तर एकपानी गीता देखील प्रकाशित केली आहे. गीतेत अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात असे अनेक महापुरुषांनी म्हटले आहे. भारतभूमी अनेक धर्मसंप्रदायांची भूमी आहे. प्रत्येक संप्रदायाचा एखादातरी प्रमाण ग्रंथ असतो. गीता हा असा एकमेव ग्रंथ आहे जो सर्व संप्रदायांनी एकमुखाने मान्य केलेला ग्रंथ आहे. 
आपण जितके गीतेचे चिंतन करू तसे लक्षात येईल की यात पारंपारिक धर्माचे विवेचन केलेले नाही. त्यामुळे ख्रिस्ती, मुस्लिम इत्यादी सर्वच धर्मांनी यातील मते ग्राह्य मानली आहेत. महात्मा गांधी, विनोबा भावे, लोकमान्य टिळक याशिवाय शॉपेनहेयर सारख्या विचारवंतांनी गीतेचा पुरस्कार केला आहे.

भगवद्गीतेच्या अभ्यासाला सुरुवात करताना आपण बाराव्या अध्यायाने सुरुवात का करतो आहोत असा स्वाभाविक प्रश्न तुमच्या मनात उपस्थित झाला असेल.
ईस्ट इंडिया कंपनी सतराव्या शतकात व्यापाराच्या उद्देशाने भारतात आली. कालांतराने त्यांनी त्यांचे बस्तान बसवले आणि भारतात ब्रिटीशांचे राज्य आले. १९१३ मध्ये ब्रिटिशांनी मुंबईत 'गेटवे ऑफ इंडिया' ची निर्मिती केली. ब्रिटिश पश्चिमेकडून भारतात आले. त्यांच्यासाठी समुद्रमार्गाने भारतात येण्यासाठी मुंबई सोयीचे ठिकाण होते. मुंबईतून पाश्चात्यांनी भारतात प्रवेश केला. पूर्वेकडून किंवा उत्तरेकडून येणाऱ्यांना दिल्ली सोयीची होती. शिवाय दिल्ली भारताच्या केंद्रस्थानी आहे. इथून भारताच्या कोणत्याही प्रांतात जाणे मुंबईपेक्षा सुलभ आहे. त्यामुळे दिल्लीला येऊन भारतात अन्यत्र कोठेही जाणे पुढे सोयीचे होऊ लागले. १९२१ मध्ये दिल्लीत 'इंडिया गेट' उभारण्यात आले. आता अशी स्थिती आहे की दिल्ली पाहिली तर भारत बघितल्यासारखे आहे. बाकी सर्व भारत बघितला पण दिल्लीला भेट दिली नसेल तर भारत बघितलाच नाही असे होईल. परदेशी वृत्तवाहिन्या देखील भारतातर्फे कोणत्याही राजकीय, सामाजिक, आर्थिक विषयावर मत देताना हे 'दिल्लीचे मत' आहे असे वृत्त देतात. दिल्लीला असे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
भगवद्गीतेत असेच आहे. पहिला अध्याय गीतेचा गेटवे ऑफ इंडिया आहे तर बारावा अध्याय इंडिया गेट आहे. दिल्ली जशी भारताच्या केंद्रस्थानी आहे तसेच बारावा अध्याय गीतेचा अध्यात्मिक आत्मा आहे. गीतेची अनेक अंगे आहेत. गीतेत कर्म, ज्ञान, भक्ती इत्यादी विषयांचा विचार मांडला आहे. या सर्व विषयांमधून भक्तीच्या मार्गाने, बाराव्या अध्यायातून गीतेत प्रवेश कारणे सुलभ आहे. हा अध्याय गीतेचे हृदय आहे. हा सर्वांत छोटा पण अत्यंत प्रभावी अध्याय आहे. जसे देहाच्या सर्व अवयवांचे दर्शन न होता फक्त हृदयाचे दर्शन जरी झाले तरी पुरते तसे बाराव्या अध्यायाचे आहे. गीतेतील अठरा अध्यायात अठरा योग सांगितले आहेत. योग म्हणजे जोडणे, जुळणे. गीता भगवंतांशी आपला योग घडवते. गीता भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील ४५ मिनिटांचा संवाद आहे. त्या संवादात प्रथम, द्वितीय असे आपण वाचतो तसे अध्याय भगवंतांनी सांगितले नव्हते. दोन माणसांमधील संवाद जसा असतो तसे प्रश्नोत्तरांच्या स्वरूपातील हे सरळ भाषण होते. या भाषणाचे विश्लेषण आणि विषयवार वर्गीकरण करुन त्यांची अठरा अध्यायात विभागणी महर्षी वेदव्यासांनी केली. यामागे सर्वांना यातील ज्ञान नीट समजावे हा उद्देश होता.

गीतेचा पहिला अध्याय विषादयोग आहे. विषादातून योग हे जरा विचित्र वाटते. विषाद म्हणजे दुःख. यातून भगवंतांची भेट कशी होईल असा प्रश्न पडतो. विषादातून भगवंतांच्या भेटीची पार्श्वभूमी तयार होते. एका गझलमध्ये शब्द आहेत 
करुणा उपजी है क्रंदन से
संगीत बना शिशु रुदन से 
बालकाच्या रडण्याने जन्माची शुभवार्ता कानावर पडते. गोस्वामी तुलसीदासांनी दशरथपुत्रांच्या जन्माचे वर्णन करताना लिहिले आहे - 
सुनि सिसु रुदन परम प्रिय बानी। संभ्रम चलि आई सब रानी।।
हरषित जहँ तहँ धाईं दासी। आनँद मगन सकल पुरबासी।।
चार पुत्रांच्या रुदनाने सर्वत्र आनंदी आनंद झाला. 
कुंतीने भगवंतांकडे दुःख मागितले होते कारण दुःखात असतानाच भगवंतांचे स्मरण होते. आपल्यापैकी कित्येक जण आयुष्यात आलेल्या एखाद्या अनपेक्षित प्रसंगानंतर अथवा अतीव दुःखदायी घटनेनंतर प्रथम भगवंताचे स्मरण करतो, त्यावेळी आपल्याला देव आठवतो. एका गाण्यात कवी म्हणतो - ये दुनिया ये महफ़िल मेरे काम की नहीं| अतीव दुःखाच्या प्रसंगी आपल्याला प्रपंच मिथ्या भासू लागतो. हा विषादयोग म्हणजे जसे गीतेचे गेटवे ऑफ इंडिया आहे. इथून गीताविषयात प्रवेश होतो. परंतु हे गीतेचे हृदय नाही.

बारावा अध्याय भक्तियोगाचा आहे. तुलसीदासजी म्हणतात - भक्ति सुतंत्र सकल सुख खानी। बिनु सतसंग न पावहिं प्रानी॥ भक्ती स्वतंत्र आहे, सर्व सुखांची खाण आहे. भक्तीला दुसऱ्या कशाचीही गरज नसते. भक्तीसाठी वेगळा वेळ देखील द्यावा लागत नाही. रोजची कामे करताना भक्ती करता येते. स्वयंपाक करताना, गाडी चालवताना, संगणकावरती काम करताना देखील भगवंतांचे नामस्मरण करता येते. भक्तीला स्थळ, काळाचे बंधन नाही. गोस्वामी तुलसीदात म्हणतात - 

भायँ कुभायँ अनख आलस हूँ। नाम जपत मंगल दिसि दसहूँ॥
सुमिरि सो नाम राम गुन गाथा। करउँ नाइ रघुनाथहि माथा॥

चांगल्या, वाईट कोणत्याही भावाने, क्रोधाने, आळसाने कोणत्याही पद्धतीने नाम जपले तर दाही दिशांमध्ये कल्याणच होते. त्याच रामाचे नाव घेऊन, रघुनाथाच्या चरणी नतमस्तक होऊन मी त्यांच्या गुणांचे वर्णन करतो. उल्टा नाम जपत जग जाना, बाल्मीकि भए ब्रह्म समाना रामनामाचा उलटा जप करणारे वाल्मिकी ब्रह्मसमान झाले होते. भक्तीचा महिमा अपरंपार आहे. सर्वांना सहज साध्य असे हे साधन आहे.

एक नारायणस्वामी नावाचे श्रेष्ठ भक्त होते. श्रमण नावाचे विद्वान ब्राह्मण त्यांचे मित्र होते. एकदा श्रमण नारायणस्वामींकडे आले. ते स्वामींना म्हणाले, "मी खूप ज्ञान संपादन केले, अनेक साधने केली परंतु तुमच्यासारखी भक्ती मला जमली नाही. मला कृपा करुन भक्तीचा उपदेश करा." नारायणस्वामी त्यांना म्हणाले, "ठीक आहे. पहिले तुम्ही हात पाय धुवून घ्या. थोडे पाणी प्या मग मी तुम्हाला उपदेश देतो." स्वामींनी सांगितल्याप्रमाणे श्रमणाचार्यांनी हात पाय धुतले. त्यांना तहान फार लागलेली नव्हती पण नारायणस्वामींनी सांगितले होते त्याप्रमाणे त्यांनी पेल्यातून पाणी घेतले. त्यातील थोडे पाणी ते प्यायले आणि उरलेले पेल्यात तसेच ठेवून दिले. आता नारायणस्वामी त्यांच्यासाठी सरबत घेऊन आले. श्रमणाचार्यांना खरे तर सरबत नको होते पण नारायणस्वामींना नाही कसे म्हणावे. नारायणस्वामी श्रमणाचार्यांच्या पेल्यात सरबत ओतू लागले. त्या पेल्यात आधीच थोडे पाणी होते. त्यात सरबत मिसळल्यावर सरबताची चव बिघडणार होती. तरीही स्वामी सरबत त्याच पेल्यात भरू लागले. श्रमणाचार्य आश्चर्याने बघत होते. काही वेळाने पेला भरला. आता श्रमणाचार्यांना राहवेना. त्यांनी स्वामींना विचारले, "स्वामी, तुम्ही हे काय करत आहात ? यात सरबत राहणार नाही. यात आधीच पाणी होते. " नारायणस्वामी म्हणाले, "हा तुमचा पहिला पाठ होता. तुम्हाला तो समजला आहे."  जोवर तुमच्या डोक्यात पूर्वीचे ज्ञान, विचार असतात तोवर तिथे नवे विचार रुजणे कठीण असते. नवे ज्ञान प्राप्त करताना जुने विचार रिते करावे लागतात. एखादी स्त्री जेंव्हा शृंगार करते तेंव्हा प्रथम जुना शृंगार उतरवते आणि मग नवा शृंगार करते. असे केले नाही तर नवा शृंगार नीट होत नाही. त्यामुळे गीतेचे ज्ञान प्राप्त करताना देखील, मनातून सर्व जुने विचार मागे सोडावेत आणि मग गीतेचे पठण, चिंतन, मनन करावे.

महाभारताचे युद्ध सुरू होऊन दहा दिवस झाल्यावर जेंव्हा पितामह भीष्म शरशय्येवर पडले तेंव्हा ही वार्ता देण्यास संजय धृतराष्ट्राकडे आला. त्यावेळी धृतराष्ट्राने संजयला युद्धाचा सुरुवातीपासूनच इतिवृत्तांत सांगण्याची विनंती केली. धृतराष्ट्राने विचारलेला प्रश्न होता - धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः।मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत सञ्जय।। हा एकमेव श्लोक धृतराष्ट्राच्या तोंडी आहे. गीतेत सातशे श्लोक आहेत. एक श्लोक धृतराष्ट्र म्हणतो. ४१ श्लोक संजय म्हणतो. ८४ श्लोक अर्जुनाच्या तोंडी आहेत तर ५७४ श्लोक भगवंतांच्या मुखातून येतात. महाभारत विश्वातील सर्वांत मोठा ग्रंथ आहे. यात अठरा पर्वांमधून एक लाख श्लोक आहेत. यातील भीष्मपर्वातील अध्याय क्र.२५ ते अध्याय क्र.४२ हे अठरा अध्याय म्हणजे गीता होय. गीता हा महाभारताचा उपग्रंथच आहे. महाभारत युद्धाचे वेळी अर्जुनाचे वय ८४ तर भगवान श्रीकृष्णांचे वय ८७ असावे असे शास्त्र मत आहे.


अर्जुन महान योद्धा होता. त्याने विश्वविजय केला होता. युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञाच्या वेळी तीन भावंडांनी जितकी संपत्ती गोळा केळी त्याच्या दुप्पट धन एकट्या अर्जुनाने जमवले होते. त्यामुळेच त्याला धनंजय नाव प्राप्त झाले. अर्जुन तपोबलाने सदेह स्वर्गात गेला होता. इंद्राने उर्वशीला त्याच्या सेवेसाठी पाठवले. उर्वशी कुरुवंशात अर्जुनाच्या पूर्वजांची माता होती. अर्जुन हे जाणून होता. उर्वशी जेंव्हा इंद्राच्या आज्ञेने अर्जुनाकडे गेली तेंव्हा अर्जुन आदरपूर्वक तिच्यापुढे नतमस्तक झाला. त्याने ती त्याला मातेसमान असल्याचे सांगितले. उर्वशी म्हणाली, "अप्सरा कोणाची माता नसते. तुला माझे ऐकायचे नसेल तर तुला एक वर्ष नपुंसक म्हणून राहावे लागेल असा शाप मी तुला देते." अर्जुनाने धर्माचा त्याग करण्यास नकार दिला आणि उर्वशीचा शाप स्वीकारला. या शापामुळेच त्याला विराटनगरीत एक वर्ष बृहन्नडेचे रुप घेऊन राहावे लागले.   
अर्जुनाने मल्लिकार्जुनगिरी पर्वतावर भगवान शंकरांशी मल्ल युद्ध केले होते. प्रत्यक्ष भगवान शंकरांना मल्ल युद्धात हरवणे शक्य नसले तरी तो हे युद्ध कित्येक दिवस हरला नव्हता. भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न होते. विराटनगरीत त्याने एकट्याने संमोहन अस्त्राने सर्व कौरव सैन्याचा पाडाव केला होता. इतका बलवान, शीलवान योद्धा आचार्य द्रोण आणि पितामह भीष्म यांच्यासमोर मोहग्रस्त झाला होता. आजवर झालेली युद्धे यापेक्षा निराळी होती. इथे जीवन मरणाचा प्रश्न होता. या युद्धात कोणाचा तरी मृत्यू अटळ होता. या प्रसंगी अर्जुनाला विषाद झाला. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचे सखा होते. त्यांनी प्रेमाने चार शब्द सांगून त्याच्या पाठीवरुन हात फिरवून त्याला युद्ध करण्यास तयार केले देखील असते पण अर्जुनाचे निमित्त करुन भगवंतांना संपूर्ण मानव जातीला उपदेश करायचा होता. महर्षी वेदव्यासांनी म्हंटले आहे -

गीता सुगीता कर्तव्या किमन्यैः शास्त्रविस्तरैः ।
या स्वंय पद्मनाभस्य मुखपद्माद्विनिः सृता ।।

जी स्वतः पद्मनाभ भगवान श्रीविष्णुंच्या मुखातून आली आहे अशी  गीता सुगीता करण्या योग्य आहे, अर्थात गीतेचे उत्तम प्रकारे पठण करुन भावासहित तिचे अंतःकरणात धारण करणे मुख्य कर्तव्य आहे. 

श्रीविष्णुंच्या मुखातून आलेली गीता हा अत्यंत प्रभावी ग्रंथ आहे. गीता भगवंतांच्या कृपेने प्राप्त होते. गीता आपल्याला निवडते. असा उद्धार करणारा ग्रंथ आपल्या हाती आला आहे, तर याचा पुरेपूर उपयोग करुन ज्ञान प्राप्त कारणे हे आपले कर्तव्य आहे. पहिल्या श्लोकाकडे वळुया.  


12.1

अर्जुन उवाच
एवं(म्) सततयुक्ता ये, भक्तास्त्वां(म्) पर्युपासते|
ये चाप्यक्षरमव्यक्तं (न्), तेषां(ङ्) के योगवित्तमाः||12.1||

अर्जुन म्हणाला, जे अनन्यप्रेमी भक्तजन पूर्वी सांगितल्याप्रमाणे निरंतर आपल्या भजन - ध्यानात मग्न राहून आपणा सगुणरूप परमेश्वराची आणि दुसरे जे केवळ अविनाशी सच्चिदानंदघन निराकार ब्रह्माचीच अतिश्रेष्ठ भावाने उपासना करतात, त्या दोन्ही प्रकारच्या भक्तांमध्ये अतिशय उत्तम योगवेत्ते कोण होत?

सकाम आणि निष्काम, सगुण आणि निर्गुण, साकार आणि निराकार भक्ती करणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ भक्त कोण असे अर्जुन भगवंतांना विचारतो. हाच प्रश्न लक्ष्मणाने श्रीरामाला विचारला होता. तुलसीदासजींच्या शब्दात लक्ष्मण विचारतो - 
मोहि समुझाइ कहहु सोइ देवा। सब तजि करौं चरन रज सेवा॥
कहहु ग्यान बिराग अरु माया। कहहु सो भगति करहु जेहिं दाया॥
हे देव! मला कृपा करून असे ज्ञान द्या ज्याने मी सर्व सोडून तुमची चरणरजसेवा करेन. ज्ञान, वैराग्य आणि मायेचे वर्णन करुन सांगा आणि त्या भक्तीचा महिमा सांगा जी केल्याने आपली दया प्राप्त होते.

प्रभू रामचंद्रांनी उत्तर दिले 
धर्म तें बिरति जोग तें ग्याना। ग्यान मोच्छप्रद बेद बखाना॥
जातें बेगि द्रवउँ मैं भाई। सो मम भगति भगत सुखदाई॥
धर्माने (त्याच्या आचरणाने)  वैराग्य आणि योगाने  ज्ञान प्राप्त होते. ज्ञानाने मोक्ष मिळतो असे वेदांमध्ये वर्णन आहे. हे बंधो ज्याने मी शीघ्र प्रसन्न होतो, ती माझी भक्ती होय - ही भक्तांना सुख देणारी आहे.
हाच प्रश्न अर्जुनाने इथे विचारला आहे. ज्ञान आणि भक्ती यांत काय श्रेष्ठ असे अर्जुन विचारतो आणि जे उत्तर प्रभू श्रीरामांनी दिले होते तेच उत्तर भगवान श्रीकृष्ण इथे देतात. भगवंत उत्तम वक्ते आहेत. प्रथम ते सोप्या शब्दांत सांगतात आणि मग विस्तारपूर्वक कथन करतात.

12.2

श्रीभगवानुवाच
मय्यावेश्य मनो ये मां(न्), नित्ययुक्ता उपासते|
श्रद्धया परयोपेता:(स्), ते मे युक्ततमा मताः||12.2||

श्रीभगवान म्हणाले, माझ्या ठिकाणी मन एकाग्र करून निरंतर माझ्या भजन-ध्यानांत रत झालेले जे भक्तजन अतिशय श्रेष्ठ श्रध्देने युक्त होऊन मज सगुणरूप परमेश्वराला भजतात, ते मला योग्यांमधील अति-उत्तम योगी वाटतात.

माझ्या सगुण रूपाची भक्ती करणारे भक्त मला प्रिय आहेत असे भगवंत सांगतात. गीतेमध्ये भगवंतांनी ज्ञान, कर्म, भक्ती असे विविध मार्ग विस्ताराने सांगितले आहेत. या सर्व मार्गांमध्ये भक्तीचा पुरस्कार भगवंत करतात. टिळा लावणारा, शेंडी ठेवणारा भक्त असतो असे नव्हे. 
श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम् ।
अर्चनं वन्दनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम् ॥
श्रीविष्णूंच्या कथांचे श्रवण करणे, त्यांचे कीर्तन करणे, स्मरण करणे, त्यांची पादसेवा कारणे, अर्चना करणे, वंदन करणे, त्यांचे दास बनणे, सखा बनणे आणि समर्पण करणे हे नवविधा भक्तीचे प्रकार आहेत.  राजा परीक्षित  श्रवण, शुकदेव कीर्तन, भक्त प्रह्लाद स्मरण, देवी लक्ष्मी पादसेवन, राजा पृथु अर्चन, अक्रूर वंदन, हनुमान दास्य, अर्जुन सख्य आणि राजा बलि ही समर्पण भक्तीची उदाहरणे आहेत.
यातील कोणत्याही प्रकारच्या भक्तीने भगवंतांची प्राप्ती होते पण भक्ती श्रद्धापूर्वक करावयास हवी. मग भगवंत ज्ञानमार्गाची उपेक्षा करतात का असा प्रश्न पडेल.

12.3

ये त्वक्षरमनिर्देश्यम्, अव्यक्तं(म्) पर्युपासते|
सर्वत्रगमचिन्त्यं(ञ्) च, कूटस्थमचलं(न्) ध्रुवम्||12.3||

जे पुरुष मन-बुद्धीच्या पलीकडे असणार्‍या सर्वव्यापी, अवर्णनीय स्वरुप आणि सदैव एकरूप असणार्‍या नित्य, अचल, निराकार, अविनाशी सच्चिदानंदघन ब्रम्हाची निरन्तर ऐक्य भावनेने ध्यान करत उपासना करतात.

12.3 writeup

12.4

सन्नियम्येन्द्रियग्रामं(म्), सर्वत्र समबुद्धयः|
ते प्राप्नुवन्ति मामेव, सर्वभूतहिते रताः||12.4||

आणि ते इन्द्रिय समूहाला चांगल्या प्रकारे ताब्यात ठेवून सर्व प्राणी मात्रांच्या कल्याणासाठी तत्पर असतात व सर्वाच्या ठायी समान भाव ठेवतात ते योगी मलाच येऊन मिळतात.

भगवंत निराकाराची आठ लक्षणे सांगतात.
अचिंत्य - ज्याचे चिंतन करता येत नाही असा, ज्याचा विचार करता येत नाही असा म्हणजे अचिंत्य. अक्षरम् - ज्याचा क्षर अथवा क्षय होत नाही असा म्हणजे अक्षर. अनिर्देश्यम् - ज्याला दर्शविता येत नाही; तो नेमका कोठे आहे हे सांगता येत नाही असा. अव्यक्तम् - ज्याच्या बाबतीत काहीही व्यक्त करता येत नाही. सर्वत्रम् - जो सर्वत्र भरून राहिला आहे. कूटस्थम् - लोहाराकडे ऐरण असते. त्यावर ठोकून तो वस्तू बनवतो. ठोकून बनविल्या जाणाऱ्या वस्तुंना ठोकण्याच्या क्रियेतून हवा तसा आकार प्राप्त होतो. हे सर्व करताना, ऐरणीचा आकार बदलत नाही. तिच्यात कोणताही बदल होत नाही. इतकेच नव्हे तर लोहाराकडील ही ऐरण अनेक पिढ्यांमधून चालत आलेली असते. तिच्यात पिढ्यानुपिढ्यांमधून कोणताच बदल झालेला नसतो. कूट हे असे न बदलणारे तत्त्व आहे. अचलम् - जे स्थिर असते. ध्रुवम् - ध्रुवासारखे अढळ.
या मन, बुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या वर सांगितलेल्या आठ लक्षणांनी युक्त अशा निराकाराची उपासना करणारे जे योगी सर्वत्र भगवंतांना बघतात, ते त्या परमात्म्यालाच प्राप्त होतात. असे जर आहे तर मग सगुणाची भक्ती करणारा मला प्रिय आहे असे भगवंतांनी का सांगितले असा प्रश्न पडतो.  

12.5

क्लेशोऽधिकतरस्तेषाम्, अव्यक्तासक्तचेतसाम्|
अव्यक्ता हि गतिर्दुःखं(न्), देहवद्भिरवाप्यते||12.5||

सच्चिदानंदघन निराकार ब्रह्मांत चित्त गुंतलेल्या त्या पुरुषांच्या साधनांत कष्ट जास्त आहेत. कारण देहाचा अभिमान असणाऱ्यांकडून अव्यक्त ब्रह्माची प्राप्ती कष्टानेच होत असते.

निराकाराची उपासना अत्यंत कठीण असते. आपण आपल्या देहालाच आपली ओळख मानतो. देहाला भूक लागते तेंव्हा मला भूक लागली असे म्हणतो. देहाला झोप येते तेंव्हा मला झोप आली असे म्हणतो. आपण जेंव्हा गाढ झोपेतून जागे होतो तेंव्हा काय गाढ झोप लागली होती असे म्हणतो. जर आपण गाढ झोपलो होतो तर झोपलो होतो हे कोणाला समजते. आपण झोपेत असतो त्यावेळी कोणीतरी जागा असतो जो मी झोपलो आहे याचा साक्षी असतो.
आपले चाळीस वर्षांपूर्वी शाळेत घेतलेले जुने छायाचित्र आपला मित्र दाखवतो. त्यातले आपण आपल्याला ओळखू येत नाही. देह निरंतर बदलत असतो. वेगवेगळ्या वयात घेतलेली छायाचित्रे वेगवेगळी दिसतात. प्रत्येक छायाचित्रात दिसणारे आपले रूप आधीच्या छायाचित्राहून निराळे दिसते. पण या सर्व स्थितींमधून जाताना हा 'मी' आहे ही जाणीव मात्र कायम असते. देह बदलत असला तरी 'मी' ची ही जाणीव बदलत नाही. असे असून सुद्धा देहालाच आपण 'मी' मानतो. जो देहभावाचा त्याग करू शकत नाही त्याला निराकाराची उपासना कठीण असते. एको अहम् द्वितीयो नास्ति | सर्वांच्या पलीकडे मी एकच आहे ही जाणीव जेंव्हा होईल तेंव्हाच निराकार भक्ती जमते.  

12.6

ये तु सर्वाणि कर्माणि, मयि सन्न्यस्य मत्पराः|
अनन्येनैव योगेन, मां(न्) ध्यायन्त उपासते||12.6||

परंतु जे मत्परायण सर्व कर्मे माझ्या ठिकाणी अर्पण करून मज सगुणरूप परमेश्वराची अनन्य भक्तियोगाने निरन्तर चिन्तन करीत उपासना करतात.

इथे भगवंत मां ध्यायन्त - मज परमेश्वराची उपासना असा शब्दप्रयोग करतात. गीतेत जिथे कुठे माम् असा शब्द येतो तो श्रीकृष्णासाठी वापरलेला नाही. माम् चा अर्थ परमात्मा असा घेणे अपेक्षित आहे. संपूर्ण महाभारतात जिथे श्रीकृष्णाचे संवाद आहेत तिथे वेदव्यासांनी केशव उवाच, वासुदेव उवाच असे म्हटले आहे. गीतेत मात्र श्रीकृष्णाच्या मुखातून आलेल्या श्लोकांसाठी भगवान उवाच असा शब्दप्रयोग वेदव्यास करतात. इथे माम् चा अर्थ आपण श्रीराम, श्रीकृष्ण, शंकर, हनुमान असा हवा तो घेऊ शकतो. ही सर्व त्या परमात्म्याचीच रुपे आहेत.
एखाद्या मनुष्याला आपण त्याच्या बाह्य रूपावरून, तो परिधान करणाऱ्या कपड्यांवरुन ओळखतो. एखाद्याला घरी एका नावाने तर बाहेर दुसऱ्या नावाने ओळखतात. आपण जे कपडे घालतो ते बदलत असतात, त्याने रुप वेगळे दिसते पण मनुष्य तोच असतो. घरातील आणि बाहेरील नावे जरी भिन्न असली तरी ती एकाच माणसासाठी वापरतात. तसेच एकाच परमात्म्याची असंख्य रुपे आहेत. एका प्रार्थनेत म्हटल्याप्रमाणे तुझी नामे अनेक आहेत पण त्यापलिकडे तू एकच आहेस -
हर देश में तू, हर भेष में तू,
तेरे नाम अनेक तू एक ही है,
तेरे नाम अनेक तू एक ही है।
तेरी रंगभूमि, यह विश्व भरा,
सब खेल में, मेल में तू ही तो है॥

सागर से उठा बादल बनके,
बादल से फटा जल हो करके।
फिर नहर बना नदियाँ गहरी,
तेरे भिन्न प्रकार, तू एक ही है॥

हर देश में तू, हर भेष में तू,
तेरे नाम अनेक तू एक ही है,
तेरे नाम अनेक तू एक ही है।

चींटी से भी अणु-परमाणु बना,
सब जीव-जगत् का रूप लिया।
कहीं पर्वत-वृक्ष विशाल बना,
सौंदर्य तेरा, तू एक ही है ॥

हर देश में तू, हर भेष में तू,
तेरे नाम अनेक तू एक ही है,
तेरे नाम अनेक तू एक ही है।

यह दिव्य दिखाया है जिसने,
वह है गुरुदेव की पूर्ण दया।
तुकडे कहे कोई न और दिखा,
बस मैं अरु तू सब एकही है॥

हर देश में तू, हर भेष में तू,
तेरे नाम अनेक तू एक ही है,
तेरे नाम अनेक तू एक ही है।
तेरी रंगभूमि, यह विश्व भरा,
सब खेल में, मेल में तू ही तो है॥

12.7

तेषामहं(म्) समुद्धर्ता, मृत्युसंसारसागरात्|
भवामि नचिरात्पार्थ, मय्यावेशितचेतसाम्||12.7||

हे अर्जुना! त्या माझ्यात चित्त गुंतवलेल्या प्रेमी भक्तांचा मी तत्काळ मृत्युरूप संसारसागरातून उद्धार करणारा होतो.

भगवंत म्हणतात जे मला शरण येतात त्यांना मी या मृत्युसंसारातून तारतो. पुनरपि जननं पुनरपि मरणं या सदैव चालणाऱ्या जन्म मृत्युच्या चक्रातून त्यांची मुक्ती होते.

12.8

मय्येव मन आधत्स्व, मयि बुद्धिं(न्) निवेशय|
निवसिष्यसि मय्येव, अत ऊर्ध्वं(न्) न संशयः||12.8||

माझ्यातच मन ठेव. माझ्या ठिकाणीच बुद्धि स्थापन कर. म्हणजे मग तू माझ्यातच राहशील, यात मुळीच संशय नाही.

भगवंत सांगतात, सर्व कर्मे करावीत पण मन आणि बुद्धी भगवंतांप्रती ठेवावी.

12.9

अथ चित्तं(म्) समाधातुं(न्), न शक्नोषि मयि स्थिरम्|
अभ्यासयोगेन ततो, मामिच्छाप्तुं(न्) धनञ्जय||12.9||

जर तू माझ्यात मन निश्चल ठेवायला समर्थ नसशील, तर हे अर्जुना! अभ्यासरूप योगाने मला प्राप्त होण्याची इच्छा कर.

आपल्याला पडला तोच प्रश्न अर्जुनाला पडला आहे. मन आणि बुद्धी जर भगवंतांच्या ठायी अर्पण केली तर मग कसे करावे ? हे जमणे अर्जुनाला कठीण वाटेल याचा विचार करुन भगवंत त्याला अभ्यास करावयास सांगतात. परमश्रद्धेय स्वामी रामसुखदासजी म्हणत - "हे नाथ, मेरे नाथ मैं आपको भूलूँ नहीं" मी जे काही करतो त्यात मला तुझे स्मरण नित्य राहावे अशी प्रार्थना ते करत. कबीरदास म्हणत - 
राम नाम रटते रहो, जब तक घट में प्राण,
कभी तो दीनदयाल के भनक पड़ेगी कान।
रामनामाचा जप सदैव करत राहावे. कधीतरी त्या कृपाळू दीनदयाळाच्या कानी आपली हाक पडेल. तुलसीदास म्हणतात - 
तुलसी मेरे राम को, रीझ भजो या खीज। 
भौम पड़ा जामे सभी, उल्टा सीधा बीज
कसेही करुन नाम घ्या. बी एकदा का जमिनीवर पडले, मग ते सरळ पडो अथवा उलटे, त्यातून वृक्ष सरळच वर येतो. जे जमेल ते करावे. भजन, पूजन, प्रार्थना कसेही करुन त्या भगवंताला भजावे.
भगवंत अर्जुनाचे सखा आहेत, ते त्याला आणखीन पर्याय देतात. 

12.10

अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि, मत्कर्मपरमो भव|
मदर्थमपि कर्माणि, कुर्वन्सिद्धिमवाप्स्यसि||12.10||

जर तू वर सांगितलेल्या अभ्यासालाही असमर्थ असशील, तर केवळ माझ्याकरता कर्म करायला परायण हो. अशा रीतीने माझ्यासाठी कर्मे केल्यानेही 'माझी प्राप्ती होणे' ही सिद्धी तू मिळवशील.

भगवंत अर्जुनाला म्हणतात, जे काही करशील ते माझ्यासाठी करतो आहेस या भावनेने कर. कर्म मत्परायण होऊन कर. परमश्रद्धेय नित्यलीलालीन भाईजी हनुमान प्रसाद पोद्दार यांनी म्हंटले आहे - 
कर प्रणाम तेरे चरणोंमें लगता हूँ अब तेरे काज।
पालन करनेको आज्ञा तव मैं नियुक्त होता हूँ आज॥
अन्तरमें स्थित रहकर मेरी बागडोर पकड़े रहना।
निपट निरंकुशचंचल मनको सावधान करते रहना॥
अन्तर्यामीको अन्तःस्थित देख सशंकित होवे मन।
पाप-वासना उठते ही हो नाश लाजसे वह जल-भुन॥
जीवोंका कलरव जो दिनभर सुननेमें मेरे आवे।
तेरा ही गुण-गान जान मन प्रमुदित हो अति सुख पावे॥
तू ही है सर्वत्र व्याप्त हरि! तुझमें यह सारा संसार।
इसी भावनासे अन्तरभर मिलूँ सभीसे तुझे निहार॥
प्रतिपल निज इन्द्रिय-समूहसे जो कुछ भी आचार करूँ।
केवल तुझे रिझानेको, बस, तेरा ही व्यवहार करूँ॥
माझ्या आयुष्यात ज्या कर्तव्य कर्मासाठी माझी नियुक्ती झाली असेल ते कर्तव्य करताना कधीही भगवंतांचे विस्मरण होऊ देऊ नये. जे होते आहे ते भगवंतांच्या इच्छेने, कृपेने होते आहे आणि जे करतो आहे ते भगवंतांसाठी करतो आहे ही भावना ठेवावी. 
अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रित:।
सर्वकर्मफलत्यागं तत: कुरु यतात्मवान् ॥ १२.११ ॥
जर माझ्या प्राप्तिरूप योगाचा आश्रय करून वर सांगितलेले साधन करायलाही तू असमर्थ असशील, तर मन, बुद्धि इत्यादींवर विजय मिळवणारा होऊन सर्व कर्मांच्या फळांचा त्याग कर.
भगवंत आणखीन पर्याय देतात. ते म्हणतात, कर्तव्य भावनेने सर्व कर्म करून कर्मफलांचा त्याग कर. 

मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है,

करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है !


पतवार के बिना ही, मेरी नाव चल रही है,

हैरान है ज़माना, मंजिल भी मिल रही है,

करता नहीं मैं कुछ भी, सब काम हो रहा है !


तुम साथ हो जो मेरे, किस चीज की कमी है,

किसी और चीज की, अब दरकार ही नहीं है,

तेरे साथ से गुलाम, अब गुलफाम हो रहा है !


मैं तो नहीं हूँ काबिल, तेरा पार कैसे पाऊं,

टूटी हुयी वाणी से, गुणगान कैसे गाऊं,

तेरी प्रेरणा से ही, सब ये कमाल हो रहा हैं !


मुझे हर कदम कदम पर, तूने दिया सहारा,

मेरी ज़िन्दगी बदल दी, तूने करके एक इशारा,

एहसान पे तेरा ये, एहसान हो रहा है !


तूफ़ान आंधियों में, तूने ही मुझको थामा,

तुम कृष्ण बन के आए, मैं जब बना सुदामा,

तेरे करम से अब ये, सरेआम हो रहा है !


मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है,

करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है !

पुढे भगवंतांनी भक्तांची ३९ लक्षणे सांगितली आहेत. त्यांचा पुढील सत्रात विचार करू. एक मिनिटाचे हरिनाम संकीर्तन करुन आज इथे थांबू. 

प्रश्नोत्तरे 
चिन्मय मित्र जी
गीतेच्या अध्यायातील पुष्पिकेमध्ये ब्रह्मविद्यायां असा उल्लेख येतो. ही ब्रह्मविद्या काय आहे ?
ब्रह्मविद्या म्हणजे सर्व विद्यांमधील श्रेष्ठ, ब्रह्मतत्त्वाचे ज्ञान देणारी विद्या. ब्रह्म जाणून घेण्याच्या सर्व मार्गांचे विवेचन गीतेत आहे. ब्रह्मप्राप्तीसाठी कोणता मार्ग वापरतो याला भगवंत फार महत्त्व देत नाहीत. दिल्लीला जाण्यासाठी रेल्वे, विमान अथवा मोटार यापैकी कोणत्याही साधनाने जाता येते. साधन महत्त्वाचे नसते, दिल्लीला पोहोचणे महत्त्वाचे असते. तसेच भगवंतांची प्राप्ती महत्त्वाची आहे. ज्ञान, कर्म, भक्ती कोणत्याही मार्गाने गेले तरी अखेरीस ब्रह्मविद्या प्राप्त होते.

भरत जी
मूर्तीपूजा का आणि कुठवर करावी ?
जोवर देहभाव सुटत नाही तोवर मूर्तीपूजा करावी. देहभाव असेपर्यंत सगुणाचा आधार घ्यावा लागतो.

पुष्पा जी
देवाजवळ काही मागावे की नाही ?
आपल्याजवळ कोणी काही मागितले तर आपण काही ना काही देतो. मूल आई वडिलांकडे मागते तेंव्हा ते त्याला काही ना काही देतात. देवाकडे मागायला काहीच हरकत नाही. यानेच त्याच्याशी संबंध जुळतो. पण म्हणून सारखेच काही मागणे योग्य नाही. भगवंतांनी सातव्या अध्यायात म्हंटले आहे -
चतुर्विधा भजन्ते मां जनाः सुकृतिनोऽर्जुन।
आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ।।
पवित्र कर्म करणारे अर्थार्थी, आर्त, जिज्ञासू आणि ज्ञानी -- या चार प्रकारचे मनुष्य मला भजतात . यात अर्थार्थी म्हणजे काही ना काही कामना करणाऱ्या भक्तांचा देखील भगवंत स्वीकार करतात. भगवंत कोणत्याच भक्ताची उपेक्षा करत नाहीत. कर्म करताना ते मी तुम्हाला अर्पण करतो असे नुसते तोंडाने म्हणू नये तर तसा अर्पणभाव असायला हवा.

प्रतिमा जी
वाईट कर्म करणारे म्हणतात, भगवंतांनी जशी बुद्धी दिली तसे वागलो. हे कितपत खरे आहे ?
विद्युत शक्तीने प्रकाश मिळतो तसेच आगही लावता येते. आपण कसे वापरू त्यावर हे अवलंबून आहे. हे तसेच आहे. सर्व काही परमात्म्याच्या इच्छेने आणि शक्तीने होत असते हे खरेच आहे. पण परमात्म्याच्या त्या शक्तीचा उपयोग कसा करावा त्याचा विवेक देखील परमात्म्याने मनुष्याला दिला आहे. देवता योनी देखील भोग योनी आहेत. त्यांना वर देण्याचे सामर्थ्य आहे पण त्याचे पुण्य या योनीत लाभत नाही. एका मनुष्य योनीत परमात्म्याची प्राप्ती शक्य आहे.

आलोक जी
मन बुद्धी ने परमात्म्याचे नित्य चिंतन कसे करावे ?
श्रवण, किर्तन, स्मरण, पादसेवन असे भक्तीचे नऊ प्रकार आहेत. आपल्याला जमेल त्या प्रकारे भक्ती करावी. कशी करावी याला काही बंधन नाही. परमात्म्याचे स्मरण महत्त्वाचे आहे. याने चिंतन आपोआप होईल.

यानंतर समापन प्रार्थना आणि हनुमान चालीसा चे पठण करून सत्राची सांगता झाली.
।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।। 

12.11

अथैतदप्यशक्तोऽसि, कर्तुं(म्) मद्योगमाश्रितः|
सर्वकर्मफलत्यागं(न्), ततः(ख्) कुरु यतात्मवान्||12.11||

जर माझ्या प्राप्तिरूप योगाचा आश्रय करून वर सांगितलेले साधन करायलाही तू असमर्थ असशील, तर मन, बुद्धि इत्यादींवर विजय मिळवणारा होउन सर्व कर्मांच्या फळांचा त्याग कर.

12.11 writeup