विवेचन सारांश
पुरुषोत्तम भगवंताचे स्वरूप

ID: 3826
मराठी
शनिवार, 14 ऑक्टोबर 2023
अध्याय 15: पुरूषोत्तमयोग
2/2 (श्लोक 7-20)
विवेचक: गीता विशारद डॉ आशू गोयल जी


परंपरेनुसार प्रार्थना आणि द्वीपप्रज्वलनाने विवेचनाचा शुभारंभ झाला. गुरुचरणांना वंदन करून विवेचनाची सुरुवात झाली. आपले पूर्वजन्मीचे संचित किंवा संत महात्म्यांचा आशीर्वाद  म्हणून आपल्या जीवनात भगवद्गीता आली. मानव जीवनाचा सदुपयोग करण्यासाठी आपण गीता अभ्यासाला लागलो आहे. गीतेसारखा कल्याणकारी दुसरा ग्रंथ या जगात नाही असे संत महात्मे आपल्याला सांगतात. हा अध्याय अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि भगवान याला शास्त्र म्हणून संबोधतात. अतिशय महत्त्वपूर्ण शास्त्र  इथे भगवान सांगतात. आपण सतत इच्छा आणि वासनांमुळे जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकलो आहे.

या अध्यायाच्या सहाव्या श्लोकात भगवंत आपला पत्ता सांगतात. ते म्हणतात की मी स्वयंप्रकाशित धाम आहे. उपमा आणि रूपक दोन प्रकारचे अलंकार आहेत. त्याचे मुख चंद्रासमान आहे. असे म्हणताना या ठिकाणी उपमा अलंकार आहे. मुखाला चंद्राची उपमा दिली आहे. माझा मुलगा चंद्र आहे असे म्हणताना या ठिकाणी रूपक आहे. चंद्र आणि मुलगा दोन्ही इतके एकरूप आहेत की ते वेगळे नाहीच असा यातून अर्थ निघतो म्हणून हे रूपक आहे. उपनिषदात म्हटले आहे -
असतो मा सद्गमय। तमसो मा ज्योतिर्गमय। मृत्योर्मामृतं गमय ॥
अर्थात - हे ईश्वरा, (आम्हाला)असत्याकडून सत्याकडे घेऊन जा, अंध:कारातून प्रकाशाकडे ने आणि मृत्यूकडून अमरत्वाकडे ने.

तुलसीदासांनी रामचरितमानसात भगवंताला प्रकाशाची उपमा दिली आहे. ते म्हणतात - 
बंदहु गुरु पद कंज कृपा सिंधु नर रुप हरि ।
महा मोह तब पुंज जासु वचन रवि कर निकर ॥
मी त्या गुरुमहराजांच्या चरणकमलाचे वंदना करतो जे कृपेचे सागर आहेत, नररूपात श्रीहरी आहेत आणि ज्यांचे वचन महामोह रूपी घन अंधःकाराचा नाश करणाऱ्या सूर्यकिरणांचा समूह आहे. 

वेद भगवंतांना बृहज्योती म्हणतात. केवळ भारतात आणि हिंदू धर्मातच नव्हे तर इतर धर्मांत देखील ईश्वराला प्रकाशाची उपमा दिलेली आढळते. ख्रिश्चन त्याला Divine Light संबोधतात. मुसलमान धर्मातही ईश्वराला नूर ए इलाही म्हटले आहे. पारशी धर्म सूर्यालाच ईश्वर मानतो.

भगवंतांची चार प्रकारे उपासना होते -  
भगवंताच्या नामाची उपासना
रूपाची(मूर्तीची) उपासना
भगवंताच्या लीलांची उपासना
भगवंताच्या धामाची उपासना
या चार उपासनांचे अलौकिक स्वरूप जाणणाऱ्याला भगवंतांची भक्ती प्राप्त होते. लौकिक रूपात अडकणे ही आरंभस्थिती होय.
हेच स्वरूप सातव्या श्लोकात भगवंत सांगतात. परमश्रद्धेय रामसुधाजी महाराज लहानपणी ऋषिकेश ला स्वामीजींचा सत्संग ऐकायला जात असत. स्वामीजींना पंधराव्या अध्यायातील सातवा श्लोक खूपच प्रिय होता. त्याचे वर्णन ते खालील प्रमाणे करतात.

15.7

ममैवांशो जीवलोके, जीवभूतः(स्) सनातनः।
मनः(ष्) षष्ठानीन्द्रियाणि, प्रकृतिस्थानि कर्षति।।15.7।।

या देहात हा सनातन जीवात्मा माझाच अंश आहे आणि तोच प्रकृतीत स्थित मनाला आणि पाचही इंद्रियांना आकर्षित करतो.

गोस्वामीजी तुलसीदास  म्हणतात -
ईश्वर अंश जीव अविनासी l चेतन अमल सहज सुख रासी ll 
हा जीव ईश्वराचा अंश आहे. तो अविनाशी, चेतन, निर्मळ आणि स्वभावतः सुखाची रास आहे. सर्व भूतांच्या ठिकाणी परमात्मा स्थित असून तो आपल्याला पृथक पृथक असल्यासारखा भासतो.  जीवभूत: सनातन:  जेवढे जीवात्मे आहेत, ते माझे अंश असून ते सनातन आहेत. इथे दोन शब्द पाहायला हवेत - पुरातन आणि सनातन.  जे खूप जुने हजारो, लाखो वर्षापूर्वीचे, ज्याचा आरंभ कधी झाला ते सांगता येत नाही त्याला पुरातन म्हणतात. सनातन म्हणजे ज्याचा आदी आणि अंत नाही असा. सनातन धर्माचा अभ्यास करणारे काही भगवंतांनी जीवात्म्याची निर्मिती प्रथम कधी केली असे विचारतात. आपल्याला बुद्धीने अनंताची कल्पना करता येत नाही त्यामुळे असा प्रश्न पडतो. जीवात्मा अनादी अनंत आहे, सनातन आहे. कित्येकदा आपल्या देहातील आत्मा दुसऱ्या कोणाच्या देहातील आत्म्याहून भिन्न आहे का असा प्रश्न पडतो. पण तसे नाही. सर्व जीवांमधील आत्मतत्त्व एकच असते. जर ते एकच आहे तर मग देह भिन्न, कार्य भिन्न असे का होते ? 

एक सोपे उदाहरण पाहूया. विद्युत केंद्रामध्ये करोडो वॉट्स विद्युत ऊर्जेचे उत्पादन होते. विद्युत वितरण केंद्रांद्वारे ही ऊर्जा शहरात आणली जाते. शहरातील वेगवेगळ्या भागात विजेच्या तारा आणि खांबांवरून ही ऊर्जा क्षेत्रनिहाय रोहित्रांद्वारे(transformer) तेथील इमारतींमधील निवासांपर्यंत येते. आपल्या घरात विजेच्या तारांमधून येणारी ही वीज स्विचबोर्ड पर्यंत येते. तेथून ती घरातील वेगवेगळ्या विद्युत उपकरणांना दिली जाते. असाच स्विचबोर्ड प्रत्येक खोलीत असतो आणि त्याद्वारे त्या खोलीतील उपकरणांना विद्युत पुरवठा होतो. आपल्या घरात येणारा वीजप्रवाह आणि शेजाऱ्याच्या घरात येणारा प्रवाह सारखाच असतो. सर्व घरांमध्ये जाणारी वीज एकच असते. परंतु प्रत्येक घरातील विजेचा वापर वेगळा असतो आणि तो त्या घराला जोडलेल्या मापकावर(meter) मोजला जातो. विद्युत मापक(meter) जोडल्याने एकच वीज वेगवेगळी भासू लागते. 

नेमकी हीच परिस्थिती आपल्या बाबतीत असते. सर्वत्र असणारे आत्मतत्त्व एकच आहे. सृष्टीत असणारे चेतनतत्त्व एकच आहे. परमात्मतत्त्व तुकड्यांमध्ये विभागलेले नाही. ते सर्वत्र भरून राहिलेले एक तत्त्व आहे - म्हणूनच म्हटले आहे अहं ब्रह्मास्मि l 
कर्मानुसार प्रत्येकाचे परिणाम वेगवेगळे असतात. परमात्मतत्त्वाकडे चार दृष्टिकोनातून बघता येते.
परमात्मा - परमात्म्याचा जेव्हा विचार केलेला असतो तेव्हा तो समष्टीचा विचार आहे; हे चराचरात व्यापलेले चैतन्यतत्त्व होय. 
आत्मा - माझ्या घरी मीटर बसवले आणि त्यात येणारी माझ्या वापरासाठी असणारी वीज म्हणजे एक आत्मतत्त्व आहे.
जीवात्मा - आत्मा जोपर्यंत स्वतंत्र आहे तोपर्यंत त्याला पाप पुण्य नसते. याच्याबरोबर जेव्हा संचित कर्म, प्रारब्ध, वासना येते, तेव्हा तोच आत्मा जीवात्मा होतो
जीवधारी - जीवात्मा जेंव्हा प्राणिमात्राच्या(मनुष्य, वृक्ष, पशू, पक्षी इत्यादी) देहात प्रवेश करतो तेंव्हा त्याला जीवधरी म्हणतात. 

आपण सगळेच या परमशक्तीचे अंश आहोत. या परमशक्तीत इच्छा वासना नसल्याने त्याला सच्चिदानंद म्हणतात. तो मीच आहे असे भगवान म्हणतात.  चिदानन्द रूप: शिवोऽहम् शिवोऽहम् मी शिवाचा अंश असूनही, देहाच्या संगतीत राहिल्याने, स्वतःला देह मानतो. एखाद्या सिंहाच्या छाव्याचा जन्म जर मेंढ्यांच्या कळपात झाला तर तो छावा स्वतःला मेंढा समजू लागेल, हे तसेच आहे. आपण मनुष्यदेहात जन्म घेतो. आपल्या आजूबाजूला स्वतःला न ओळखणारे, देहालाच सर्वस्व मानणारे मनुष्य असतात. त्यांच्या संगतीत आपण देखील आणि स्वतःला देह समजू लागतो. जेव्हा एखादा स्वामी गोविंद देव गिरि यांच्यासारखा कोणी महात्मा आपल्याला भेटतो तेव्हा त्यांच्या मार्गदर्शनाने, भगवंताच्या कृपेने आपल्या हाती भगवद्गीता येते आणि मग आपल्या आत चैतन्यतत्त्व दडलेले आहे व तेच सर्व कार्य आपल्याकडून करवून घेते हे आपल्याला समजू लागते. मी म्हणजे शरीर नसून आत्मा आहे हे उमगू लागते. 
आपण आपला पाच वर्षाचा फोटो बघतो, तेंव्हा हा आपलाच फोटो आहे हे आपल्याला पटत नाही. पूर्वी जर आपण आपला लहान वयातील फोटो कधीच बघितला नसेल आणि अचानक कोणी जर तो दाखवला तर आपण ओळखू शकत नाही  कारण आता आपल्यात खूप बदल झालेला असतो. शरीर तेच असते, परंतु त्यात बदल होत असल्याने ते वेगळे वाटते. डोळे तेच असतात. पाच वर्षाच्या मुलाला जी मी आहे ही अनुभूती असते तीच अनुभूती वीस  वर्षाच्या चाळीस वर्षांच्या, साठ वर्षाच्या वयातही  असते. ती कधी बदलत नाही. त्यातील चैतन्य न बदलणारे असते.

आत्मतत्त्व जर न बदलणारे आहे तर ते या बदलणाऱ्या प्रपंचात कसे अडकते ? भगवंत म्हणतात, मनः षष्ठानीन्द्रियाणि, प्रकृतिस्थानि कर्षति पाच ज्ञानेंद्रिये केवळ कामाची नाहीत. मन त्यांच्याबरोबर सहाव्या इंद्रियाचे काम करते.
पाची इंद्रिये स्वतंत्रपणे काम करत असतात. आपले मन जर दुसरीकडे असले किंवा विचारात असले तर आपल्याला एखादी गोष्ट बघत असूनही समजत नाही. एखादी गोष्ट आपण ऐकतो पण मन तिथे नसल्याने ते आपल्याला ऐकू येत नाही. आपण बघतो, ऐकतो, वास घेतो, स्पर्श करतो. पण आपले मन जर दुसरीकडे असले तर ती गोष्ट ग्रहण करता येत नाही.

परम श्रद्धेय शरणानंदजीएक सुंदर सूत्र सांगतात, ते म्हणतात आपल्या दृष्टीला चंचल बनवू नका. तिला इकडे तिकडे अनावश्यक ठिकाणी फिरू देऊ नका कारण दृष्टीबरोबर मन देखील तेथे द्यावे लागेल. मन हेच पाच इंद्रियांचे विषय ग्रहण करणारे, पंचेंद्रियांचे स्वामी आहे. मन विषयांमध्ये अडकून त्यांच्या मागे धावत असते. मन जर एखाद्या विषयात अडकले तर मग ज्ञानेद्रियांनी आणलेल्या माहितीचे ग्रहण ते करू शकत नाही. इथे वासना आणि इच्छा निर्माण होतात. जिलबी खाणे वाईट नाही पण त्याची सतत आठवण येणे हे चुकीचे आहे. हा संग चुकीचा आहे हे समजण्यासाठी भगवान महत्त्वपूर्ण सिद्धांत सांगतात. आपण चुकीच्या समजुतीच्या संगतीत असल्याने आद्य शंकराचार्य सांगतात त्याप्रमाणे आपल्याला पुनरपि जननं पुनरपि मरणं यानुसार पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो तो कसा हे पुढील श्लोकात सांगितले आहे.

15.8


शरीरं(य्ँ) यदवाप्नोति, यच्चाप्युत्क्रामतीश्वरः।
गृहीत्वैतानि संयाति, वायुर्गन्धानिवाशयात्॥15.8॥

वारा वासाच्या वस्तूतून वास घेऊन स्वतः बरोबर नेतो तसाच देहादिकांचा स्वामी जीवात्माही ज्या शरीराचा त्याग करतो, त्या शरीरातून मनसहित इंद्रिये बरोबर घेऊन नवीन मिळणाऱ्या शरीरात जातो.

हे आत्मतत्त्व कसे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते. मनुष्य  एका योनीतून दुसऱ्या योनीत कसा जातो याचे सूत्र भगवान सांगतात. हे सांगताना वायूचे उदाहरण दिले आहे.  भगवान म्हणतात-अर्जुन, वायु हा सर्वव्यापी आहे. तो गंध ग्रहण करून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी  जातो. आपण म्हणतो वारा जोराने वाहतो आहे. वादळ आल्यावर,  वारा अधिक वेगाने फिरताना दिसतो. आत्मतत्त्व सर्व व्यापक असून ते मनाच्या आकर्षणाने वेगवेगळ्या योनी ग्रहण करते. कचराकुंडी जवळून जाताना आपल्याला वायूचा दुर्गंध येतो. हा दुर्गंध तसाच रहात नाही. जसे आपण पुढे जातो तसतसा हा दुर्गंध मागे राहतो. वायूचा गुणधर्म असा आहे, त्याला कुठलाही दुर्गंध  किंवा सुगंध चिकटून रहात नाही. तो अलिप्तपणे पुढे जात राहतो. त्याचप्रमाणे हे आत्मतत्त्व इंद्रियांना न चिकटता पुढे जात असते. चौथ्या अध्यायात भगवान म्हणतात - जो जशा भावाने आपले शरीर सोडतो, तशी योनी त्याला मिळते. अंतकाळी जसे चिंतन आपण करतो, त्यानुसार पुढचा जन्म मिळतो. जो मरताना धनाचं चिंतन करतो त्याला तसाच जन्म मिळतो. कोणी मुलाचे चिंतन करणारे असतात, कोणी पत्नीचे  चिंतन करणारे असतात, काही व्यवसायाचे चिंतन करणारे असतात, त्यानुसार त्यांना योनी मिळत असते. अंतिम क्षणी जी वासना निर्माण होते, त्यानुसार पुढचा जन्म असतो. आपण कोणत्या मोहात होतो  आणि आपल्याला अंतिम क्षणी कोणाचे स्मरण झाले, हे कसे कळू शकेल? गीतेत भगवान म्हणतात- अंतकालेच मामेव स्मरनमुक्ता कलेवरम l  शेवटच्या क्षणी आपण ज्याचे स्मरण करतो तीच योनी आपल्याला मिळते. गोस्वामीजी म्हणतात
जन्म जन्म मुनि जतन कराही l अंत राम कहि आवत नाही ll
जासु नाम बल संकर कासी l देत सबहि सम गति अविनासी ll
जर जीवनभर भगवंताचे नाव घेतले नाही तर अंतकाळी ते मुखात कसे येईल. एखादेच महात्मा गांधींसारखे महापुरुष असतात ज्यांना शेवटी राम आठवतो. एखादी भिंत सरळ असते. ती काही कारणाने जर वाकली, तर जी ज्या दिशेला वाकलेली असेल त्याच दिशेने ती ढासळते. उत्तरेकडे वाकली तर उत्तरेकडे पडते. दक्षिणेकडे असली तर दक्षिणेकडे पडते. जीवाम्यांचेही असेच असते. २४ तासांपैकी सोळा तास झोप सोडून तो कर्म करत असतो. त्यापैकी १५ तास ४० मिनिटे जर संसाराचे चिंतन असेल, मोबाईल वरती व्हाट्सअप बघण्यात वेळ घालवला असेल, दुसऱ्याची निंदा करण्यात वेळ घालवला असेल तर उरलेले २० मिनिटे जरी भगवत चिंतनात घालवले तरी त्याला भगवंतांचे  स्मरण कसे होईल?
भगवान म्हणतात ज्याला जसे संस्कार किंवा वासना आधीच्या जन्मात असतात त्यानुसार जन्म मिळतो. करोडो जन्मांचे संस्कार एकत्रित होत असतात. आपल्या मनात विचार येतो, मी तर इतके वाईट केले नाही, माझ्या जीवनात असे का घडले? किंवा एखाद्या वेळी चांगले घडल्यावर आपण आश्चर्यचकित होतो. यासाठी मोबाईलचे उदाहरण दिले आहे. आपल्याजवळ एक छोटासा पेन ड्राईव्ह असतो. त्यात ६४ जीबी २५६ जीबी एवढी मेमरी असते. जवळ-जवळ १५० चित्रपट त्यामध्ये साठवता येतात. त्याप्रमाणेच मन, बुद्धी करोडो जन्माचे संस्कार स्वतःत साठवते. वेळोवेळी हे प्रतिबिंबित झालेले आपल्याला दिसते. एक तीन वर्षाचा बालक गीतेचे अध्याय म्हणताना दिसतो. हे त्याचे पूर्वजन्मीचे संस्कार असतात. कदाचित तो मागच्या जन्मात गीताव्रती ही असू शकतो. त्याची आई जेव्हा गीता पठण करते तेव्हा तोही तिच्याबरोबर हे पठण करू लागतो. वायूच्या तत्वाप्रमाणेच हे आत्मतत्त्वही मागच्या योनीतून पुढच्या योनीत जात असते. या पुढील श्लोकात भगवान त्याची पाच उदाहरणे देतात.

15.9


श्रोत्रं(ञ्) चक्षुः(स्) स्पर्शनं(ञ्) च, रसनं(ङ्) घ्राणमेव च।
अधिष्ठाय मनश्चायं(व्ँ), विषयानुपसेवते॥15.9॥

हा जीवात्मा कान, डोळे, त्वचा, जीभ, नाक आणि मन यांच्या आश्रयानेच विषयांचा उपभोग घेतो.

मनुष्य कान, नाक, डोळे, जीभ आणि त्वचा या पाच इंद्रियांपासून विषय भोगतो. यापैकी श्रोत्र म्हणजे शब्द. हरीण खूप वेगाने पळतो. चित्ता हा सर्वात वेगवान प्राणी आहे. पण तो जेव्हा हरणाची शिकार करायला जातो, तेव्हा वीस वेळा प्रयत्न केले तर त्यात तो १९ वेळा अयशस्वी होतो आणि शेवटी एक वेळा यशस्वी होऊन तो त्याची शिकार करतो. कारण हरणाची चाल चौकडी असते. तो वळणे घेत पळतो. या हरणांमधल्या कस्तुरीमृगाचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या बेंबीत सुगंधी कस्तुरी असते. ही कस्तुरी मिळवण्यासाठी शिकारी त्याची शिकार करतात. शिकारी एका प्रयत्नातच हरणाला पकडू शकतो कारण हरणाला संगीत खूप प्रिय आहे हे त्याला माहित असते. हरणाला पकडताना विशिष्ट प्रकारचे संगीत टेपरेकॉर्डर वर लावले जाते. स्पीकर चा आवाज जेव्हा हरणाला येतो, तेव्हा दोन्ही कान टवकारून ते संगीत ऐकण्यात मग्न होते. ही संधी साधून शिकारी त्याला पकडतात. अशा प्रकारे शब्दाच्या आकर्षणाने हरणाची शिकार होते.

चक्षु म्हणजे नेत्र. डोळ्यांना रूपाचे आकर्षण असते. पावसाळ्यात आपण ट्यूबलाइट वर अनेक पतंग टण टण आवाज करताना  बघतो. त्यांना प्रकाशाचे आकर्षण असल्याने ते तिथे जातात. सकाळी उठल्यावर जेव्हा आपण बघतो तेव्हा हजारो पतंग खाली मरून पडलेले दिसतात. रूपाच्या आकर्षणाने ते आपला जीव गमावतात.

स्पर्श- हत्ती हा सर्वात बुद्धिमान आणि सामर्थ्यवान प्राणी आहे. पण स्पर्शाच्या आकर्षणाने तो शिकाऱ्याकडून पकडला जातो. अगदी लहान अंकुशाने माहुत त्याच्याकडून काम करून घेत असतो. या हत्तीला हत्तीणीचा स्पर्श फार प्रिय असतो. अमावस्येच्या रात्री  त्याला पकडण्यासाठी आठ फूट लांब, आठ फूट रुंद आणि आठ फूट खोल असा खड्डा खणण्यात येतो. त्यावर फळी ठेवली जाते आणि त्यावर गवत पसरवून वर हत्तीणीची ताजी विष्ठा पसरतात. त्यावर हत्तीणीचे चित्र ठेवले जाते. हत्तीणीचा स्पर्श आणि विष्ठेचा गंध हत्तीला आल्याने, स्पर्शाच्या आशेने तो धावत येतो आणि अलगद त्या खड्ड्यामध्ये पडतो. तिथून बाहेर पडण्यासाठी तो खूप खटपट करतो. पण बाहेर येऊ शकत नाही. तो खूप जखमी होतो. बाहेर पडण्याच्या धडपडीत आवाज करतो पण तीन-चार तासानंतर तो थकून जातो. तीन दिवस पर्यंत माहूत येत नाही. चौथ्या दिवशी तो केळी घेऊन येतो आणि त्याला खायला देतो. त्याच्याकडे प्रेमाने बघतो. असे होता होता सहाव्या दिवशी माहुत अंकुश घेऊन येतो आणि त्याला बाहेर कसे पडायचे याचे ट्रेनिंग देऊ लागतो. त्यानंतर सातव्या दिवसानंतर त्याच्या इशाऱ्यानुसार तो फळीवर चढतो आणि पकडला जाऊन जीवनभर माहुताच्या इशाऱ्यानुसार वागतो. हे सगळे स्पर्शाच्या  आकर्षणाने होते.

रसनम म्हणजे रसना म्हणजे जीभ. जिभेला चवीचे आकर्षण असते. मासोळीला पकडण्यासाठी मच्छीमार आकड्याला कणकेची गोळी लावतो. कणकेच्या आकर्षणाने ती मासोळी आकड्यात अडकते आणि पकडली जाते.

नासिकेचा विषय गंध आहे. भ्रमराला गंधाचे आकर्षण असते. त्याला कमळाच्या फुलातील पराग कणाच्या गंधाचे आकर्षण असते. त्याचे पुढचे दोन दात खूप मजबूत असतात. त्याच्या दातात एवढी ताकद असते की तो सहज  झाडाचा बुंधा कोरून त्याच्या आत जाऊन राहू शकतो. पण गंधाच्या आकर्षणाने तो कमल फुलात जातो. सूर्यास्तापर्यंत दलाचा आस्वाद घेतो. सूर्यास्तानंतर पाकळ्या मिटून जातात. जेव्हा सगळ्या पाकळ्या बंद होतात, तेव्हा तो बाहेर पडू शकतो पण त्याला गंधाचे आकर्षण असल्याने तो तिथेच राहतो. त्याला त्याचे प्राण गमवावे लागतात.

शब्दाच्या आकर्षणाने हरीण, स्पर्शाच्या आकर्षणाने हत्ती, रूपाच्या आकर्षणाने पतंग, रसाच्या आकर्षणाने मासोळी आणि गंधाच्या आकर्षणाने भ्रमराला आपले प्राण गमवावे लागतात.
मनुष्यप्राणी तर शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या पाचही इंद्रियांच्या आसक्तीत अडकलेला आहे. त्याला चवदार पदार्थ खायला हवे. सुंदर मुलायम गादीवर झोपायला हवे, छान छान संगीत ऐकायला हवे. टुमदार मोटारीतून फिरायला हवे. या सर्व आसक्तीत मनुष्य अडकलेला आहे. करोडो वर्षांपासून आपल्या इच्छापूर्तीसाठी या जन्मातून त्या जन्मात  त्याला जावे लागते.

15.10


उत्क्रामन्तं(म्) स्थितं(व्ँ) वापि, भुञ्जानं(व्ँ) वा गुणान्वितम्।
विमूढा नानुपश्यन्ति, पश्यन्ति ज्ञानचक्षुषः॥15.10॥

शरीर सोडून जात असता किंवा शरीरात राहात असता किंवा विषयांचा भोग घेत असता किंवा तीन गुणांनी युक्त असताही (त्या आत्मस्वरूपाला) अज्ञानी लोक ओळखत नाहीत. केवळ ज्ञानरूप दृष्टी असलेले विवेकी ज्ञानीच तत्वतः ओळखतात.

उत्क्रामन्तं स्थितं वापि  त्या ठिकाणी भगवान तीन स्थिती सांगतात. पहिली उठणे, स्थितं म्हणजे एका जागी स्थिर राहणे आणि पुन्हा येणे. जीव या शरीराला सोडून दुसऱ्या शरीरात जातो आणि परत विषयांचा भोग घेतो. अज्ञानी लोक हे जाणत नाही. ज्यांना ज्ञानचक्षु असतात तेच फक्त हे जाणू शकतात. गुणान्वितम् - जीव सत्व रज आणि तम या तीन गुणांनी युक्त असतो. तो उत्क्रामन्तं म्हणजे नवीन शरीरधारी होतो, पहिले शरीर त्यागून दुसऱ्या शरीरात जातो तो या तीन गुणांना सोबत घेऊनच. त्यांची वर्गवारी कशी असते हे समजावून देताना एक उदाहरण दिले आहे. एका वर्गात ४० विद्यार्थी असतात. त्यांचा निकाल सांगताना असे सांगितले जाते, ८०% विद्यार्थी प्रथम श्रेणीत,१०% द्वितीय श्रेणीत आणि १०% तृतीय श्रेणीत पास झाले आहेत.
त्याचप्रमाणे आपल्या शरीरातील अवस्था समजावण्यासाठी सात स्तर सांगितले आहेत.
१- पाच कर्मेंद्रिये - हात, पाय, तोंड, उपस्थ आणि गुदा. यापासून मिळणारे ज्ञान आरंभिक असते. लहान बालक ज्ञान मिळवण्यासाठी याचाच वापर करतो.
२- पाच ज्ञानेन्द्रिय - डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा. यापासून मिळणारे ज्ञान दुसऱ्या स्तराचे आहे.
३- मन, बुद्धी, चित्त, अहंकार . नुसते बघून, ऐकून आपल्याला ज्ञान होत नाही. बुद्धीने त्याचा विचार केला जातो नंतर ते स्वीकारले जाते.
४- अनुभव- ज्ञानेन्द्रिय आणि कर्मेंद्रियांपेक्षाही अनुभवाने मिळणारे ज्ञान श्रेष्ठ असते. वृद्धापसेवा. याचा अर्थ वृद्धांकडून ज्ञान मिळवा. त्यांच्या अनुभवातून आपल्याला ज्ञान मिळवता येते.
५-  साधना किंवा अभ्यास-  वारंवार साधना करून अभ्यास केल्यास ज्ञानप्राप्ती होऊ शकते.
६- कृपा- कृपा झाल्यावरही ज्ञान प्राप्त होते. यह फल साधन ते नही होई l तुम्हारी कृपा पाए कोई कोई ll  अर्जुनावर भगवंताने कृपा केली होती. म्हणूनच ते त्याला म्हणाले निमित्त मात्र तू बन. मी आधीच सर्वांना मारले आहे. तेव्हा युद्धाला तयार हो. पण भगवंताच्या कृपेने सर्व गोष्टी साध्य होतात असे नाही.  कृपा टिकण्यासाठी प्रयत्न करायला हवे. शिवाने दर्शन देऊन रावणावर कृपा केली होती. पण स्वभावानुसार  त्याचा नाश झाला.
७- स्थिती विशेष - हा सातवा स्तर आहे. मिळालेली स्थिती टिकतेच असे नाही. जे योगी आणि महात्मे असतात त्यांची स्थिती कायम राहते. सुमारे २६०० वर्षांपूर्वी युनान मध्ये सुकरात उर्फ सॉक्रेटिस होऊन गेला. तो म्हणतो मला जसजसे ज्ञान मिळत गेले तसतसे माझे अज्ञान मला समजू लागले. माझे अज्ञान किती आहे हे मला समजले.
गुरुशिवाय आपल्याला ज्ञान होऊ शकत नाही. फक्त पिताच मुलाला जन्म देऊ शकत नाही. जन्म देण्यासाठी मातेची आवश्यकता असते. त्याप्रमाणे ज्ञान पिता असून वैराग्य माता आहे
सोइ जानइ जेहि देहु जनाई। जानत तुम्हहि तुम्हइ होइ जाई ।। अर्थात केवळ तुझ्या कृपेने त्याला जाणता येते. जो कोणी तुला जाणतो तो तुझ्यात सामावून जातो. 
यातील सातवा स्तर जाणला तो ज्ञानी त्याच्यासाठी बाकीचे सहा याबाबतीत अज्ञानी असतात. ज्याला दुसरा समजला त्याच्यासाठी पहिल्या स्तरातील अज्ञानी असतो. जो स्तर समजतो त्याच्यासाठी सोडून त्या स्तराखालचे इतर अज्ञानी असतात.

15.11

यतन्तो योगिनश्चैनं(म्), पश्यन्त्यात्मन्यवस्थितम्।
यतन्तोऽप्यकृतात्मानो,नैनं(म्) पश्यन्त्यचेतसः।।15.11।।

योगीजनही आपल्या हृदयात असलेल्या या आत्म्याला प्रयत्नानेच तत्वतः जाणतात; परंतु ज्यांनी आपले अंतःकरण शुद्ध केले नाही असे अज्ञानी लोक प्रयत्न करूनही या आत्मस्वरूपाला जाणत नाहीत.

बरेच वेळा साधक प्रश्न विचारतात, आम्ही खूप साधना करतो, ध्यानधारणा करतो, तप करतो पण अजूनही आम्हाला भगवंताकडून काहीच मिळाले नाही. आमचे शेजारी, वडील, भाऊ आणि इतर कुटुंबीय सतत भगवंताची सहा-सहा तास पूजा करतात, ध्यान लावून बसतात पण अजूनही त्यांना भगवत्प्राप्ती झाली नाही. केवळ उपासना करून भागणार नाही. त्यासाठी अंत:करणाची शुद्धी असायला हवी. फक्त यज्ञ करून काही साध्य होत नाही. जरी अर्चना, साधना, तप केले पण अंत:करण शुद्ध नसेल तर काही उपयोग होत नाही. गोस्वामीजी म्हणतात  मोहे कपट छल छिद्र न भावा आरशावर धूळ असेल तर आपले प्रतिबिंब स्पष्ट दिसणार नाही, त्यावर कपड्याने पुसून धूळ साफ केली तरच चेहरा स्पष्ट दिसू शकेल. तसेच भगवत्प्राप्तीसाठी अंत:करण शुद्ध असायला हवे. नामजप, पूजा, अर्चना, व्रते, उपवास इत्यादी उपासनेच्या साधनांनी चित्तशुद्धी होण्यास मदत होते. 

15.12

यदादित्यगतं(न्) तेजो, जगद्भासयतेऽखिलम्।
यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ, तत्तेजो विद्धि मामकम्।।15.12।।

सूर्यामध्ये राहून जे तेज सर्व जगाला प्रकाशित करते, जे तेज चंद्रात आहे आणि जे अग्नीत आहे, ते माझेच तेज आहे, असे तू जाण.

बाराव्या श्लोकापासून पंधराव्या श्लोकापर्यंत भगवंत आपला विस्तार सांगतात. अतिशय सूक्ष्म वस्तु पासून स्थूलापर्यंत हे परमतत्त्व पसरलेले आहे. सूर्य आणि चंद्रापासून मिळणारे तेज माझेच आहे असे भगवंत म्हणतात.

15.13

गामाविश्य च भूतानि, धारयाम्यहमोजसा।
पुष्णामि चौषधीः(स्) सर्वाः(स्), सोमो भूत्वा रसात्मकः।।15.13।।

आणि मीच पृथ्वीत शिरून आपल्या शक्तीने सर्व भूतांना धारण करतो आणि रसरूप अर्थात अमृतमय चंद्र होऊन सर्व वनस्पतींचे पोषण करतो.

सूर्य आणि चंद्र यानंतर आता भगवंत मी पृथ्वीत आहे असे सांगतात. मी या पृथ्वीत आपल्या शक्तीने प्रवेश करून सर्वांना धारण करतो. मी सर्वांचे पोषण करतो. मी चंद्रापासून औषधी बनवून वनस्पतींचे पोषण करतो असे भगवान म्हणतात.

15.14

अहं(व्ँ) वैश्वानरो भूत्वा, प्राणिनां(न्) देहमाश्रितः।
प्राणापानसमायुक्तः(फ्), पचाम्यन्नं(ञ्) चतुर्विधम्॥15.14॥

मीच सर्व प्राण्यांच्या शरीरात राहणारा, प्राण व अपानाने संयुक्त वैश्वानर अग्निरूप होउन चार प्रकारचे अन्न पचवितो.

भगवंत म्हणतात अर्जुना, "मी सर्व प्राण्यांच्या शरीरात राहून पंचप्राणाने चार प्रकारचे अन्न पचवतो." पोटातील अग्नी जठराग्नि आहे . तीन प्रकारचे अग्नी आहेत.  दावाग्नि,  वडवाग्नि आणि जठराग्नि. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण जरी आईस्क्रीम सारखे थंड पदार्थ खाल्ले तरी त्यापासून तयार होणारे मलमूत्र गरमच असते. आपण चार प्रकारचे अन्न ग्रहण करतो.
भक्ष्य - पोळी भाकरी हे चावून खाणारे अन्न म्हणजे भक्ष्य. 
पेय - दूध ताक हे पातळ पिण्याचे पदार्थ भोज्य.
लेह्य - चटणीसारखे चाटून खायचे पदार्थ ते लेह्य.
चोष्य - ऊस चोखायचा असल्याने तो चोष्य.
भगवंत म्हणतात, हे चारही प्रकारचे अन्न मीच पचवतो. यासाठी प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान या पाच मार्गाने अन्नाचे पचन होते. पण शीर्षासनात जरी अन्न खाल्ले तरी ते जठरात जाते. या ठिकाणी गुरुत्वाकर्षणाच्या नियमाचे उल्लंघन जरी झाले तरी प्राण अपनादी वायूंच्या सहाय्याने ते अन्न खालीच जाते. आपण भोजन घेतल्यावर त्यापासून सप्तधातू क्रमाक्रमाने मिळतात.
रस,
रसापासून रक्त,
रक्तापासून मांस,
त्यातून मेद,
मेदापासून अस्थी,
अस्थीपासून मज्जा
आणि अखेरीस मज्जेपासून ओज प्राप्त होतो.
प्रत्येक धातूपासून पुढील धातूची ऊर्जा प्राप्त होते. परमात्म्याची ऊर्जा अशीच महाकाश, मठाकाश ते घटाकाश अशी प्रवाहित होते.  

15.15

सर्वस्य चाहं(म्) हृदि सन्निविष्टो, मत्तः(स्) स्मृतिर्ज्ञानमपोहनं(ञ्) च।
वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो, वेदान्तकृद्वेदविदेव चाहम्।।15.15।।

मीच सर्व प्राण्यांच्या हृदयात अन्तर्यामी होऊन राहिलो आहे. माझ्यापासूनच स्मृती, ज्ञान आणि अपोहन ही होतात. सर्व वेदांकडून मीच जाणण्यास योग्य आहे. तसेच वेदान्ताचा कर्ता आणि वेदांना जाणणाराही मीच आहे.

स्मृती, ज्ञान आणि अपोहन या तीन गोष्टी भगवान येथे सांगतात. स्मृती म्हणजे आधीच्या गोष्टी आठवणे. एखादी गोष्ट समजणे म्हणजे ज्ञान आणि अपोहन म्हणजे संशय रहित असणे. स्मृती पूर्वीच्या स्मरणातील असते. ज्ञान आपण आज मिळवत असतो आणि अपोहन म्हणजे जिथे संशय नसतो असे. आपल्या सभोवती असे काही लोक असतात ते दूरवरचा विचार करणारे असतात. अशा लोकांचे आपण ऐकतो. मोठमोठे संत महात्मे असे असतात. जगातील मोठमोठे श्रीमंत कारखानदार लोक, शास्त्रज्ञ वगैरे अशा लोकांकडे सल्ला मागण्यासाठी जातात. कारण अपोहनाची क्षमता, दूरदृष्टी त्यांच्याकडे असल्याने ते आपल्या संशयाचे निरसन करतात. ही सर्व क्षमता भगवंताकडेच असल्याने भगवंत म्हणतात मी वेदांचा कर्ता आहे आणि मीच वेदांना जाणणारा आहे.

15.16

द्वाविमौ पुरुषौ लोके, क्षरश्चाक्षर एव च।
क्षरः(स्) सर्वाणि भूतानि, कूटस्थोऽक्षर उच्यते।।15.16।।

या विश्वात नाशवान आणि अविनाशी असे दोन प्रकारचे पुरुष आहेत. त्यामध्ये सर्व भूतमात्रांची शरीरे ही नाशवान आणि जीवात्मा अविनाशी म्हटला जातो.

या विश्वात नाशवंत आणि अविनाशी या दोन स्थिती आहेत. जीव हा नाशवंत आहे आणि चेतनतत्त्व अमर आहे. ते अविनाशी आहे. यालाच आपण क्षर- अक्षर म्हणू शकतो. जड-चेतन म्हणू शकतो. देहधारी आणि चेतनतत्त्व म्हणू शकतो. याला नाशवंत आणि अविनाशी म्हणू शकतो. या सगळ्यांचा अर्थ एकच आहे. अर्जुना आतापर्यंत मी तुला दोन गोष्टी सांगितल्या. आता तिसरी तू ऐक. त्यामुळेच या अध्यायाला शास्त्र म्हटले आहे.

15.17

उत्तमः(फ्) पुरुषस्त्वन्यः(फ्), परमात्मेत्युदाहृतः।
यो लोकत्रयमाविश्य, बिभर्त्यव्यय ईश्वरः।।15.17।।

परंतु या दोन्हींपेक्षा उत्तम पुरुष तर निराळाच आहे. जो तिन्ही लोकांत प्रवेश करून सर्वांचे धारण-पोषण करतो. याप्रमाणे तो अविनाशी परमेश्वर आणि परमात्मा असा म्हटला जातो.

या दोन्ही तत्वांपेक्षा उत्तम पुरुष वेगळा आहे. आपण भगवंताचे अंश आहोत हे खरे आहे. समुद्रातील पाण्याचा थेंब आणि समुद्र एकसमान असूनही त्या थेंबाला समुद्र म्हणता येणार नाही. परमात्मा जीवातम्याची निर्मिती करून  या संसाराला निर्माण करतो. आपण कुठे जन्माला येऊ? कुठे राहू? कधी आपला मृत्यू होईल? ते आपल्याला सांगता येत नाही. याची सर्व सूत्रे भगवंताच्या हातात असल्याने तो उत्तम पुरुष आहे.

15.18

यस्मात्क्षरमतीतोऽहम्, अक्षरादपि चोत्तमः।
अतोऽस्मि लोके वेदे च, प्रथितः(फ्) पुरुषोत्तमः।।15.18।।

कारण मी नाशवान जडवर्ग-क्षेत्रापासून तर पूर्णपणे पलीकडचा आहे आणि अविनाशी जीवात्म्यापेक्षाही उत्तम आहे. म्हणून लोकांत आणि वेदांतही पुरुषोत्तम नावाने प्रसिद्ध आहे.

या श्लोकात भगवंत आपल्या स्वरूपाचे वर्णन करतात. ते म्हणतात नाशिवंत जीवात्मा आणि अविनाशी चेतनतत्त्व यांच्या भरणपोषणाचे काम करणारा मी एकमेव परमात्मा आहे. पुरुषोत्तम यामध्ये पुरुष शब्द जवळ असून आत्मा दूर आहे. पण अविनाशी तत्त्व जीवात्म्यापेक्षा उत्तम असल्याने तो पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध आहे.

15.19

यो मामेवमसम्मूढो, जानाति पुरुषोत्तमम्।
स सर्वविद्भजति मां(म्), सर्वभावेन भारत।।15.19।।

हे भारता! जो ज्ञानी पुरुष मला अशाप्रकारे तत्त्वतः पुरुषोत्तम म्हणून जाणतो, तो सर्वज्ञ पुरुष सर्व रीतीने नेहमी मला वासुदेव परमेश्वरालाच भजतो.

अर्जुना! जो ज्ञानी पुरुष, पुरुषोत्तम भगवंताला सगुण भावाने किंवा निर्गुण भावाने  स्मरत असेल तरी तो माझेच स्मरण करतो हे लक्षात ठेव.

15.20

इति गुह्यतमं(म्) शास्त्रम्, इदमुक्तं(म्) मयानघ।
एतद्बुद्ध्वा बुद्धिमान्स्यात्, कृतकृत्यश्च भारत।।15.20।।

हे निष्पाप अर्जुना! असे हे अतिरहस्यमय गुप्त शास्त्र मी तुला सांगितले आहे, याचे तत्वतः ज्ञान करून घेतल्याने मनुष्य ज्ञानवान आणि कृतार्थ होतो.

भगवंताला अर्जुनाची दोन नावे प्रिय आहेत. एक अनघ आणि दुसरा भारत. अनघ म्हणजे निष्पाप. तो अनघ असल्याने हे अतिरहस्यमय ज्ञान  इथे भगवंत त्याला सांगतात.  हे गुह्यतम ज्ञान म्हणजे शास्त्र. गीता ज्याला वाचता येत नाही तो गीता ऐकू तर शकतो. गीता त्यालाच ऐकायला मिळते, जो भगवंता कडून निवडला गेला असतो. वारंवार आपल्याला हेच सांगितले जाते त्यावर आपण विश्वास ठेवायला हवा. आपण गीता निवडली आहे असे म्हणण्यापेक्षा गीतेने आपल्याला निवडले आहे.  पूर्वजांचे पुण्य किंवा संत महात्म्यांचा आशीर्वाद यामुळेच हे शक्य झाले. हे शास्त्र  एकदा कळल्यावर मनुष्य ज्ञानवान आणि कृतार्थ होतो.

ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, भगवद्गीता पंधराव्या अध्यायातच पूर्ण झाली आहे. सोळा आणि सतरावा अध्याय परिशिष्ट आहे. १८ वा अध्याय म्हणजे गीतेचे सार आहे. शास्त्रीय दृष्टीने या अध्यायाला खूप महत्त्व आहे.
विवेचनाच्या नंतर हरिनाम संकीर्तनाने या सत्राची सांगता झाली. आणि त्यानंतर प्रश्न- उत्तरांना सुरुवात झाली.

-: प्रश्नोत्तरे :-
१- मिश्राजी - भगवद्गीता श्रीकृष्ण अर्जुन यांच्यामधील संवाद आहे. तो युद्धभूमीवर सांगितला गेला  तर आपल्यापर्यंत तो कसा पोहोचला?
उत्तर- वेदव्यासांनी जेव्हा महाभारत लिहिले तेव्हाच संजयला दिव्यदृष्टी दिली. महाभारतात एक लाख श्लोक आहेत. त्यामध्ये श्रीकृष्ण उवाच वासुदेव उवाच  संजय उवाच  असे म्हटले आहे. भगवद्गीतेत मात्र भगवानुवाच असेच म्हटले आहे. कारण भगवान म्हणजे एकमेव परमात्मतत्त्व  या ठिकाणी आहे. व्यासांनी आधीच संवाद लिहिलेला होता. त्यामुळे तो आपल्यापर्यंत सहज पोहोचू शकला.

२- पटेल दीदी - घरात कोणाचा जन्म झाल्यावर पितृपंधरवाड्यात आपण जे श्राद्ध करतो ते करू शकत नाही, असे का? तसेच आपण या दिवसात मंदिरातही का जात नाही?
उत्तर- जन्म झाल्यावर आपल्याला सोयर असल्याने या गोष्टी करता येत नाही. मंदिरातही जाता येत नाही .

३- साधनाजी- भगवद्गीता तुम्ही शिकवता आहात. तसेच आता रामायण हे का सुरू करत नाही?
उत्तर- गीतेनंतर रामायण सुरू करण्यासाठी थोडा वेळ लागेल. आम्ही नक्की तसा प्रयत्न करू.

४- कल्पनाजी - आम्ही तुमचे विवेचन ऐकतो. पण नेमका कोणता श्लोक चालू आहे हे आम्हाला समजत नाही. तुम्ही विवेचनात तसे सांगत जा.
उत्तर- गीता वाचण्याचा सराव केल्यावर तुम्हाला हे नक्की समजेल. सुरुवातीला कोणत्या श्लोक चालू आहे हे आम्ही सांगत असतो आणि म्हणत असतो.

५- मनीषा जी - तुम्ही म्हणता की लहानपणाचे आपले शरीर बदलते पण आत्मा मात्र तोच असतो. शरीराबरोबरच लहानपणचा साधा भोळा आपला स्वभावही बदलत असतो. मोठे झाल्यावर आपण भोळे राहत नाही असे का?
उत्तर - स्वभाव आणि आपल्या शरीरात सूक्ष्म रूपाने बदल घडत असतो. तो आपल्या लक्षातही येत नाही.
कर्म पूजा आपण निष्काम भावनेने कशी करू शकतो?
उत्तर - ज्याप्रमाणे बँकेतील कॅशियर ला जास्त रकमेच्या ठेवी आल्या तरी जास्त आनंद होत नाही किंवा ठेवी आल्या नाही तरी दुःख होत नाही त्याप्रमाणेच आसक्ती आपण सोडली तर सुखदुःख न होता कर्म पूजा, निष्काम भावनेने होईल.

६- रामकुमार जी - मन इंद्रियांना कसे ग्रहण करते?
उत्तर- आपण डोळ्यांनी एखादी गोष्ट बघतो. आपले मन जर दुसरीकडे असेल तर ती गोष्ट बघितल्यावरही आपल्याला सांगता येत नाही. हीच गोष्ट संगीत ऐकत असताना जर लक्ष नसेल तर विचारल्यावर काय ऐकले याचे उत्तर आपण देऊ शकत नाही. याचाच अर्थ मन इंद्रियांचे रसग्रहण करते.

प्रश्नोत्तरानंतर प्रार्थना होऊन विवेचनाची सांगता झाली.



ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां(य्ँ) योगशास्त्रे
श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरुषोत्तमयोगो नाम पञ्चदशोऽध्याय:॥