विवेचन सारांश
चार वर्णांची स्वभाव वैशिष्ट्ये, गुण व कर्मे आणि परमसिद्धी प्राप्तीसाठी करावयाची कर्मे व लागणारे गुण

ID: 3903
Marathi - मराठी
शनिवार, 28 ऑक्टोबर 2023
अध्याय 18: मोक्षसन्यासयोग
5/6 (श्लोक 40-53)
विवेचक: गीता विशारद डॉ. श्री संजय मालपाणी जी


पारंपारिक पद्धतीने सुमधुर प्रार्थनेसह दीपप्रज्वलन करून विवेचन सत्राची सुरुवात झाली.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः।
गुरु: साक्षात्परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥

गुरुवंदना करून विवेचनास प्रारंभ झाला. मागील विवेचन सत्रात सात्त्विक, राजसिक आणि तामसिक या तीन प्रकारच्या सुखांच्या व्याख्या आपण पाहिल्या. 
आता यापुढील श्लोक पाहूया.

18.40

न तदस्ति पृथिव्यां(म्) वा, दिवि देवेषु वा पुनः।
सत्त्वं(म्) प्रकृतिजैर्मुक्तं(म्), यदेभिः(स्) स्यात्त्रिभिर्गुणै:॥18.40॥

पृथ्वीवर, आकाशात किंवा देवांत तसेच यांच्याशिवाय इतरत्र कोठेही असा कोणताच प्राणी किंवा पदार्थ नाही की जो प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या या तीन गुणांनी रहित असेल.

प्रकृती ही सत्त्व, रज आणि तम या तीन गुणांनी व्याप्त आहे त्यामुळे पृथ्वीवरील प्रत्येक जीवही या तीन गुणांनी युक्त आहे. 
पुढील श्लोकात भगवंत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या चार वर्णांचे गुण आणि त्यांची विहित कर्तव्ये सांगत आहेत. ती जाणण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे हे चारही वर्ण जन्मानुसार न ठरता गुण आणि कर्म याप्रमाणे त्याकाळी ठरत होते आणि हे भगवंतांनी भगवद्गीतेत अनेकदा निक्षून सांगितले आहे. आपल्या मातापित्यांचे, पूर्वजांचे अनेक गुण आपल्यामध्ये अनुवंशिकतेने, गुणसूत्रांमुळे येत असतात. त्यामुळे मुलांमध्ये आई-वडिलांची प्रवृत्ती बऱ्याच वेळा पहावयास मिळते. त्यामुळे माणसामधले गुण आणि वृत्ती हे जन्मानुसार तसेच कर्मानुसार (या जन्मातील तसेच पूर्वजन्मातील) ठरतात. त्याप्रमाणे आपला वर्ण ठरतो. अर्थात हा वर्ण बदलला जाऊ शकतो. उदाहरणार्थ विश्वामित्र हे राजर्षी होते. परंतु वारंवार अत्यंत कठोर तपश्चर्या करून ते ब्रह्मर्षि झाले. 

18.41

ब्राह्मणक्षत्रियविशां(म्), शूद्राणां(ञ्) च परन्तप।
कर्माणि प्रविभक्तानि, स्वभावप्रभवैर्गुणैः॥18.41॥

हे परंतपा! ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांची कर्मे स्वभावतः उत्पन्न झालेल्या गुणांमुळे निरनिराळी केली गेली आहेत.

येथे भगवंत स्वभाव हा शब्द वापरत आहेत. 'स्वभाव' या शब्दाचा अर्थ आपली सहज प्रवृत्ती. मनुष्याच्या सहज प्रवृत्तीवरून त्याचा वर्ण आणि त्यावरून त्याचे गुण आणि कर्म ठरतात.
पुढील श्लोकात भगवंत सर्व वर्णांची स्वभाववैशिष्ट्ये, गुण आणि कर्म सांगत आहेत.

18.42

शमो दमस्तपः(श्) शौचं(ङ्), क्षान्तिरार्जवमेव च।
ज्ञानंविज्ञानमास्तिक्यं(म्), ब्रह्मकर्म स्वभावजम्॥18.42॥

अंत:करणाचा निग्रह, इंद्रियांवर ताबा ठेवणे, धर्मासाठी कष्ट सहन करणे, अंतर्बाह्य शुद्ध राहणे, दुसऱ्यांच्या अपराधांना क्षमा करणे, मन, इंद्रिये व शरीर सरळ राखणे, वेद, शास्त्र, ईश्वर व परलोक इत्यादींवर विश्वास ठेवणे, वेद-शास्त्रांचे अध्ययन अध्यापन करणे आणि परमात्मतत्त्वाचा अनुभव घेणे ही सर्वच्या सर्व ब्राह्मणाची स्वाभाविक कर्मे आहेत.

येथे ब्राह्मणांचे अनेक गुण वर्णन केले आहेत. हे सर्व गुण कर्मानुसार जी व्यक्ती ब्राह्मण असते त्यांच्यासाठी लागू आहे. 

18.43

शौर्यं(न्) तेजो धृतिर्दाक्ष्यं(म्), युद्धे चाप्यपलायनम्।
दानमीश्वरभावश्च, क्षात्रं(ङ्) कर्म स्वभावजम्॥18.43॥

शौर्य, तेज, धैर्य, चातुर्य, युद्धातून पलायन न करणे, दान देणे आणि स्वामिभाव' ही सर्वच्या सर्वच क्षत्रियाची स्वाभाविक कर्मे आहेत.

या श्लोकात भगवंत क्षत्रियांच्या गुण आणि कर्मांबद्दल बोलत आहेत. 
अप्रत्यक्षपणे भगवंत अर्जुनाला त्याच्या क्षत्रिय गुणांची आणि कर्मांची आठवण करून देत आहेत कारण पहिल्या अध्यायात अर्जुनाच्याही मनात युद्धापासून दूर पलायन करण्याची इच्छा उत्पन्न झाली होती.
न काङ्क्षे विजयं कृष्ण न च राज्यं सु खानि च।
किं नो राज्येन गोविन्द किं भोगैर्जीवितेन वा।।१.३२।।
 हे कृष्णा! मला तर विजयाची इच्छा नाही, राज्याची नाही की सुखाचीही नाही. हे गोविंदा! आम्हाला असे राज्य काय करायचे? अशा भोगांनी आणि जगण्याने तरी काय लाभ होणार आहे?
असे अर्जुन त्यावेळी म्हणत होता. परंतु भगवंतांनी त्याला पलायनापासून परावृत्त केले. गीता आपल्याला पलायनवाद शिकवत नाही. 'भागो नही, जागो!' असा संदेश भगवद्गीता देते. अर्जुन क्षत्रिय आहे. त्यामुळे युद्ध करण्यातच त्याचे 'श्रेयस' कसे आहे हे भगवंत त्याला सांगतात.
ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि।।२.३८।।
युद्ध करण्यात काहीही पाप नाही हे भगवंत अर्जुनाला सांगतात.
परंतु अर्जुनाच्या ऐवजी एखादा ब्राह्मण भगवंतांच्या पुढे त्यावेळी उभा असता तर कदाचित भगवंतांनी त्याला युद्ध करू नकोस असा उपदेश केला असता. त्याला त्यांनी अहिंसेचा उपदेश केला असता. तो तुझा मूळ स्वभाव नाही असे त्याला सांगितले असते. जन्माने ब्राह्मण असूनही युद्धासाठी उभे असलेले ब्राह्मण महाभारत युद्धाच्या वेळी होते. त्यामुळेच येथे वर्णांचे गुण आणि कर्म याबद्दल भगवंत जे मार्गदर्शन करत आहेत ते जन्मानुसार नव्हे, तर कर्मानुसार असलेल्या व्यवस्थेचे आहे.

18.44

कृषिगौरक्ष्यवाणिज्यं(म्), वैश्यकर्म स्वभावजम्।
परिचर्यात्मकं(ङ्) कर्म, शूद्रस्यापि स्वभावजम्॥18.44॥

शेती, गोपालन आणि क्रयविक्रयरूप सत्य व्यवहार ही वैश्याची स्वाभाविक कर्मे होत. तसेच सर्व वर्णांची सेवा करणे हे शूद्राचेही स्वाभाविक कर्म आहे.

या श्लोकात भगवंत वैश्य आणि शूद्र यांची स्वाभाविक कर्मे सांगत आहेत. शुश्रुषा करणे (परिचर्या) हे शूद्रांचे स्वाभाविक कर्म आहे. परिचर्या या शब्दावरूनच स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 'नर्स' या इंग्रजी शब्दाला परिचारिका असा मराठी प्रतिशब्द दिला. सेवाभावी भाव ज्या व्यक्ती मधे असतो त्याला आपण शूद्र असे म्हणू शकतो. शूद्र हा कुठलाही अपमानास्पद शब्द नाही. गुणकर्म विभाजनाप्रमाणेच आपण आजही कामांचे विभाजन करीत असतो. उदाहरणार्थ अनेक आस्थापनांमध्ये प्रथम श्रेणीपासून चतुर्थ श्रेणीपर्यंत कर्मचारी व्यवस्था असते. या सर्वांची कामे ठरलेली असतात. चतुर्थ श्रेणी कर्मचारी प्रथम श्रेणी अधिकाऱ्याची कामे करू शकत नाही. प्रत्येकाचे अधिकार आणि कर्मे वेगवेगळी आहेत. त्याचप्रमाणे वर्णांमधील ही अशा प्रकारची रचना केली गेली आहे. ज्याप्रमाणे सीमेवरील सैनिक कार्यालयीन कामकाज सांभाळू शकत नाही, त्याचप्रमाणे कार्यालयीन कामकाज करणारी व्यक्ती- अगदी ती संरक्षण खात्यातील असली तरीही-सीमेवर जाऊन देशाचे रक्षण करण्यासाठी शस्त्र हातात घेऊ शकत नाही. 
अतिशय सुस्पष्ट अशा कर्मांच्या विभागणीचे भगवंतांनी येथे विवेचन केले आहे. 
चुकीच्या पद्धतीने कर्माची विभागणी केल्याचे परिणाम आपल्या समाजात अनेक वेळा बघावयास मिळतात. उदाहरणार्थ, एखाद्या राजनेत्याच्या मुलाची इच्छा किंवा त्याचे गुण राजनेता बनण्यास उपयुक्त नसले, योग्य नसले, तरीही त्याला जबरदस्तीने नेता बनवले जाते. राजनेतेपण त्याच्यावर लादले जाते. 
घरातही मुलाची इच्छा नसेल किंवा आवड नसेल तरीही त्याच्यावर आई-वडील आपल्याला अपूर्ण इच्छेप्रमाणे अथवा आवडीप्रमाणे शिक्षण घेण्याची जबरदस्ती करतात. मुलांच्या स्वभावाप्रमाणे त्यांना शिक्षणाची दिशा निवडण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे.
त्यामुळे प्रत्येकाने आपल्या स्वभावानुसार विहित कर्माप्रमाणे आपले क्षेत्र निवडले पाहिजे. 
बऱ्याचदा आई-वडिलांकडून आनुवंशिकतेने मिळालेल्या गुणसूत्रांमुळे मुलांमध्ये लहानपणीच आई-वडिलांच्या क्षेत्राची आवड उत्पन्न होते. घरात आई वडील गायन शिक्षक असतील तर संगीताचे वातावरण घरात असलेला मुलगा लहानपणीचा उत्तम गायक बनतो.

18.45

स्वे स्वे कर्मण्यभिरतः(स्), संसिद्धिं(म्) लभते नरः।
स्वकर्मनिरतः(स्) सिद्धिं(म्), यथा विन्दति तच्छृणु॥18.45॥

आपापल्या स्वाभाविक कर्मांत तत्पर असलेल्या मनुष्यास भगवत्प्राप्तिरूप परम सिद्धीचा लाभ होतो. आपल्या स्वाभाविक कर्मांत रत असलेला मनुष्य ज्या रीतीने कर्म करून परम सिद्धीला प्राप्त होतो, ती रीत तू ऐक.

जी व्यक्ती आपले काम कुशलतेने करते तिला योगी म्हणता येईल. 
''योग: कर्मसु कौशलम्''  असे भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायात म्हटले आहे.
अशी व्यक्ती भगवंतांच्या अगदी निकट पोहोचते. अत्यंत तन्मयतेने आणि कुशलतेने आपले विहित कर्म करताना अशा व्यक्तींची जणू समाधीच लागते. गायकाची गायनात एकतानता होते, नर्तकी आपल्या नर्तनातच इतकी एकाग्र होते की जणू तिची समाधीच लागते.
मीराबाईंची भगवंतांचे गुण गाताना आणि नाचताना अशीच समाधी लागत असे.
ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन
वो तो गली-गली हरि गुन गाने लगी|
अशाप्रकारे आपली स्वाभाविक कर्मे करून मनुष्य परमसिद्धी प्राप्त करू शकतो.

18.46

यतः(फ्) प्रवृत्तिर्भूतानां(म्), येन सर्वमिदं(न्) ततम्।
स्वकर्मणा तमभ्यर्च्य, सिद्धिं(म्) विन्दति मानवः॥18.46॥

ज्या परमेश्वरापासून सर्व प्राण्यांची उत्पत्ती झाली आहे आणि ज्याने हे सर्व जग व्यापले  आहे, त्या परमेश्वराची आपल्या स्वाभाविक कर्मांनी पूजा करून मनुष्य परम सिद्धी मिळवितो.

आपापल्या कर्माने आपण परमेश्वराची पूजा करू शकतो उदाहरणार्थ एखादा गायक पैशासाठी गायन न करता परमेश्वर प्राप्तीसाठी गायन करून परम सिद्धी प्राप्त करू शकतो. ज्या क्षणी असे गायन करण्यास तो सुरुवात करेल त्या क्षणी त्या गायकाची मीराबाई बनण्यास वेळ लागणार नाही. तसेच जेव्हा एखादा साहित्यिक आपली साहित्यरचना भगवंतांसाठी करू लागेल तेव्हा तो संत तुलसीदासांप्रमाणे परमसिद्धी प्राप्त करू शकेल.  तुलसीदासांनी आपली काव्यरचना भगवत्प्राप्तीसाठी केली. तुलसीदासांनी दोहे गात गात येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तीला चंदन लावण्यास सुरुवात केली आणि मनात सतत असा भाव जागृत ठेवला की मी प्रत्यक्ष परमेश्वरालाच गंध लावत आहे, तेव्हा त्यांना स्वाभाविकपणे येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती श्रीरामाचे दर्शन होऊ लागले. 
एखाद्या शिक्षकाच्या मनात ज्यावेळी असा भाव जागृत होईल की माझ्याकडे येणारी छोटी मुले ही  बालकृष्णांची रूपे आहेत आणि मी आपल्या कर्मांनी या बालकृष्णाचे पूजन करत आहे, त्यावेळी त्या शिक्षकांनाही भगवत् प्राप्ती आणि भगवत् दर्शन होऊ शकेल. असे शिक्षक अतिशय आदरणीय बनतात. समाज त्यांच्यापुढे नतमस्तक होतो. 
अशाप्रकारे सत्कर्म करून परमसिद्धी प्राप्त केलेल्या संतांना समाज राजा पेक्षाही उच्च स्थान देतो. त्यांना 'महाराज' असे म्हणून समाज गौरवतो. भूमीवर राज्य करणाऱ्या राजा म्हणतात लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्याला महाराज म्हणतात. म्हणूनच आपण शिवरायांना शिवाजी 'महाराज' म्हणतो.
समर्थ रामदास स्वामींनी शिवरायांचे वर्णन करताना असे म्हटले,
नरपती हयपती गजपती | गडपती भूपती जळपती |
पुरंदाराणी शक्ति | पृष्ठाभागी ||
यशवंत किर्तिवंत | सामर्थ्यावंत वरदवंत | 
पुण्यवंत नितीवंत | जाणता राजा ||
जेव्हा स्वाभाविक कर्मे हीच पूजा बनतात त्यावेळी ती श्रेष्ठतम पूजा ठरते.
म्हणूनच आदि शंकराचार्य श्री शंकरांची पूजा आणि मानस पूजा करून झाल्यावर म्हणत, "हे परमेश्वरा! आता तुझ्या पूजेचे माझे कार्य समाप्त झाले आहे. आता मी माझ्या नित्यकर्मांकडे वळतो. परंतु ती कर्मे करत असताना सुद्धा तुझे पूजन सतत होत राहू दे. माझे चालणे ही सुद्धा तुझी प्रदक्षिणा होऊ दे."
पूजा ते विषयोपभोगरचना निद्रा समाधिस्थितिः॥
संचारः पदयोः प्रदक्षिणविधिः स्तोत्राणि सर्वा गिरो।
यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं शम्भो तवाराधनम्‌॥
संपूर्ण विषयभोगाचीच रचना आपली पूजाच आहे. मी जेव्हा झोपतो, तेव्हा ती आपली ध्यान समाधी आहे, माझे चालणे-फिरणे ही आपली प्रदक्षिणा आहे. माझ्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द आपले स्तोत्र आणि मंत्र आहे. अशाप्रकारे मी, आपला भक्त, जी जी कर्मे करतो ती आपली आराधनाच आहे. 
एखादा वैश्य वर्णाचा व्यक्ती असेल तर तो कदाचित शिकवण्याचे काम चांगल्या पद्धतीने करू शकणार नाही. सैनिकांप्रमाणे सीमेवर जाऊन लढण्याचे कामही त्याला जमणार नाही. पण उत्तम व्यापार करणे, ग्राहकांची सेवा करणे हीच त्याची साधना, आराधना बनली पाहिजे. यातून जो कर तो भरेल, त्या करातून रस्ते, महामार्ग बनतील, सैन्यासाठी आवश्यक सोयी, सुविधा पुरविता येतील. आपल्या विहित कर्माद्वारे तो एक प्रकारे देशसेवाच करेल. त्यासाठी त्याला हातात शस्त्र घेण्याची गरज नाही.

18.47

श्रेयान्स्वधर्मो विगुणः(फ्), परधर्मात्स्वनुष्ठितात्।
स्वभावनियतं(ङ्) कर्म, कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्॥18.47॥

उत्तम प्रकारे आचरिलेल्या दुसऱ्याच्या धर्मापेक्षा वैगुण्य असलेलाही आपला धर्म श्रेष्ठ आहे. कारण स्वभावाने नेमून दिलेले स्वधर्मरूप कर्म करणाऱ्या माणसाला पाप लागत नाही.

इस्लाम १४०० वर्षांपूर्वी उदयास आला. ख्रिस्ती आणि यहुदी धर्म साधारणपणे २१०० आणि २३०० वर्षे जुने आहेत. भगवद्गीता ५००० वर्षांपूर्वी सांगितली गेली. आपल्याला माहित असलेले धर्म हे मुख्यतः संप्रदाय आहेत. हे संप्रदाय भगवद्गीता सांगितली त्यावेळी अस्तित्वात नव्हते. भगवद्गीतेमध्ये धर्म या शब्दाचा एकमेव अर्थ आहे तो म्हणजे 'कर्तव्य'! कर्तव्याचे निष्ठेने पालन करणे म्हणजेच धर्मपालन करणे होय. भगवंत येथे अर्जुनाला कर्तव्य भावनेने युद्ध करावयास सांगतात. असे केल्याने तुला पाप लागणार नाही असे ते म्हणतात. 
याच श्लोकाची पहिली ओळ जशीच्या तशी तिसऱ्या अध्यायातही आली आहे. 
श्रेयान्स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्ठितात्।
स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः।।३.३५।।
चांगल्या प्रकारे आचरणात आणलेल्या दुसऱ्याच्या धर्माहून गुणरहित असला तरी आपला धर्म अतिशय उत्तम आहे आपल्या धर्मात मरणेही कल्याणकारक आहे पण दुसऱ्याचा धर्म भय देणारा आहे.
मानव जन्माची यथार्थता आणि यशस्विता ही स्वभावजन्य कर्म करण्यातच आहे. स्वभाव या शब्दाचे दोन अर्थ होतात एक स्वभाव म्हणजे आपल्या आत मध्ये असलेला भाव आणि स्वभाव याचा दुसरा अर्थ होतो  सहज भाव.  सहज या शब्दाचा अर्थ होतो 'सहजन्मना प्राप्त्यर्थम् इति|'  जे जन्मापासून प्राप्त आहे ते. आनुवंशिकतेमुळे, गुणसूत्रांमुळे जे गुण प्राप्त झालेले असतात त्याप्रमाणे आपला स्वभाव बनण्याची शक्यता असते.
आपली आई कशीही असली तरी बालक आपल्या आईकडेच धाव घेते. त्याचप्रमाणे परधर्म कितीही चांगला वाटला तरी आपल्या धर्माचे आचरण करणेच श्रेयस्कर असते. मासा पाण्यात राहतो. तूप पाण्यापेक्षा कितीही चांगले असले तरी तो तुपात राहू शकत नाही. 

18.48

सहजं(ङ्) कर्म कौन्तेय, सदोषमपि न त्यजेत्।
सर्वारम्भा हि दोषेण, धूमेनाग्निरिवावृताः॥18.48॥

म्हणूनच हे कुंतीपुत्रा! सदोष असले तरीही स्वाभाविक कर्म सोडून देऊ नये. कारण धुराने जसा अग्नी, तशी सर्व कामे कोणत्या ना कोणत्या दोषाने युक्त असतात.

आपल्या सहज कर्माचा आपण कधीही त्याग करू नये कारण प्रत्येक कर्मात काही ना काही दोष असतोच. आपण अग्नीला पवित्र मानतो. सर्व कार्यांचा आरंभ अग्निपूजनाने होतो. परंतु त्या अग्नीला सुद्धा धुराचा दोष असतोच. स्वयंपाक करताना आपण अग्नी प्रज्वलित करतो त्याच्या उष्णतेने कितीतरी जिवाणू नष्ट होतात. पाणी उकळतानाही त्यातील जिवाणूंचा नाश होतो. अगदी यज्ञयाग करतानाही प्रज्वलित झालेल्या  अग्नीमुळे कित्येक जिवाणू नष्ट होतात. शेती करताना, जमीन नांगरताना कित्येक प्राणी नाश पावतात. पूर्वीच्या काळी दूध आणि ज्ञान या दोन गोष्टी विकणे पाप मानले जात होते. महाभारत काळात सर्व आचार्य निरपेक्षपणे विद्यादान करीत असत. विद्यार्जन पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी आपल्या ऐपतीप्रमाणे गुरुजींना गुरुदक्षिणा देत असत. परंतु द्रोणाचार्यांची परिस्थिती  फार गरीबीची होती. त्यांचा मुलगा अश्वत्थामा याला दूधही मिळत नसे. याची आई त्याला पाण्यात पीठ कालवून ते दूध म्हणून देत असे. त्यामुळे भीष्माचार्यांनी विचारल्यावर द्रोणाचार्यांनी कौरव पांडवांना वेतन घेऊन  शिकवण्याची तयारी दाखवली. त्याच क्षणापासून त्यांचे पतन सुरू झाले. अर्जुनाच्या  मनात युद्धाबद्दल भीती नव्हती तर आप्तस्वकीयांना मी कसे मारू? हा प्रश्न त्याच्या मनात होता. हे सुद्धा पापाचरण आहे असे त्याचे मत होते. दुसऱ्या अध्यायात तो भगवंतांना प्रश्न विचारतो,
गुरूनहत्वा हि महानुभावान्
श्रेयो भोक्तुं भैक्ष्यमपीह लोके।
हत्वार्थकामांस्तु गुरूनिहैव
भुञ्जीय भोगान् रुधिरप्रदिग्धान्।।२.५।।
या महानुभाव गुरुजनांना न मारता मी या जगात भिक्षा मागून खाणे ही कल्याणकारक समजतो कारण गुरुजनांना मारून या लोकात रक्ताने माखलेले अर्थ व कामरूप भोगच ना भोगावयाचे!
अर्जुन घाबरट नव्हता. परंतु आप्तस्वकीयांचा मोह त्याच्या मनात उत्पन्न झाला होता. यापूर्वीही त्याने अनेकदा कौरवांचा पराभव केला होता. अज्ञातवासात पांडव विराट नगरीत राहत असताना त्याचे कौरवांशी युद्ध झाले होते आणि त्यावेळी त्याने मोहिनी अस्त्राचा वापर करून सर्व कौरवांना मूर्च्छित केले होते. अर्जुनाच्या सांगण्यावरून विराट राजाचा पुत्र उत्तर याने भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य सोडून उर्वरित सर्व कौरवांची उत्तरीये काढून घेतली होती. अशाप्रकारे एकटा अर्जुन सर्व कौरवांचा नि:पात करू शकत होता. 
म्हणून भगवंत येथे अर्जुनाला सांगतात की  आपली सहज कर्मे कितीही दोषयुक्त असली तरी त्यांचा आपण त्याग करू नये. डॉक्टर लहान मुलांना जेव्हा इंजेक्शन देतात तेव्हा तो मुलगा खूप रडतो परंतु असे असले तरीही त्या बालकाला रोगमुक्त करण्यासाठी इंजेक्शन देणे आवश्यक असते. त्यासाठी त्या बालकाला  रडविण्याचा दोष डॉक्टरांना घ्यावा लागतो.

18.49

असक्तबुद्धिः(स्) सर्वत्र, जितात्मा विगतस्पृहः।
नैष्कर्म्यसिद्धिं(म्) परमां(म्), सन्न्यासेनाधिगच्छति॥18.49॥

सर्वत्र आसक्तिरहित बुद्धी असलेला, निःस्पृह आणि अंतःकरण जिंकलेला मनुष्य सांख्ययोगाने त्या श्रेष्ठ 'नैष्कर्म्यसिद्धीला' प्राप्त होतो.

आसक्तीरहित म्हणजे लोभ, मोह इत्यादींपासून मुक्त असणारी बुद्धी असलेला आणि स्पृहारहित म्हणजे आकांक्षांपासून मुक्त असलेला व जिंकलेल्या अंतःकरणाचा म्हणजे मन आणि पाच इंद्रिये यांचा ताबा मिळवलेला मनुष्य ज्ञानयोगाने त्या श्रेष्ठ 'नैष्कर्म्यसिद्धीला' प्राप्त होतो.
येथे 'नैष्कर्म्य' याचा अर्थ काम न करणे असा नाही. कर्माला अकर्म बनवणे याचा अर्थ नैष्कर्म्य असा होतो. काम करताना त्याला योग बनवणे, त्याचे कर्मयोगात रूपांतर करणे, याचा अर्थ नैष्कर्म्य!  आपल्याला एखादे अतिशय वाईट स्वप्न पडते आणि आपण घाबरून जागे होतो. जागे झाल्यावर आपला विवेक जागृत होतो आणि आपल्याला पडत असलेले स्वप्न हे खरे नाही याची जाणीव होते. अशाप्रकारे ज्ञान प्राप्त झाले की अज्ञान नाहीसे होते.  असे ज्ञान गौतम बुद्ध ,भगवान महावीर, मीराबाई , कबीर यांना प्राप्त झाले होते. 
न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते।
तत्स्वयं योगसंसिद्धः कालेनात्मनि विन्दति॥४.३८॥
या जगात ज्ञानासारखे पवित्र करणारे खात्रीने दुसरे काहीही नाही. ते ज्ञान कितीतरी काळाने कर्मयोगाने अंतःकरण शुद्ध झालेला माणूस आपोआपच आपल्या आत्म्यात प्राप्त करून घेतो.
आपले नैष्कर्म्य म्हणजे काय हे समजण्याचे ज्ञान प्राप्त करून घेतले पाहिजे. 
आपले स्वभावजन्य, सहज कर्म करत असताना 'मी हे भगवंताचे काम करत आहे' असा भाव मनात जागृत ठेवून ते काम केले पाहिजे. मग ते दोषयुक्त असले तरीही ते निष्ठेने केले तर सिद्धी प्राप्त होऊ शकते.

18.50

सिद्धिं(म्) प्राप्तो यथा ब्रह्म, तथाप्नोति निबोध मे।
समासेनैव कौन्तेय, निष्ठा ज्ञानस्य या परा॥18.50॥

हे कुंतीपुत्रा ! जी ज्ञानयोगाची अंतिम स्थिती आहे, त्या नैष्कर्म्यसिद्धीला ज्या रीतीने प्राप्त होऊन मनुष्य ब्रह्माला प्राप्त होतो, ती रीत थोडक्यात तू माझ्याकडून समजून घे.

18.50 writeup

18.51

बुद्ध्या विशुद्धया युक्तो, धृत्यात्मानं(न्) नियम्य च।
शब्दादीन्विषयांस्त्यक्त्वा, रागद्वेषौ व्युदस्य च॥18.51॥

विशुद्ध बुद्धीने युक्त; हलके, सात्त्विक आणि नियमित भोजन घेणारा; शब्दादी विषयांचा त्याग करून एकान्तात शुद्ध ठिकाणी राहणारा; सात्त्विक धारणाशक्तीने अंत:करण व इंद्रियांवर संयम ठेवून मन, वाणी आणि शरीर ताब्यात ठेवणारा; राग-द्वेष पूर्णपणे नाहीसे करून चांगल्या प्रकारे दृढ वैराग्याचा आश्रय घेणारा; अहंकार, बळ, घमेंड, कामना, राग, संग्रहवृत्ती यांचा त्याग करून नेहमी ध्यानयोगात तत्पर असणारा; ममतारहित व शान्तियुक्त असा पुरुष सच्चिदानन्दघन ब्रह्मामध्ये एकरूप होऊन राहण्यास पात्र होतो.

18.51 writeup

18.52

विविक्तसेवी लघ्वाशी, यतवाक्कायमानसः।
ध्यानयोगपरो नित्यं(म्), वैराग्यं(म्) समुपाश्रितः॥18.52॥

18.52 writeup

18.53

अहङ्कारं(म्) बलं(न्) दर्पं(ङ्), कामं(ङ्) क्रोधं(म्) परिग्रहम्।
विमुच्य निर्ममः(श्) शान्तो, ब्रह्मभूयाय कल्पते॥18.53॥

हे तीन श्लोक भगवद्गीतेतील अत्यंत महत्त्वाचे श्लोक आहेत. 
सच्चिदानंद ब्रह्मामध्ये एकरूप होऊन राहण्याची पात्रता भगवंत येथे वर्णन करत आहेत. 
शब्द हे वाणीचा विषय आहे. आपल्या शरीरातून बाहेर टाकली जाणाऱ्या सर्व गोष्टी दुर्गंधीयुक्त आहेत. परंतु एकच गोष्ट आपण मनात आणले तर सुगंधित करून बाहेर टाकू शकतो आणि ती म्हणजे शब्द! आपण मधुर भाषी, मधुर वचनी बनले पाहिजे. सतराव्या अध्यायात आपण कसे बोलले पाहिजे हे भगवंत सांगतात,
अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत्।
स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते।।17.15।।
जे दुसऱ्याला न बोचणारे, प्रिय, हितकारक आणि यथार्थ भाषण असते ते, तसेच वेदशास्त्रांचे पठण आणि परमेश्वराच्या नामजपचा अभ्यास हेच वाणीचे तप म्हटले जाते.
म्हणून पाचही इंद्रियांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
आपल्याला चुकीच्या मार्गावर घेऊन जाणाऱ्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक गोष्टींपासून आपण दूर राहिले पाहिजे. 
योगमार्गाच्या सर्व शत्रूंपासून आपण दूर राहिले पाहिजे.
या तीन श्लोकांतला प्रत्येक शब्द म्हणजे जणू एक एक अध्याय आहे. अतिशय महत्त्वाचे हे शब्द आहेत.

प्रश्न उत्तर
शशी दीदी - या अध्यायातील ४३ व्या श्लोकात क्षत्रियाची कर्मे वर्णन करताना निडरता हे महत्त्वाचे कर्म सांगितले आहे. परंतु आपण आपल्या मुलांना मात्र सतत 'हे करू नको', 'ते करू नको' असे सांगून घाबरट बनवतो. त्याचवेळी समाजातील काही लोक त्यांच्या मुलांना 'कोणालाही आणि कशालाही घाबरू नकोस' असे शिकवत असतात आणि ते आसुरी संपत्ती ने युक्त होतात. अशावेळी क्षात्रतेज जागवण्याची आवश्यकता आहे का?
उत्तर - 'अभय' ही सोळाव्या अध्याय सांगितलेली सर्वात पहिली दैवी गुणसंपदा आहे. त्यामुळे ती मुलांना शिकवलीच पाहिजे. परंतु आसुरी निडरता अंगी बाणवली तर भगवत् प्राप्ती होत नाही हेही निश्चित. कुठल्याही धर्माच्या धर्मग्रंथात असे सांगितले नाही.

हनुमान प्रसाद भैय्या- नैष्कर्म्य म्हणजे काय?
उत्तर -फळाची अपेक्षा सोडून कर्म केल्याने जी सिद्धी प्राप्त होते ती नैष्कर्म्य सिद्धी होय. गृहस्थाश्रमात राहताना कदाचित सर्व कर्मे  अशा पद्धतीने करणे शक्य होणार नाही. परंतु निदान काही कर्मे तरी 'सर्वभूतहितेरतः' अशा पद्धतीने केली पाहिजे आणि नंतर वानप्रस्थाश्रमात गेल्यावर सर्व कर्मे फलाकांक्षा सोडून केली पाहिजे. अशी कर्मे केल्याने आपल्याला आनंद प्राप्त होतो.
राजिबा भैय्या- अठराव्या अध्यायातील दुसरा श्लोक
श्रीभगवानुवाच
काम्यानां(ङ्) कर्मणां(न्) न्यासं(म्), सन्न्यासं(ङ्) कवयो विदुः।
सर्वकर्मफलत्यागं(म्), प्राहुस्त्यागं(म्) विचक्षणाः॥१८.२॥
याचा अर्थ परत एकदा विशद  करू शकाल का?
उत्तर- येथे भगवंत विद्वान लोकांची मते अर्जुनाला सांगत आहेत.
श्रीभगवान म्हणाले, कित्येक पंडित काम्य कर्मांच्या त्यागाला 'संन्यास' मानतात; तर दुसरे काही विचारकुशल लोक सर्व कर्मांच्या फळाच्या त्यागाला 'त्याग' म्हणतात.
पुढे तिसऱ्या श्लोकातही त्यांनी तेच सांगितले आहे. परंतु चौथ्या श्लोकानंतर भगवंत अर्जुनाला स्वतःचे मत सांगत आहेत.

मंजू दीदी -आपण विवेचनात मधुर भाषणाचे महत्त्व सांगितले परंतु प्रत्यक्षात जीवनात आपल्या भोवतालची माणसे कडवट बोलत असतात, त्याला काय उपाय आहे?
उत्तर- मधुर भाषण बोलण्यासाठी आपल्याला निसर्गरम्य वातावरणात जाऊन राहण्याची आवश्यकता नसते. आपण जिथे राहतो ते स्थान आपण आपल्या मधुर वाणीने वृंदावनाप्रमाणे रम्य करू शकतो. कारण त्यासाठी बाह्य वातावरणापेक्षाही अंतरंगात बदल घडून येणे गरजेचे आहे. ती मनाचा निग्रह आवश्यक आहे. एकदा एक व्यक्ती रामकृष्ण परमहंसांकडे गेली आणि त्याने त्यांना आपल्याला लागलेले दारूचे वाईट व्यसन सोडवण्याची विनंती केली. ते ऐकताच रामकृष्ण परमहंस उठले आणि बाजूला असलेल्या एका झाडाला घट्ट धरून बसले आणि त्यांनी त्या व्यक्तीला आपल्याला या झाडापासून सोडविण्यास सांगितले. ती व्यक्ती म्हणाली, "मी आपल्याला कसा सोडवू शकतो? कारण आपणच झाडाला धरून ठेवले आहे. आपण झाडाला सोडले तरच आपली तेथून सुटका होईल. झाडांने आपल्याला पकडलेले नाही." यावर रामकृष्ण परमहंस म्हणाले, "अरे, तुझेही तसेच आहे. तू मद्यपि आहेस, याचे कारण तू त्या सवयीला धरून ठेवले आहेस. ज्या क्षणी तू ती सवय सोडशील त्या क्षणी ती सुटेल."
त्यामुळे आपल्या मध्ये बदल घडवायचा असेल तर तो आपणच घडवला पाहिजे.

नीलम दीदी -आपण मधुर भाषण करावे हे योग्यच आहे. परंतु अनेकदा आपल्याला आपल्या घरातील मोठ्या व्यक्तींनाही काही गोष्टी बोलाव्या लागतात. त्यांनी ऐकले नाही तर कठोर शब्दात सांगाव्या लागतात. याचे नंतर आपल्याला वाईट वाटते. पण त्यावेळी तसे बोलण्याखेरीस काही उपाय नसतो. अशा परिस्थितीत कसे वागावे?
उत्तर - अनेकदा घरातील वृद्ध व्यक्ती वयोमानानुसार हट्टी होतात. डॉक्टरांनी जे करू नये असे सांगितले आहे तेच करण्याचा हट्ट धरून बसतात. अशावेळी आपल्याला कौशल्याने आणि त्यांच्या मनाचा विचार करून मार्ग काढला पाहिजे. चौदाव्या अध्यायात आपण शम आणि दम याबद्दल पाहिले. माणसाच्या विषयवासना कधी कधी पूर्ण भोगल्याशिवाय संपत नाहीत. 
परंतु अशावेळी रात्री आपल्याला 'आपण दिवसातून असे शब्दांचे बाण किती वेळा सोडले?' याचा विचार करून परमेश्वराची प्रार्थना केली पाहिजे आणि रोज तो आकडा कमी कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि वडीलधाऱ्यांची सकाळी आदल्या दिवशीच्या शब्दांबद्दल माफी सुद्धा मागितली पाहिजे. 
मनुज गलती का पुतला है, यह अक्सर हो ही जाती है॥
जो कर ले ठीक गलती को, उसे इन्सान कहते हैं॥
हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे.

संपत भैय्या -मी एका कंपनीत काम करतो माझ्या हाताखाली काही माणसे काम करतात त्यांना शूद्र म्हणता येईल का?
उत्तर- कंपनीत काम करणे हे तुमचे कर्म झाले परंतु परिचर्यात्मक अर्थात सेवावृत्तीने, सेवाभावाने ते काम करीत असाल, तर त्याला शूद्र म्हणतात.

बजरंग भैया -जेव्हा दोन भावांमध्ये वाटणी होते आणि त्यापैकी एक भाऊ जास्त वाटा घेतो त्यावेळी त्यांच्या कार्मिक अकाउंट वर परिणाम होतो का?
उत्तर- निश्चितच परिणाम होतो. याबाबतीत श्रीकृष्णांचा आज आदर्श समोर ठेवला पाहिजे. ते शिष्टाई करण्यासाठी जेव्हा कौरवांकडे गेले, तेव्हा ते म्हणाले,
‘दो न्याय अगर तो आधा दो,
पर, इसमें भी यदि बाधा हो,
तो दे दो केवल पाँच ग्राम,
रक्खो अपनी धरती तमाम।
हम वहीं खुशी से खायेंगे,
परिजन पर असि न उठायेंगे!

दुर्योधन वह भी दे ना सका,
आशीष समाज की ले न सका,
उलटे, हरि को बाँधने चला,
जो था असाध्य, साधने चला।
जब नाश मनुज पर छाता है,
पहले विवेक मर जाता है।
कवी दिनकर जी यांची ही फार सुंदर कविता आहे.

गायत्री दीदी - पूर्वीच्या काळी क्षत्रिय स्त्रिया आपल्या पतीला, पुत्रांना युद्धभूमीवर जातेवेळी मदत करत. त्यांना औक्षण करत. सद्यपरिस्थितीत अशा स्त्रियांचे काय कर्म आहे?
उत्तर- आताही स्त्रियांचे हेच कर्तव्य आहे. युद्धभूमीवर जाणाऱ्या सैनिकांच्या पत्नींना ही सर्व कर्तव्ये करावीच लागतात. त्यांच्या माघारी घर सांभाळणे, मुलांना आई आणि वडील दोघांचेही प्रेम देणे ही कर्मेही त्यांना पार पाडावी लागतात. आता तर स्त्रियाही सैन्यात सामील होऊ लागल्या आहेत.

विवेचन सत्राच्या शेवटी विवेचकांनी  कृष्ण की चेतावनी  ही रामधारी सिंह "दिनकर" यांची एक सुंदर कविता सादर केली.
कृष्ण की चेतावनी 
कवी- रामधारी सिंह "दिनकर"
 
वर्षों तक वन में घूम-घूम,
बाधा-विघ्नों को चूम-चूम,
सह धूप-घाम, पानी-पत्थर,
पांडव आये कुछ और निखर।
सौभाग्य न सब दिन सोता है,
देखें, आगे क्या होता है।

मैत्री की राह बताने को,
सबको सुमार्ग पर लाने को,
दुर्योधन को समझाने को,
भीषण विध्वंस बचाने को,
भगवान् हस्तिनापुर आये,
पांडव का संदेशा लाये।

‘दो न्याय अगर तो आधा दो,
पर, इसमें भी यदि बाधा हो,
तो दे दो केवल पाँच ग्राम,
रक्खो अपनी धरती तमाम।
हम वहीं खुशी से खायेंगे,
परिजन पर असि न उठायेंगे!

दुर्योधन वह भी दे ना सका,
आशीष समाज की ले न सका,
उलटे, हरि को बाँधने चला,
जो था असाध्य, साधने चला।
जब नाश मनुज पर छाता है,
पहले विवेक मर जाता है।

हरि ने भीषण हुंकार किया,
अपना स्वरूप-विस्तार किया,
डगमग-डगमग दिग्गज डोले,
भगवान् कुपित होकर बोले-
‘जंजीर बढ़ा कर साध मुझे,
हाँ, हाँ दुर्योधन! बाँध मुझे।

यह देख, गगन मुझमें लय है,
यह देख, पवन मुझमें लय है,
मुझमें विलीन झंकार सकल,
मुझमें लय है संसार सकल।
अमरत्व फूलता है मुझमें,
संहार झूलता है मुझमें।

‘उदयाचल मेरा दीप्त भाल,
भूमंडल वक्षस्थल विशाल,
भुज परिधि-बन्ध को घेरे हैं,
मैनाक-मेरु पग मेरे हैं।
दिपते जो ग्रह नक्षत्र निकर,
सब हैं मेरे मुख के अन्दर।

‘दृग हों तो दृश्य अकाण्ड देख,
मुझमें सारा ब्रह्माण्ड देख,
चर-अचर जीव, जग, क्षर-अक्षर,
नश्वर मनुष्य सुरजाति अमर।
शत कोटि सूर्य, शत कोटि चन्द्र,
शत कोटि सरित, सर, सिन्धु मन्द्र।

‘शत कोटि विष्णु, ब्रह्मा, महेश,
शत कोटि जिष्णु, जलपति, धनेश,
शत कोटि रुद्र, शत कोटि काल,
शत कोटि दण्डधर लोकपाल।
जञ्जीर बढ़ाकर साध इन्हें,
हाँ-हाँ दुर्योधन! बाँध इन्हें।

‘भूलोक, अतल, पाताल देख,
गत और अनागत काल देख,
यह देख जगत का आदि-सृजन,
यह देख, महाभारत का रण,
मृतकों से पटी हुई भू है,
पहचान, इसमें कहाँ तू है।

‘अम्बर में कुन्तल-जाल देख,
पद के नीचे पाताल देख,
मुट्ठी में तीनों काल देख,
मेरा स्वरूप विकराल देख।
सब जन्म मुझी से पाते हैं,
फिर लौट मुझी में आते हैं।

‘जिह्वा से कढ़ती ज्वाल सघन,
साँसों में पाता जन्म पवन,
पड़ जाती मेरी दृष्टि जिधर,
हँसने लगती है सृष्टि उधर!
मैं जभी मूँदता हूँ लोचन,
छा जाता चारों ओर मरण।

‘बाँधने मुझे तो आया है,
जंजीर बड़ी क्या लाया है?
यदि मुझे बाँधना चाहे मन,
पहले तो बाँध अनन्त गगन।
सूने को साध न सकता है,
वह मुझे बाँध कब सकता है?

‘हित-वचन नहीं तूने माना,
मैत्री का मूल्य न पहचाना,
तो ले, मैं भी अब जाता हूँ,
अन्तिम संकल्प सुनाता हूँ।
याचना नहीं, अब रण होगा,
जीवन-जय या कि मरण होगा।

‘टकरायेंगे नक्षत्र-निकर,
बरसेगी भू पर वह्नि प्रखर,
फण शेषनाग का डोलेगा,
विकराल काल मुँह खोलेगा।
दुर्योधन! रण ऐसा होगा।
फिर कभी नहीं जैसा होगा।

‘भाई पर भाई टूटेंगे,
विष-बाण बूँद-से छूटेंगे,
वायस-श्रृगाल सुख लूटेंगे,
सौभाग्य मनुज के फूटेंगे।
आखिर तू भूशायी होगा,
हिंसा का पर, दायी होगा।’

थी सभा सन्न, सब लोग डरे,
चुप थे या थे बेहोश पड़े।
केवल दो नर ना अघाते थे,
धृतराष्ट्र-विदुर सुख पाते थे।
कर जोड़ खड़े प्रमुदित,
निर्भय, दोनों पुकारते थे ‘जय-जय’!

संजयजींनी म्हटलेल्या रामधारी सिंह 'दिनकर' जींच्या कृष्णकी चेतावनी या कवितेची लिंक 
( https://youtu.be/cngYNxL6sbk?si=ewO9ujcB37Ix7jTa

समापन प्रार्थना आणि हनुमान चालीसा म्हणून विवेचन सत्राची सांगता झाली.