विवेचन सारांश
ज्ञानयोग, भक्ती आणि ध्यानयोगाचे वर्णन

ID: 5361
मराठी
रविवार, 18 ऑगस्ट 2024
अध्याय 5: कर्मसन्यासयोग
2/2 (श्लोक 11-29)
विवेचक: गीता विशारद डॉ आशू गोयल जी


परंपरेनुसार प्रारंभिक प्रार्थना आणि दीप प्रज्वलनाने विवेचनाचा शुभारंभ झाला. गुरुदेवांना वंदन करून  कर्मसंन्यासयोगाचे विवेचन सुरु झाले.
वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् ।
देवकीपरमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् ॥

योगेशं सच्चिदानंदं ,वासुदेवं व्रजप्रियम् ।

धर्म संस्थापकमं वीरं ,कृष्णम् वंदे जगतगुरुम् ॥
गुरुचरणकमलवंदना होऊन कार्यक्रमास सुरुवात झाली.
आपण जीवन सफल करण्यासाठी या जन्मातच नाही तर पुढच्या जन्मातही यशस्वी होण्यासाठी गीतेचे पठण करण्यास आणि ती जीवनात उतरवण्यास अग्रेसर झालो आहोत. आपले या जन्माचे सुकृत, पूर्वजन्मीचे पुण्य, संतमहात्म्म्यांची कृपा या सर्वांमुळे भगवद्गीतेचे सान्निध्य   आपल्याला मिळाले. भगवद्गीतेसमान मनुष्याचे कल्याण करणारा सुगम ग्रंथ इतर कोणताही नाही. शेकडो वर्षांपासून भगवद्गीतेवर टीकाटिप्पणी केली जाते आहे. या सर्व टीका वाचणे, समजून घेणे  हे सर्व अद्भुत आहे. केवळ भारतातच नव्हे तर विदेशातही तत्त्वचिंतक भगवद्गीतेमुळे प्रभावित झाले आहेत.

कर्मयोगाचा हा महत्त्वपूर्ण अध्याय आहे. याचे नाव कर्मसंन्यासयोग  आहे. या अध्यायाच्या आठव्या आणि नवव्या श्लोकात भगवंताने तेरा क्रियांचे वर्णन केले आहे. पाच क्रिया ज्ञानेंद्रियाच्या आणि पाच क्रिया कर्मेंद्रियांच्या आहेत. एक अंत:करण,एक प्राण आणि एक कुर्मप्राणाची अशा या १३ क्रिया आहेत. या तेरा क्रियांमध्ये योगी 'मी' काहीच करत नसून भगवंत हे सर्व करतो या साक्षीभावाने बघतो.     

दहाव्या श्लोकात भगवंत म्हणतात योगी कमलपत्राप्रमाणे असून कशातही लिप्त होत नाही.
ब्रह्मण्याधाय कर्माणि, सङ्गं त्यक्त्वा करोति यः꠰
लिप्यते न स पापेन, पद्मपत्रमिवाम्भसा॥५.१०꠱
योगी संसारात विचरण करतो. सगळ्यांशी व्यवहारही करतो. सगळे आवश्यक कर्तव्यही करतो पण आसक्तीरहित राहून कर्म करत असतो.

5.11

कायेन मनसा बुद्ध्या, केवलैरिन्द्रियैरपि।
योगिनः(ख्) कर्म कुर्वन्ति, सङ्गं(न्) त्यक्त्वात्मशुद्धये॥5.11॥

कमयोगी ममत्वबुद्धी सोडून केवळ इन्द्रिये, मन, बुद्धि आणि शरीर यांच्याद्वारे आसक्ती सोडून अन्त:करणाच्या शुद्धीसाठी कर्म करतात.

हा अतिशय महत्त्वपूर्ण असा श्लोक आहे. आपल्या मनात नेहमी असा प्रश्न येतो पूजा करणे का आवश्यक आहे? आपण मंदिरात का जावे? ध्यान करणे, जप करणे का आवश्यक आहे? तीर्थयात्रा का जरुरी आहे? दानासारखे पुण्यप्रद काम आपण का करावे? यासारखे अनेक प्रश्न आपल्या मनात असतात. आपल्या घरातील परंपरा किंवा कुळधर्मानुसार हे आपण करत असतो. रोज आरती करतो, दिवा लावतो,  जप करतो. पण याचा फायदा काय? ही भावना आपल्या मनात नेहमी येते. नैवेद्य दाखवताना मनात येते की देव हे खातो थोडी तरी आपण ही क्रिया करतो. अर्थात हे सर्व प्रश्न आपल्या अंतर्मनाची शुद्धता नसल्याने निर्माण होतात. आपल्या मनात या सर्व संकल्पना स्पष्ट नाहीत. आपल्याला असे वाटते की हे सगळे केल्याने देव खूश होईल. तो आपल्यावर प्रसन्न होईल. एवढ्या मोठ्या महात्म्याने माझी पूजा केली असे देवाला वाटेल असे आपल्याला वाटते. भगवंताची पूजा केल्याने, आरती ओवाळल्याने तो खुश होतो असे नाही. खरे तर त्याचीच फळे, फुले आणि इतर साहित्य आपण त्याला अर्पण करत असतो. 

एखादा लहान मुलगा त्याच्या वडिलांना वाढदिवसानिमित्त भेट देतो. ही भेट विकत घेण्यासाठी त्याच्या पिगीबँकमधल्या पैशांचा तो वापर करतो किंवा वडिलांकडून शंभर रुपयाची नोट तो मागतो. जेव्हा ही भेट तो वडिलांना देतो तेव्हा वडील ती आनंदाने स्वीकारतात. भेट घेताना त्या भेटीमागील प्रेम आणि मुलाच्या भावना याचाच विचार वडील करतात. त्याचप्रमाणे भगवंत आपला भाव बघत असतात. आपण स्वयंपाक करतो आणि आधी भगवंताला नैवेद्य दाखवतो. नैवेद्य दाखवून लगेच जेवायला सुरुवात करतो. ही सगळी क्रिया यांत्रिकपणे न करता भगवंतासाठी मी करतो आहे ही भावना त्यामध्ये असली तर ती भगवंतापर्यंत पोहोचते. सगळे काही भावात आहे. जप, ध्यान, पूजा, तीर्थयात्रा, गीतापठण यामुळे भगवंताची प्राप्ती आपल्याला होणार नाही. भगवत्प्राप्तीसाठी जरी आपण हे सर्व करत असलो तरी अंतर्यामी शक्तीला जागृत करून जर आपण हे केले तरच ते योग्य असते.

आरशावर धूळ असेल तर आपले प्रतिबिंब दिसत नाही. आरसा पुसल्यावर प्रतिबिंब स्पष्ट दिसते. त्याचप्रमाणे आपल्या अंतःकरणातील मळ नाहीसा झाला आणि ते शुद्ध झाले तरच भगवंतापर्यंत आपण पोहोचू शकतो. अंत:करण शुद्ध नसेल तर या सर्व गोष्टींचा काही उपयोग नाही. रोज पहाटे तीन वाजता उठणे, ध्यान करणे, योग करणे, गीतापारायण ककरणेरते अशा सवयी काही लोकांना असतात. या सवयी चांगल्याच आहेत. रोज केल्याने या अंगवळणी पडतात. परंतु हे सर्व करण्यामागे अंतःकरण शुद्धीचा हेतू नसेल तर त्याचा काही उपयोग होत नाही.

काही लोक रोज तीन, चार तास देवपूजेत व्यतित करतात. असे असून सुद्धा हेच लोक थोड्या फायद्यासाठी पटकन खोटे बोलताना आढळतात. इच्छा, लोभ, वासना यांच्यामध्ये खूप भरलेल्या असतात. वास्तविक पूजा करताना आपल्यातील दुर्गुण कसे कमी होतील असा भाव असायला हवा. पण त्यांच्या वर्तनातून तसे काही होते असे दिसत नाही. याचे कारण त्यांचे पूजेचे विधी यांत्रिक असतात. त्यात अंतःकरणशुद्धीचा हेतू नसतो. पूजेचा मुख्य हेतू चित्ताशुद्धी असायला हवा.   

गीतेचे काही साधक काही वर्षे गीतापरिवरात गीता शिकत आहेत. त्यांचे पठणाचे चार स्तर दोनदोनदा पूर्ण झाल्याचे ते सांगतात. हे सर्व चांगलेच आहे. परंतु यातून आपल्या स्वभावात, दृष्टीकोनात काही परिवर्तन झाले की नाही हे आपण स्वतः तपासून पहावे. आपल्या जीवनात सत्य, प्रेम, औदार्य वाढले की नाही हे पाहावे. आपल्या जीवनातील कपट, वासना कमी झाल्या की नाही हे पाहावे. सद्गुण वाढत नसतील तर नुसत्या क्रियांना अर्थ नसतो. सत्कर्माने काही ना काही चांगला बदल घडत असतो, भलेही तो अप्रत्यक्ष असेल पण केलेले चांगले कार्य कधीही वाया जात नाही.  

श्रीमद्भगवद्गीता वारंवार पठण केल्याने त्याचे पुण्यफळ नक्की मिळेल पण केवळ पुण्य प्राप्त करणे हा हेतू नसावा. अंतःकरण शुद्धी हा मुख्य हेतू असला पाहिजे. हीच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे असे भगवंत सांगतात. चित्तशुद्धीखेरीज भगवत्प्राप्ती अशक्य आहे. जप, तप, योग, पूजा ही साधने साबणासारखी आहेत. यांनी आपल्या चित्तातील मळ धुवून निघतो. योगी सुखदुःखाचा त्याग करुन भगवत्प्राप्तीसाठी आपले अंतःकरण शुद्ध करतात.
       

5.12

युक्तः(ख्) कर्मफलं(न्) त्यक्त्वा, शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम्꠰
अयुक्तः(ख्) कामकारेण, फले सक्तो निबध्यते॥5.12॥

कर्मयोगी कर्मांच्या फळांचा त्याग करुन भगवत्प्राप्तीरुप शांतीला प्राप्त होतो आणि कामना असलेला पुरुष कामनांच्या प्रेरणेमुळे फळांत आसक्त होऊन बद्ध होतो.

भगवंत म्हणतात, अर्जुना, कर्मयोगी कर्म करतो पण तो फळांचा त्याग करतो. ते अर्जुनला त्याचे कर्तव्यकर्म कर्तव्यबुद्धीने करण्यास सांगतात. आपण व्यवहारात अनेक भूमिका पार पाडत असतो. कोणी आई असते, कोणी खेळाडू असतो, कोणी शिक्षक असतो, कोणी डॉक्टर असतो. ज्या भूमिकेत आपण असू ते कर्तव्य व्यवस्थित करावे. कर्तव्य करतांना अपेक्षा ठेवू नये. पालक मुलाचे पालन पोषण करतात. मुलगा मोठा झाल्यावर आपल्यासाठी काही करेल का ही चिंता जर आपण करत असू तर ते सकाम कर्म असल्याने ते दु:खाला जन्म देते. अपेक्षारहित कर्माची दृष्टी आल्यास सर्व दुःख संपून जाईल. समोरचा काय करतोय याच्याशी माझे कर्तव्य नाही. सकामी नेहमी दुःखी राहतो की महत्वपूर्ण गोष्ट आहे. कर्मयोगात कर्मफळाची अपेक्षा नसते.
सीताराम सीताराम सीताराम कहिये l 
जाहि विधि राखे राम ताहि विधि रहीए ll 
राम आपल्याला जसे ठेवेल तसे आपण आपले कर्तव्यकर्म करत आनंदाने राहावे.
जो कर्म फळाची अपेक्षा ठेवतो त्याला परत जन्माला येऊन दुःखांशी सामना करावा लागतो. तो  पुनरपि जननम् पुनरपि मरणम्  या चक्रात अडकतो.

5.13

सर्वकर्माणि मनसा, सन्न्यस्यास्ते सुखं(म्) वशी।
नवद्वारे पुरे देही, नैव कुर्वन्न कारयन्॥5.13॥

अन्तःकरण ज्याच्या ताब्यात आहे, असा सांख्ययोगाचे आचरण करणारा पुरुष कोणतेही कर्म करणारा किंवा करविणारा न होताच नऊ दरवाजांच्या शरीररुपी घरात सर्व कर्मांचा मनाने त्याग करुन आनंदाने सच्चिदानन्दघन परमात्म्याच्या स्वरुपात स्थित राहतो.

ज्याचे मन ताब्यात असते तो सांख्ययोगाचे आचरण करणारा पुरुष त्याच्या संपूर्ण जीवनात आपल्या मनाला ताब्यात ठेवतो. तो नवद्वारांच्या देहात राहून कर्मांचा मनाने त्याग करून आनंदाने राहतो. आपण आपल्या मनाचे गुलाम बनतो. जर आपण मनाचे स्वामी आहोत तर मनाने आपले ऐकले पाहिजे. पण प्रत्यक्ष जीवनात असे घडत नाही. आपण मनाच्या तालवार नाचत असतो. वास्तविक नोकराने मालकाची गोष्ट ऐकली पाहिजे.

आपल्या देहाची नऊ द्वारे म्हणजे दोन डोळे, दोन कान, एक मुख, दोन नासिका, एक लिंग, गुदा. शास्त्रात आणखी दोन द्वारे सांगितली आहेत. त्यातील एक म्हणजे नाभी. आईच्या गर्भात असताना बालकाचे पोषण करण्याचे काम नाभीतून होत असते. जन्म झाल्यावर, नाळ कापल्यानंतर नाभी बंद होते. अकरावे द्वार म्हणजे ब्रह्मरंध्र. योग्यांना योगाच्या सहाय्याने यामधून प्राण बाहेर काढता येतो. नऊ द्वारांचे आपले शरीर आहे याविषयी  भागवत महापुराणात प्राचीन बहिर ऋषींना नारदाने कथा सांगितली.

दोन मित्र होते. एकाचे नाव अविज्ञात होते. त्याच्या नावाप्रमाणे त्याच्याविषयी किंवा त्याच्या जन्माविषयी कोणाला काहीही माहित नव्हते. दुसऱ्याचे नाव पुरंजन होते. पुरंजन चंचल स्वभावाचा होता.एक दिवस पुरंजन अविज्ञाताला म्हणाला की मित्रा तुला तर कसलीच इच्छा होत नाही, तू एकदम शांत स्वभावाचा आहेस पण मला मात्र फिरायला जायची इच्छा होते आहे. मी खूप दूर काही काळासाठी फिरायला जायचा विचार करतो आहे. त्यावर अविज्ञात म्हणाला ठीक आहे मित्रा, तुला जायचे तर तू जा पण मी इथे तुझी वाट बघतो आहे हे ध्यानात असू दे. मला विसरू नकोस. पुरंजन म्हणाला मित्रा तू माझा अत्यंत जवळचा आहेस, मी तुला कसा विसरेन. झाले, पुरंजन यात्रेला निघाला. त्याने नगरांना भेटी दिल्या, अनेक लेणी, सुंदर सुंदर राजवाडे बघितले. निरनिराळ्या प्रकारची वने, वृक्ष, सरोवरे बघत तो मार्गक्रमण करत राहिला. काही काळाने त्याला एक अत्यंत भव्य किल्ला आणि त्यावरील प्रासाद दिसला. तीन मजली प्रासाद अतिशय सुंदर होता. त्याला नऊ दरवाजे होते. दोन दरवाजे खाली होते. मधल्या मजल्यावर एकही दार नव्हते. सर्वात वरच्या मजल्यावर सात द्वारे होती. पुरंजन प्रासादात गेला. आत शोभेच्या असंख्य वस्तू होत्या. प्रासाद अतिशय उत्तम रीतीने सजवलेला होता. तिथे एक सुंदर स्त्री तिच्या सेवकांबरोबर राहत होती. ते सेवक तिची सर्व कामे करत. शिवाय तिच्याकडे एक पंचमुखी सर्प होता. त्या सुंदर स्त्रीला आणि तिच्या त्या वैभवाला पाहून पुरंजन भुलला. तो तिच्यात आसक्त झाला. त्याने तिला लग्नाची मागणी घातली. तिनेही त्याची मागणी स्वीकारली. पुरंजन आनंदीत झाला. त्याने तिचे नाव विचारले. ती म्हणाली मला नाव नाही. पुरंजन म्हणाला हरकत नाही आजपासून मी पुरंजन तर तू माझी पुरंजनी. दोघेही प्रासादात संसार करू लागले. पुरंजन पुरंजनी मध्ये पुरता गुरफटला, तो ती म्हणेल ते, ती म्हणले तसेच वागत असे. तिच्या तालावर सर्व काही चालू होते. काही वर्षे लोटली.

एकदा तिथे एक अत्यंत कुरूप म्हातारी आली. 'जरा' तिचे नाव. तिने प्रासाद बघितला. ती पुरंजनाला म्हणाली तुमचे भवन फार सुंदर आणि मोठे आहे, मला पण इथे राहू द्या. त्यावर तो म्हणाला माझे घर, माझी पत्नी, आमचे सर्व दास-दासी इतकेच काय तर आमच्याकडील पंचमुखी सर्प देखील सुंदर आहेत. इथे तुझ्यासारख्या कुरूप व्यक्तीचे काय काम. तू इथून चालती हो. जरेने खूप विनवणी करून देखील पुरंजनाने तिला हाकलून दिले. जरा तिथून आपला भाऊ चण्डवेग याच्याकडे गेली. ती म्हणाली मला त्या प्रासादात राहायचे आहे, तू काही कर. चण्डवेगाने ३६५ गोऱ्या आणि ३६५ काळ्या सैनिकांची फौज उभी केली. जरा म्हणाली अरे चण्डवेगा तो किल्ला मजबूत आहे. अनेक बलाढ्य सैनिक आणि दास दासी त्याच्या रक्षणासाठी सदैव सज्ज आहेत, तुझी ही छोटी फौज तो किल्ला जिंकायला पुरी पडेल का. त्यावर चण्डवेग म्हणाला जरे तू चिंता करू नकोस माझे सैनिक संख्येने कमी असतील, दिसायला दुबळे वाटतील पण ते कधीही हार मानणार नाहीत. जरा आपल्या भावाचे सैन्य घेऊन किल्ल्यावर चालून गेली. रोज सैनिक जात आणि हल्ला करत, काही ना काही नुकसान करून परत येत. कधी एखादा बुरुज ढासळे, कधी एखादी वीट निसटे, कधी संरक्षक जाळीचे नुकसान होई. पुरंजन पुरंजनी झालेले नुकसान आपल्या सेवकांच्या मदतीने रोज दुरूस्त करत. पण जरेचे सैन्य रोज काहीतरी उपद्रव करत राही, ते हार मानत नसत. असेच चालू राहिले आणि अखेरीस किल्ल्याचे सैन्य कमी पडू लागले आणि एक दिवस त्यांचा पाडाव झाला. जरेने किल्ल्याचा ताबा घेतला आणि ती किल्ल्यावर राहू लागली. जरेबरोबर तिथे राहणे काही पुरंजनाला पसंत नव्हते. तो दुःखाने झुरत चालला आणि एक दिवस त्या दुःखाने त्रस्त होऊन पुरंजनाने प्राणत्याग केला. प्राण सोडते समयी पुरंजनीचे आपल्या मागे कसे होईल या विचारात त्याला मरण आले. आता मरते समयी जो विचार, इच्छा असते त्याप्रमाणे जन्म प्राप्त होतो या न्यायाने त्याला एका स्त्रीचा जन्म प्राप्त झाला. या स्त्रीचा विवाह झाला, पुढे तिच्या पतीचा मृत्यु झाला आणि ती स्त्री सती जाण्यासाठी आपल्या पतीबरोबर चितेवर चढली.

इकडे खूप काळ मित्राची वाट पाहत असलेला अविज्ञात मित्राच्या शोधासाठी निघाला आणि तो शोधत शोधत जिथे स्त्रीजन्मातील पुरंजन चितेवर आरूढ झालेला होता तिथे आला. अविज्ञाताने त्याच्या दिव्य शक्तीने ही स्त्री म्हणजे पुरंजन आहे हे ओळखले. त्याने त्या स्त्रीला तिच्या पूर्व जन्माविषयी सर्व सांगितले. ते सर्व ऐकून ती स्त्री आणि अविज्ञात तिथून निघाले आणि आपल्या नगरात परत आले आणि सुखाने राहू लागले.

बहिर ऋषींनी नारदांना विचारले महाराज ही काय कथा आहे मला काही बोध झाला नाही. नारद म्हणाले मुनीवर हा पुरंजन आणि अविज्ञात म्हणजे जीवात्मा आणि परमात्मा आहेत. सुरूवातीला हे मित्र एकत्र असतात. पुढे जीवात्मा परमात्म्याला सोडून जातो. तो वेगवेगळ्या योनींमधून प्रवास करत शेवटी मनुष्य योनीच्या नऊ द्वारे असलेल्या शरीरात प्रवेश करतो. त्यातली खालची दोन द्वारे म्हणजे लिंग आणि गुदद्वार. वरती जी सात दारे आहेत त्यात दोन डोळे, दोन कान, दोन नासिका आणि एक तोंड येते. बुद्धी ही त्यात निवास करणारी पुरंजनी होय. कर्मेंद्रिये आणि ज्ञानेंद्रिये हे तिचे दास दासी तिच्या तालावर नाचतात. पंचमुखी सर्प म्हणजे पंच तन्मात्रा जे पंच ज्ञानेंद्रियांचे विषय आहेत. या बुद्धीमध्ये जीवात्मा आसक्त होतो आणि तो या नवद्वाराच्या मानव शरीररूपी प्रासादात अडकतो.
बडे भाग मानुष तन पाया l
सुर दुर्लभ सब ग्रंथन्ही गावा ll
जरा म्हणजे वृद्धापकाळ. चाळिशीनंतर जरा या प्रासादावर साद देऊ लागते. एखादा केस पांढरा होतो, कुठे सुरकुत्या दिसू लागतात. जीवात्म्याला हे आवडत नाही. ही जरा जेंव्हा तिच्या भावाकडे म्हणजे काळाकडे जाते तेंव्हा तो भाऊ ३६५ गोरे आणि ३६५ काळे सैनिक पाठवतो. हे सैनिक म्हणजे ३६५ दिवस आणि रात्र. हे सतत हल्ला करत राहतात. मनुष्य शरीराची डागडुजी करत राहतो पण म्हातारपण काही टळत नाही. शेवटी जरा देहाचा ताबा घेते. जीवात्मा कामबुद्धीच्या चिंतनात म्हणजे पुरंजनीच्या चिंतनात अखेर देह सोडतो, तो अविज्ञाताला म्हणजे परमात्म्याला विसरतो. कामनेप्रमाणे जन्म या न्यायाने पुढील जन्म प्राप्त होतो. पुनरपि जननम् पुनरपि मरणम् या दुष्टचक्रात जीव अडकतो. पुढे कुठल्या तरी संतांच्या आशिर्वादाने अविज्ञात मदतीला येतो. संतांची वचने, सत्कर्मे काही ना काही करून तो पुरंजनाला त्याच्या मूळ स्वरूपाची आठवण देत राहतो. अखेरीस जन्म, जरा आणि मृत्यु या चक्रातून पुरंजनरूपी जीवात्म्याची सुटका होते आणि त्याचे आणि परमात्म्याचे म्हणजे अविज्ञाताचे मिलन होते.

पुरंजन आपले प्रतीक आहे. आपण या नवद्वारातून सुटण्याचा प्रयत्न करायला हवा. इथे भगवंत म्हणतात ज्याचे अंतःकरण त्याच्या ताब्यात आले तो मनाने सर्व कामनांचा आणि कर्मांचा त्याग करतो.

5.14

न कर्तृत्वं(न्) न कर्माणि, लोकस्य सृजति प्रभुः।
न कर्मफलसंयोगं(म्), स्वभावस्तु प्रवर्तते॥5.14॥

परमेश्वर मनुष्यांचे कर्तेपण, कर्में किंवा कर्मफलांशी संयोग उत्पन्न करीत नाही; तर प्रकृतीच खेळ करीत असते.

भगवान म्हणतात मी काहीच करत नाही. जे काही करते ते प्रकृतीच करत असते. भगवंताच्या इच्छेने काही घडत नाही. तरी आपण म्हणत असतो भगवान आम्हाला चांगली बुद्धी दे. एका उदाहरणाने हे स्पष्ट केलेले आहे. एका कारखान्यात अनेक कामगार काम करत असतात. प्रत्येकाचे वेतन हे वेगवेगळे असते. त्यातील एक कामगार मालकाला म्हणतो की मी इतरांएवढेच तास काम करतो तरी मला वेतन कमी मिळते. मालक म्हणतो मी जरी कंपनीचा मालक असलो तरी कंपनीच्या निर्मितीचे काम मी केले आहे. पगारासंबंधी सगळं वेतनविभाग बघतो. हीच गोष्ट सृष्टीच्या बद्दल आहे. परमात्मा म्हणतो मी सृष्टीची निर्मिती केलेली असली तरी सगळे व्यवहार करणारी प्रकृती आहे.

5.15

नादत्ते कस्यचित्पापं(न्), न चैव सुकृतं(म्) विभुः।
अज्ञानेनावृतं(ञ्) ज्ञानं(न्), तेन मुह्यन्ति जन्तवः॥5.15॥

सर्वव्यापी परमेश्वही कोणाचेही पापकर्म किंवा पुण्यकर्म स्वतःकडे घेत नाही. परन्तु अज्ञानाने ज्ञान झाकलेले आहे. त्यामुळे सर्व अज्ञानी लोक मोहित होतात.

भगवान म्हणतात अज्ञानाने ज्ञान झाकलेले आहे. हे अज्ञान म्हणजे काय? ज्याप्रमाणे आकाशात ढग आल्यास सूर्याचा प्रकाश झाकला जातो पण ढग नाहीसे झाल्यावर प्रकाश परत दिसू लागतो त्याचप्रमाणे आपल्यातील अज्ञान दूर करण्याचे काम संत महात्मे करत असतात. रामचरितमानसमध्ये तुलसीदासांनी संजीवनी बुटी प्रसंगाचे वर्णन केले आहे. हनुमान लक्ष्मणाला मूर्च्छा आल्यावर संजीवनी बुटी आणण्यासाठी निघतो. एका गुप्तचरकडून रावणाला हे  कळल्यावर त्याला परावृत्त करण्यासाठी रावण कालनेमी नावाच्या राक्षसाला पाठवतो.
दसमुख कहा मरमु तेहिं सुना l पुनि पुनि कालनेमि सिरू धुना ll 
देखत तुम्हहि नगरू जेहिं जारा l तासु पंथ को रोकन पारा ll 
रावण त्याला सर्व समजावतो. ऐकल्यावर कालनेमी आपले डोके आपटून खेद प्रकट करतो. त्याच्या मनात येते की ज्याने तुझे नगर जाळले, त्याचा मार्ग कोण रोखू शकेल? वास्तविक रावणाने रामाचे भजन करून त्याला प्रसन्न करायला हवे. तो रावणाला वारंवार समजावतो. तेव्हा रावण क्रोधित होतो.

शेवटी  कालनेमी हनुमानाला मोहात टाकून संजीवनीबुटीपासून दूर ठेवण्यास तयार होतो.
असं कहि चला रचिसि मग माया l सर मंदिर बर बाग बनाया ll
मारुतसुत देखा सुब आश्रम l मुनिहि बूझि जल पियौ जाइ श्रम ll 
ठरल्याप्रमाणे कालनेमी सुंदर आश्रम जंगलात मायेने निर्माण करतो. तलाव मंदिर आणि सुंदर बाग तयार करतो. यतीवेश धारण करतो. संजीवनीसाठी निघालेल्या हनुमानाला जेव्हा सुंदर आश्रम दिसतो तेव्हा तेथील मुनीला विचारून आपण पाणी पिऊन थकवा दूर करण्याचा विचार हनुमंताच्या मनात येतो. त्याप्रमाणे मारुती त्या यतीजवळ जाऊन नम्रतेने मस्तक टेकवले आणि तो श्रीरामाच्या गुणांची कथा ऐकू लागला.
होत महा रन रावन रामहिं l जितिहहिं राम न संसय या महिं ll 
इहाँ भऍ मैं देखऊ भाई l ग्यानदृष्टी बल मोहि अधिकाई ll 
यती म्हणाला रावण आणि रामात महान युद्ध चालू आहे. राम जिंकणार यामध्ये काही संशय नाही. मी इथे असलो तरी ज्ञानदृष्टीने मला सगळे दिसते.
मागा जल तेहिं दीन्ह कमंडल l कह कपि नहिं अघाऊ थोरें जल ll 
सर मज्जन करि आवहु l दिच्छा देऊ ग्यान जेहिं पावहु ll 
हनुमानाने त्याला पाणी मागितले. यतीने त्याला कमंडलु दिला. हनुमान म्हणाला, एवढ्या थोड्या पाण्याने माझी तहान जाणार नाही. तेव्हा कालनेमी त्याला म्हणाला की तू तलावात जाऊन स्नान कर. लगेच परत ये. मी तुला दीक्षा देतो आणि मग तुला ज्ञान प्राप्त होईल.
सर पैठत कपि पद गहा मकरीं तब अकुलान l 
मारी सो धरि दिब्य तनु चली गगन चढी जान ll 
तलावात प्रवेश करताच एका मगरीने हनुमानाचा पाय पकडला. हनुमानाने तिला मारले. अप्सरेचा दिव्य देह धारण करून ती आकाशात  निघून गेली. जाताना ती म्हणाली हे वानर! तुझ्या दर्शनाने मी पापरहित झाली. मुनीचा शाप नष्ट झाला. हे कपि हा यती नाही, तो घोर निशाचर आहे. मी सत्य बोलते.
सिर लंगूर लपेटि पछारा l निज तनु प्रगटेसि मरती बारा ll 
राम राम कहि छाडेसि प्राना l सुनि मन हरषि चलेउ हनुमाना ll 
अप्सरा जाताच हनुमानाने निशाचराजवळ जाऊन, पहिले गुरूदक्षिणा घ्या आणि नंतर मला मंत्र द्या असे म्हंटले. त्याने त्याचे डोके आपल्या शेपटीने बांधले आणि त्याला आपटले. मरताना त्याने आपले शरीर प्रगट केले. राम राम म्हणून कालनेमीने आपले प्राण सोडले.

हनुमान इतका ज्ञानी असूनही फसला. आपण तर सामान्य आहोत. असे आपण फसू नये म्हणून सत्संगात राहावे. वेदांताचा विचार केल्यास अज्ञानाचे निवारण होऊन ज्ञानाची प्राप्ती होते.

5.16

ज्ञानेन तु तदज्ञानं(म्), येषां(न्) नाशितमात्मनः।
तेषामादित्यवज्ज्ञानं(म्), प्रकाशयति तत्परम्॥5.16॥

परन्तु ज्यांचे ते अज्ञान परमात्मज्ञानाने नाहीसे झाले आहे, त्यांचे ते ज्ञान सूर्याप्रमाणे त्या सच्चिदानन्दघन परमात्म्याला प्रकाशित करते.

ज्ञानेन तु तदज्ञानं येषां नाशितमात्मन:  परंतु ज्यांचे अज्ञान परमात्मज्ञानाने नाहीसे झाले आहे, तेषामादित्य प्रकाशयति तत्परम्  त्यांचे ते ज्ञान सूर्याप्रमाणे सच्चिदानंद परमात्म्याला प्रकाशित करते.

5.17

तद्बुद्धयस्तदात्मान:(स्), तन्निष्ठास्तत्परायणाः।
गच्छन्त्यपुनरावृत्तिं(ञ्), ज्ञाननिर्धूतकल्मषाः॥5.17॥

ज्यांचे मन व बुद्धि तद्रूप झालेली आहे आणि सच्चिदानन्दघन परमात्म्यांतच ज्यांचे नित्य ऐक्य झाले आहे, असे ईश्वरपरायण पुरुष ज्ञानाने पापरहित होऊन परम गतीला प्राप्त होतात.

भगवान म्हणतात आपले मन आणि बुद्धी परमेश्वराकडे लागली तर गच्छन्ति पुनरावृत्ती ज्ञाननिर्धूतकल्मषा: सच्चिदानंद घन परमात्म्यात त्यांचे नित्य ऐक्य होते, असे ईश्वर परायण पुरुष ज्ञानप्राप्तीमुळे पापातून मुक्त होऊन परमगतीला पोहोचतात.

5.18

विद्याविनयसम्पन्ने, ब्राह्मणे गवि हस्तिनि।
शुनि चैव श्वपाके च, पण्डिताः(स्) समदर्शिनः॥5.18॥

ते ज्ञानी पुरुष विद्या व विनय यांनी युक्त असलेला ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाळ या सर्वांना समदृष्टीनेच पाहातात.

काही वेळा समदर्शित्व मानणारे आपल्यासारखे सामान्य लोक कुटुंब, मित्र, आप्तजन या सगळ्यांवर प्रेम करतात पण प्रत्येकासाठीचा व्यवहार मात्र वेगवेगळा असतो. ज्ञानी पुरुष विद्या आणि विनयाने संपन्न असल्याने ब्राह्मण गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाळ यांना समदृष्टीने पाहतात. आपल्यासाठी समदर्शन आणि समवर्तन यामध्ये फरक आहे.

5.19

इहैव तैर्जितः(स्) सर्गो, येषां(म्) साम्ये स्थितं(म्) मनः।
निर्दोषं(म्) हि समं(म्) ब्रह्म, तस्माद् ब्रह्मणि ते स्थिताः॥5.19॥

ज्यांचे मन समभावात स्थिर झाले, त्यांनी या जन्मीच संपूर्ण संसार जिंकला. कारण सच्चिदानंदघन परमात्मा निर्दोष आणि सम आहे. म्हणून ते सच्चिदानन्दघन परमात्म्यातच स्थिर असतात.

भगवान या ठिकाणी समभावी योग्याची स्थिती सांगतात. योगी लोक समभावामध्ये स्थिर असल्याने ते ज्ञानी पुरुष सच्चिदानंद घन परमात्म्यातच स्थिर असतात असा सच्चिदानंदघन परमात्मा निर्दोष आणि सम आहे.

5.20

न प्रहृष्येत्प्रियं(म्) प्राप्य, नोद्विजेत्प्राप्य चाप्रियम्।
स्थिरबुद्धिरसम्मूढो, ब्रह्मविद् ब्रह्मणि स्थितः॥5.20॥

जो पुरुष प्रिय वस्तु मिळाली असता आनंदित होत नाही आणि अप्रिय वस्तू प्राप्त झाली असना उद्विग्न होत नाही, तो स्थिर बुद्धि असलेला संशयरहित ब्रह्मवेत्ता पुरुष सच्चिदानन्दघन परब्रह्म परमात्म्यात ऐक्यभावाने नित्य स्थित असतो.

या श्लोकात भगवान योग्याची लक्षणे सांगतात. प्रिय वस्तू मिळाल्याने तो आनंदीत होत नाही किंवा अप्रिय वस्तू मिळाल्याने तो दुःखी होत नाही. असा स्थिरबुद्धी असलेला पुरुष सच्चिदानंद घन परब्रह्म परमात्म्यात ऐक्यभावाने नेहमी स्थित असतो.
वनवासाच्या प्रसंगात पाच पांडव वनात फिरत होते. फिरता फिरता ते एका तलावापाशी पाणी पिण्यासाठी आले. एकेक करून ते पाणी पिताना यक्षाच्या प्रश्नांची उत्तरे न सांगता पाणी पिऊन मरून गेले. धर्मराज युधिष्ठिर तहानेने व्याकुळ असूनही आणि समोर चार भावांचे कलेवर बघूनही शांततेत राहिला. त्याने यक्षाला नम्रतेने प्रणाम केला आणि बुद्धीपूर्वक उत्तरे दिली. हे कर्मयोग्याचे लक्षण आहे.

5.21

बाह्यस्पर्शेष्वसक्तात्मा, विन्दत्यात्मनि यत्सुखम्।
स ब्रह्मयोगयुक्तात्मा, सुखमक्षयमश्नुते॥5.21॥

ज्याच्या अन्तः करणाला बाहेरील विषयांची आसक्ती नसते, असा साधक आत्म्यात असलेल्या, ध्यानामुळे मिळणाऱ्या सात्विक आनंदाला प्राप्त होतो. त्यानंतर तो सच्चिदानन्दघन परब्रह्म परमात्म्याच्या ध्यानरूप योगात ऐक्यभावाने स्थिति असलेला पुरुष अक्षय आनन्दाचा अनुभव घेतो.

ध्यानयोगात स्थित असलेला पुरुष बाह्य विषयात आसक्त नसतो. भगवान म्हणतात ही आसक्ती सोडली तरच परमात्म्याची प्राप्ती होऊ शकेल. आपण कपडे धुताना ते साफ करतो. त्याचा मळ काढतो. एवढेच आपल्या हातात असते. सुफी कवी म्हणतो जब मै था तब हरी नही अब हरी है तो मै नही l परमात्म्याची प्राप्ती झाल्यावर 'मी' 'तू' पण नाहीसे होते आणि परमात्म्याशी एकरूपता साधते.  
जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत परमात्म्याची प्राप्ती होणार नाही.

5.22

ये हि संस्पर्शजा भोगा, दुःखयोनय एव ते।
आद्यन्तवन्तः(ख्) कौन्तेय, न तेषु रमते बुधः॥5.22॥

जे हे इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगाने उत्पन्न होणारे सर्व भोग आहेत, ते जरी विषयी पुरुषांना सुखरुप वाटत असले, तरी तेही दुःखालाच कारण होणारे आणि अनित्य आहेत. म्हणून हे अर्जुना! बुद्धिमान विवेकी पुरुष त्यांत रमत नाहीत.

भोगाची निंदा करताना भगवान म्हणतात, विषय आणि इंद्रिये यांच्या संयोगातून निर्माण होणारे भोग सुरुवातीला जरी आनंददायी वाटले तरी परिणामी ते दुःखदायक असतात. भगवद्गीतेच्या १८ व्या अध्यायातील ३८ व्या श्लोकात याचे वर्णन आले आहे.
विषयेन्द्रियसंयोगाद्यत्तदग्रेऽमृतोपमम्।
परिणामे विषमिव तत्सुखं राजसं स्मृतम्।।१८.३८।।
जे सुख विषय आणि इंद्रियांच्या संयोगाने उत्पन्न होते, ते प्रथम भोगताना अमृता सारखे वाटत असले तरी परिणामी विषासारखे असते. म्हणून ते सुख राजस म्हटले गेले आहे.

5.23

शक्नोतीहैव यः(स्) सोढुं(म्), प्राक्शरीरविमोक्षणात्।
कामक्रोधोद्भवं(म्) वेगं(म्), स युक्तः(स्) स सुखी नरः॥5.23॥

जो साधक या मनुष्यशरीरात शरीर पडण्याआधीच काम - क्रोधामुळे उत्पन्न होणारा आवेग सहन करण्यास समर्थ होतो, तोच योगी होय व तोच सुखी होय.

कामना असण्यात काही हरकत नाही. पण त्या कामनांच्या किंवा इच्छांच्या वेगावर नियंत्रण असायला हवे. क्रोध आल्यावर आपण एवढे बोलतो की त्यानंतर आपल्याला पश्चाताप होतो. आपण एवढे बोलायला नको होते असे मनातून वाटते. कामनांचा वेग आपला नाश करतात. विकार हे आपल्यासाठी उपयोगी आहेत पण त्यांचा वेग सहन करणारा योगी सुखी असतो.

5.24

योऽन्तःसुखोऽन्तरारामः(स्), तथान्तर्ज्योतिरेव यः।
स योगी ब्रह्मनिर्वाणं(म्), ब्रह्मभूतोऽधिगच्छति॥5.24॥

जो पुरुष अन्तरात्म्यातच सुखी, आत्म्यातच रमणारा आणि आत्म्यातच ज्ञान मिळालेला असतो, तो सच्चिदानन्दघन परब्रह्म परमात्म्यासह ऐक्यभावाला प्राप्त झालेला सांख्ययोगी शान्त ब्रह्माला प्राप्त होतो.

सांख्ययोगी कसा असतो याचे वर्णन या श्लोकात आले आहे. असा योगी अंतरात्म्यात सुखी राहणारा, आत्म्यामध्येच रमणारा आणि आत्म्यातच ज्ञान मिळवणारा असतो. तो समत्व आणि ऐक्यभावाने सच्चिदानंद परमात्म्याला प्राप्त होऊन शांत ब्रह्माला प्राप्त होतो.

5.25

लभन्ते ब्रह्मनिर्वाणम्, ऋषयः क्षीणकल्मषाः।
छिन्नद्वैधा यतात्मानः(स्), सर्वभूतहिते रताः॥5.25॥

ज्यांचे सर्व पाप नष्ट झाले आहे, ज्यांचे सर्व संशय ज्ञानामुळे फिटले आहेत, जे प्राणिमात्राच्या कल्याणात तत्पर आहेत आणि ज्यांचे जिंकलेले मन निश्चलपणे परमात्म्यात स्थिर असते, ते ब्रहमवेत्ते शान्त ब्रह्माला प्राप्त होतात.

कर्मयोग्याची महत्त्वाची ओळख सर्व भूतहीते रताः अशी असते. सर्व लोकांच्या कल्याणाचा तो विचार करतो. यामुळे त्याचे सर्व पाप नष्ट होऊन अज्ञानाचा नाश होतो. ते परब्रह्म परमात्म्यात निश्चितपणे स्थिर असतात आणि असे ब्रह्मपद मिळवणारे शांत ब्रह्माला प्राप्त होतात. याविषयीचे एक भजन आहे.
हे नाथ अब तो ऐसी दया हो, जीवन निरर्थक जानेन पाये l 
यह मन न जाने क्या क्या कराये ,कुछ बन ना पाया आपने बनाये ll 

5.26

कामक्रोधवियुक्तानां(म्), यतीनां(म्) यतचेतसाम्।
अभितो ब्रह्मनिर्वाणं(म्), वर्तते विदितात्मनाम्॥5.26॥

काम - क्रोध मावळलेले, मन जिंकलेले, परब्रह्म परमात्म्याचा साक्षात्कार करुन घेतलेले जे ज्ञानी पुरुष असतात, त्यांना सर्व बाजूंनी शांत परब्रह्म परमात्माच परिपूर्ण असतो.

कामक्रोधनवियुक्तानां  काम क्रोधादीविकारांना सोडलेले  यतीनां यतचेतसाम् मन जिंकलेले, परब्रह्म परमात्म्याचा साक्षात्कार करुन घेतलेले यती  अभितो ब्रह्मनिर्वाणम् ब्रह्मपदाला पोहोचतात.

5.27

स्पर्शान्कृत्वा बहिर्बाह्यांश्, चक्षुश्चैवान्तरे भ्रुवोः।
प्राणापानौ समौ कृत्वा, नासाभ्यन्तरचारिणौ॥5.27॥

बाहेरच्या विषयभोगांचे चिन्तन न करता ते बाहेरच ठेवून, दृष्टी भुवयांच्या मध्यभागी स्थिर करुन तसेच नाकातून वाहणारे प्राण व अपान सम करुन,

5.27 writeup

5.28

यतेन्द्रियमनोबुद्धि:(र्), मुनिर्मोक्षपरायणः।
विगतेच्छाभयक्रोधो, यः(स्) सदा मुक्त एव सः॥5.28॥

ज्याने इंद्रिये, मन व बुद्धि जिंकली आहेत, असा मोक्षतत्पर मुनी इच्छा, भय आणि क्रोध यांनी रहित झाला की, तो सदोदित मुक्तच असतो.

या ठिकाणी ध्यानयोगाचे वर्णन आलेले आहे. भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायात त्याचा विस्तृतपणे विचार भगवंत करतात. योगी पुरुष ध्यानामध्ये कसा असतो हे इथे सांगितले आहे.
बाहेरील विषयांना विकारांना बाहेरच ठेवून, आपली दृष्टी भुवयांच्या मध्यभागी स्थिर करून, प्राण आणि अपान सम करून, मन आणि बुद्धी जिंकली आहेत असा परमेश्वराच्या स्वरूपाचे निरंतर चिंतन करणारा, मोक्षाची इच्छा करणारा योगी, विकारांना जिंकल्यामुळे सदोदित मुक्त असतो.

5.29

भोक्तारं(म्) यज्ञतपसां(म्), सर्वलोकमहेश्वरम्।
सुहृदं(म्) सर्वभूतानां(ञ्), ज्ञात्वा मां(म्) शान्तिमृच्छति॥5.29॥

माझा भक्त मला सर्व यज्ञ आणि तपांचा भोक्ता, सर्व लोकांच्या ईश्वरांचाही ईश्वर, प्राणिमात्रांचा सुह्रद अर्थात स्वार्थरहित दयाळू आणि प्रेमी, असे तत्वतः समजून शांतीला प्राप्त होतो.

गोस्वामीजी चौपाई मानस मध्ये सांगतात, माणसाचे मन 10 ठिकाणी अडकते. जननी, जनक,दारा,कन्या,सुत, बंधू, भवन, शरीर,परिवार आणि सुहृद. या दहा माया ममता पासून दोरी बनवा आणि ती भगवंताच्या चरणाशी  अर्पण करा. देवा तुमच्या कृपेने मला हे सगळे मिळाले ही वृत्ती झाली तर  शरणा गतीने तो योगी परमशांतीला पोहोचतो.

परमपूज्य गुरुदेवांच्या आज्ञेनुसार हे विवेचन सांगितले गेले. आपण हे सर्व विचार गुरुकृपेने जीवनात आणून जीवन सार्थक करावे. हरी शरणम या भगवत चिंतनाने विवेचनाची सांगता झाली आणि प्रश्नोत्तरांना सुरुवात झाली.

प्रश्न उत्तरे -
- सुरेंद्र घाटेजी - आपण सांगता की हे दहा मोह दोरीला बांधून भगवंताला अर्पण करावे. माझा मुलगा परदेशात राहतो तो मला विचारत नाही त्यामुळे मी दुःखी आहे. त्यावर उपाय काय आहे तुम्ही मला सांगा.
उत्तर- आपण यावर जास्त विचार करू नये. त्या ठिकाणी आपले अंतर्मन उघडून स्वतःला म्हणावे की माझे काय चुकले म्हणून मला असे भोगावे लागते. नेहमी परिस्थिती सारखीच राहत नाही परिस्थिती बदलल्यावर सगळे काही ठीक होईल.आपण धैर्यपूर्वक वाट बघावी. सारे संबंध बदलणारे असतात नित्य परमात्मा आहे म्हणून  परमात्मा कडे लक्ष ठेवावे. बाकी सारे देवावर सोडावे.

२- ओमप्रसादजी - बारा आणि पंधरावा अध्याय महात्म्याने सांगितल्याने तो रोज म्हणावा का?
उत्तर- संतांद्वारे आज्ञा झाल्यावर ते माझ्या कल्याणासाठी आहे असा विचार करून तो नक्की वाचावा.

३- माधुरी जी - मनावर आपण का निर्भर राहतो?
 उत्तर- आपण मनाचे गुलाम असतो. मनाला नियंत्रित केल्याशिवाय आपले कल्याण होणार नाही. अभ्यास आणि वैराग्याने हे सहज होऊ शकते. भोगा पासून वैराग्य घेऊन मन नियंत्रित ठेवता येते. हठयोगाने हे करता येईल.

- अरुणजी - सांख्ययोग काय आहे?
उत्तर- संख्यात्मक विचार यामध्ये येतो. इथे २७ तत्वांचा विचार होतो.

५- पद्मिनीजी - ज्ञानयोगी म्हणतात मी जीवात्मा नाही मी आत्मा आहे हे कसे?
उत्तर- आपल्याकडे सुंदर सुंदर दागिने असतात. ते विकताना आपले लक्ष त्याच्या सुंदर नक्षी कडे असते. सोनाराचे मात्र लक्ष त्यातील फक्त सोन्याकडे असते. त्याचप्रमाणे ज्ञानयोगी ब्रम्हांडात ईश्वर नावाचे तत्व आहे, परमात्मा आहे हेच बघतो.

६- राणी जी -
रुद्र ब्राह्मणांकडून करून घ्यावे की आपण म्हणावे?
उत्तर- ब्राह्मण भोजन आणि दक्षिणा दिल्याने अनुष्ठान पूर्ण होते. तुम्ही रुद्र स्वतः म्हटले तरी हरकत नाही मात्र शेवटी ब्राह्मणाला बोलवून त्याला दक्षिणा व भोजन नक्की द्या.   

प्रश्नोत्तरानंतर हनुमान चालीसाने पाचव्या अध्यायाची सांगता झाली.
।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।