विवेचन सारांश
सत्त्व, रज आणि तम या गुणांचे वर्णन

ID: 5809
मराठी
शनिवार, 02 नोव्हेंबर 2024
अध्याय 14: गुणत्रयविभागयोग
1/3 (श्लोक 1-7)
विवेचक: गीता प्रवीण कविता जी वर्मा


गुरुपरंपरेला वंदन करून, प्रारंभिक प्रार्थना आणि दीपप्रज्वलनाने विवेचनाचा शुभारंभ झाला. दीपावली हे एक पर्व आहे. धनत्रयोदशी पासून भाऊबीजेपर्यंत  पाच दिवस दिवाळी असते. आज बलिप्रतिपदा आहे तसेच गोवर्धन पर्वताची कथा ही आजच्या दिवशी आठवते. इंद्राचा अहंकार दूर करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने याच दिवशी गोवर्धनपूजा सुरू केली.

भगवद्गीतेचा १४ वा अध्याय  गुणत्रयविभागयोग या नावाने ओळखला जातो. सत्त्व, रज आणि तम या गुणांचे वर्णन या ठिकाणी येते. त्याचबरोबर आपल्यातील अहंकार आणि ईर्षा प्रयत्नाने आपण कशी नियंत्रित करू शकतो हे या अध्यायात सांगितले आहे. आपल्यातील कुठल्या दुर्गुणांना दूर करायला हवे हे विस्तारपूर्वक हा अध्याय सांगतो.
 
प्रत्येक व्यक्तीमध्ये हे तीनही गुण असतातच. संत महात्म्यांमध्येही या गुणांचा अंतर्भाव असतो. सत्त्वगुण हा मनुष्यातील चांगुलपणा दर्शवतो. रजोगुण क्रियाशीलता सांगतो. तमोगुण मनुष्यातील क्रियाशून्यता दाखवतो.
भगवद्गीतेच्या अठराव्या अध्यायात भगवान म्हणतात- 
न तदस्ति पृथिव्यां वा दिवि देवेषु वा पुनः।
सत्त्वं प्रकृतिजैर्मुक्तं, यदेभिः स्यात्त्रिभिर्गुणै:॥१८.४०॥
पृथ्वीवर, आकाशात किंवा देवांत तसेच यांच्याशिवाय इतरत्र कोठेही असा कोणताच प्राणी किंवा पदार्थ नाही की जो प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या या तीन गुणांनी रहित असेल.

या सृष्टीतील प्रत्येक व्यक्ती, भाव, वस्तु हे सर्व या तीन गुणांनी युक्त आहेत. इतकेच नव्हे तर आपण एखाद्या गोष्टीविषयी अथवा वस्तूविषयी जी कल्पना करतो ती देखील या तीन गुणांनी युक्त असते. मात्र हे तीनही गुण योग्य प्रमाणात असणे आवश्यक आहे.

आपल्यातील सत्त्वगुण आपल्याला उर्ध्वगतीकडे घेऊन जातो. रजोगुणामुळे क्रियाशीलता निर्माण होते. तमोगुण आपल्याला अधोगतीकडे घेऊन जातो.

14.1

श्रीभगवानुवाच
परं(म्) भूयः(फ्) प्रवक्ष्यामि, ज्ञानानां(ञ्) ज्ञानमुत्तमम्।
यज्ज्ञात्वा मुनयः(स्) सर्वे, परां(म्) सिद्धिमितो गताः॥14.1॥

श्रीभगवान म्हणाले, ज्ञानांतीलही अति उत्तम ते परम ज्ञान मी तुला पुन्हा सांगतो की, जे जाणल्याने सर्व मुनीजन या संसारातून मुक्त होऊन परम सिद्धी पावले आहेत.

परम्  म्हणजे सर्व ज्ञानात श्रेष्ठ असे उत्तम ज्ञान मी तुला सांगतो, असे भगवान अर्जुनाला म्हणतात. राजविद्याराजगुह्यज्ञान नवव्या अध्यायात भगवंताने सांगितले आहे.  भगवंत अर्जुनाला अनसूय संबोधतात. तुला कोणत्याही प्रकारची ईर्षा नसल्याने हे ज्ञान मी सांगतो आहे असे भगवान अर्जुनाला म्हणतात. तेच ज्ञान 'भूय: प्रवक्ष्यामि' म्हणजे पुन्हा मी सांगतो असे या चौदाव्या अध्यायात भगवंत म्हणत आहेत.

स्वामी चिन्मयजींच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी भगवंत आईची भूमिका वठवतात. मुलाला जेव्हा भूक लागते तेव्हा आईला कळतं त्याला किती खायला द्यावे. हे तर अत्यंत गूढ असे ज्ञान आहे जे समजायला वेळ लागू शकतो. वेगवेगळ्या प्रकारांनी पुन्हा पुन्हा सांगितले तर ते व्यवस्थित कळू शकते. 

जगभर विविध प्रकारचे ज्ञान उपलब्ध आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत आपण कोणते ना कोणते तरी कर्म करत असतो. त्यावेळी ज्ञान ग्रहण करतच असतो. त्यापैकी बरेचसे ज्ञान आपल्या विस्मरणात जाते. परंतु भगवद्गीतेचे ज्ञान अव्यय आहे. अव्यय म्हणजे कधीही नष्ट न होणारे. हे ज्ञान चोर चोरू शकत नाही. हे मिळवण्यासाठी आपल्याला अधिकारी व्हावे लागते. एकदा हे  ज्ञान प्राप्त झाले तर ती व्यक्ती प्रकाशमय, ज्ञानमय होऊन जाते. हे ज्ञान पवित्र आहे. हे ज्ञान प्राप्त करून मुनय: सर्वे - सर्व मुनींनी सिद्धी प्राप्त करून घेतली आहे. हे सांगण्याचा भगवंताचा काय उद्देश आहे?

जे मनन करतात ते मुनी. भगवंताचा एवढाच उद्देश आहे की आपण जे ऐकतो, जे वाचतो, त्यावर चिंतन आणि मनन केले पाहिजे. जिज्ञासेने मनातल्या प्रश्नांची उत्तरे शोधली पाहिजेत. संशयाचे निराकरण केले पाहिजे. ते ज्ञान परिपूर्ण नाही जोपर्यंत त्याविषयी मनात संशय आहे आणि असा कोणताही संशय नाही ज्याचे निवारण भारतीय शास्त्रांद्वारे होऊ शकत नाही. अशा परिपूर्ण ज्ञानाने मुनी सिद्धी प्राप्त करून घेतात आणि सिद्धी म्हणजे तरी काय! ते अशा ज्ञानामुळे गुणातीत होतात, तीनही गुणांच्या पलीकडे जाऊन विचार करू शकतात.
   

14.2

इदं(ञ्) ज्ञानमुपाश्रित्य, मम साधर्म्यमागताः।
सर्गेऽपि नोपजायन्ते, प्रलये न व्यथन्ति च॥14.2॥

हे ज्ञान धारण करुन माझ्या स्वरुपाला प्राप्त झालेले पुरुष सृष्टीच्या आरंभी पुन्हा जन्माला येत नाहीत आणि प्रलयकाळीही व्याकुळ होत नाहीत.

इदं ज्ञानमुपाश्रित्य -  या ज्ञानाला ज्यांनी हृदयापर्यंत पोहोचवले आहे अशी व्यक्ती कशी असते हे १२ व्या आणि १६ व्या अध्यायात स्पष्ट केले आहे.
अद्वेष्टा सर्व भूतानां मैत्र: करूण एव च l 
निर्ममो निरहंकार: समदुःखसुख: क्षमी  ll१२.१३ll  
त्याच्यातला द्वेष नाहीसा झालेला असतो. त्याला सर्वांबद्दल मैत्री आणि करुणा निर्माण होऊन तो महात्मा होऊन जातो असे भक्तांच्या लक्षणात १२ व्या अध्यायात सांगितले आहे. स्वतःचे नाव व्हावे अशा दृष्टीने तो कोणतेच काम करत नाही. अशा व्यक्तीने हे ज्ञान धारण केले आहे असे समजावे.
मम साधर्म्यमागता: - अशी व्यक्ती माझ्याबरोबर समानता प्राप्त करते. मी शरीर नाही त्यामुळे मला अहंकार नाही. हे तो जाणतो. अशीच व्यक्ती माझ्याशी साधर्म्य साधते म्हणजे एकरूप होऊन जाते.
सर्गेsपि नोपजायन्ते - सर्ग म्हणजे पृथ्वीचा आरंभ. अशी व्यक्ती सृष्टीच्या आरंभी पुन्हा जन्म घेत नाही. 
प्रलये न व्यथन्ति च - प्रलय म्हणजे पृथ्वीचा अंत. प्रलय जरी झाला तरी अशी व्यक्ती  व्यथित होत नाही. त्याला कोणत्याही प्रकारची व्याकुळता नसते.
चार प्रकारचे प्रलय असतात - नित्य प्रलय, प्राकृतिक प्रलय, नैमित्तिक प्रलय आणि आत्यंतिक प्रलय. 
नित्य प्रलय म्हणजे आपण रोज रात्री झोपतो आणि सकाळी उठतो.
नित्य प्रलयाचा तीन अवस्था समजून घेतल्या पाहिजेत.- जागृत अवस्था, स्वप्नावस्था आणि सुषुप्ती अवस्था.
जागृत अवस्था - या अवस्थेत शरीर आणि मन दोन्हीही क्रियाशील असते. आपली जाणीव जागृत असते. घरात काही पदार्थ बनत असेल तर इंद्रियांना प्रथम ही गोष्ट समजते. नाकाला त्याचा वास येतो. बाजूला संगीत चालू असेल तर कान ते देखील श्रवण करतात. सामान्यतः आपण नेहमी हा अनुभव करत असतो.
स्वप्नावस्था - या अवस्थेचे वर्णन उपनिषदात आले आहे. स्वप्नात मनुष्य अनेक प्रकारचे अनुभव घेत असतो. त्याला स्वप्नात घोडे दिसतात. हत्ती दिसतात. महाल दिसतो. यामध्ये इंद्रिये आणि शरीर क्रियाशील नसतात पण मन क्रियाशील असते. स्मृती जागृत असते. जागे झाल्यावर बऱ्याचदा स्वप्न आपल्याला आठवते सुद्धा! सृजनाने मनुष्य स्वप्नात एक आभासी जग निर्माण करतो व त्याचा अनुभव करतो. ही अवस्था पूर्णपणे सत्यही नाही आणि असत्यही नाही. तरीही या अवस्थेची स्वतःची एक सत्ता असते, अगदी थोड्या काळापुरती आणि म्हणूनच आपण स्वप्नात साप पाहिला तर घाबरतो, म्हणजे शरीराने प्रतिसाद दिलेला असतो पण सर्प मात्र खरा नसतो.
सुषुप्ती अवस्था - त्यात मन पूर्णपणे थांबून स्मृती नाहीशी होते. आपण पूर्णपणे शांत निद्रावस्थेत जातो. यात कोणत्याही गोष्टीचे भान नसते. आपण फक्त छान झोपलो होतो तेवढाच अनुभव येतो. यालाच नित्यप्रलय म्हंटले  गेले आहे कारण इथे शरीर मन यांना भान नसते. निद्रेत संपूर्णपणे शरीर  विलीन होऊन जाते.

प्राकृतिक प्रलय- ब्रह्माला जेव्हा परमधामाची स्थिती प्राप्त होते तेव्हा तेथे असलेल्या सर्व जीवांना देखील परमगती प्राप्त होते त्यांना पुनर्जन्म असत नाही. हाच तो प्राकृतिक प्रलय. आठव्या अध्यायात याचे वर्णन आले आहे.-
आब्रह्मभुवनाल्लोकाः पुनरावर्तिनोऽर्जुन ।
मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते ॥
हे भरतवंशी अर्जुना! ब्रह्मलोकापर्यंतचे सर्व लोक पुनरावर्ती आहेत. परंतु हे कुंतीपुत्रा, मला प्राप्त झाल्यावर पुनर्जन्म होत नाही कारण मी कालातीत आहे आणि हे सर्व ब्रह्मादिकांचे लोक कालाने मर्यादित असल्याने अनित्य आहेत. 
स्वर्गलोकापक्षाही श्रेष्ठ असा ब्रह्मलोक आहे. उपासना आणि ज्ञानाने ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. इंद्राला जर मुक्ती मिळाली तर हे जरुरी नाही की तेथे स्वर्गलोकात असलेल्या सर्वांनाच मुक्ती मिळेल परंतु ब्रह्मलोक यासाठीच श्रेष्ठ आहे की ब्रम्हाला जर मुक्ती मिळाली तर ब्रह्मलोकातील सर्वांना मुक्ती मिळते. सृष्टीची रचना ब्रम्हानेच केली आहे. जेव्हा ब्रम्हालाच ब्रह्मज्ञान होते, तेव्हा ब्रह्मा मुक्त होतात आणि ब्रम्हाद्वारा रचित सृष्टीचा देखील लय होतो. ब्रम्हांड प्रकृतीमध्ये विलीन होऊन जाते म्हणून याला प्राकृतिक प्रलय असे म्हटले जाते.

नैमित्तिक प्रलय - ब्रह्माचे आयुष्य शंभर वर्षांचे असते. आपली शंभर वर्षे यात समजू नये. हा फार मोठा कालावधी आहे याला कल्प असेही म्हणतात. त्यानंतर ब्रह्माला निद्रा येते. या निद्रेच्या निमित्ताने प्रलय होतो. म्हणजे निद्रेच्या निमित्ताने होणारा प्रलय म्हणून नैमित्तिक प्रलय असे म्हणतात.

आत्यंतिक प्रलय - मिळालेल्या ज्ञानामुळे  एकरूपता प्राप्त होऊन  मुक्ती मिळते. यानंतर जीव फिरुन संसारात येत नाही. परमज्ञान प्राप्त केल्याने अशी व्यक्ती कोणत्याही कारणाने व्यथित होत नाही. मृत्यूची सत्यता माहीत होते. तो त्याचा सहज स्वीकार करतो. 

14.3

मम योनिर्महद्ब्रह्म, तस्मिन्गर्भं(न्) दधाम्यहम्।
सम्भवः(स्) सर्वभूतानां(न्), ततो भवति भारत॥14.3॥

हे अर्जुना! माझी महद्-ब्रह्मरुप मूळ प्रकृती संपूर्ण भूतांची योनी म्हणजे गर्भधारणा करण्याचे स्थान आहे आणि मी त्या योनीच्या ठिकाणी चेतन- समुदायरुप गर्भाची स्थापना करतो. त्या जड-चेतनाच्या संयोगाने सर्व भूतांची उत्पत्ती होते.

या अध्यायात भगवान अनेक विषय सांगतात. इथे प्रकृतीला योनी असे म्हंटले आहे. मूळ प्रकृतीसाठी अनेक शब्द आहेत. ही प्रकृती आरंभापासून आहे. तिला माया असेही म्हणतात. पुरुष आणि प्रकृती यांच्या संयोगाने सृष्टी निर्माण होते. भगवान म्हणतात हे अर्जुना! माझी महद् ब्रह्मरूप मूळ प्रकृती संपूर्ण भूत मात्रांची योनी म्हणजे गर्भधारणा करण्याचे स्थान आहे. पुरुष चेतन आणि प्रकृती जड आहे. यांच्या संयोगाने सर्व भूतांची उत्पत्ती होते. ज्याप्रमाणे पंखा चालवण्यासाठी त्याची पाती जडरूपात असून त्यातील विद्युतशक्ती चैतन्य रूपात असते; या दोघांच्या संयोगाने पंखा चालतो त्याचप्रमाणे सृष्टीच्या निर्मितीत पुरुष लंगडा आहे. त्यात ज्ञानशक्ती आहे पण क्रियाशक्ती नाही. प्रकृती आंधळी आहे. तिच्यात क्रियाशक्ती आहे पण ज्ञानशक्ती नाही. मात्र पुरुष आणि प्रकृती यांचा संयोग झाल्यावर सृष्टीची निर्मिती होते.

14.4

सर्वयोनिषु कौन्तेय, मूर्तयः(स्) सम्भवन्ति याः।
तासां(म्) ब्रह्म महद्योनि:(र्), अहं(म्) बीजप्रदः(फ्) पिता॥14.4॥

हे अर्जुना! नाना प्रकारच्या सर्व जातींत जितके शरीरधारी प्राणी उत्पन्न होतात, त्या सर्वांचा गर्भ धारण करणारी माता प्रकृती आहे आणि बीज स्थापन करणारा मी पिता आहे.

नाना प्रकारच्या एकूण ८४ लक्ष योनी विद्यमान आहेत. या सर्व योनीत मनुष्य योनी दुर्लभ आणि श्रेष्ठ आहे. मनुष्यजन्मात आपण कर्म करून पुण्य प्राप्त करून मोक्षापर्यंत जाऊ शकतो. देवताही हे काम करू शकत नाही.
मूर्तय: सम्भवन्ति या: - जितकी शरीरे आहेत ती सगळी प्रकृती पासून निर्माण होतात.
प्रकृती त्रिगुणात्मक आहे. सत्त्व, रज आणि तम हे तीन गुण प्रकृतीत आहेत. या तीन गुणात जेव्हा साम्यावस्था येते तेव्हा प्रलय होतो. सृष्टीत कोणतीही क्रिया या तीन गुणांमुळेच होत असते. सगळ्या चांगल्या गोष्टी सत्त्वगुणांमुळेच होतात. क्रियाशीलता रजोगुणामुळे येते. जडत्व तमोगुणामुळे येते.
तीनही गुण मनुष्यासाठी आवश्यक आहेत. तमोगुण आपण सोडू शकत नाही. दिवसभर काम केल्यावर आपल्याला झोपेची आवश्यकता असते. मात्र प्रत्येक गुणाचे प्रमाण किती यावरून तो माणूस सत्त्वगुणी, रजोगुणी की तमोगुणी आहे हे समजते.

सृष्टीत पंचमहाभूतांचे प्रमाण वेगवेगळे असते. ते सगळे एकत्र येऊन आकाश बनते. आकाशाचा ५०% भाग असतो. उरलेल्या चार भूतांपैकी आप, तेज, वायू आणि पृथ्वी यांचे प्रत्येकी प्रमाण १२.५% असते.

सृष्टीत चार प्रकारांनी शरीरे निर्माण होतात.
चिमणी, कोंबडी वगैरे प्राणी अंडज असतात.
काही प्राणी गर्भधारणेने जन्माला येतात. जसे मनुष्य, कुत्रा, घोडा मांजर इत्यादी. त्यांना पिंडज असे म्हणतात.
काही प्राणी घामापासून निर्माण होतात त्यांना स्वेदज म्हणतात. जसे उवा गोचीड इत्यादी.
उद्भिज म्हणजे जे भूमीपासून उत्पन्न होतात जसे वृक्षवेली वगैरे.

सर्व शरीरधारी प्राण्यांचा गर्भ धारण करणारी माता प्रकृती आहे आणि बीज निर्माण करणारा मी पिता आहे असे भगवान म्हणतात.

14.5

सत्त्वं(म्) रजस्तम इति, गुणाः(फ्) प्रकृतिसम्भवाः।
निबध्नन्ति महाबाहो, देहे देहिनमव्ययम्॥14.5॥

हे अर्जुना! सत्त्वगुण, रजोगुण आणि तमोगुण हे प्रकृतीपासून उत्पन्न झालेले तिन्ही गुण अविनाशी जीवात्म्याला शरीरात बांधून ठेवतात.

सत्त्व, रज आणि तम हे गुण प्रकृती पासून निर्माण झाले आहेत. भगवान अर्जुनाला महाबाहो हे विशेषण वापरतात. इथे शरीरासाठी देही हा शब्द वापरला आहे. भगवद्गीतेच्या तेराव्या अध्यायात यालाच क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हे शब्द योजले आहेत. या शरीरात किंवा देहात राहूनच आम्ही शरीरात असणाऱ्या आत्म्याला समजू शकतो. जेव्हा आपण शरीर म्हणजे देह असे समजतो तेव्हा मान आणि अपमान या भावना आपल्याला सुखदुःख देत असतात. जेव्हा आपण असे म्हणतो की आपण म्हणजे परमात्म्याचा अंश आहे तेव्हा कोणत्याही प्रकारची भावना त्रास देत नाही. आत्मा परमात्म्याचे स्वरूप आहे. ज्या महापुरुषांना हे समजते ते विरक्त होऊन जातात. भगवद्गीतेच्या बाराव्या अध्यायात म्हंटले आहे -
यस्मान्नोद्विजते लोको लोकान्नोद्विजते च य: l
हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो य: स च मे प्रिय: ll१२.१५ll
ज्याच्यापासून कोणत्याही प्राणाला त्रास होत नाही तसेच ज्याला कोणत्याही प्राण्याचा उबग येत नाही, जो हर्ष, मत्सर, भीती आणि उद्वेग यापासून अलिप्त असतो, तो भक्त मला प्रिय आहे असे भगवान म्हणतात.

निबध्नन्ति -आपण देहाभिमानी असल्यामुळे संसाराला बांधले जातो. सत्त्व, रज आणि तम हे तीन गुण आपल्याला बांधून ठेवतात.

14.6

तत्र सत्त्वं(न्) निर्मलत्वात्, प्रकाशकमनामयम्।
सुखसङ्गेन बध्नाति, ज्ञानसङ्गेन चानघ॥14.6॥

हे निष्पापा! त्या तीन गुणांमधील सत्त्वगुण, निर्मळ प्रकाश उत्पन्न करणारा आणि विकाररहित आहे. तो सुखासंबंधीच्या व ज्ञानासंबंधीच्या अभिमानाने बांधतो.

तत्र सत्त्वं निर्मलत्वात् - या ठिकाणी भगवान सत्त्वगुणाविषयी सांगतात. सत्त्वगुण निर्मळ, प्रकाश उत्पन्न करणारा आणि विकाररहित आहे पण तरीसुद्धा तो आपल्याला सुखासंबंधीच्या व ज्ञानासंबंधीच्या अभिमानाने बांधून ठेवतो.

विद्यार्थ्यांनी समयपालन, स्वाध्याय, अभ्यास यात लक्ष घालायलाच हवे. आरंभी हे सर्व आवश्यक आहे. पण यानंतर त्यांना सुख मिळते. सुख आणि ज्ञान मिळाल्यावर आपण परमलक्ष्य साधले असे वाटते. परंतु यापुढेही जीवाला जायचे असते. सत्त्वगुण सोन्याच्या दोरीसारखा आहे. तो आरंभी सुख देतो पण नंतर तो अभिमानाने बांधतो.

14.7

रजो रागात्मकं(म्) विद्धि, तृष्णासङ्गसमुद्भवम्।
तन्निबध्नाति कौन्तेय, कर्मसङ्गेन देहिनम्॥14.7॥

हे अर्जुना! रागरुप रजोगुण इच्छा व आसक्ती यांपासून उत्पन्न झालेला आहे, असे समज. तो या जीवात्म्याला कर्मांच्या आणि त्यांच्या फळांच्या संबंधाने बांधतो.

रजोगुणाला क्रियाशील म्हंटले आहे. जेव्हा या क्रियेत आसक्ती वाढते  तेव्हा ही आसक्ती रजोगुणी ठरते. एखादा पदार्थ खाण्याची इच्छा निर्माण झाल्यास त्यासंबंधीच्या क्रिया सुरू होतात. सत्त्वगुणातही आपण क्रिया करत असतो. पण कधी कधी आसक्ती  तीव्र झाल्यास तृष्णा वाढते. तृष्णा आणि संग यामुळे इच्छा पूर्ण करण्यासाठी मनुष्य चुकीच्या मार्गाला लागतो. तिसऱ्या अध्यायात हीच गोष्ट सांगितली आहे.
काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भव:l 
महाशनो महापाप्मा विध्येनमिह वैरिणम् ll३.३७ll
रजोगुणापासून उत्पन्न झालेला हा कामच क्रोध आहे. हा भोगांनी कधीही तृप्त न होणारा व मोठा पापी आहे. हाच या विषयातील वैरी आहे असे तू जाण असे भगवान म्हणतात.

दीपावलीच्या मंगल शुभेच्छा देऊन सत्त्वगुणाचा प्रकाश आपल्या अंत:करणात प्रकाशित करावा ही इच्छा प्रगट करून प्रश्न उत्तरांना सुरुवात झाली.

प्रश्न उत्तरे :-
१- छाया दीदी - प्रकृती आणि पुरुष यांच्या संयोगाने सृष्टी निर्माण होते असे सांगितले आहे. त्यात १२.५ हे प्रमाण कशासाठी आहे?
उत्तर - सृष्टीच्या प्रारंभी सूक्ष्म मात्रांपासून पंचमहाभूते निर्माण झाली. स्थूलरूपाने एकेका तत्वातील इतर तत्वांचे प्रमाण समजावे म्हणून अशी विभागणी सांगितली गेली आहे. समजा अग्नितत्वाचा विचार करायचा असेल तर त्यात पंचमहाभूतांपैकी अग्नितत्व ५०% आणि इतर चार तत्वे १२.५+१२.५+१२.५+१२.५=५०% अशाप्रकारे पाच तत्वांचे प्रमाण असते.

२- साधना दीदी- सत्त्वगुण आपल्याला बांधतो. सत्त्वगुणामुळे अहंकार निर्माण होतो असे तुम्ही सांगितले. पण हा अहंकार कमी करण्यासाठी आम्ही काय करावे?
उत्तर - आपली जेवढी साधना वाढते तेवढे ज्ञान वाढते. ज्ञान वाढल्यावर अहंकार तर येतोच. अहंकार कमी करण्यासाठी गीतापरिवारात सेवा, स्वाध्याय आणि साधना करायला सांगितली आहे.

३- रेखादीदी - आपल्याला सुतक असेल गीता वाचता येईल का?
उत्तर - गीता वाचायला हरकत नाही.  त्याचे पाठ करता येतील. फक्त मंदिरात जाऊ नका.

४-रितादीदी - तन्मात्रा म्हणजे काय?
उत्तर- अग्नी आपल्याला दिसतो पण सृष्टीच्या प्रारंभी तो सूक्ष्म रूपात होता याला तन्मात्रा म्हटले आहे. सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी तो तन्मात्रेत म्हणजे सूक्ष्म मात्रेत होता.

५- सरला दीदी - मी सत्त्वगुणात प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करते आहे. सेवा, साधना व स्वाध्याय याविषयी मला मार्गदर्शन करा.
उत्तर- दिवसभर आपण कोणत्या ना कोणत्या प्रकारे सेवा करावी. सद्ग्रंथांचे वाचन करावे.  साधनेच्या सर्व गोष्टी दिनाचर्येनुसार जरूर कराव्या. हळूहळू प्रयत्नाने तुम्हाला सत्त्वगुणात प्रवेश करता येईल.

६- मीना दीदी - मला व्रती व्हायचे आहे त्यासाठी मी रोज किती श्लोक पाठ करावे?
उत्तर- नियमितपणे वेळ देऊन रोज ठराविक श्लोक पाठ करावे. नियम, सातत्य सोडू नये.

७- रेणू दीदी - तुमच्या मागे नेहमी दोन फोटो असतात त्यापैकी एक स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज आहेत तर दुसरे कोण ?
उत्तर- दुसरा फोटो स्वामी विवेकानंदजींचा आहे.

पूर्वजन्मीचे संस्कार या जन्मात येतात का?
हो.एका जीवनात आपण साधना पूर्ण करू शकत नाही म्हणून आपल्याला परत जन्म घ्यावा लागतो.

प्रश्नोत्तरानंतर समापन प्रार्थना आणि हनुमान चालीसाने गुणत्रयविभाग विभागयोग या चौदाव्या अध्यायाच्या विवेचनाच्या पूर्वार्धाची सांगता झाली.
||श्रीकृष्णार्पणमस्तु||