विवेचन सारांश
भगवंताच्या ऐश्वर्याचे वर्णन

ID: 6027
मराठी
रविवार, 08 डिसेंबर 2024
अध्याय 10: विभूतियोग
1/3 (श्लोक 1-10)
विवेचक: गीता विदूषी सौ वंदना जी वर्णेकर


परंपरेप्रमाणे आरंभीची प्रार्थना आणि दीपप्रज्वलन झाले.
वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम्।
देवकीपरमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्॥
सध्या गीता परिवारात गीताजयंतीचा उत्सव धुमधडाक्यात साजरा होतो आहे. गीताजयंतीच्या निमित्ताने बालकांनी ग्रंथदिंडी काढण्याचे अद्भुत कार्य केले. भगवद्गीतेचे महत्त्व अवर्णनीय आहे. विवेचनाच्या माध्यमातून आज आपण  विभूतियोग  जाणून घेणार आहोत.
यानंतर गुरुवंदना झाली. जगद्गुरू श्रीकृष्णांना वंदन करण्यात आले. माता सरस्वती, भगवान वेदव्यास, ज्ञानेश्वर महाराज आणि परमपूज्य स्वामी गोविंद देव गिरि महाराजांना वंदन करण्यात आले. भगवद्गीतेला वंदन करण्यात आले.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः।
गुरु: साक्षात्परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥
ॐ कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने ॥
प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः ॥

नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहम्।
पूर्णब्रह्मपरानन्दमीशं आळन्दिवल्लभम्॥

यानंद श्रुतिमंत्र शक्ति महती ब्रह्मात्म विद्यावती
यासूत्रोदित शास्त्रपद्धतिरति प्रद्योदिनान्तरद्युतिः।
या सत्काव्यगतिप्रसादितर्मतिर्नानागुणालंकृति:
सा प्रत्यक्ष सरस्वती भगवती मान्त्रायतां भारती॥

ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयम्
व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम्।
अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीमष्टादशाध्यायिनीम्
अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्॥

नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र।
येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः॥

सर्व गीताप्रेमी साधकांना वंदन करून विवेचनाची सुरुवात झाली. गुरुदेवांनी आपल्याला दिव्यदृष्टी दिलेली आहे. अशीच दिव्यदृष्टी अर्जुनाला अकराव्या अध्यायात भगवंताने विश्वरूप दर्शन दाखवताना दिली होती. आज विभूतियोग आपण बघणार आहोत. भगवद्गीता हे अनुपमेय गीत आहे. गीता हा एकमेव ग्रंथ असा आहे ज्याची मार्गशीर्ष शुध्द एकादशीला जयंती साजरी होते. याच दिवशी महाभारत युद्धाचा आरंभ झाला होता. भगवद्गीता इतकी मंत्रमय आहे की त्यामुळे आपण भगवंताच्या निकट जातो. भगवंत सच्चिदानंद आहेत. त्या आनंदाने विश्व भरून जावे म्हणून मी माझ्या वाणीचा विस्तार करतो आहे असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात - 
तैसा वाग्विलास विस्तारु, गीतार्थेसी विश्व भरू ।
आंनदाचे आवारू, मांडू जगा ॥
   
गीतेला अंब म्हंटले आहे. मनुष्य देह नसून चैतन्य आहे. परब्रह्म परमात्मा अंश स्वरूपात आपल्या अंतरंगात आहे  ही वेगळी ओळख करून देणारी भगवद्गीता अंबा आहे. 
परमात्मा जिथे विशेषत्वाने प्रकट होतो ती स्थाने सांगणारा हा विभूतियोग आहे. नववा अध्याय हा ज्ञान, कर्म आणि भक्तियोगाचा संगम आहे. याचा अभिप्राय, तात्पर्य जीव, जगत आणि परमेश्वर यांचा परस्पर संबंध नवव्या अध्यायात स्पष्ट करुन भगवंतांनी सांगितला. परंतु हे सर्व समजून घेण्यास अर्जुन तेवढा पात्र नव्हता, तर आपली काय कथा ! 
म्हणौनि नवमींचिया अभिप्राया, सहसा मुद्रा लावावया।
बिहाला मग मी वायां, गर्व कां करूं ? ॥
जिथे अर्जुनालाच तो अभिप्राय समजून घेणे कठीण जात होते तिथे मी काय गर्व करावा असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात.

नवव्या अध्यायात भगवंत म्हणतात - समोऽहं सर्वभूतेषु न मे द्वेष्योऽस्ति न प्रियः। ते म्हणतात मी सर्व प्राणिमात्रात समान आहे. मला कोणाचाही द्वेष नाही अथवा कोणीही मला प्रिय नाही. भगवंत समत्व समजावून देतात.
समोर ११ अक्षौहिणी सेना आहे; त्यातील दुर्योधन दुःशासन यांनी द्रौपदीचे चीरहरण केले. यांच्यात मी समत्व कसे पाहू असा विचार अर्जुनाच्या मनात येतो. भगवंत सर्वत्र समत्व पहावे असे सांगतात पण हे सामान्य माणसासाठी हे सोपे नाही. गाळाने भरलेल्या तलावात पडलेली अंगठी दिसत नाही. पण पाणी स्थिर असेल, गाळ खाली बसलेला असेल तर अंगठी चटकन दिसते. समत्व साधण्यासाठी ही मनःस्थिती प्रथम साधावी लागते.

विभूतीयोगाविषयी विनोबाजी म्हणतात, लहान मुलाला अक्षर ओळख करुन देताना प्रथम सोपी अक्षरे शिकवतात मग त्यांना संयुक्त अक्षरे शिकवतात तसेच भगवंत आता त्यांना कुठे कुठे पाहावे याची सोपी उदाहरणे प्रथम अर्जुनाच्या माध्यमातून साधकांना देतात. त्यातून मग पुढे अकराव्या अध्यायात विश्वरूपदर्शन भगवंत देतात. आता या अध्यायात भगवंत त्यांच्या विभूती सांगतात. ज्ञानेश्वर महाराज या संदर्भात म्हणतात -
ते सद्भावे जीवगत I अतुल दिसती फाकत I
स्फटिक गृहीचे डोलत I दीप जैसे II
स्फटिकाच्या आवरणातील दीपकाची ज्योती अधिक प्रकाशमय दिसते. तसेच ज्यांचे अंतःकरण शुद्ध आहे, सृष्टीतील ज्या गोष्टींच्या अनुभवाने आपल्या मनाला अंतरातील आत्मारामचा अनुभव येतो अशा ठिकाणी भगवंतांची प्रचिती येते. अशा विभूतींविषयी भगवंत इथे सांगतात ते पाहू.

10.1

श्रीभगवानुवाच
भूय एव महाबाहो, शृणु मे परमं(म्) वचः।
यत्तेऽहं(म्) प्रीयमाणाय, वक्ष्यामि हितकाम्यया॥10.1॥

श्रीभगवान म्हणाले, हे महाबाहो! आणखीही माझे परम रहस्यमय आणि प्रभावयुक्त म्हणणे ऐक. जे मी अतिशय प्रेमी अशा तुला तुझ्या हितासाठी सांगणार आहे.

नवव्या अध्यायात भगवंतांनी मुख्य उपदेश सांगून संपवला. भगवंत इथे म्हणतात - भूय एव महाबाहो. त्यांना अर्जुनाला शोकाकुल अवस्थेतून बाहेर काढायचे आहे. त्याचा उत्साह जागा करण्यासाठी ते त्याला महाबाहो या विशेषणानी संबोधतात. सृष्टीत मला तुमचा अनुभव कुठे येईल असा अर्जुनाला प्रश्न पडला आहे हे जाणून भगवंत इथे स्वतः सांगायला सुरुवात करतात.

भगवंत म्हणतात माझे - भूय म्हणजे - पुन्हा एकदा - शृणु मे परमं वचः - माझे परम वचन ऐक. ते पुन्हा सांगतात कारण अर्जुन त्यांच्यासाठी अत्यंत प्रिय आहे. गुरुदेव म्हणतात, भगवद्गीतेचे श्रवण करायचे असेल तर अर्जुनाच्या स्थानी आपण आहोत अशी कल्पना करावी. आपल्या आयुष्यात जी काही कुंठा आहे म्हणजे जो काही अवरोध आहे तो दूर करून वैकुंठाला नेणारे भगवंत आहेत. त्यांच्या हाती आपल्या जीवनाचे सारथ्य द्यावे.
आता अर्जुन भगवंतांना एवढा का प्रिय आहे हे सांगताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात -
तू सुमनू शुद्ध मती I अनिंदकु अनन्य गती I 
गौप्य तरी तुज प्रति I  चावळीजे II 
तू चांगल्या मनाचा आहेस, तुझी मती शुद्ध आहे. तू कोणाची निंदा करत नाहीस. शरण येणे तुझ्याकडून शिकावे. एक अक्षौहिणी सेना नाकारून अर्जुनाने निःशस्त्र भगवंतांना निवडले होते. मग त्याला गौप्य, रहस्य सांगायचे नाही तर कोणाला?
भगवंत म्हणतात, तू मला अत्यंत प्रिय आहेस त्यामुळे मी तुला हे पुन्हा सांगतो आहे. अर्जुन भगवंतांचा भक्त आहेच पण ही एकतर्फी भक्ती नाही. भगवंतांना देखील अर्जुन तितकाच प्रिय आहे. भक्त म्हणजे विभक्त नाही तो. भगवंतांचा आणि अर्जुनाचा असा भक्तसंबंध आहे.
भगवंत म्हणतात प्रीयमाणाय - माझ्याप्रत जो तुझा भक्तिभाव आहे आणि तसाच प्रियभाव माझा तुझ्याप्रत आहे त्या तुला मी तुझ्या हितकाम्यया - हितासाठी पुन्हा माझे वचन सांगतो आहे. भगवंत स्वतः ज्ञानाचा स्रोत खुला करतात. भगवंतांचा अर्जुनाच्या प्रति असलेल्या प्रेमाने ज्ञानाचा मार्ग खुला होतो. मनाने आपण प्रेम करतो, बुद्धीला ज्ञान होत असते. यांचा समन्वय होत असतो. भगवंत स्वतःचा परिचय पुन्हा एकदा अर्जुनाला या अध्यायातून देतात.

10.2

न मे विदुः(स्) सुरगणाः(फ्), प्रभवं(न्) न महर्षयः।
अहमादिर्हि देवानां(म्), महर्षीणां(ञ्) च सर्वशः॥10.2॥

माझी उत्पत्ती अर्थात् लीलेने प्रकट होणे ना देव जाणत ना महर्षी. कारण मी सर्व प्रकारे देवांचे व महर्षीचे आदिकारण आहे.

तू प्रेमळ आहेस अर्जुना असे भगवंत म्हणतात. स्वतःसाठी जगणे आणि सर्वांसाठी जगणे यात फरक आहे. व्यष्टी, समष्टी, सृष्टी आणि परमेष्ठी यांच्या दृष्टीने जीवन जगायला हवे. स्वतःच्या म्हणजे व्यष्टी च्या पलीकडे जाऊन समष्टी, सृष्टी आणि परमेष्ठी यांचा विचार करणे हा भगवंतांच्या प्रेमाच्या पात्रतेचा एक निकष आहे. अशी दृष्टी झाली की व्यक्ती परमात्म्याच्या प्रेमाला पात्र होते.
व्यक्तिगत संतुलन हा योग आहे आणि सार्वत्रिक संतुलन हा धर्म आहे असे परमपूज्य गुरुदेव म्हणतात.
१. व्यष्टी म्हणजे व्यक्तिगत जीवन
२. समष्टी म्हणजे समाज
३. सृष्टी म्हणजे जिच्यामुळे जीवन चालते
क्या धरा हमने बनाई या बुना हमने गगन
क्या हमारी ही वजह से बह रहा सुरभित पवन।
४. तसेच परमेष्ठी म्हणजे परमात्मा, सृष्टीकर्ता
या सर्वांच्यात संतुलन, समत्व राखणे हाच धर्म आहे हे गुरुदेव म्हणतात.
मे प्रभवं सुरगणाः न महर्षयः विदुः - भगवंत म्हणतात माझी उत्पत्ती देवगण किंवा महर्षी जाणत नाहीत.
अहम् देवानां महर्षीणां च सर्वशः आदिर्हि - मी सर्व देवतांचा, महर्षींचाही आदी आहे.

पुत्राचा जन्म होतो तेव्हा तो जन्मानंतरचे सगळे जाणतो पण आधीचे काही जाणू शकत नाही. मुलाला त्याच्या जन्माआधी त्याचे माता पिता कसे राहत होते याची काही कल्पना नसते. तसेच महर्षी आणि देवतांना सुद्धा त्याचप्रमाणे सृष्टीची निर्मिती कशी झाली हे जाणता येत नाही. भगवंत नवव्या अध्यायात म्हणतात -
पिताऽहमस्य जगतो माता धाता पितामहः।
वेद्यं पवित्रमोंकार ऋक्साम यजुरेव च।।९.१७।।
या जगाला धारण करणारा व कर्मफल देणारा, आई-वडील, आजोबा, जाणण्याजोगा पवित्र ओंकार, तसेच ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेदही मीच आहे.
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात- 
अगा उदरीचा गर्भु जैसा I
न देखे आपुलिया मातेच्या वयसा
आईच्या उदरातील गर्भ आईचे वय जाणत नाही. तसेच ज्यांच्या गर्भातून सृष्टी उत्पन्न झाली आहे ती सृष्टी त्या परमपित्याला जाणू शकत नाही.
त्यामुळे भगवंत म्हणतात ज्यांच्यावर माझे आत्यंतिक प्रेम आहे त्यांनाच मी हे गूढ सांगतो असे भगवंत अर्जुनाला म्हणतात. अर्जुन भगवंतांना अत्यंत प्रिय असल्याने ते त्याच्याजवळ हे रहस्य उलगडतात. त्यामुळे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात -
अर्जुनच स्तवावा I
ऐसे वाटते माझ्या जीवा I
अर्जुनाचेच स्तवन करावे, त्याचीच स्तुती करावे, त्याच्यासारखे व्हावे असे ज्ञानेश्वर महाराजांना वाटते. कारण अर्जुनाच्या स्वभावामुळे तो भगवंतांना प्रिय झाला आणि त्यांनी त्याला गुह्य ज्ञान दिले.

10.3

यो मामजमनादिं(ञ्) च, वेत्ति लोकमहेश्वरम्।
असम्मूढः(स्) स मर्त्येषु, सर्वपापैः(फ्) प्रमुच्यते॥10.3॥

जो मला वास्तविक जन्मरहित, अनादी आणि लोकांचा महान ईश्वर असे तत्त्वत: जाणतो, तो मनुष्यात ज्ञानी असणारा सर्व पापांपासून मुक्त होतो.

य: माम् अजमनादिं लोकमहेश्वरम् च वेत्ति - भगवंत स्वतःचे वर्णन करतात. अज म्हणजे ज्याचा जन्म होत नाही. अनादी म्हणजे ज्याचा आदि किंवा आरंभ माहीत नाही. स्वित्झर्लंड च्या जवळ जमिनीखाली खूप मोठी प्रयोगशाळा उभारली गेली होती. तिथे God particle चा शोध घेण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु परमात्मा असा जाणता येत नाही. भगवंत म्हणतात मी अज आणि अनादी आहे. ईश्वर म्हणजे नियंता, महेश्वर म्हणजे महान नियंता आणि लोकमहेश्वर म्हणजे परमात्मा, सर्व सृष्टीचा नियंता आहे.
सूर्यमालेत सर्व ग्रह गोल सूर्याभोवती फिरतात. सर्व ग्रह आपल्या कक्षातून फिरतात. या सर्वात एक नियम आहे. त्याचा नियंता कोण आहे - तर तो परमात्मा आहे.
हे सर्व जो जाणतो तो असम्मूढः आहे. ज्याला हे समजते तो सर्वपापैः प्रमुच्यते - सर्व पापातून मुक्त होतो. पाप म्हणजे संदिग्धता, अज्ञान, भ्रांती. तो असम्मूढः या सर्व भ्रांतीतून, कुंठेतून, अवरोधातून मुक्त होतो.
भगवंत म्हणतात हे तत्वतः जाणणाऱ्याच्या मनातील सर्व अवरोध दूर होतात.

10.4

बुद्धिर्ज्ञानमसम्मोहः, क्षमा सत्यं(न्) दमः(श्) शमः।
सुखं(न्) दुःखं(म्) भवोऽभावो, भयं(ञ्) चाभयमेव च॥10.4॥

निर्णयशक्ती, यथार्थ ज्ञान, असंमूढता, क्षमा, सत्य, इंद्रियनिग्रह, मनोनिग्रह, सुख-दुःख, उत्पत्ति प्रलय, भय अभय, अहिंसा, समता, संतोष, तप, दान, कीर्ति-अपकीर्ति असे हे प्राण्यांचे अनेक प्रकारचे भाव माझ्यापासूनच होतात.

10.4 writeup

10.5

अहिंसा समता तुष्टि:(स्), तपो दानं(म्) यशोऽयशः।
भवन्ति भावा भूतानां(म्), मत्त एव पृथग्विधाः॥10.5॥

भगवंत अनंतकोटी ब्रह्मांडनायक आहेत. आपली पृथ्वी या संपूर्ण विश्वात धुलीकणासमान आहे. भगवंत म्हणतात या सृष्टीतील सर्व Hardware आणि Software मीच आहे.  बुद्धि:, ज्ञान, असम्मोहः, क्षमा, सत्यम्, दम:, शमः सुखम्, दुःखम्, भव:, अभाव:, भयम्, अभयम्, अहिंसा, समता, तुष्टि:, तप: दानम्, यश: अयशः इति भावा: मत् एव पृथग्विधाः भवन्ति. बुद्धी, ज्ञान, क्षमा, सत्य, दम, शम, भय, अभय, अहिंसा समता आदि सर्व भाव माझ्यातून उत्पन्न होतात असे भगवंत म्हणतात.

बुद्धींतून ज्ञान येते, ज्ञानातून असंमोह म्हणजे अज्ञान नाहीसे होते. त्यातून क्षमा येते. क्षमा म्हणजे सहनशीलता. आपल्याला अपमान सहन होत नाही. क्षमा म्हणजे सहनशीलता तसेच माफ करण्याची वृत्ती. पुढे सत्य, इंद्रियांचे दमन आणि मनाचे शमन परमात्म्यातून निर्माण होते. सुख, दुःख म्हणजे अनुकूल आणि प्रतिकूल तसेच भव म्हणजे उत्पत्ती, अभाव म्हणजे विलय परमात्म्यातून येते. भय म्हणजे भिती. काही ठिकाणी भय आवश्यक असते. नदीच्या प्रचंड प्रवाहाचे आवश्यक तेवढे भय असावे लागते. विजेच्या झटक्याचे भय असायला हवे. भय आणि अभय परमात्म्यातूनच निर्माण होते.

काया, वाचा, मनाने कोणाची हिंसा करु नये ही भावना परमात्म्यातूनच येते. तसेच समता - समत्वम् योग उच्यते असे भगवंतानी म्हटले आहे. भगवंतांना समता प्रिय आहे. संतुष्टी, दान, यश, अपयश असे सर्व परस्परविरोधी भाव परमात्म्यातूनच उत्पन्न होतात. भगवंत आपल्या वैभवाचा परिचय देत आहेत. या सर्व भाव भावनातून सृष्टीचे कार्य चालते. केवळ Hardware म्हणजे इंद्रिये आणि देहातून कार्य चालत नाही. हे सर्व भाव भावना आतील Software आहे. त्याशिवाय कार्य चालत नाही.

आजकाल आर्टिफिशियल इंटेलिजेंस विषयी खूप बोलले जाते. त्याद्वारे अनेक लोकांची देहबोली हुबेहूब दाखवतात पण त्यांच्या मनातील भाव तसेच्या तसे उतरवता येत नाहीत.
भगवंत म्हणतात हे सर्व भाव माझ्यातून उत्पन्न होतात. यांचा कर्ता मी आहे. श्रीकृष्णांना भगवंतांचा पूर्णावतार समजले जाते. त्यांच्या चिंतनाने आपल्याला परमात्म्याप्रत पोहोचता येते. ते केवळ साकार नाहीत तर निराकाराचे साकार रूप आहेत हे ध्यानात ठेवले पाहिजे.

आता भगवंत त्यांचे निर्माणकार्य कसे चालते ते सांगतात. स्वयंपाक करताना त्याची सुरुवात कशी होते ? इमारतीचे निर्माण करताना त्याची सुरुवात कशी होते ? चित्रकार चित्र काढतो तेव्हा त्याची कल्पना आधी मनात येते मग ते कागदावर उतरते. दिग्दर्शक चित्रपट सुरु करताना त्याची सुरुवात कशी करतो ? तसेच भगवंत आता निर्मितीची सुरुवात कशी होते ते सांगतात.

10.6

महर्षयः(स्) सप्त पूर्वे, चत्वारो मनवस्तथा।
मद्भावा मानसा जाता, येषां(म्) लोक इमाः(फ्) प्रजाः॥10.6॥

सात महर्षी, त्यांच्याही पूर्वी असणारे चार सनकादिक तसेच स्वायंभुव इत्यादी चौदा मनू हे माझ्या ठिकाणी भाव असलेले सर्वच माझ्या संकल्पाने उत्पन्न झाले आहेत. या जगातील सर्व प्रजा त्यांचीच आहे.

ब्रह्मापासून सृष्टीची निर्मिती झाली आहे. सनत, सनंदन, सनातन आणि सनतकुमार हे चार ब्रह्माचे पुत्र आहेत. १४ मनु आहेत. मनू आणि शतरुपा यांच्यापासूनच सर्व प्रजा निर्माण झाली आहे. आपले वैवस्वत मन्वंतर आहे.
सृष्टीच्या निर्मितीचा क्रम सांगताना भगवान म्हणतात की सृष्टीची निर्मिती ब्रह्माच्या मनातून झाली. ब्रह्माच्या मनात मनुष्याच्या आकृतीची निर्मिती झाली.

प्रज्ञाचक्षु संत गुलाबराव महाराज म्हणतात मनुष्य माकडापासून निर्माण न होता तो ब्रह्माच्या मनाने निर्माण झाला आहे. आर्किटेक्ट सर्वप्रथम घर कसे बनेल याचा मनात विचार करतो. त्याचा मास्टर प्लॅन मनात तयार करतो आणि नंतर तो कागदावर चित्रित करतो. ड्रॉइंग फायनल झाल्यावर घराची निर्मिती होते. किंवा मूर्तिकार आणि चित्रकार आपल्या मनात एक चित्र किंवा मूर्तीची कल्पना करतात मग त्याला आकार देतात. त्याप्रमाणेच ब्रह्माने सर्वप्रथम मनात मनुष्याच्या आकृतीची कल्पना केली.

त्यांनी सर्वप्रथम ४ सनकादिक यांना निर्माण केले. (सनत, सनंदन, सनातन आणि सनतकुमार). ते ब्रह्मचारी असल्यामुळे त्यांच्यापासून प्रजानिर्मिती झाली नाही. नंतर सात महर्षी(मरीची, अंगीरस, अत्रि, पुलस्य, पुलह, क्रतु आणि वसिष्ठ ) नंतर १४ मनू यांची निर्मिती झाली. पहिल्या मन्वतरानंतर मनू आणि शतरुपा यांच्यापासून दांपत्यजीवनाला सुरुवात झाली. भगवान म्हणतात हे सर्व माझ्या संकल्पनेतूनच निर्माण झाले आहे. सर्व प्रजा त्यांचीच आहे. 

भगवान अर्जुनाला आपले ऐश्वर्य सांगताना म्हणतात, प्रत्येक तत्वाच्या मुळाशी मी आहे. ज्याप्रमाणे बीजापासून वृक्ष बनल्यावर बीज दिसत नाही, अलंकार बनल्यावर केवळ दागिनाच दिसतो त्यातील सोने दिसत नाही त्याचप्रमाणे सगळ्या सृष्टीचा जन्म परमात्म्यापासून झाला आहे. तोच बीज आहे. सृष्टीच्या निर्मितीनंतर ईश्वर दिसत नाही.

10.7

एतां(म्) विभूतिं(म्) योगं(ञ्) च, मम यो वेत्ति तत्त्वतः।
सोऽविकम्पेन योगेन, युज्यते नात्र संशयः॥10.7॥

जो पुरुष माझ्या ह्या परमैश्वर्यरूप विभूतीला आणि योगशक्तीला तत्त्वत: जाणतो, तो स्थिर भक्तियोगाने युक्त होतो, यात मुळीच शंका नाही.

जे संपूर्णपणे माझ्या विभूतींना जाणतात ते माझ्यापासून वेगळे होऊ शकत नाहीत. जोपर्यंत आपण संपूर्णपणे भगवंताला समजून घेत नाही तोपर्यंत आपल्या मनात संशय राहतोच. आपले विचार स्थिर होत नाहीत. पण जेव्हा आपल्याला समजते की हे सगळं विश्व परमात्म्यापासून बनले आहे आणि सगळ्यात भगवंत आहे, परमात्मा सृष्टीसोबत आहे वेगळा नाही, तेव्हा अविचल राहून स्थिर मनाने आपण परमात्म्याबरोबर जोडले जातो. अशा भक्तांना भक्तियोगाची प्राप्ती होते. भगवान म्हणतात, मी अनंतकोटी ब्रह्मांडनायक आहे. भगवान विभक्त न होता ते आपल्या अंतरंगात राहतात. जो माझे ऐश्वर्य आणि सामर्थ्य जाणतो, तो स्थिर भक्तियोगाने युक्त होतो यात संशय नाही असे भगवंत सांगतात.
या ठिकाणी गुरुदेव रानडे यांचे उदाहरण दिले आहे. त्यांना शंकर शेठ शिष्यवृत्तीसाठी मंत्र म्हणावयास सांगितला. शिष्यवृत्ती मिळाल्यानंतरही त्यांनी मंत्रजप सोडला नाही. तो त्यांचा नियम झाला. अशा प्रकारे त्यांची सकाम भक्ती निष्काम भक्तीत रूपांतरीत झाली.

10.8

अहं(म्) सर्वस्य प्रभवो, मत्तः(स्) सर्वं(म्) प्रवर्तते।
इति मत्वा भजन्ते मां(म्), बुधा भावसमन्विताः॥10.8॥

मी वासुदेव सर्व जगाच्या उत्पत्तीचे कारण आहे आणि माझ्यामुळेच सर्व जग क्रियाशील होत आहे, असे जाणून श्रद्धा व भक्तीने युक्त असलेले बुद्धिमान भक्त मज परमेश्वरालाच नेहमी भजतात.

अहं सर्वस्य प्रभवो मी सृष्टीच्या उत्पत्तीचे कारण आहे. प्रभाव म्हणजे उत्पत्ती. प्रलय म्हणजे विलय. 
विज्ञानात E = mc2 शिकवले जाते. यात m म्हणजे मॅटर अथवा पदार्थ. E म्हणजे ऊर्जा. विज्ञान स्थूलातून सूक्ष्माची निर्मिती होते असे म्हणते. वेदांतात याउलट सांगितले आहे. वेदांतानुसार सूक्ष्मापासून स्थूलाची निर्मिती झाली आहे. मनातील सूक्ष्म संकल्पाद्वारे स्थूलाची निर्मिती होते. 
भगवंत पुढे म्हणतात - मत्त: सर्वं प्रवर्तते आणि माझ्यापासून सगळ्या जगाचे चलन वलन होत आहे. जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय माझ्यामुळे आहे. 
विद्युत चुंबकीय क्षेत्रात वाहक  फिरतो तेव्हा त्याच्यातून विद्युतधारा वाहू लागते. त्याचप्रकारे जगत जेव्हा ब्रह्मांडाच्या ऊर्जेत फिरते तेव्हा त्याच्यात चैतन्यशक्ती उत्पन्न होते.
भजन्ते  याचा अर्थ भगवंताचे काम करताना भक्ती करणे, प्रेम करणे आणि परमात्म्याशी प्रेमाने एकरूप होणे. ईश्वराचे प्रेम जेव्हा पाण्याच्या धारेप्रमाणे वाहते तेव्हा ती सर्वोच्च भक्ती असते. ज्याच्या अंतःकरणातून प्रेमधारा वाहतात तो सर्वोच्च भक्त आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात  गंगामैया सागराला मिळून एकरूप होउन जाते त्याप्रमाणे प्रेमधारा अंतःकरणापासून निर्माण झाल्यास ती परमभक्ती बनते. आणि नंतर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याप्रमाणे  जे जे भेटे  भूत ते ते मानिजे भगवंत l  यानुसार जे जे समोर येईल  ते ईश्वराचे रूप मानणे हेच भक्तीचे रूप आहे. असे जाणणारा श्रद्धा व भक्तीने युक्त असलेला बुद्धिमान भक्त मलाच भजतो.

10.9

मच्चित्ता मद्गतप्राणा, बोधयन्तः(फ्) परस्परम्।
कथयन्तश्च मां(न्) नित्यं(न्), तुष्यन्ति च रमन्ति च॥10.9॥

निरंतर माझ्यात मन लावणारे आणि माझ्यातच प्राणांना अर्पण करणारे माझे भक्तजन माझ्या भक्तीच्या चर्चेने परस्परांत माझ्या प्रभावाचा बोध करीत तसेच गुण व प्रभावासह माझे किर्तन करीत निरंतर संतुष्ट होतात आणि मज वासुदेवातच नेहमी रममाण होत असतात.

मच्चित्ता मद्गतप्राणा - ज्याच्या चित्तात माझ्याविषयीचे प्रेम निरंतर वाहत असते, जे माझ्यातच प्राणांना अर्पण करतात ते - बोधयन्तः परस्परम् - एकमेकात चर्चा करुन, आपापली अनुभूती एकमेकांना सांगून - कथयन्तश्च मां नित्यन् - परमात्म्याची निरंतर स्तुती करत, चिंतन करत - तुष्यन्ति च रमन्ति च - माझ्यातच रममाण होतात.  
भगवंत म्हणतात ते माझ्यात रममाण होतात कारण ते माझे रहस्य जाणतात. भगवंतांप्रत जे प्रेम आपल्यात आहे ते सर्वांमध्ये यावे असे त्यांना वाटते. दोन भक्त जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा त्यांची भेट कशी असते हे सांगताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात -
जवळकेंचीं सरोवरें जैशीं । उचंबळलिया कालवती परस्परें ।
मग तरंगासि धवळारें । तरंगचि आश्रय ॥
जेव्हा दोन जलाशय एकमेकात मिसळतात तेव्हा त्यांच्या लाटा उचंबळून येतात तसे जेव्हा दोन भक्त एकत्र येतात तेव्हा त्यांना परमात्म्याच्या भक्तीचा उमाळा येतो.
तुकाराम महाराज आपल्या अभंगातून म्हणतात -
घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचें ॥
तुम्ही घ्या रे डोळे सुख । पाहा विठोबाचें मुख ॥
तुम्ही ऐका रे कान । माझ्या विठोबाचे गुण ॥
मना तेथें धांव घेई । राहें विठोबाचे पायीं ॥
वाणीने विठ्ठलाचे गोड नाम घ्यावे, डोळ्यांनी विठ्ठलाचे सुंदर मुख बघावे, कानांनी विठ्ठलाचे गुण ऐकावे, मन विठ्ठलाच्या चरणी ठेवावे.
अंतकरण चतुष्ट्य यात मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार येतात. तुलसीदास परमात्म्याची स्तुती करताना म्हणतात 
इति वदति तुलसीदास शंकर शेष मुनि मन रंजनं।
मम हृदय कंज निवास कुरु कामादि खलदल गंजनं।।
माझ्या मनातील विकार नष्ट व्हावे. अविनाशी अविकारी ईश्वरात मन आणि बुद्धी एकाग्र केल्याने मनाचे विकार, अहंकार नष्ट होतात. इथे चित्तवृत्तींना सोडून परमात्म्याशी एकरूप होणे सहज शक्य होते. 

10.10

तेषां(म्) सततयुक्तानां(म्), भजतां(म्) प्रीतिपूर्वकम्।
ददामि बुद्धियोगं(न्) तं(म्), येन मामुपयान्ति ते॥10.10॥

त्या नेहमी माझे ध्यान वगैरेमधे मग्न झालेल्या आणि प्रेमाने भजणा-या भक्तांना मी तो तत्वज्ञानरूप योग देतो. ज्यामुळे ते मलाच प्राप्त होतात.

भगवंत म्हणतात -
तेषां सततयुक्तानाम् 
नेहमी माझे ध्यान करण्यात मग्न झालेल्या 
भजतां प्रीतिपूर्वकम्  मला प्रेमाने भजणाऱ्या माझ्या भक्तांना
ददामि बुद्धियोगन् मी बुद्धियोग देतो. भगवद्गीतेच्या नवव्या अध्यायात म्हटले आहे 
अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम्।।९.२२।।
जे अनन्य प्रेमी भक्त मला परमेश्वराला निरंतर चिंतन करीत निष्काम भावनेने भजतात, त्यांचा योगक्षेम मी चालवतो. ज्ञानेश्वर महाराज सर्व भूतमात्रात भगवंताला बघत. ते म्हणत जे जे भेटे भूत ते ते मानी भगवंत l संत जनाबाईने अशीच परमेश्वराची सगुण भक्ती केली. पंढरपूरला नामदेवाच्या घरी राहून जनाबाईने ईश्वरप्राप्ती मिळवली. ती म्हणते -
देव खाते देव पीते ।
देवावरी मी निजतें ॥१॥
देव देते देव घेते ।
देवासवें व्यवहारिते ॥२॥
देव येथें देव तेथे ।
देवाविणें नाहीं रीतें ॥३॥
जनी म्हणे विठाबाई ।
भरुनि उरलें अंतरबाहीं ॥४॥
असे म्हणून ती नेहमी भगवंताशी समर्पण भावाने राहत असे. श्रीकृष्णावर प्रेम करणाऱ्या गोपी अशाच प्रकारच्या होत्या.
एकनाथ महाराज तर सर्व भूतमात्रात भगवंताला बघत म्हणूनच पोळी पळवणाऱ्या कुत्र्याच्या मागे तूप राहिले म्हणून तुपाची वाटी घेऊन ते धावले होते. असे सतत भगवंताचे चिंतन मनन करणारे भक्त भगवंतालाच जाऊन प्राप्त होतात.
यानंतर अर्जुन भगवंताला प्रश्न विचारतो त्याचे स्पष्टीकरण पुढील आठवड्यात होणार आहे असे सांगून प्रश्न उत्तरांना सुरुवात झाली.

प्रश्नोत्तरे :-
१- गीतांजली ताई - मुले घराबाहेर पडल्यावर त्यांच्या विषयी चिंता वाटून मनात वाईट विचार येतात ते येऊ नये म्हणून मी काय करावे?
उत्तर- मनात असा विचार येऊ नये म्हणून आपल्या संत महात्म्यांनी असा उपदेश केला आहे की मन सकारात्मक गोष्टीत लावावे. काही चांगले काम केल्याने चांगल्या गोष्टीत मन लागते. राम राम लिहावे. सकारात्मक क्रिया जर आपल्या आयुष्यात जोडल्या गेल्या तर वृत्ती सकारात्मकतेकडे जाते.

२- रोहिणी ताई - तुम्ही संत जनाबाईचे उदाहरण दिले त्यांच्यासारखे होण्यासाठी आपण काय करावे?
उत्तर - जनाबाई जवळ ऐश्वर्य, बुद्धी नव्हती. परंतु निरंतर प्रेमधारा विठ्ठलाच्या चरणी तिने वाहिली. आपण किती वेळ ईश्वरावर अपेक्षेशिवाय प्रेम करू शकतो हे बघावे. ज्ञानेश्वरे महाराजांनी म्हटले आहे -
देवाचिये द्वारी उभा क्षणभरी । तेणे मुक्ती चारी साधियेल्या ।। आपणही काहीही न मागता भगवंताची उपासना करावी.

३-  भागवत दादा - उत्पत्ती भगवंतापासून होते तर इतरही धर्मीयांची उत्पत्ती भगवंताकडूनच झाली. मग ते धर्मद्वेष का करतात ? भांडणे का होतात?
उत्तर- आपण जेव्हा असे समजू की भगवंताने चांगल्या आणि वाईट गोष्टी निर्माण केल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक धर्मात चांगले किंवा वाईट लोक असतात. आपण चांगल्याच गोष्टी उचलून घ्याव्या. सज्जनांच्या सहवासात रहावे. संघटित राहून चांगली कर्मे करावी पण सावध राहावे.

४- सुरेंद्र भैय्या - नवव्या अध्यायातील विसाव्या श्लोकात तीनच वेदांचे वर्णन का केले?
उत्तर - सुरुवातीला ऋग्वेद, यजुर्वेद, आणि सामवेद हे तीनच वेद होते. त्यानंतर यातूनच अथर्ववेद निर्माण झाला आहे. 

प्रश्नोत्तरानंतर समापन प्रार्थना आणि हनुमान चालीसाने या विवेचनाची सांगता झाली.
। । श्रीकृष्णार्पणमस्तु । ।