विवेचन सारांश
ब्रह्मनिर्वाण प्राप्तीचा कर्मसंन्यास मार्ग
आपण कर्मसंन्यासयोग नामक पाचव्या अध्यायाची चर्चा करत आहोत. मागील सत्रात आपण पाहिले की प्रारंभीच अर्जुनाने भगवंतांना प्रश्न विचारला होता,
यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम् ॥ ५-१ ॥
कर्मयोगाचा विस्तार आपण कर्मसंन्यासयोगात बघतो आहोत. कर्मसंन्यासासाठी संन्यास घेण्याची, भगवी वस्त्रे धारण करण्याची गरज नसते. गृहस्थाला कर्मांचा त्याग करून कर्मसंन्यास करता येतो. बाह्यात्कारी संन्यासी व कर्मयोगी हे वेगवेगळे वाटत असले तरी त्यांची अंतरंगाची अवस्था एकसारखीच असते. निरपेक्ष भावनेने कर्म करून ते कर्म व त्याचे फळ भगवंतांना अर्पण करणे, त्याच्या कर्तेपणाच्या भावनेचा त्याग करणे हा कर्मयोग संन्याशासाठीही आवश्यक असतो. कर्मयोगाचे आचरण केले नाही तर पदरी दु:ख पडणारच.
ब्रह्मण्याधाय कर्माणि सङ्गं त्यक्त्वा करोति यः ।
5.11
कायेन मनसा बुद्ध्या, केवलैरिन्द्रियैरपि।
योगिनः(ख्) कर्म कुर्वन्ति, सङ्गं(न्) त्यक्त्वात्मशुद्धये॥5.11॥
युक्तः(ख्) कर्मफलं(न्) त्यक्त्वा, शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम्꠰
अयुक्तः(ख्) कामकारेण, फले सक्तो निबध्यते॥5.12॥
सर्वकर्माणि मनसा, सन्न्यस्यास्ते सुखं(म्) वशी।
नवद्वारे पुरे देही, नैव कुर्वन्न कारयन्॥5.13॥
न कर्तृत्वं(न्) न कर्माणि, लोकस्य सृजति प्रभुः।
न कर्मफलसंयोगं(म्), स्वभावस्तु प्रवर्तते॥5.14॥
जे कर्म केले त्याचे कर्तृत्व (एखादे कर्म मी केले हा भाव), ते कर्म आणि त्या कर्मफळाचा संयोग (फळ प्राप्त करून देणे) हे भगवंत करत नाहीत. भगवंतांवर नेहमी आरोप ठेवला जातो, की ते पक्षपात करतात. एखाद्याला घबाड मिळवून देतात आणि दुसर्यावर नाराज होऊन त्याला काहीच देत नाहीत. दुसरा आरोप असा असतो की, चांगले कर्म करणार्याला बदल्यात कमी मिळते मात्र वाईट कर्म करणार्याला भगवंत यश देतात.
भगवंत इथे स्पष्ट करतात की ते कोणालाही काहीही देत नाहीत. जे काही प्राप्त होते ते स्वकर्मानुसार मिळते. भगवंतांना कर्म अर्पण केले तरी यात त्यांचे काहीच नाही. हे स्पष्ट करण्यासाठी भगवंतांनी हे श्लोक सांगितले आहेत.
ज्ञानेश्वर माऊली म्हणतात,
आणि
ही आपली प्रकृती कशी बनते? अनेक जन्मांपासून केलेल्या कर्मांचे संस्कार (Impressions) आपल्या अंतरंगावर पडतात. त्यामुळे आपल्याला काही सवयी जडतात. त्यानुसार आपला स्वभाव बनला असे आपण म्हणतो. हा स्वभाव आताच्या जन्मातील आणि पूर्वजन्मातील कर्मानुसार बनत जातो. त्यामुळे सर्व कार्य हे आपल्या या स्वभावानुसार, प्रकृतीनुसार होते.
तर मग यात भगवंतांची भूमिका (Role) काय आहे? तर परमात्मा चैतन्य आहे, आपल्यातील आत्मतत्त्व आहे. त्याच्या शक्तीमुळे सर्व कार्य घडतात आणि प्रकृती ते घडवून आणते.
डोळे बघतात पण त्यांना बघण्याची शक्ती परमात्म्यामुळे मिळते. कान ऐकतात मात्र चैतन्यतत्त्वाशिवाय त्यांना अर्थ नाही. जीवित देह आणि मृतदेह यात डोळे, नाक, कान इत्यादी सर्व इंद्रिये सारखीच असतात. मात्र मृतदेह ऐकू किंवा बघू शकत नाही कारण त्याचा चैतन्यतत्त्वाशी संपर्क तुटलेला असतो. शक्ती परमात्म्याची असते आणि स्वभाव व्यक्तीचा असतो.
वीज केंद्रावर वीज निर्मिती होते. ही निर्माण झालेली वीज म्हणजे अव्यक्त शक्ती (potential energy) असते. पुढे ती मनोरे, तारा यातून घराघरात पोहोचते आणि विद्युत उपकरणे चालवते. एकच वीज विविध उपकरणात जाऊन विभिन्न परिणाम घडवून आणते. बल्बमध्ये जाऊन प्रकाश, पंख्याला फिरवून वारा, फ्रीजमधून थंडावा आणि हिटरमधून उष्णता निर्माण करते. ही अव्यक्त शक्ती म्हणजेच परमात्मा आणि तारांमधून वाहणारा वीजेचा प्रवाह म्हणजे प्रकृती, म्हणजे शक्ती परमात्म्याची असते तर प्रकृती वीजेच्या प्रवाहाच्या स्वरूपात कार्य करत असते.
त्याचप्रमाणे आपले प्राकृतिक शरीर आहे, त्यात शक्ती परमात्म्याची आहे पण कार्य प्रकृती करत आहे. आपण जसे संस्कार ग्रहण करत आलो आहोत त्यानुसार त्या संस्कारांच्या जोरावर कार्य केले जाते. भगवंत काहीच करत नाहीत. प्रकृतीनुसार हे सर्व कार्य घडते.
दुसरे उदाहरण पाहू या. एका माणसाने त्याच्या दोन्ही मुलांना उपहार म्हणून एक एक हजार रुपये दिले होते. पहिल्या मुलाने त्याला दिलेल्या एक हजाराची पुस्तके आणली, थोडक्यात त्याने त्या एक हजार रुपयांचा ज्ञानार्जनासाठी उपयोग केला, तर दुसऱ्याने त्याला दिलेल्या एक हजार रुपयात सिनेमे पाहिले, थोडक्यात त्याने ते एक हजार रुपये करमणुकीसाठी वापरले. जरी एकाच माणसाची ती दोन मुले असली तरी मुलांच्या प्रकृतीनुसार त्यांची खर्च करण्याची प्रवृत्ती वेगवेगळी दिसून येते.
नादत्ते कस्यचित्पापं(न्), न चैव सुकृतं(म्) विभुः।
अज्ञानेनावृतं(ञ्) ज्ञानं(न्), तेन मुह्यन्ति जन्तवः॥5.15॥
आपल्याला असे वाटत असते की आपण आपली कर्मे आणि त्या कर्मांची फळे भगवंतांना
ज्ञानेन तु तदज्ञानं(म्), येषां(न्) नाशितमात्मनः।
तेषामादित्यवज्ज्ञानं(म्), प्रकाशयति तत्परम्॥5.16॥
ज्ञानाच्या प्रकाशाने अज्ञान दूर होते. तेराव्या अध्यायात भगवंतांनी सांगितले आहे,
तद्बुद्धयस्तदात्मान:(स्), तन्निष्ठास्तत्परायणाः।
गच्छन्त्यपुनरावृत्तिं(ञ्), ज्ञाननिर्धूतकल्मषाः॥5.17॥
तत् म्हणजे तो परमात्मा, (सतराव्या अध्यायात ओम तत् सत् असा उल्लेख आला आहे), आत्मा याचे स्वतः, आत्मतत्त्व, परमतत्त्व, मन, इंद्रिय असे संदर्भानुसार अर्थ होतात. या श्लोकात आत्मा हा शब्द मन या अर्थाने घ्यायचा आहे. निष्ठा म्हणजे श्रद्धेची परिपक्व अवस्था असते. पुढील कथा ऐकून ही निष्ठा कशी असावी हे लक्षात येईल.
ऋषींनी आश्रमात नुकताच आलेल्या एका शिष्याला विचारले, "तू असा उदास का?"
ज्यांचे मन आणि बुद्धी त्या परमात्म्यासोबत एकरूप झाली आहे, ज्यांची त्या परमात्म्यामध्येच परिपक्व श्रद्धा असते, जे त्या परमात्म्यासाठी सदैव तत्पर असतात, ते ज्ञानामुळे पापमुक्त होऊन या लोकात फिरून न येण्याची परमगती प्राप्त करून घेतात. मोक्ष हा मृत्यूनंतर प्राप्त होत नसतो तर जीवित असतानाच जो मनुष्य या शरीरात राहून स्वतःला ओळखतो, त्या माणसासाठी पुनर्जन्म नसतो. एकदा असे ज्ञान प्राप्त झाले की त्या ज्ञानी व्यक्तीची दृष्टी कशी होते, त्याच्या ज्ञानचक्षूला काय दिसते हे भगवंत पुढे सांगतात.
विद्याविनयसम्पन्ने, ब्राह्मणे गवि हस्तिनि।
शुनि चैव श्वपाके च, पण्डिताः(स्) समदर्शिनः॥5.18॥
येथे ब्राह्मण हा शब्द जातीच्या संदर्भात नसून जो माणूस परब्रह्म जाणण्यासाठी प्रयत्नशील असतो, त्याला ब्राह्मण म्हटले आहे. ज्याच्याजवळ ज्ञान आहे मात्र अहंकार नाही तर विनय आहे, त्याला ब्राह्मण म्हटले आहे.
असे पंडित विद्या व विनय यांनी युक्त असलेला ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाळ या सर्वांना समदृष्टीनेच पहातात. ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाळ या सर्वांच्या ठायी एकच चैतन्यतत्त्व वसते हे ते जाणतात. गीतेत समत्वाचे माहात्म्य आहे. योगाची व्याख्या
पंडित समदर्शिन् (समान दृष्टीने बघणारे) असतात पण समवर्तिन् (समान व्यवहार करणारे) नसतात. ते सर्वांना समान दृष्टीने पहातात, पण सर्वांशी समान व्यवहार करतातच असे नाही.
एका आईची दोन मुले आहेत. एक मुलगा धडधाकट, नियमित व्यायाम करणारा आहे तर दुसरा नेहमी आजारी असतो. आई नियमित व्यायाम करणाऱ्याला बदामाचे लाडू खायला घालत घालते. आजारी मुलाला मात्र ती वरणाचे पाणी, भाताची पेज देते. आईचे प्रेम हे समदृष्टीचे उत्तम उदाहरण आहे. इथे दोन्ही मुलांबद्दल तिला समान प्रेम वाटत असले तरी ती व्यवहार मात्र ज्याच्या त्याच्या प्रकृतीनुसार करते.
इहैव तैर्जितः(स्) सर्गो, येषां(म्) साम्ये स्थितं(म्) मनः।
निर्दोषं(म्) हि समं(म्) ब्रह्म, तस्माद् ब्रह्मणि ते स्थिताः॥5.19॥
ज्यांच्या मनात आणि बुद्धी समभाव आहे, ते या इहलोकात, या शरीरात राहूनच संसार जिंकतात. ते परमात्म्यामध्येच स्थित होतात, कारण ब्रह्म निर्दोष आहे, निष्पक्षपाती आहे.
न प्रहृष्येत्प्रियं(म्) प्राप्य, नोद्विजेत्प्राप्य चाप्रियम्।
स्थिरबुद्धिरसम्मूढो, ब्रह्मविद् ब्रह्मणि स्थितः॥5.20॥
दुसऱ्या अध्यायात अर्जुनाने भगवंतांना स्थितप्रज्ञाची लक्षणे विचारली होती. त्याने भगवंतांना विचारले होते
हृष् म्हणजे हर्षित होणे तर प्रहृष् म्हणजे प्रमाणाबाहेर अत्यंत हर्षित होणे, उन्मादित होणे, उत्तेजित होणे. याचेच रूपांतर पुढे MANIA (मॅनिया, हर्षवायु, हर्षोन्माद) या मनोविकृतीत होऊ शकते. प्रिय गोष्टीची प्राप्ती झाली, एखादी स्पर्धा जिंकली तर आपल्याला हर्ष होतो. काही जणांना प्रहर्ष होतो. आजूबाजूचे विसरून ते आनंदाने वेडेपिसे होतात. ज्ञानी मनुष्य असा आनंदाने वेडापिसा होत नाही. मनात आहे ते मिळाल्याचे त्यालाही तर सुख वाटतेच मात्र त्याची अभिव्यक्ती सौम्य असते.
उद्विज् म्हणजे जे हवे ते मिळाले नाही व जे नको ते वाट्याला आले तर अपेक्षाभंगामुळे मनात खेद, शोक, संताप, निराशा आदी नकारात्मक भावना उत्पन्न होतात. एका मर्यादेपर्यंत अपेक्षाभंग झाल्याबद्दल खेद वाटला असता आपण ते स्वाभाविक आहे हे समजू शकतो व शेवटी काळ हा सर्व दु:ख विसरायला मदत करत असल्याने काही काळ निराशा वाटली तरी पुढे नेहमीचे जीवन जगू लागतो. पण कधी कधी या भावनांचा अतिरेक व्हायला लागतो आणि हळूहळू या स्वाभाविक भावनांचे रूपांतर DEPRESSION (डिप्रेशन, औदासिन्य) या मनोविकृतीत होऊ शकते. ज्ञानी मनुष्याला जरी जे नकोसे वाटते तेच मिळाले तरी तो असा उद्विग्न होत नाही. कोणत्याही परिस्थितीत त्याच्या भावना नियंत्रित असतात, बुद्धी स्थिर रहाते. भगवंत म्हणतात अशी स्थिर बुद्धी असलेला ज्ञानी ब्रह्मवेत्ता होतो, तो परब्रह्मात स्थित असतो.
बाह्यस्पर्शेष्वसक्तात्मा, विन्दत्यात्मनि यत्सुखम्।
स ब्रह्मयोगयुक्तात्मा, सुखमक्षयमश्नुते॥5.21॥
आपल्याला स्पर्श म्हणजे त्वचेला होणारा स्पर्श हे माहिती असते, पण इथे बाह्यस्पर्श म्हणजे सर्व उपभोगाच्या बाह्य विषयांचा इंद्रियांशी होणारा संयोग असा अर्थ आहे. इंद्रियांचे विषय बाहेरून येतात. इंद्रियांशी जेंव्हा विषयांचा संयोग होतो तेंव्हा आपण ते विषय ग्रहण करतो. दृश्याचा नेत्रांशी होणारा स्पर्श, शब्दाचा कानांशी होणारा स्पर्श, गंधाचा नाकाशी होणारा स्पर्श हे सर्व बाह्यस्पर्श असतात. इंद्रियांना त्यांच्या विषयांशी होणार्या संयोगातून माणसाला सुख किंवा दुःख प्राप्त होते आणि माणूस त्यातच अडकतो. उन्हाळ्याच्या दिवसात पंख्याचा वारा, कूलरचा थंडावा त्याला सुखावतो आणि भट्टीसमोर बसले तर त्याला उष्म्याचा असह्य त्रास होतो. ही सुखदुःखाची अनुभूती होणे चुकीचे नाही. मात्र मनाने सदैव त्याचेच चिंतन करणे हे चुकीचे आहे. आज एखादा पदार्थ बनणार आहे या विचारात मन रमून सतत त्याचेच चिंतन करण्याऐवजी अन्न हे पूर्णब्रह्म असे मानून समोर जे आले ते खाऊन, गोड मानून विषय बाजूला सारावा.
ज्ञानी मनुष्य हे बाह्य विषय ग्रहण करतच नाही असे नव्हे. कानाने श्रवण, नाकाने गंध ग्रहण, नेत्रांनी बघणे बंद होऊच शकत नाही. पण ज्ञानी या इंद्रियांशी होणारा संयोगांमध्ये अडकून रहात नाही, आसक्त होत नाही. सामान्य माणसाचे मन विषयांमध्ये अडकत असते पण ज्ञानी मनाने या कशातही अडकत नाही. तो अंतरंगातून परमात्म्याशी तादात्म्य ठेवून असल्याने निरंतर न घटणार्या आंतरिक सुखाचीच अनुभूती घेत असतो. सुखांसाठी ज्ञानी व्यक्तीला बाह्यस्पर्शांवर अवलंबून राहावे लागत नाही. ज्ञानेश्वर माऊलींनी यासाठी अत्यंत सुंदर उपमा दिली आहे,
ये हि संस्पर्शजा भोगा, दुःखयोनय एव ते।
आद्यन्तवन्तः(ख्) कौन्तेय, न तेषु रमते बुधः॥5.22॥
इंद्रियांचा त्यांच्या बाह्य विषयांशी होणारा संयोग म्हणजे स्पर्श व संस्पर्श म्हणजे चांगल्या प्रकारे होणारा संयोग. बाह्य विषयांमधून मिळणारी ही सुखे क्षणभंगुर असतात कारण त्यांना प्रारंभ असतो आणि अंतही असतो, या कारणाने ही सुखे अखेरीस दुःखच देणारी असतात.
शक्नोतीहैव यः(स्) सोढुं(म्), प्राक्शरीरविमोक्षणात्।
कामक्रोधोद्भवं(म्) वेगं(म्), स युक्तः(स्) स सुखी नरः॥5.23॥
काम व क्रोध यांच्यापासून अतीव, प्रबळ असा वेग (भावनेची उत्कटता, strong passion) उत्पन्न होतो. असा कामनेचा वा क्रोधाचा प्रबळ वेग ओळखणे ओळखणे आणि त्यावर नियंत्रण मिळवणे यासाठी आत्मसंयमाची गरज असते. भगवंत हळूहळू पुढील अध्यायाची, आत्मसंयमयोगाची, प्रस्तावनाच इथे करत आहेत.
योऽन्तःसुखोऽन्तरारामः(स्), तथान्तर्ज्योतिरेव यः।
स योगी ब्रह्मनिर्वाणं(म्), ब्रह्मभूतोऽधिगच्छति॥5.24॥
येथे ज्ञानी व्यक्तीबद्दल तीन गोष्टी सांगितल्या आहेत. तो अंत:सुख (आत्म्यामध्येच सुखी), अंतरारामः (आत्म्यामध्येच रममाण होणारा) व अन्तर्ज्योती (आत्मा हीच ज्याची ज्ञानज्योती आहे) असा असतो. हा ज्ञानी अंतरंगातून प्राप्त झालेल्या ज्ञानातच रमतो व बाह्य विषयांकडे त्याचे मन आणि बुद्धी भटकत नाही. तो परब्रह्मासोबत एकरूप होऊन परम शांती प्राप्त करून घेतो. आपण तीर्थयात्रा करतो, तीर्थयात्रा जरूर करावी. तीर्थयात्रा केल्याने पुण्य मिळते. पण अंतर्यात्रा ही सर्वात मोठी तीर्थयात्रा आहे. अंतर्यात्रा केल्याने शांती प्राप्त होते.
लभन्ते ब्रह्मनिर्वाणम्, ऋषयः क्षीणकल्मषाः।
छिन्नद्वैधा यतात्मानः(स्), सर्वभूतहिते रताः॥5.25॥
तीर्थयात्रेमुळे चित्ताची शुद्धी होते. चित्त शुद्ध झाले की अंतर्यात्रा करता येते. ज्यांचे पाप हळूहळू क्षीण होत नष्ट झाले आहे, ज्यांचे संशय नष्ट झालेले आहेत, ज्यांचे ताब्यात आणलेले चित्त केवळ एका परमात्म्यात निश्चल असते अशा ऋषींना अत्यंत शांती प्राप्त होते. पण म्हणून ते आपला वसा सोडत नाहीत.
त्याचे भजन राहिना । मूळ स्वभाव जाईना ॥
अनुशासनबद्ध जीवनासाठी चित्त ताब्यात असणे आवश्यक आहे. काही लोक कर्मकांडांची अवहेलना करतात. नियमांचे जंजाळ त्यांना मानवत नाही. पण हे नियम भगवंतांसाठी नाहीत तर आपल्यासाठी आहेत. हे सर्व नियम आपल्याला अनुशासन शिकवतात. या नियमांनी मनाला शिस्त लागते. कसेही वर्तन केले तर तो स्वैराचार होतो. जो अनुशासित जीवन जगतो, त्याच्या मन आणि इंद्रियांवर नियंत्रण येते. अनेक व्रत हे भगवंतासाठी नाही तर आपल्या उद्धारासाठी आहेत.
कामक्रोधवियुक्तानां(म्), यतीनां(म्) यतचेतसाम्।
अभितो ब्रह्मनिर्वाणं(म्), वर्तते विदितात्मनाम्॥5.26॥
हे योगाच्या समाधी अवस्थेचे वर्णन आहे. हे आत्मस्वरूपाचा साक्षात्कार झालेले यती समाधी अवस्थेत असतात. जो या अवस्थेपर्यंत पोचला तो काम आणि क्रोधापासून मुक्त झाला. त्याने आपल्या चित्तावर विजय प्राप्त केला. अंतरंगातील तत्त्व आणि सर्वत्रव्यापी तत्त्व एकच आहे तो हे जाणतो. तो मनुष्य केवळ ब्रह्मवेत्ता नाही, तर तोच परब्रह्म होतो. एकदा रामकृष्णांचा शिष्य त्यांना म्हणाला, "गुरूजी, तुम्ही ब्रह्मज्ञानी आहात." त्यावर ठाकूर म्हणाले, "अरे मी ब्रह्मज्ञानी नाही, मी ब्रह्मच आहे."
स्पर्शान्कृत्वा बहिर्बाह्यांश्, चक्षुश्चैवान्तरे भ्रुवोः।
प्राणापानौ समौ कृत्वा, नासाभ्यन्तरचारिणौ॥5.27॥
अशा व्यक्तीचे जीवन कसे असते हे भगवंत सांगतात. आत्मसंयमयोगात (सहावा अध्याय) मन, इंद्रिय, शरीरावर नियंत्रण कसे आणावे, ध्यान कसे करावे हे सविस्तर सांगितले आहे. अष्टांगयोगात आठ अंगे सांगितली आहेत - यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी.
यापैकी पहिली चार अंगे बर्याच जणांना माहीत असतात. सत्तावीसाव्या श्लोकात चौथ्या प्राणायाम या अंगाचे वर्णन आले आहे. योगी भ्रूमध्यावर दृष्टी स्थिर करतात. प्राणायामाच्या अभ्यासाने नाकाद्वारे वाहणाऱ्या प्राण, अपान वायूंना ते एकसमान करून नियंत्रणात आणतात.
यतेन्द्रियमनोबुद्धि:(र्), मुनिर्मोक्षपरायणः।
विगतेच्छाभयक्रोधो, यः(स्) सदा मुक्त एव सः॥5.28॥
भोक्तारं(म्) यज्ञतपसां(म्), सर्वलोकमहेश्वरम्।
सुहृदं(म्) सर्वभूतानां(ञ्), ज्ञात्वा मां(म्) शान्तिमृच्छति॥5.29॥
इथे प्रत्यक्ष परमात्मा श्रीकृष्णाच्या रूपात घनीभूत होऊन बोलत आहेत. महाभारतात श्रीकृष्णासाठी इतर पर्वांमध्ये केशव, कृष्ण, वासुदेव असे संबोधन योजले असले तरी भगवद्गीतेच्या अठरा अध्यायात वेदव्यास श्रीकृष्णांना भगवान असे संबोधतात. गीता भगवंतांनी श्रीकृष्णाच्या रूपात सांगितली आहे.