विवेचन सारांश
काम, क्रोध आणि लोभ - आत्म्याचा नाश करणारी नरकाची द्वारे
प्रार्थना व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. गुरुच आपल्याला गोविंदाचे दर्शन घडवतात त्यामुळे सादर गुरुवंदनेने विवेचनाची सुरुवात झाली.
मागील आठवड्यापासून आपण दैवी आणि आसुरी संपत्ती बाबतचा सोळावा अध्याय पहात आहोत. पहिल्या विवेचन सत्रात आपण पहिल्या पाच श्लोकांविषयी पाहिलं आहे. हे सर्व श्लोक दैवी गुणांबाबत मार्गदर्शन करतात. पहिल्या तीन श्लोकातून सव्वीस दैवी गुणांचे नामनिर्देशन केले गेले आहे. चौथ्या श्लोकात अहंकार, दम्भ, गर्व, क्रोध, अज्ञान यासारखे आसुरी गुण मनुष्यात दिसून येतात अस भगवंतांनी सांगितलं आहे. हे दैवी आणि आसुरी गुणनिर्देशन करताना भगवंत अर्जुनाला एक अत्यंत महत्त्वपूर्ण बाब सांगतात ती आपणही समजून घेणे आवश्यक आहे. पाचव्या श्लोकात भगवंत म्हणतात -
“दैवी संपद्विमोक्षाय निबन्धायासुरी मता |
मा शुचः सम्पदं दैवीमभिजातोऽसि पाण्डव ||”
दैवी संपदा मोक्षकारी आहे. आसुरी संपदा बंधनकारी आहे असं भगवंतांनी सांगितलं. हे सांगणं ठीक आहे परंतु पुढे भगवंत अर्जुनाला म्हणतात, हे अर्जुना तू शोक करू नकोस, चिंता करू नकोस कारण तू दैवी संपदा घेऊन जन्माला आलेला आहेस. अर्जुनाला असं सांगण्याची काय आवश्यकता होती?
आवश्यकता होती कारण अर्जुन त्यावेळी विमनस्क होता, द्विधा मन:स्थितीत होता, नकारात्मक भूमिकेत होता. त्याचे प्राणप्रिय गांडीव धनुष्य ही त्याच्या हातातून गळून पडलेले होते. अशा पार्श्वभूमीवर दैवी गुणसंपदा, आसुरी गुणसंपदा यांचे अर्जुन समोर सांगत असलेले वर्णन हे त्याच्या नकारात्मक मनोबुद्धीला कदाचित जाणून बुजून, कुत्सीतपणाने, उपहासाने केले जात आहे असं अर्जुनाला वाटू शकतं. अशा मनस्थितीत एखाद्याने आपल्याकडे पाहून केलेले स्वाभाविक हास्यही आपल्याला कुत्सितपणाने, केले आहे असं वाटतं आपणही हा अनुभव कधीतरी घेतोच. वास्तविक त्या व्यक्तीचे हास्य निरागस, स्वाभाविक असतं परंतु आपली मानसिक स्थिती बिघडलेली असते म्हणून आपण या त्याच्या हास्याला नकारात्मक बाजूनेच पाहतो. दुसरी गोष्ट म्हणजे हे संभाषण ऐकून आपल्यामध्ये आसुरी गुणच अधिक प्रबळ आहेत असा अर्जुनाच्या मनाचा ग्रह झाला असता व कदाचित विपरीत विचारांनी तो अधिकच संभ्रमित, विमनस्क झाला असता. भगवंतांना अर्जुनाला या अवस्थेतून, या संभ्रमातून बाहेर काढायचे होते. त्याचे मनोधैर्य वाढविण्यासाठी भगवंत त्याला जाणीव करून देतात की तू दैवी संपदा घेऊन जन्माला आलेला आहेस त्यामुळे तुला शोक करण्याचे काहीच कारण नाही.
जे साधक भगवद्गीता शिकण्यासाठी सिद्ध झालेले आहेत त्यांच्याही बाबतीत आपण निश्चितपणे असे म्हणू शकतो की ते दैवी गुणसंपदा प्राप्त आहेत.
आपण सर्व प्रकृतीचे जातक आहोत, पुत्र आहोत त्यामुळे स्वाभाविकच प्रकृतीचे सत्व रज आणि तम हे गुणही आपल्यामध्ये दिसून येतात. जेव्हा आपण संगणक खरेदी करतो तेव्हा त्यात काही सॉफ्टवेअर्स आधीच डाऊनलोड केलेली असतात. आपल्यामध्ये असलेले हे तीन गुणही आपल्यातील इन बिल्ट सॉफ्टवेअर आहेत. त्यांची आपल्याला गरजही आहे. उदाहरणार्थ जर आपल्यातला तमोगुण पूर्णपणे नष्ट झाला तर आपली रात्रीची निद्रा ही सुखाची होऊ शकणार नाही कारण योग्य मात्रेतला तमो गुणच आपल्याला योग्य निद्रा देतो. या गुणांतला समतोल बिघडला तर त्या गोष्टीचा आपल्यावर परिणाम होऊ शकतो. जेव्हा रजो गुण वाढतो तेव्हा अशा राजसी वृत्तीच्या व्यक्तीची निद्रा बिघडते. सत्वगुणी व्यक्तीची निद्रा तर खूपच कमी झालेली दिसते. केवळ तीन चार तासाची निद्रा अशा व्यक्तीला पुरेशी होते. संत महात्मे याचे उत्तम उदाहरण आहेत. तात्पर्य काय तर तमो गुण कमी झाला की निद्रा कमी होते. नैसर्गिक निद्रा ही आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. समतोल महत्त्वाचा. महत्त्वाचा मुद्दा असा की दैवी गुणसंपदेप्रमाणे काही आसुरी गुणसंपदाही आपल्यामध्ये आहे कारण आपण ना देव आहोत ना दानव. आपण मानव आहोत. भगवंत म्हणतात–
16.6
द्वौ भूतसर्गौ लोकेऽस्मिन्, दैव आसुर एव च।
दैवो विस्तरशः(फ्) प्रोक्त, आसुरं(म्) पार्थ मे शृणु।।16.6।।
या जगात दोन भिन्न प्रकारच्या व्यक्ती असणारच आहेत. जिथे राम आहे तिथे रावण आहे. जिथे कंस आहे तिथे कृष्णही आहेच. अशा दैवी प्रवृत्तीचे आणि आसुरी प्रवृत्तीचे लोक यापूर्वीही होते, आजही आहेत व भविष्यातही राहणारच आहेत. ज्या प्रवृत्तीचे पारडे जड होईल ती प्रवृत्ती अधिक बळावते. जे सॉफ्टवेअर लोड होईल तशी प्रवृत्ती होणारच. याचबरोबर मोबाईल, सोशल मीडिया यासारख्या बाबी अशा प्रवृत्ती जोपासण्यासाठी अधिक खतपाणी पुरवतात. कोणत्या मार्गावर चालायचं त्याचा रिमोट आपल्याच हाती आहे.
कोणतेही वाद्य म्हटले की आवाज तर येणारच, जिथे गुळ आहे तिथे मुंग्या, मुंगळे येणारच, जिथे सुगंधी फुले आहेत तिथे भृंग येणारच, जिथे घर्षण आहे तिथे अग्नी असणारच त्याचप्रमाणे मनुष्य शरीर आहे तिथे दैवी गुणांबरोबरच काही आसुरी गुण असणारच. आपल्यामध्ये कोणते गुण अधिक वाढवायचे याचा विवेक मनुष्य जवळच आहे. 'बडे भाग मानुष तन-पायो|'. सौभाग्यानेच आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त झाला आहे. आपण अशा दुभाजकावर उभे आहोत जिथे एक मार्ग दैवी गुणसंपदे कडे जातो आणि दुसरा मार्ग आसुरी गुणसंपदेकडे नेतो आपण मात्र कोणत्या मार्गावरून जावे या संभ्रमात असतो. भगवंत आसुरी संपदेबाबत सविस्तर सांगू लागतात.
प्रवृत्तिं(ञ्) च निवृत्तिं(ञ्) च, जना न विदुरासुराः।
न शौचं(न्) नापि चाचारो, न सत्यं(न्) तेषु विद्यते।।16.7।।
कधी कधी 'न शौचं न अ़़पि च आचारो' म्हणजे शौच-अशौच, आचार-विचार, प्रवृत्ती-निवृत्ती याबाबत योग्य मार्गदर्शन परिवारातील व्यक्तींकडून झालेलं नसतं. अंतर्बाह्य शुचिता म्हणजे काय याबाबत अनभिज्ञ असलेल्या व्यक्ती आचारहीनच बनतात. अशा अस्वच्छ, आचारहीन, धादांत खोटं बोलूनही मला खोटं बोलायला आवडत नाही असे म्हणणाऱ्या व अशा प्रकारच्या नौटंकी करणाऱ्या व्यक्ती या आसुरी प्रकारच्या असतात.
असत्यमप्रतिष्ठं(न्) ते, जगदाहुरनीश्वरम्।
अपरस्परसम्भूतं(ङ्), किमन्यत्कामहैतुकम्।।16.8।।
नैसर्गिक वाऱ्याची झुळूक आनंद देऊन जाते, सुखाची निद्रा देऊन जाते परंतु वातानुकूलित खोलीमध्ये ही सुखाची झोप लागू शकत नाही कारण सुखाचे अंतिम टोक हे दुःख आहे. सुखाच्या पाठीमागे पळणाऱ्यांना दुःखच भोगावं लागतं. आळसामध्ये पडून राहिलात व आजारांनी घेरलं म्हणजे दुःखच वाट्याला येतं. सुख आणि दुःख दोन्हीही नश्वर आहेत. पण आनंद मात्र शाश्वत आहे. आनंदाला अंतिम टोकच नाही आणि जर आनंदाचे अंतिम टोक कोणते असे विचारले तर असे सांगता येईल की आनंदाचे अंतिम टोक म्हणजे परमानंद.
तुकाराम महाराज म्हणतात “आनंदाचे डोही, आनंद तरंग”. आनंदाच्या डोहात उठणारे तरंग आनंदाचेच असतात कारण आनंद आत्म्याची अनुभूती आहे. अंतरंगातील स्फूर्ती म्हणजे आनंद. पाच हजार वर्षा पूर्वी आत्म्याची जी अनुभूती होती तीच आजही आहे आणि पुढील पाच हजार किंबहुना असंख्य वर्षे ती अशीच राहणार आहे. तात्पर्य, आत्म्याची अनुभूती त्रिकालाबाधित सत्य आहे. भगवद्गीतेची पाच हजार वर्षांपूर्वी जी आनंदाची अनुभूती होती तीच आजही आहे. भगवद्गीतेच्या आनंदाच्या डोहात आपण किती खोल पर्यंत जाऊ तेवढी अधिक आनंदाची अनुभूती आपण अनुभवू शकतो. या अनुभवाला कदापि मुकू नका.
आसुरी प्रवृत्तीच्या व्यक्तींचे विचार मात्र विपरीतच असतात. स्वतः मौजमजा करायची मग इतरांना त्रास झाला तरी त्याचे त्यांना काही वाटत नाही. मनुष्यजन्मात आलोय तेव्हा मौज मजेतच हा जन्म घालवायचा हेच त्यांचं जीवनाविषयीचं तत्त्वज्ञान असतं. शुभ मुहूर्त वगैरे सर्व थोतांड आहे असा यांचा तर्क असतो. प्राणी सुद्धा आपल्या पिलांना जन्म देतातच ना! ते कुठे मुहूर्त बघून लग्न करतात? मग माणसाने कशासाठी मुहूर्त वगैरे पाहून विवाह करावयाचा? जर यांच्यासमोर आपण म्हणालो की आसुरी वागण्याने किड्याच्या योनीत जन्म घ्यावा लागेल तर यांचे तत्त्वज्ञान तयारच असते अरे घाणीमधले किडेही किती मजेत असतात पहा! थोडक्यात काय केवळ मौजमजा, केवळ कामोपभोग, केवळ सुखासीन जीवन एवढ्याच त्यांच्या मनुष्य जीवनाविषयीच्या कल्पना असतात. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यू संबंधी यांचे वक्तव्य असते - बघा आयुष्यभर देव देव करत होता, व्रत वैकल्य करीत होता पण मेलाच ना शेवटी आणि तोही असा!
या आसुरी प्रवृत्तीच्या लोकांचा मंत्र 'खा, प्या, मजा करा.' एवढाच असतो. हे मनमानी असतात, आपल्याच तर्काने चालणारे असतात, हे देव विरोधी, लोकविरोधी असतात. यांच्या स्वभावाविषयी भगवंत आणखी स्पष्टतेने सांगतात की -
एतां(न्) दृष्टिमवष्टभ्य, नष्टात्मानोऽल्पबुद्धयः।
प्रभवन्त्युग्रकर्माणः, क्षयाय जगतोऽहिताः।।16.9।।
आपल्याला दुसऱ्याच्या आनंदात आनंद आणि दुसऱ्याच्या दुःखात दुःख मानायला शिकलं पाहिजे. एखाद्याच्या दुःखाची, पीडेची अनुभूती आपल्या अंतर्मनाला होत असेल तर तो आपला दैवी गुण आहे असे समजावे.
दुसऱ्याच्या आनंदाने दुःखी होणाऱ्या आसुरी वृत्तीची एक कथा -
एका आसुरी वृत्तीच्या स्त्रीने कठोर तपश्चर्या करून भगवंतांना प्रसन्न करून घेतले. भगवंतांना माहिती होतं की ती स्त्री आसुरी वृत्तीची आहे, आपल्या शेजारणीचा ती मत्सर करत आहे परंतु तपश्चर्या केली होती तेव्हा तिला फळ देणं भागच होतं. भगवंत म्हणतात, तुला काय हवं ते माग परंतु एक अट आहे तू जे मागशील त्याच्या दुप्पट तुझ्या शेजारीणीला मिळेल. या स्त्रीने आपल्या शेतात विहीर मागितली. भगवंतांनी तिच्या शेतात एक विहीर दिली परंतु शेजारणीच्या शेतात दोन विहिरी दिल्या. या स्त्रीचा जळफळाट झाला, तपश्चर्या मी करणार आणि फळ मात्र शेजारणीला मिळणार. आपल्या आसुरी स्वभावानुसार तिने भगवंतांच्याकडे वर मागितला की देवा माझा एक डोळा फुटू दे जेणेकरून आपल्या शेजारीणीचे दोन्ही डोळे जाणार हा आसुरी आनंद!
अशी ही आसुरी वृत्ती प्रसंगी त्या मनुष्याला आणि त्याच्याच बरोबर इतरांनाही विनाशाप्रत नेते.
दुसरी कथा अशाच आसुरी वृत्तीची जी सर्वांच्याच परिचयाची आहे. हे असुर सुद्धा अतिशय कठोर तपश्चर्या करून भगवंतांकडून हवे ते वरदान मागून घ्यायचे. हिरण्यकश्यपूची कथा सर्वांनाच ज्ञात आहे-
कठोर तपस्या करून हिरण्यकश्यपूने वरदान मिळवले की त्याला देव, आसुर, यांपैकी कुणाकडूनही मृत्यू येणार नाही. त्याचा मृत्यू जमीन, आकाश, पाताळ, पाणी यापैकी कुठेही होणार नाही. त्याला ना सकाळी मृत्यू येईल, ना दुपारी, ना रात्री मृत्यू येईल. त्याला ना घरात मृत्यू येईल ना घराच्या बाहेर, कोणत्याही शस्त्र किंवाअस्त्रा ने त्याचा मृत्यू होणार नाही. वरदान प्राप्त झाल्यानंतर उन्मत्त झालेल्या हिरण्यकश्यपूने स्वतःलाच देव म्हणून घोषित केले. इतर कोणत्याही देवाचं नाव राज्यात कोणीही घ्यायचं नाही असा हुकूम केला. प्रत्यक्ष त्याचा पुत्र प्रल्हाद भगवंताचे नाव घेतो म्हणून त्याचा अतिशय क्रूरपणाने छळ केला. क्रोधाने एकदा त्याने प्रल्हादाला विचारले कुठे आहे तुझा भगवंत? प्रल्हादाने उत्तर दिले, 'तो तर सर्वत्र आहे.' एका खांबाकडे बोट दाखवून हिरण्यकश्यपूने विचारले, 'या खांबात आहे का तुझा भगवंत?' प्रल्हाद शांतपणे म्हणाला, 'हो, आहे.' उन्मत्त हिरण्यकश्यपूने त्या खांबाला लाथ मारली तेव्हा मोठा आवाज झाला आणि खांबातून साक्षात भगवंत नरसिंहाच्या रूपात प्रकट झाले. हिरण्यकश्यपूला दिलेल्या सर्व वरदानांचा मान राखून भगवंतांनी, जे मनुष्यही नाहीत प्राणीही नाहीत, देव,दानव, असुर नाहीत, दिवसा नाही, दुपारी नाही, रात्री नाही अशा संधिकालात, घरात नाही बाहेर नाही, घराच्या उंबरठ्यावर बसून, जमीन, आकाश, पाताळ, यापैकी कुठेही नाही तर दाराच्या चौकटीत बसून, हिरण्ययकश्यपूला आपल्या मांडीवर घेऊन, शस्त्र नाही अस्त्र नाही तर आपल्या नख्यांच्या सहाय्याने त्याचा वध केला. आसुरी वृत्तीचा अंत विनाश हाच आहे.
काममाश्रित्य दुष्पूरं(न्), दम्भमानमदान्विताः।
मोहाद्गृहीत्वासद्ग्राहान्, प्रवर्तन्तेऽशुचिव्रताः।।16.10।।
चिन्तामपरिमेयां(ञ्) च, प्रलयान्तामुपाश्रिताः।
कामोपभोगपरमा, एतावदिति निश्चिताः।।16.11।।
आशापाशशतैर्बद्धाः(ख्), कामक्रोधपरायणाः।
ईहन्ते कामभोगार्थम्, अन्यायेनार्थसञ्चयान्।।16.12।।
लक्ष्मीनारायणाची उपासना शुभधनाची प्राप्ती करून देते परंतु हे लोक अज्ञानवश फक्त लक्ष्मीचीच उपासना करतात. केवळ लक्ष्मीची उपासना केली तर ती घुबडावर बसून येते पण नारायणा सोबत लक्ष्मीची उपासना केली तर ती नारायणासह गरुडावर स्वार होऊन येते. घुबडावर स्वार होऊन आलेली लक्ष्मी धनप्राप्ती देते पण सत्यानाशही करते. अशा व्यक्ती संपत्तीसोबत स्वतःचाही सर्वनाश करून घेतात.
इदमद्य मया लब्धम्, इमं(म्) प्राप्स्ये मनोरथम्।
इदमस्तीदमपि मे, भविष्यति पुनर्धनम्।।16.13।।
अधिकाधिक ते मिळवीत जावे, अशी त्यांची कामना असते जी कधीच परिपूर्ण होत नाही. छोटी गाडी असेल तर मोठी गाडी यांना हवी असते. मोठी कार मिळाली तरीही ते समाधानी नसतातच त्यांना त्यापेक्षा अधिक महागडी, मोठी गाडी हवी असते. याच्या प्राप्तीसाठी ते अनेक गैरकृत्यांचा मार्गही अवलंबतात. यांच्या अंतरीचा दीप कधीच प्रज्वलित होत नाही. हे लोक सदैव अज्ञानाच्या अंधारातच राहतात.
असौ मया हतः(श्) शत्रु:(र्), हनिष्ये चापरानपि।
ईश्वरोऽहमहं(म्) भोगी, सिद्धोऽहं(म्) बलवान्सुखी।।16.14।।
आढ्योऽभिजनवानस्मि, कोऽन्योऽस्ति सदृशो मया।
यक्ष्ये दास्यामि मोदिष्य, इत्यज्ञानविमोहिताः।।16.15।।
अनेकचित्तविभ्रान्ता, मोहजालसमावृताः।
प्रसक्ताः(ख्) कामभोगेषु, पतन्ति नरकेऽशुचौ।।16.16।।
नवव्या अध्यायातील हा श्लोक ऐकून ते हुरळून जातात-
त्रैविद्या मां सोमपा: पुत पापा यज्ञै रिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते |
ते पुण्यमासाद्य सुरेंन्द्रलोकमश्नन्ति दिव्यान्दिवि देवभोगान् ||
त्यांच्या मते सोमरसपान म्हणजे मद्यपान. यज्ञ करणारे आणि सोमरस प्राशन करणारे थेट सुरेंद्र लोकात म्हणजेच इंद्रलोकात जातात आणि देवाधिकांसारखे दिव्य भोग उपभोगतात. आहाहा! केवळ एका यज्ञाच्या पुण्यावर केवढं क्रेडिट मिळतं. एवढाच सीमित अर्थ ते जाणतात.
परंतु या महाशयांनी त्याच्या पुढचा श्लोक पाहिलेलाच नसतो.
ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं
क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति|
एका यज्ञाचं जेवढं त्यांचं क्रेडिट आहे तेवढाच काळ त्यांना स्वर्गलोकात रहायला मिळतं. त्यांचं पुण्य संपलं की त्यांना परत लाथ मारून पृथ्वीवर पाठवलं जातं. हा श्लोक समजून घेणं अधिक महत्त्वाचं आहे.
‘भज गोविंदं भज गोविंदम्.'
भगवंताचे स्मरणच आपल्याला खऱ्या अर्थाने तारून नेणारे आहे. बाकी सर्व व्यर्थ.
आत्मसम्भाविताः(स्) स्तब्धा, धनमानमदान्विताः।
यजन्ते नामयज्ञैस्ते, दम्भेनाविधिपूर्वकम्।।16.17।।
अहङ्कारं(म्) बलं(न्) दर्पं(ङ्), कामं(ङ्) क्रोधं(ञ्) च संश्रिताः।
मामात्मपरदेहेषु, प्रद्विषन्तोऽभ्यसूयकाः।।16.18।।
याच अध्यायात सुरुवातीला दैवी गुणात एक शब्द वापरला आहे, ‘अपैशुनम्’ याचा अर्थ आहे निंदा नालस्ती न करणे. एखाद्याबद्दल चांगलं बोलायचं नसेल तर न बोललेलं बरं परंतु एखाद्याची निंदा करणे म्हणजे त्या व्यक्तीचा अपमान करणे होय.
तानहं(न्) द्विषतः(ख्) क्रूरान् , संसारेषु नराधमान्।
क्षिपाम्यजस्रमशुभान्, आसुरीष्वेव योनिषु।।16.19।।
आसुरीं(य्ँ) योनिमापन्ना, मूढा जन्मनि जन्मनि।
मामप्राप्यैव कौन्तेय, ततो यान्त्यधमां(ङ्) गतिम्।।16.20।।
त्रिविधं(न्) नरकस्येदं(न्), द्वारं(न्) नाशनमात्मनः।
कामः(ख्) क्रोधस्तथा लोभ:(स्), तस्मादेतत्त्रयं(न्) त्यजेत्।।16.21।।
भगवद्गीतेच्या आणि विशेषतः या श्लोकाच्या अर्थाच्या सानिध्यात आल्यानंतर अत्यंत क्रोधी असणारी व्यक्ती ही चिंतनशील बनू लागते.
विवेचक इथे स्वतःचा अनुभव कथन करतात. मार्केटिंग क्षेत्रात असल्यामुळे त्यांना क्रोध अनावर व्हायचा. प्रसंगी शिवीगाळ सुद्धा व्हायची. जेव्हा त्यांनी हा श्लोक समजून घेतला तेव्हा त्यांच्या मनात विचार सुरू झाले. क्रोध हे सुद्धा नरकाचे द्वारच आहे. तशातच त्यांच्या एका मित्राच्या वडिलांचे निधन झाले. शवाशेजारी पंडितजी गरुड पुराण वाचत होते. त्यात नरकाचे वर्णन होते. नरक म्हणजे मलमूत्रांची, त्याज्य बाबींची नदी. मृत्यूनंतर आसुरी कृत्य करणाऱ्यांना यमदूत फरफटत नरकात घेऊन जातात. तिथे विविध प्रकारच्या यातना देतात. शिरच्छेद करतात, उकळत्या तेलात टाकतात, वगैरे वगैरे. सामान्य बुद्धीला न पटणारी अशी ही विधाने. मृत झालेल्या शरीराला यापैकी कोणत्याही जाणीवा होणारच नाहीत असे तर्कवितर्क मनात येत होते पण जसा-जसा विचार करायला सुरुवात केली तसतसं ध्यानात आलं की पंडित जी मेल्यानंतरच्या नाहीत जिवंतपणाच्याच गोष्टी करीत आहेत. क्रोधामुळे विवेक बुद्धी नष्ट होते. विवेक नसलेला मेंदू म्हणजेच शिरच्छेद झालेला मेंदू होय. उकळते तेल म्हणजे शरीरातील क्रोधामुळे तप्त झालेले रक्त. क्रोधामुळे चेहरा पकोड्यासारखा दिसतो. क्रोध जर वाढतच गेला तर त्याचा परिणाम म्हणजे हायपर टेन्शन, ब्लड प्रेशर, शुगर यासारखे विकार निर्माण होतात. शुगर वाढलेली असते. डॉक्टरांनी आपल्याला गोड खाण्याची, मिठाई खाण्याची मनाई केलेली असते आणि आपण सोडून आपल्यासमोर इतर सर्वजण जिलेबीचा स्वाद घेत असतात. आपल्यासाठी ही नरक यातनाच नव्हे का. इतके विकार केवळ एका क्रोधामुळे होतात. म्हणून क्रोध हे नरकाचे द्वारच होय.
एतैर्विमुक्तः(ख्) कौन्तेय, तमोद्वारैस्त्रिभिर्नरः।
आचरत्यात्मनः(श्) श्रेयस् , ततो याति परां(ङ्) गतिम्।।16.22।।
यः(श्) शास्त्रविधिमुत्सृज्य, वर्तते कामकारतः।
न स सिद्धिमवाप्नोति , न सुखं(न्) न परां(ङ्) गतिम् ।।16.23।।
तस्माच्छास्त्रं(म्) प्रमाणं(न्) ते, कार्याकार्यव्यवस्थितौ।
ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं(ङ्), कर्म कर्तुमिहार्हसि।।16.24।।
प्रश्न उत्तरे:-
जिज्ञासा पाटील दीदी-
प्रश्न: अभ्यासात मन लागत नाही पाठांतर होत नाही काय करू?
उत्तर: प्राणायाम करणे महत्त्वाचे. भगवद्गीता योगशास्त्राची पायरी आहे. योगामध्ये प्रथम यम आणि नियम सांगितले आहेत. आपण आपल्या सवयींवर नियंत्रण केले पाहिजे हे झाले यम. काही गोष्टी नियम म्हणून केल्या गेल्या पाहिजेत. श्रीकृष्ण शरणं मम म्हणून श्वास घ्यायचा आणि तोच मंत्र म्हणून श्वास सोडायचा. श्वासाच्या गतीची समानता राखता आली पाहिजे. अशाप्रकारे प्राणायाम करावा. सोबत काही आसनेही केली तर फायदा होईल. मोबाईलचा वापर करणे पूर्णपणे टाळावे.
आर्या दीदी-
प्रश्न: गंगास्नानाने पापे धुतली जातात. कुंभमेळ्यातही अशी पापे धुऊन जातात. कितीही पापे केली आणि गंगास्नान करून पाप मुक्ती करून घेतली हे कितपत तर्कसंगत आहे?
उत्तर. गंगास्नानाने पापे धुतली जातात असे नाही. नदीत उतरतो तेव्हा ती पापे बाहेरच असतात. आपल्याला स्नान करताना चांगल्या कामांचा संकल्प करावा लागतो. कुंभमेळ्यामध्ये हा स्पॅन जरा अधिक वाढतो. पाप हे मनाच्या आसक्तीच्या लोहचुंबकाला आकर्षित होत असते. गंगास्नान किंवा कुंभमेळ्यामध्ये आपण चांगल्या कर्माचे संकल्प केले तर पाप मुक्त होऊ हा या मागचा अर्थ समजून घेतला पाहिजे.
पिंकी दीदी-
प्रश्न: एखादी व्यक्ती दैवी गुण संपादन करू इच्छिते पण इतर सदस्य त्या व्यक्तीला ना उमेद करतात. काय करावे?
उत्तर: अशा स्थितीत एक व्यक्ती दैवी गुण संपत्ती युक्त असते पण त्याची ताकद कमी पडून आसुरी संपदा वाले या कमकुवत व्यक्तीवर कब्जा करू पाहतात. तेव्हा त्या व्यक्ती चे मनोबल वाढवणे, आत्मबल वाढवणे आवश्यक आहे.
कधी कधी आपण पूजा पाठ करतोय बाकीचे साथ देत नाहीत यामुळे क्रोध ही येतो पण अशा प्रसंगी संयमित वृत्तीने दृढनिश्चयाने आपले कार्य करीत राहावे.
निर्मला दीदी-
प्रश्न: अनाकलनीय स्वप्ने का पडतात?
उत्तर: कधी कधी ज्या गोष्टींची आपण कल्पनाही केलेली नसते अशा गोष्टी स्वप्नात दिसतात. आपण पंचमहाभूतांमुळेच बनलेले आहोत त्यामुळे चंद्रादी ग्रह गोलांचा परिणाम आपल्यावर होत असतो. कधी पूर्वजन्मीचे संकेत म्हणून तर कधी वातावरणाचा परिणाम म्हणून अशी स्वप्ने दिसतात. यातून बाहेर पडण्यासाठी परमेश्वरावर श्रद्धा ठेवून परमेश्वराची भक्ती करावी.
ज्योत्स्ना दीदी-
प्रश्न: एकाग्रता वाढवण्यासाठी कोणता उपाय करावा?
उत्तर: ओंकार, प्राणायाम, भ्रामरी यामुळे एकाग्रता वाढू शकते.
प्रश्न: सर्व भगवंत करत असतात तर मग दोष आपल्याला का लागतात?
उत्तर: भगवंतांनी केवळ छोटासा आत्मा आपल्याला दिलेला आहे. बाकी सर्व बाबी प्रकृतीतून आलेल्या आहेत. आपली बुद्धी प्रकृतीच्या अधीन आहे, आपली कर्मे बुद्धीच्या अधीन आहेत तेव्हा योग्य निर्णय घेऊन योग्य कर्म करणे आपल्या विवेकबुद्धीवर अवलंबून असते परमेश्वरावर नव्हे. आपली कर्मे आपण आपल्या विवेकबुद्धीच्या निर्णयानंतर केलेली असतात तेव्हा त्याचा दोष भगवंतांना लागत नाही. शक्ती भगवंतांनी दिली आहे पण त्याचा उपयोग कशासाठी केला जाणार आहे ते आपल्यावरच अवलंबून आहे.
तालिक रामजी-
प्रश्न: काम क्रोध लोभ एवढे तीनच दुर्गुण सांगितले आहेत. वास्तविक चौथ्या मोह या दुर्गुणाबद्दल सांगितले नाही?
उत्तर : मोह दुर्गुण या तिन्ही मध्येच समाविष्ट असल्यामुळे त्याच्या स्वतंत्र अस्तित्वाबद्दल सांगितले गेले नाही.
समापन प्रार्थनेनंतर विवेचन सत्राची सांगता झाली.
|| श्रीकृष्णार्पणमस्तु ||