विवेचन सारांश
ॐ तत्सत् ब्रह्ममंत्र

ID: 6269
मराठी
शनिवार, 18 जानेवारी 2025
अध्याय 17: श्रद्धात्रयविभागयोग
2/2 (श्लोक 13-28)
विवेचक: गीता विशारद डॉ. श्री संजय मालपाणी जी


|| जय श्रीकृष्ण ||
प्रार्थना, दीप प्रज्वलन व गुरुवंदनेने विवेचन सत्राचा प्रारंभ झाला. गुरुवंदनेतील हे वंदन सर्वच गुरूंसाठी आहे. हे वंदन परम श्रद्धेय श्री गोविंद गिरी महाराजांसाठी आहे.

मागील सप्ताहात आपण नचिकेताच्या कथेपर्यंत आलो होतो. नचिकेताच्या पित्याने एक यज्ञ केला होता. यज्ञात त्यांनी सर्वस्वाचे दान करण्याचा संकल्प केला होता त्यानुसार त्यांनी आपल्या जवळच्या सर्व गाईंचेही दान केले. इतकंच नव्हे तर आपल्या जवळ असलेली एक भाकड गायही त्यांनी एका विप्राला दान केली. नचिकेताने आपल्या पित्याच्या या कृतीला विरोध केला. तो म्हणाला, "असल्या भाकड गाईचे दान करून काय उपयोग? उलट ज्याला दान दिली त्याच्यावर हे विनाकारण लादलेलं ओझं नव्हे का?"
नचिकेताने आपल्या पित्याला पुढे असेही विचारले, "जर आपण सर्वस्वाचे दान केले आहेत तर मग या आपल्या पुत्राला, नचिकेताला कोणाला दान केले आहे?" नचिकेताच्या या प्रश्नाने क्रोधित झालेल्या त्याच्या पित्याने रागातच त्याला सांगितले, "मी तुला यमाला दान केले आहे."

क्रोधावस्थेत, नैराश्यात कोणाला कोणतेही वचन देऊ नये अथवा कोणताही निर्णय घेऊ नये असे आपल्याकडील वयस्कर अनुभवी लोक सांगतात. क्रोध निवळेपर्यंत काही काळ थांबावे, असे ते म्हणतात.
क्रोधाने का होईना आपल्या पित्याच्या मुखातून दानाचे वचन बाहेर पडले आहे, त्या वचनाची पूर्तता करावीच लागेल असे नचिकेताने ठरवले. या वचनपूर्तीच्या हेतूने नचिकेता यमदेवाच्या द्वारापाशी आला. यमराज महालात नव्हते. नचिकेता त्यांना भेटण्यासाठी त्यांची प्रतीक्षा करीत सलग तीन दिवस तिष्ठत उभा राहिला. या तीन दिवसात त्याने अन्न पाणीही घेतले नाही. यमदेव जेव्हा त्यांचे काम आटोपून परत आले तेव्हा त्यांना प्रवेशद्वारा जवळ एक बालक उभा असलेला दिसला; त्यांनी आपल्या द्वारपालाला त्या बालकासंबंधी विचारले तेव्हा त्यांना नचिकेताच्या येण्याचे प्रयोजन समजले.

यमराजांना सर्व हकीकत नचिकेताकडून समजली. एका छोट्याशा बालकाला आपल्यासाठी तीन दिवस उपाशी राहून आपली प्रतिक्षा करावी लागली या गोष्टीचे यमराजांना अतीव दुःख झाले. आपल्या चुकीचे परिमार्जन करण्यासाठी त्यांनी नचिकेताला तीन वर देऊ केले.
पहिल्या वरदानात नचिकेताने, "माझ्या पित्याला क्रोधमुक्त करावे, पापमुक्त करावे. त्यांच्याकडून अजाणतेपणाने घडलेल्या पापातून त्यांना मुक्ती मिळावी.", अशी इच्छा केली. यमराजांनी तथास्तु म्हटले.
दुसऱ्या वरदानात नचिकेताने, "स्वर्गलोकाच्या प्राप्तीसाठी जे यज्ञ केले जातात त्यासाठी अग्नी प्रज्वलित करावा लागतो. या अग्निप्रज्वलनाची विद्या आपण मला द्यावी.", अशी इच्छा व्यक्त केली.

यमलोकापर्यंत पोहोचण्याचे द्वार अग्नी हेच आहे म्हणूनच आपल्याकडे मृतदेहाला अग्नी दिला जातो. यमदेवांनी नचिकेताचे दुसरे वरदानही पूर्ण केले इतकेच नव्हे तर त्याला असेही वरदान दिले की ज्या मृतव्यक्तीच्या घरातून हा अग्नी जाईल त्याला "नचिकेता अग्नी'’ असे संबोधले जाईल.

अग्नीचे विविध प्रकार आहेत. उदाहरणार्थ आपल्या उदरातल्या अग्नीला जठराग्नी म्हटले जाते. भीमाच्या उदरातल्या अग्नीला वृकाग्नी असे म्हटले जायचे. अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्रात जंगले च्या जंगले स्वाहा करणाऱ्या भीषण वणव्यातील दावानल हाही अग्नीचाच एक प्रकार आहे. आपल्या सर्वांच्या परिचयाचा आपल्या स्वयंपाक घरातील गॅस, शेगडीतील अग्नी हा ही अग्नीचाच प्रकार आहे. मृत व्यक्तीच्या घरात गोवरी प्रज्वलित करून अग्नी निर्माण केला जातो व त्यातील एक गोवरी उचलून एका मडक्यात ठेवून मृत शरीराबरोबर स्मशानात नेली जाते. चितेवर त्या मृतदेह सोबत ती गोवरी ठेवून मृतदेहाला अग्नी दिला जातो. या अग्नीला नचिकेता अग्नी असे म्हटले जाते. त्याचबरोबर मृत व्यक्तीच्या घरामध्ये दिव्याच्या स्वरूपात सतत अग्नी प्रज्वलित केला जातो. दररोज त्या अग्नीला तूपमिश्रित भाताच्या शितांचा नैवेद्य दाखवला जातो. या दिव्यातील अग्नीलाही नचिकेता अग्नी असेच संबोधले जाते.

आपल्या संस्कृतीमध्ये अग्नीची पूजा करण्याची परंपरा आहे. स्वयंपाक झाल्यानंतर प्रथम अग्नीला तूपमिश्रित भाताच्या एक दोन शितांचा नैवेद्य दाखवला जातो. त्यानंतर गाय, कुत्रा, पक्षी यांच्यासाठी ग्रास बनवला जातो. त्यानंतर अतिथीसाठीही भिक्षा देण्याची परंपरा आहे; त्यानंतर घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून भोजन घ्यावे अशी आपली संस्कृती आहे.

तिसरे वरदान मागायची वेळ आल्यावर नचिकेताने प्रणाम करून अत्यंत विनम्रपणाने यमदेवांकडे वरदान मागितले की मला मृत्यूचे ज्ञान प्राप्त व्हावे; म्हणजेच नचिकेताने आत्मज्ञानाचे वरदान मागितले. यमराज क्षणभर स्तब्ध झाले. एवढ्या छोट्याशा बालकाला आत्मज्ञान देण्याची बाब त्यांच्या मनाला पटत नव्हती. ते म्हणाले, "मी तुला इंद्रपद देऊन त्रैलोक्याचे राज्य देतो, हवे असेल अमृत देऊन अमरत्व प्रदान करतो परंतु तू  मृत्यूच्या ज्ञानाचे वरदान मागू नकोस. दुसरे काहीही माग, मी देईन." नचिकेता म्हणाला, "मला सुखोपभोग, इंद्रपद वगैरे नको आहे. आपण तीन वरदान देणार होतात; देणारच असाल तर मृत्यूनंतरच्या ज्ञानाचे वरदान द्यावे नाहीतर आपली इच्छा !"
नचिकेताच्या निग्रहापुढे यमराजांचे काही चालले नाही. अखेर त्यांना नचिकेताची मागणी मान्य करावीच लागली. त्यांनी नचिकेताला मृत्यूनंतरच्या ज्ञानाचे म्हणजेच आत्मज्ञानाचे वरदान दिले.

वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ वेगवेगळ्या हेतूने केले जातात. मागील सप्ताहात आपण सात्विक व राजस यज्ञांसंबंधी पाहिलेले आहे. भगवंत आता तामस यज्ञाविषयी म्हणतात -

17.13

विधिहीनमसृष्टान्नं(म्), मन्त्रहीनमदक्षिणम्|
श्रद्धाविरहितं(म्) यज्ञं(न्), तामसं(म्) परिचक्षते||17.13||

शास्त्राला सोडून, अन्नदान न करता, मंत्रांशिवाय, दक्षिणा न देता व श्रद्धा न ठेवता केल्या जाणाऱ्या यज्ञाला तामस यज्ञ म्हणतात

जो विधीहीन म्हणजेच शास्त्रविधीरहित केला जातो असा यज्ञ, जो योग्य प्रकार चे अन्नदान न करता केला जातो असा यज्ञ, जो अनधिकारी व्यक्तींकडून, अशुद्ध, अयोग्य मंत्रोच्चारण करून केला जातो, जो मंत्रहीन यज्ञ केला जातो-( मंत्रप्राप्तीचा अधिकार गुरूकडून घ्यावा लागतो. गुरुअभावी म्हटलेल्या मंत्रांना फारसा अर्थ राहत नाही म्हणूनच गुरू आणि गुरूंकडून मिळालेला गुरुमंत्र श्रेष्ठ समजला जातो. गुरू जो मंत्र देतात तो अत्यंत शुद्ध स्वरूपात यमनियमांचे पालन करून दिलेला असतो, त्यामुळे तो सिद्ध मंत्र असतो), जो दक्षिणेरहित केलेला यज्ञ असतो - म्हणजे पुरोहितांना दक्षिणा न देता केलेला यज्ञ किंवा पुरोहितांना दक्षिणा द्यावी लागेल म्हणून त्यांना डावलून रेकॉर्डसोबत पूजाउपचार करून यज्ञविधी केला जातो. अशा प्रकारच्या अशास्त्रीय यज्ञांना, श्रद्धाविरहित यज्ञांना तामसी यज्ञ म्हटले जाते.

श्रावणामध्ये अथवा प्रदोष काळी महादेवाच्या पिंडीवर जो दुग्धाभिषेक केला जातो हा अभिषेक विधी मूर्खपणाचा आहे असा युक्तिवाद कधी कधी बुद्धिवादी लोक करतात. त्या अभिषेकासाठीचे दूध एखाद्या भुकेल्या बाळाला, एखाद्या गरजू व्यक्तीला द्या अशी यांची विचारधारा असते. ही विचारपद्धती पूर्णपणे चुकीची आहे असं नाही म्हणता येणार कारण भुकेलेल्याला अन्नदान हे शास्त्रविधीत अधोरेखित केलेले आहे परंतु महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करण्यामागचेही शास्त्र जाणून घेणे तेवढेच गरजेचे आहे. महादेवाच्या पिंडीतील ऊर्जा शांत आणि नियंत्रित करण्यासाठी हा संततधार अभिषेक असतो. अशा या शांत लहरींमार्फत त्या पिंडीतील ही ऊर्जा आपल्यापर्यंत पोहोचते यासाठीच महादेवाच्या पिंडीवर संततधार अभिषेकाचे पात्र असते.
या पाखंडी व्यक्तींचे वर्तन दुटप्पी असते. पिंडीवरील दुग्धाभिषेकाने दूध व्यर्थ जाते, वाया जाते असा यांचा युक्तिवाद असतो आणि इकडे आपल्या मुलांचा वाढदिवस वारेमाप पैसा खर्च करून इव्हेंट म्हणून साजरा करतात. आपल्या लाडक्या मुलामुलींची हौस पुरवण्यासाठी केलेला हा खर्च त्यांना निरर्थक वाटत नाही कारण तो त्यांच्या इव्हेंटचा भाग असतो. जसं आपल्या मुलांचे कोडकौतुक करतो तसे भगवंतांचेही कोडकौतुक दुग्धाभिषेकाने केले तर काय बिघडते असा विचार केला जात नाही.

आपली सर्व शास्त्रपुराणे, विधी, वैज्ञानिक पायावर रचलेली आहेत. आपण याबाबत सखोल चिंतन करत नाही, विचार करत नाही. एकच उदाहरण घेऊया. श्राद्ध म्हणजे काय तर आपल्या मृत परीजनांची श्रद्धेने केलेली आठवण. या श्राद्धाच्या प्रसंगी काकग्रास म्हणजेच कावळ्याला नैवेद्य ठेवलेला असतो. श्राद्धविधीमध्ये अंगठ्यावरून तिलांजली अर्पण केली जाते. (इथेही पुन्हा आपल्या संस्कृतीचे दर्शन होते. जसे की ओंजळीतून अर्पण केलेल्या पाण्याला अर्घ्य असे म्हटले जाते; उजव्या तळहातावरून सोडलेल्या पाण्याला संकल्प असे म्हणतात तर अंगठ्यावरून सोडलेल्या पाण्याला तर्पण असे म्हणतात.) श्राद्धप्रसंगी कावळा हाच पक्षी का असतो त्याही पाठीमागे शास्त्र आहे. कधी कधी आपण अनुभव घेतो की पत्रावळीवर ठेवलेल्या नैवेद्याच्या आजूबाजूला तो कावळा घिरट्या घालतो पण भोजनापर्यंत येत नाही. कावळ्याची दृष्टी, काकदृष्टि असे तिला म्हणतात अतिशय तीक्ष्ण आणि सूक्ष्म असते. कावळ्याला पितर किंवा तो मृतात्मा अजूनही सुक्ष्मरूपात तिथे अस्तित्वात आहे याची जाणीव होते. जोपर्यंत तो आत्मा तिथून जात नाही तोपर्यंत कावळा अन्नाला स्पर्श करीत नाही. इतर पक्षांना अशी काकदृष्टी नाही म्हणून श्राद्धविधीसाठी कावळा हाच पक्षी महत्त्वाचा ठरतो.

आपल्या संस्कृतीमध्ये प्राण्यांना, विशेषतः गाईला, कुत्र्याला ग्रास दिला जातो त्याही पाठीमागचे शास्त्र आहे. गाईच्या वशिंडावरून, पाठीवरून हात फिरवल्यानंतर येणारी ऊर्जा ही अनेक रोगांवर उपयोगी ठरते. कुत्र्याला तुकडा दिल्यावर तो शेपूट हलवून प्रसन्नता व्यक्त करतो. 
प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते।
प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते।।२.६५।।
प्रसन्नता त्या व्यक्तीला नवीन ऊर्जा देते. ऊर्जेमुळे उत्साह टिकून राहतो. उत्साहाने कार्य करण्याची प्रेरणा मिळते. थकवा न जाणवता प्रसन्नता येते काम अधिक वेगाने आणि सकारात्मकतेने होते.
उत्साहामुळे बुद्धी अधिक प्रबळ व ताजी तवानी होते. आपल्याला सात्विक बनायचे आहे तामसी नाही. सतरावा अध्याय एक प्रकारची प्रयोगशाळा आहे. इथे विविध प्रकारचे प्रयोग सांगितलेले आहेत. त्यापैकी भगवंत तीन प्रकारच्या तपासंबंधी बोलत आहेत.

17.14

देवद्विजगुरुप्राज्ञ, पूजनं(म्) शौचमार्जवम्|
ब्रह्मचर्यमहिंसा च, शारीरं(न्) तप उच्यते||17.14||

देव, ब्राह्मण, गुरु व ज्ञानी यांची पूजा करणे तसेच पावित्र्य, सरळपणा, ब्रह्मचर्य आणि अहिंसा हे शारीरिक तप म्हटले जाते.

देव म्हणजे भगवंत. द्विज या शब्दाचा अर्थ आहे दोन वेळा जन्मणारा. पक्षांना द्विज असे म्हटले जाते कारण अंड्याच्या रुपात पक्षिणीच्या पोटातून ते एकदा बाहेर येतात आणि नंतर अंड्याचे कवच फोडून पिल्लाच्या रूपात बाहेर येतात. अशाप्रकारे ते दोन वेळा जन्मतात म्हणून पक्षांना द्विज असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे जे ज्ञानी आहेत ते प्रथम मातेच्या कुशीतून जन्मतात. हा त्यांचा एक जन्म. त्यानंतर उपनयन संस्कारानंतर गुरुगृही जाऊन, ज्ञानग्रहण करून, अनेक प्रकारच्या ज्ञानसिद्धी प्राप्त करून घेतात. अशा प्रकारे ज्ञानसिद्धीप्राप्त ज्ञानींचा एक प्रकारे पुनर्जन्मच झालेला असतो म्हणून अशा ज्ञानी व्यक्तींना द्विज असे संबोधले जाते.

प्राज्ञ या शब्दाचा अर्थ आहे ज्ञानी किंवा जाणणारा. भगवंत म्हणतात, देव, द्विज, गुरू ( गुरूंच्या संज्ञेत मातापिता, आचार्य, गुरूवर्य यांचा समावेश होतो) व प्राज्ञ यांचे पूजन करावे. हे पूजनही शौचम, आर्जवम् असे असले पाहिजे. शौचम् म्हणजे पवित्रता. सोळाव्या अध्यायात सांगण्यात आलेल्या दैवी गुणसंपदांमध्ये या शौचम्, आर्जवम् दोन्ही गुणांबद्दल आपण पाहिले आहे. शौच म्हणजे केवळ स्नानशुद्धी नव्हे. कोरोनाच्या काळात आपण हॅन्ड सॅनीटायझरने वारंवार हात धुवत होतो. भोजनापूर्वी या केमिकलने आपण हस्तशुद्धी केली परंतु ती स्वच्छता झाली शुद्धता नव्हे कारण त्या केमिकलने हातावरचे सूक्ष्म किटाणू मरून गेले पण त्यांचे सुक्ष्मातीसूक्ष्म मृतावशेष आपल्या हातावरच राहिलेले होते. आपण भोजन केले. स्वच्छता झाली पण शुचिता झाली नाही कारण शुचितेसाठी वाहत्या पाण्यात हात धुतले गेले पाहिजेत. जसं भोजन तसं मन असं आपल्याकडे म्हटलं जातं. मनाच्या पवित्रतेसाठी नैवेद्य दाखवला जातो. बाह्यशुचितेसोबत आंतरिक शुचिताही महत्त्वाची आहे. प्रथम मन शुद्ध करा, पवित्र करा नंतर भोजन करा तरच ते भोजन ही पवित्र बनते. अपवित्र मनाने, क्रोधित होऊन जर अन्नग्रहण केले तर असे अन्न आपला क्रोध आणखीन वाढवते. म्हणून अंतर्बाह्य शुचिता महत्त्वाची. शुचिता म्हणजे निर्मलता. यामध्ये आणखीही भाव आहेत जसे ज्याच्या मनात कपटकारस्थान नाही , निराशा नाही, ताणतणाव नाहीत, क्रोध नाही, द्वेषबुद्धी नाही अशा प्रकारचे मन विशुद्ध मन असे समजले जाते. शुद्धतेमध्ये या सर्व शुद्ध गुणांनी युक्त मनाचाही विचार येतो. हे शुद्ध मन म्हणजेच शौचम्.

आर्जवम् म्हणजे मधुरता. बोलण्यात, वागण्यात, व्यवहारात सर्वत्र आर्जव हवे. मधुरता केवळ वाणी पुरती मर्यादित नाही. जसं ओठात साखर, पोटात कातर ( मुह मे राम बगल मे छुरी या हिंदी म्हणीचे मराठी भाषांतर) या वागण्याला आर्जव म्हटले जात नाही. वाणीही मधुर हवी आणि मन ही मधुर हवे. वर्तनही मधुर हवे. या मधुर वर्तनालाच आर्जव असे म्हटले जाते. ब्रह्मचर्य सुद्धा अतिशय महत्त्वाचे आहे. आपण ब्रह्मचर्य शब्दाची, अविवाहित म्हणजे ब्रह्मचारी एवढीच संकुचित व्याख्या करतो परंतु ब्रह्मचर्य म्हणजे आपल्या पंचेंद्रियांवर असलेले आपले नियंत्रण. काय पहावे आणि काय पाहू नये; काय ऐकावे आणि काय ऐकू नये; कशाचा गंध घ्यावा, कशाचा घेऊ नये ; काय खावे आणि काय खाऊ नये; कशाला स्पर्श करावा कोणत्या गोष्टीला स्पर्श करू नये याचा विवेक म्हणजे ब्रह्मचर्य होय.

या ब्रह्मचर्य शब्दासोबत आणखी एक महत्त्वाचा शब्द जोडला गेला आहे तो म्हणजे अहिंसा. याही शब्दाला आपण वेगळ्या अर्थाने, चुकीच्या मार्गाने घेतो. “अहिंसा परमो धर्म:” या वचनाचा शब्दशः अर्थ घेऊन एखाद्या दहशतवाद्याला, आतंकवाद्याला, न मारता सोडून दिले तर काय अनर्थ घडून येईल याचा विचार केलेलाच बरा ! भगवंत स्वतः इथे सांगतात, अशा आतंकवाद्यांची हत्या करणे ही सुद्धा अहिंसा आहे. भगवंत अर्जुनाला वारंवार सांगतात की, हे कौरव आणि ही कौरवसेना आततायी आहेत म्हणून त्यांना मारणे हे तुझे कर्तव्य आहे, हाच तुझा धर्म आहे. आततायी कोण हेही भगवंत स्पष्ट करतात. ज्याने दुसऱ्याच्या राज्यावर अतिक्रमण केले आहे, परस्त्रीचे अपहरण किंवा अपमान केलेला आहे, कपटकारस्थानाने विषप्रयोग केलेला आहे, दुसऱ्याचे घर जाळण्याचा प्रयत्न केलेला आहे,अशा प्रकारची दुष्कृत्य करणारे ते आततायी होत.

दुर्योधनाने यापैकी सर्व कृत्ये केलेली होती. आपण अहिंसेची चुकीची व्याख्या घेऊन त्याचे समर्थन करतो, हे योग्य नव्हे. आतंकवादी कसाबला दिलेली फाशीची शिक्षा ही हिंसा नसून अहिंसाच आहे. चुकीची व्याख्या करून आपण आपला पुरुषार्थ, आपला धर्म विसरत आहोत म्हणूनच भगवंतांना ‘क्षत्रियस्य न विद्यते’ असे सुनवावे लागले. त्याचा क्षत्रिय धर्म कोणता हे पुन्हा पुन्हा त्याला समजावून सांगावे लागले. युद्धात शत्रूला मारणे हाच क्षत्रियाचा धर्म आहे, ही अहिंसाच होय.

अशा प्रकारचे तप हे शारीरिक तप म्हटले जाते. अनेक छोट्या छोट्या गोष्टीतून आपण शारीरिक तप आचरणात आणू शकतो. उपवास करून जिभेचे ब्रह्मचर्य सांभाळू शकतो, शेजारधर्म पाळून शारीरिक तप करू शकतो (शेजारच्या कोणाला इस्पितळात भरती केले असेल तर त्यांच्या कुटुंबीयांची, व त्यांची जेवणाखाण्याची व्यवस्था सांभाळू शकतो.). जेवढी क्षमता आहे त्याच्या एक पाऊल पुढे जाणे म्हणजे तप अशी तपाची व्याख्या आपण करू शकतो.

महाराष्ट्रात संक्रांतीला तिळगुळ बनवतात. ही तिळगुळ बनवण्याची प्रक्रिया अतिशय नाजूक असते. मंदाग्नीवर ठेवलेल्या परातीमध्ये तीळ पसरले जातात. त्यावर थेंबा थेंबाने साखरेचा पाक टाकून, अतिशय हळुवार हाताने हलवून मस्त असा काटेरी हलवा बनवला जातो. या हलव्याचा काटा जिभेला बोचत नाही तर गोडवा निर्माण करतो. असा हा तिळगुळ देताना, "तिळगुळ घ्या गोड बोला !" असे म्हणण्याची पद्धत आहे. सध्या मोबाईलच्या जमान्यात संवाद, संभाषण थांबले आहे म्हणून तिळगुळ घ्या आणि बोला तरी असे म्हणण्याची वेळ आलेली आहे. असो. भगवंत पुढे सांगतात -

17.15

अनुद्वेगकरं(म्) वाक्यं(म्), सत्यं(म्) प्रियहितं(ञ्) च यत्|
स्वाध्यायाभ्यसनं(ञ्) चैव, वाङ्मयं(न्) तप उच्यते||17.15||

जे दुसऱ्याला न बोचणारे, प्रिय, हितकारक आणि यथार्थ भाषण असते ते, वेदशास्त्रांचे पठण आणि परमेश्वराच्या नामजपाचा अभ्यास- हेच वाणीचे तप म्हटले जाते.

भगवंत म्हणतात, ‘अनुद्वेगकरम्’ म्हणजे उद्वेग निर्माण न करणारे, अर्थात दुसऱ्याच्या मनाला न बोचणारे असे बोलणे. बोलणे मधुर असावे अन्यथा आपल्या शब्दांच्या असंख्य विषारी काट्यांनी माणसाचे मन रक्तबंबाळ होऊन जाईल. काही व्यक्तींचे असे मत असते की कटू असले तरी ते सत्य आहे तेव्हा ते बोललेच पाहिजे, मी ते बोलणारच असा त्यांचा आग्रह असतो. भगवंत म्हणतात सत्य आहे ठीक आहे पण ते हितकर आहे का? जे सत्य आहे हितकर आहे असे सत्य बोलावे. निंदा सुद्धा मधुर शब्दात करावी ज्यामुळे समोरच्यात सुधारणा व्हावी. समुद्रमंथनातून निघालेले विष देवांचे देव महादेव यांनी कुटुंबप्रमुख या नात्याने प्राशन करून कंठात धारण केले. ते नीकंठ बनले. जर ते विष त्यांनी बाहेर टाकले असते तर जीवसृष्टी नष्ट झाली असती. जर ते त्यांच्या शरीरात गेले असते तर अपायकारी ठरले असते म्हणून महादेवांनी ते कंठातच धरण केले. आपल्या सामान्य मनुष्यांच्या जीवनात जेव्हा जेव्हा असे मंथनाचे प्रसंग येतील, अशा प्रकारचे विष प्रकट होईल तेव्हा कुटुंबप्रमुख या नात्याने ते आपल्या कंठातच धारण करावे. शब्दांच्या माध्यमातून ते बाहेर टाकू नये. सत्यबाब सुद्धा हितकारी असेल अशा पद्धतीने, समोरच्याला रुचेल अशा पद्धतीनेच बोलावी यासंबंधीची एक बोध पर कथा आहे. 

एका राजाला हस्तरेषाद्वारा ज्योतिष, भविष्य जाणून घेण्याचा शौक असतो. एकदा त्यांच्या राज्यात एक नामवंत हस्तसामुद्रिक ज्योतिषी येतात. ते प्रकांड पंडित असतात. राजा त्यांना सन्मानपूर्वक बोलावतो, आपला हात दाखवतो आणि भविष्य विचारतो. ज्योतिषी हात पाहून चिंताग्रस्त होतात. राजा त्याना चिंतेचे कारण विचारतो तेव्हा ते ज्योतिषी राजाचे भविष्य वर्तवतात. ज्योतिषी म्हणतात, "आपल्यासमोर आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींचा मृत्यू होईल. सर्वांच्या मृत्यूचे दुःख आपल्याला सोसावे लागेल." असले भविष्य ऐकून राजाला अत्यंत क्रोध येतो. तो त्या ज्योतिषाला तुरुंगात टाकतो, कठोर शिक्षा करतो. परंतु या भविष्याने राजाची झोपच उडालेली असते. असाच काही काळ लोटल्यानंतर पुन्हा एक दुसरा ज्योतिषी त्यांच्या राज्यात येतो. प्रधानजी त्या ज्योतिषाला घेऊन महाराजांच्याकडे येतात. महाराज त्याला हात दाखवून भविष्य विचारतात. तो ज्योतिषी चतुर असतो. हात पाहून तो म्हणतो, "आहाहा काय हात आहे ! आपण अत्यंत नशीबवान आहात. आपण दीर्घायुषी आहात. वर्षानुवर्षे आपण राज्याचा उपभोग घेणार आहात. आपल्या कुटुंबातील इतरांपेक्षा आपल्याला दीर्घायुष्य लाभणार आहे."
गंमत पहा दोघांनीही सांगितलेल्या भविष्याचा अर्थ एकच होता परंतु पहिल्या ज्योतिषाने नकारात्मक शब्दांमधून भविष्य वर्तवले त्यामुळे सत्य असूनही हितकर न वाटल्यामुळे राजाने त्या ज्योतिषाला शिक्षा केली या उलट दुसऱ्या ज्योतिषाने तीच गोष्ट, तेच भविष्य वर्तवले परंतु अतिशय मृदू शब्दांमध्ये, सुखकारक अशा पद्धतीने, राजाला हितकारक होईल अशा पद्धतीने सांगितले. राजाने त्याचा गौरव केला.

तात्पर्य, "सत्यं(म्) प्रियहितं(ञ्) च यत्”. सत्य आणि प्रिय बोलावे. कटू बोलणे कोणालाही आवडत नाही. भगवद्गीतेचे एवढे तत्त्वज्ञान जरी आचरणात आणले तरी आपले जीवन सुखकारक बनेल. एकदा एका मुलाने प्रश्न केला, "कोकीळ पक्षी आपली अंडी कावळ्याच्या घरट्यात ठेवते. बिचारा कावळा ती अंडी आपली समजूनच उबवतो. असं असूनही सर्वजण त्या आळशी कोकिळेचे कौतुक करतात, कावळ्याची उपेक्षा करतात. असं का?" उत्तर सोपं आहे. कोकीळ आपल्या मधुर कंठाने सर्वांची मने जिंकून घेते. या उलट कावळ्याची कर्कश्य काव काव रोष निर्माण करते. म्हणून कोकिळेसारखे मधुर बोलणे शिकूया.
मनुष्यजीवनात शरीराबरोबर मनाचे तपही सांगितलेले आहे.

17.16

मनः(फ्) प्रसादः(स्) सौम्यत्वं(म्), मौनमात्मविनिग्रहः|
भावसंशुद्धिरित्येतत्, तपो मानसमुच्यते||17.16||

मनाची प्रसन्नता, शांत भाव, भगवत्चिंतन करायचा स्वभाव, मनाचा निग्रह आणि अंतःकरणातील भावांची पूर्ण पवित्रता हे मनाचे तप म्हटले जाते.

मनाचे तप कशाला म्हणतात त्याची व्याख्या भगवंत सांगतात. मन सदैव आनंदी राहायला हवे. सुखदुःख, बाह्य घटना ह्या बाह्य अनुभूती आहेत. बाहेर काय घडत आहे ते प्रिय मानून घ्यायचे. जसे गुलाबजाम आणि कारल्याची भाजी दोन्ही गोष्टी प्रिय आहेत असे समजून सेवन करायचे. हा आत्मसंतृष्टीचा भाव आहे. 'शीतोष्ण सुखदुःखेषु' अशी वृत्ती हवी. यासाठी आंतरिक सुख महत्त्वाचे. भगवंत जे करतात ते आपल्या भल्यासाठीच हा विश्वास, हा भाव सदैव मनात ठेवायचा. भगवंताने एखादी अप्रिय गोष्ट ही आपल्या बाबतीत केली असली तरीही त्यामागे भगवंताचे काही प्रयोजन असेल असे समजून त्या अप्रिय गोष्टीचाही स्वीकार करावयाचा यासंबंधीची एक बोधपर कथा आहे. 

एक लाकूडतोड्या असतो. एकदा लाकडे तोडताना अचानक त्याचे एक बोट कुऱ्हाडीच्या घावाने तुटते. त्याला अतिशय वाईट वाटते. आता मी काम कसे करणार अशी त्याला चिंता वाटते. तो झाल्या घटनेचा भगवंताला दोष देतो. त्याचा मित्र त्याला म्हणतो, "अरे, कशासाठी दुःख करतोस. जे होते ते चांगल्यासाठीच होते, असे समज." लाकूडतोड्याला हे पटत नाही. नशिबाला आणि भगवंतालाही दोष देत तो आपल्या घराकडे परत येत असतो. इतक्यात जंगलातले काही आदिवासी त्याला पकडतात. त्या आदिवासींना त्यांच्या देवासाठी नरबळी द्यायचा असतो. लाकूडतोड्या प्रचंड घाबरतो. एक तर बोट तुटले आता प्राण ही गमावावे लागणार. इतक्यात एका आदिवासी माणसाचे लक्ष त्याच्या तुटलेल्या बोटाकडे जाते. तो सर्वांना सांगतो, "अरे याचे एक बोट नाही. असा अपंग व्यक्ती देवाला बळी म्हणून चालणार नाही तेव्हा सोडून द्या याला." त्या लाकूडतोड्याला सोडून दिले जाते. आता मात्र तो परमेश्वराचे मनःपूर्वक आभार मानतो.
“मनःप्रसाद सौम्यत्वम्” म्हणजे मनाचा निग्रह करणे, समत्व राखणे. अंतःकरणातील भावांची पूर्ण पवित्रता, प्रसन्नता, सौम्यत्व, संयम, भावशुद्धी आणि पवित्रता यांना मानसिक तप असे संबोधले आहे.

17.17

श्रद्धया परया तप्तं(न्), तपस्तत्त्रिविधं(न्) नरैः|
अफलाकाङ्क्षिभिर्युक्तैः(स्), सात्त्विकं(म्) परिचक्षते||17.17||

फळाची इच्छा न करणाऱ्या योगी पुरुषांकडून अत्यंत श्रद्धेने केलेल्या वर सांगितलेल्या तिन्ही प्रकारच्या तपाला सात्विक तप म्हणतात.

कोणतीही फलाकांक्षा न ठेवता योगी पुरुषांकडून केले जाणारे तप, जे अत्यंत श्रद्धेने केले गेलेले आहे त्याला सात्विक तप असे म्हटले आहे. फलाकांक्षा न ठेवता, स्थिर बुद्धीने आणि श्रद्धेने केलेल्या शारीरिक, वाचिक आणि मानसिक या तीनही प्रकारच्या तपांना सात्विक तप म्हटले जाते. सेवाभावाने केलेले हे सात्विक तप आहे.
कुंभपर्वाच्या निमित्ताने लर्नगीता प्रचारासाठी सर्व गीताप्रेमींना कुंभपर्वात सामील होऊन लर्नगीता उपक्रमाच्या प्रचारासाठी जमेल त्या प्रकारच्या सेवा द्याव्यात. यामध्ये सामील होणाऱ्या साधकांची सर्व प्रकारची तपे पूर्ण होणार आहेत. अनेक लाभ त्यांना मिळणार आहेत. ऋषीमुनींचे दर्शन घडणार आहे. रोज दहा-पंधरा किलोमीटर चालावे लागणार आहे म्हणजे व्यायाम अर्थात शारीरिक तप होणार आहे. देव, द्विज, गुरु, प्राज्ञ या चारही प्रकारच्या व्यक्तींचे दर्शन घडणार आहे. गंगामैयाच्या पवित्र स्नानाने शौचम, आर्जवम् हे हेतू साध्य होणार आहेत. शरीराची, मनाची व वाणीची शुद्धता प्रकट होणार आहे. कुठल्याही फळाची आकांक्षा न ठेवता जेवढी शक्य असेल तेवढी सेवा देण्यासाठी स्तुत्य उपक्रमात सामील होऊया.

17.18

सत्कारमानपूजार्थं(न्), तपो दम्भेन चैव यत्|
क्रियते तदिह प्रोक्तं(म्), राजसं(ञ्) चलमध्रुवम्||17.18||

जे तप सत्कार, मान व पूजा होण्यासाठी तसेच दूसऱ्या काही स्वार्थासाठीही स्वभावाप्रमाणे किंवा पाखंडीपणाने केले जाते, ते अनिश्चित तसेच क्षणिक फळ देणारे तप येथे राजस म्हटले आहे.

मान मिळावा, पूजा केली जावी, सत्कार केले जावेत म्हणून दांभिक वृत्तीने केले जाणारे तप राजसी तप म्हटले जाते. हे तप अनिश्चित स्वरूपाचे असते.
एकदा एका दांभिक गृहस्थांनी भागवत कथेचे आयोजन केले होते. 'मी केले, मी केले' अशा अहंकारामुळे भागवतकथेच्या आयोजनामाचं मूळ कारणच लक्षात घेतलं गेलं नाही. भागवतकथेचे आयोजन केले जाते कारण अशाश्वत जीवनात कोणत्याही क्षणी काहीही घडू शकते तेव्हा प्रत्येक क्षण सत्कारणी कसा लावायचा याचे विवेचन म्हणजे भागवत. राजा परीक्षित याचा सात दिवसानंतर मृत्यू होणार होता. या शेवटच्या सात दिवसात त्याने भागवतकथा श्रवण केली. आपल्या जीवनात कशा पद्धतीने वर्तन करावयाचे याचे विवेचन म्हणजे भागवत हे लक्षात न घेता केवळ आयोजनाची प्रौढी मिरवणारे राजसी वृत्तीचे असतात. त्यांची वृत्ती अहंकारी असते. सर्वांनी केवळ आपलीच स्तुती करावी, आपण दिलेल्या भोजनाचीच स्तुती करावी, आपल्यालाच सर्वांनी मान द्यावा अशा वृत्तीने केलेले तप हे राजसी वृत्तीचे असते.
भगवंत यानंतर तामसी तपाविषयी सांगत आहेत.

17.19

मूढग्राहेणात्मनो यत्, पीडया क्रियते तपः|
परस्योत्सादनार्थं(म्) वा, तत्तामसमुदाहृतम्||17.19||

जे तप मुर्खतापूर्वक हट्टाने, मन, वाणी आणि शरीराला कष्ट देऊन किंवा दुसऱ्याचे अनिष्ट करण्यासाठी केले जाते, ते तप तामस म्हटले गेले आहे.

जे तप मूर्खतापूर्वक केले जाते, अट्टाहासा पायी केले जाते, मन, वाणी आणि शरीराला कष्ट देऊन जे तप केले जाते, दुसऱ्याचे अनिष्ट व्हावे या हेतूने जे तप केले जाते त्या सर्व तपांना तामसी तप असे म्हटले जाते. यासंबंधीची एक कथा आहे.
एक तामसी वृत्तीची स्त्री आपल्या शेजारीणीचा मस्तर करीत असे. तिची शेजारीण सात्विक वृत्तीची होती. या तामसी स्त्रीने कठोर तपश्चर्या करून भगवंतांना प्रसन्न करून घेतले. तिची तामसी वृत्ती भगवंतांना माहिती होती. त्रिभुवन जाणणारे भगवंत त्या स्त्रीला ओळखून होते. ते म्हणाले, "काय हवं ते माग पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू जे मागशील त्याच्या दुप्पट तुझ्या शेजारीणीला मिळेल. तू एक साडी मागितलीस तिला दोन मिळतील, तू एक विहीर मागितली तर तिला दोन मिळतील." त्या दुष्ट प्रवृत्तीच्या स्त्रीने बराच विचार करून भगवंतांकडे वर मागितला, "माझा एक डोळा फोडा. परिणामी शेजारीणीचे दोन्ही डोळे फुटतील." अशा वृत्तीने केलेले तप हे तामसी तप संबोधले जाते.
यानंतर भगवंत दानाकडे वळतात.

17.20

दातव्यमिति यद्दानं(न्), दीयतेऽनुपकारिणे|
देशे काले च पात्रे च, तद्दानं(म्) सात्त्विकं(म्) स्मृतम्||17.20||

दान देणेच कर्तव्य आहे', ह्या भावनेने जे दान देश, काळ आणि पात्र मिळाली असता उपकार न करणाऱ्याला दिले जाते, ते दान सात्विक म्हटले गेले आहे.

हे अर्जुना, दानाचे प्रकार ऐक. दान देणे हे कर्तव्य आहे या भावनेने केलेले दान सात्विक स्वरूपाचे समजले जाते. अशा प्रकारच्या दानात माझ्याकडे जे आहे त्यातील मला काही दान दिले पाहिजे एवढाच उदात्त हेतू असतो. ज्याची जेवढी पात्रता आहे तेवढे दान त्याला द्यावे. सत्पात्री दिलेले दान, जे गरजवंत आहेत अशा गरजू व्यक्तींना दिलेले दान या सर्वांना सात्विक दान असे म्हटले जाते. सात्विकतेने दिलेले दान हे सात्विक स्वरूपाचे असते. असे दान कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता दिलेले असते, निरपेक्षपणाने दिलेले असते. एका सुंदर गाण्याच्या ओळी आहेत -
“गरीबों की सुनो, 'वो' तुम्हारी सुनेगा
तुम एक पैसा दोगे, 'वो' दस लाख देगा”
यातील 'वो' म्हणजेच भगवंत होय.

यासंबंधीची एक सुंदर कथाही आहे.
एक भिकारी एका मंदिराजवळ रोज भीक मागत असे. आपल्या झोपडीतून बाहेर पडताना रोज तो आपल्या झोळीमध्ये मूठभर तांदळाचे दाणे ठेवायचा त्यामुळे आपल्याला भिक्षा भरपूर मिळते असा त्याचा समज होता. मंदिरापाशी आल्यावर भगवंतांना प्रणाम करायचा. खूप भिक्षा मिळू दे अशी प्रार्थनाही करायचा. नित्याप्रमाणे तो एक दिवस मंदिराजवळ आला. त्यादिवशी सोमवार होता. त्याने भगवंतांची प्रार्थना केली व भरपूर भिक्षा मिळण्याची याचना केली. इतक्या त्याला एक रथ येताना दिसला. त्याने अंदाज केला की तो रथ राजाचाच रथ असावा. खरंच तो रथ राजाचा होता हे त्याला समजले. रथ त्याच्याच जवळ येऊन थांबला. रथातून राजा त्याच्याकडे आला. भिकारी अतिशय आनंदीत होऊन गेला होता. त्याला वाटत होतं की साक्षात राजा आलेला आहे तो आपल्याला भरपूर भिक्षा देईल, आज आपल्याला खूप चांगलं काहीतरी मिळेल अशा कल्पनेत तो होता पण वेगळंच काहीतरी घडलं.
राजाने भिक्षेसाठी त्याच्यापुढे हात केले आणि म्हणाला, "मला आज स्वप्न पडलं की पूर्व दिशेने गेल्यानंतर, जी पहिली व्यक्ती तुला भेटेल आणि तुला भिक्षा देईल त्याच्याकडून ती भिक्षा घेतली तर त्या भिक्षेमुळे पाऊसपाणी चांगले होऊन तुझी प्रजा सुखी बनेल. त्या स्वप्नानुसार मी पूर्वदिशेने आलो. समोर पहिली व्यक्ती म्हणून तूच भेटलास तेव्हा तुझ्या झोळीत जे काही असेल त्यातले काहीतरी मला भिक्षा म्हणून दे." भिकाऱ्याने आपल्या झोळीत हात घातला. मूठभर तांदूळ बाहेर काढले. तो राजाला भिक्षा देणार तेवढ्यात त्याच्या मनात विचार आला, राजाला काय कमी आहे, मूठभर तांदूळ देण्याऐवजी आपण चिमूटभर दिले तरी सुद्धा चालतील असा विचार करून त्याने दोन बोटाच्या चिमटीत मावतील एवढे दोन दाणेच राजाच्या हातावर ठेवले. राजाने आनंदाने ती भिक्षा स्वीकारली, त्याला प्रणाम केला आणि तो परत गेला.

इकडे भिकारी रोजच्याप्रमाणे भीक मागू लागला. त्याला रोजच्यापेक्षा भरपूर भीक मिळाली. झोळी भरून सुद्धा त्याच्याकडे अधिक भिक्षा होती. त्याला अतिशय आनंद झाला. घरी आल्यावर तो आणि त्याची पत्नी दोघे भिक्षा मोजू लागले. एवढ्यात त्याच्या पत्नीला एक चमत्कार दिसला. त्याच्या झोळीतल्या भिक्षेत एक सोन्याचा तांदुळाचा दाणा होता. तिने तो आपल्या पतीला दाखवला. आता तो भिकारी ही आणखी सोन्याचे तांदूळ दाणे मिळतात का म्हणून शोध करू लागला. त्यालाही आणखी एकच सोन्याचा तांदुळाचा दाणा मिळाला. भिकाऱ्याला आता पश्चाताप वाटू लागला की आपण राजाला तांदुळाचे मूठभर तांदूळ दाणे दिले असते तर आज आपल्याला मुठभर सोन्याचे तांदुळाचे दाणे मिळाले असते. त्याने केवळ दोनच दाणे राजाला भीक म्हणून घातले होते. तेवढे दोनच दाणे सोन्याचे होऊन त्याच्याकडे परत आले होते. आता पश्चाताप करून काहीही उपयोग नव्हता कारण ‘अब पछताने से क्या फायदा जब चिडिया चुग गई खेत’ |
दे दान द्यावे ते सत्पात्री असावे. दानाचे ही विविध प्रकार आहेत. श्रमाचे दान, रक्तदान, वेळेचे दान, विद्येचे दान, अवयवदान, अन्नदान अशा अनेक प्रकारची दाने आहेत. आपल्या कुवतीनुसार जे जमेल, झेपेल, रुचेल असे सात्विक स्वरूपाचे दान करावे. दान करताना फळाची अपेक्षा ठेवू नये.
यानंतर भगवंतांनी राजसी दान म्हणजे काय हे पुढील श्लोकात सांगितले आहे.

17.21

यत्तु प्रत्युपकारार्थं(म्), फलमुद्दिश्य वा पुनः|
दीयते च परिक्लिष्टं(न्), तद्दानं(म्) राजसं(म्) स्मृतम्||17.21||

परंतु जे दान क्लेशपूर्वक प्रत्युपकाराच्या हेतूने किंवा फळ नजरेसमोर ठेवून दिले जाते, ते राजस दान म्हटले आहे.

द्वेषपूर्वक, प्रति उपकाराच्या भावनेने, फळाची अपेक्षा ठेवून, क्लेशपूर्वक दिलेले दान अशा प्रकारच्या दानांना राजस दानं म्हटले जाते.
द्यावं आणि परत घ्यावं अशा वृत्तीचे दान राजस असते. गाईला भरपूर चाऱ्यासाठी दान केलं परंतु त्या मोबदल्यात गाईचे भरपूर दूध मिळेल, वासरू मिळेल असा उद्देश ठेवून केलेले दान राजस होय. दान द्यायचे पण त्या मोबदल्यात आपले काही काम साधून घेण्याचे उद्दिष्ट ठेवले तर ते दान राजस दान होय. सन्मान मिळावा, प्रशंसा व्हावी, प्रतिष्ठा वाढावी, स्वर्गप्राप्तीची अपेक्षा, रोग निवारण व्हावे या आणि अशा उद्देशाने दिलेले दान राजसी होय.

17.22

अदेशकाले यद्दानम्, अपात्रेभ्यश्च दीयते|
असत्कृतमवज्ञातं(न्), तत्तामसमुदाहृतम्||17.22||

जे दान सत्काराशिवाय किंवा तिरस्कारपूर्वक अयोग्य ठिकाणी, अयोग्य काळी आणि कुपात्री दिले जाते, ते दान तामस म्हटले गेले आहे.

चोरीचे धन आणले त्यातून खूप मोठा यज्ञ केला, दानधर्म केला परंतु ही सर्व कृत्ये अयोग्य आहेत. जंगलात धर्मशाळा बांधून काय उपयोग होणार? तिथे जाऊन कोण राहणार? अशा प्रकारची अयोग्य देशी, अयोग्य वेळी आणि कुपात्री केलेली दाने तामसीच असतात. अशी दाने अवज्ञेने दिली जातात. तिरस्कारपूर्वक केलेली ही दाने असतात. अयोग्य ठिकाणी, अयोग्य वेळी आणि कुपात्र व्यक्तीला दिलेले दान तामसी दान म्हटले आहे.
पुढे भगवंत ॐ तत्सदिति या महामंत्राबद्दल सांगत आहेत.

17.23

ॐ तत्सदिति निर्देशो, ब्रह्मणस्त्रिविधः(स्) स्मृतः|
ब्राह्मणास्तेन वेदाश्च, यज्ञाश्च विहिताः(फ्) पुरा||17.23||

ॐ' , तत्, सत् अशी तीन प्रकारची सच्चिदानंदघन ब्रह्माची नावे सांगितली आहेत. त्यापासून सृष्टीच्या आरंभी ब्राह्मण, वेद आणि यज्ञादी रचले गेले आहेत.

ॐ तत्सदिति हा ब्रह्ममंत्र आहे. ही तीन प्रकारची सच्चिदानंदघन ब्रह्माची नावे सांगितली आहेत. यांच्यापासूनच ब्राह्मण, वेद आणि यज्ञ यांची निर्मिती झाली आहे. अशा या निर्मात्याच्या विश्वंभराचा ॐ तत्सदिति हा जणू मंत्रच आहे. हे तिन्ही शब्द अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. दहाव्या अध्यायात यासंबंधी अधिक वर्णन आहे. प्रणव म्हणजेच ओंकार. शब्द अनेक प्रकारचे आहेत - दन्तव्य, कंठव्य, तालव्य, ओष्ठ्य वगैरे. हे सर्व आहत ध्वनी आहेत.
शब्दांमध्ये मी ओंकार आहे असे दहाव्या अध्यायात भगवंत म्हणतात. ब्रह्म अनाहत आहे. एकच नाम ओंकार. आघाताशिवाय होणारा नाद म्हणजे अनाहत ध्वनी.

17.24

तस्मादोमित्युदाहृत्य, यज्ञदानतपः(ख्) क्रियाः|
प्रवर्तन्ते विधानोक्ताः(स्), सततं(म्) ब्रह्मवादिनाम्||17.24||

म्हणून वेदमंत्रांचा उच्चार करणाऱ्या श्रेष्ठ पुरुषांच्या शास्त्राने सांगितलेल्या यज्ञ, दान व तपरुप क्रियांचा नेहमी 'ॐ' या परमात्म्याच्या नावाचा उच्चार करुनच प्रारंभ होत असतो.

सर्व क्रिया ओंकाराच्या साह्याने प्रवृत्त होतात. नमः शिवाय म्हणण्यापूर्वी ॐ लावावा लागतो म्हणजेच ॐ नमः शिवाय असे म्हणावे लागते. प्रत्येक यज्ञ, दान, तप करण्यासाठी शास्त्रशुद्ध क्रिया म्हणजे त्यांचा मंत्र होतो.  ब्रह्मवादी अशा शास्त्रशुद्ध क्रिया करतात. ते स्वतःही ॐ उच्चारूनच शास्त्राने सांगितलेल्या यज्ञ, दान, तप या क्रियांचा प्रारंभ करतात. ॐ म्हणजे परमात्म्याच्या नावाचा उच्चार होय. कोणताही मंत्र ओंकाराशिवाय पूर्ण होत नाही. नमो नारायण: असं न म्हणता ॐ नमो नारायण: असे म्हटले जाते.

17.25

तदित्यनभिसन्धाय, फलं(म्) यज्ञतपः(ख्) क्रियाः|
दानक्रियाश्च विविधाः(ख्), क्रियन्ते मोक्षकाङ्क्षिभि:||17.25||

तत्' या नावाने संबोधिल्या जाणाऱ्या परमात्म्याचेच हे सर्व आहे, या भावनेने फळाची इच्छा न करता नाना प्रकारच्या यज्ञ, तप व दानरुप क्रिया कल्याणाची इच्छा करणाऱ्या पुरुषांकडून केल्या जातात.

तत् त्या नावाने संबोधल्या जाणाऱ्या परम्यात्म्याचेच हे सर्व काही आहे या भावनेने फळाची इच्छा न ठेवता, नाना प्रकारच्या यज्ञ, दान, तपरूप क्रिया कल्याणाची इच्छा करणाऱ्या पुरुषांकडून केल्या जातात. तत् ओळखता आले पाहिजे त्यासाठी 'मी' पणा सोडावा लागतो. किंबहुना जिथे तू आहेस तिथे मी नाही असा हा तत् भाव आहे. हा परमशक्तीचा साक्षात्कार पाहण्यासाठी मनातून विचारांना हटवावे लागते कारण जोपर्यंत विचार आहेतआहेत तोपर्यंत विकारही आहेत. विचार गेले विकारही गेले अशा शून्य मनात भगवंतस्वरूप तत् प्रकट होतो. ईश्वराची संस्थापना शून्य मन:स्थितीत, निर्विकार मन:स्थितीत होते. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तो ईश्वर येत नाही. 'मी'पणाचा त्याग केला की ईश्वराचे अनुष्ठान झालेच म्हणून समजावे. भगवंताला हृदयात स्थान द्यायचे असेल तर 'मी' पणा काढून टाकलाच पाहिजे असे तत् चे महत्व भगवंत सांगतात.
यानंतर सत् चा महिमा भगवंत वर्णन करतात .

17.26

सद्भावे साधुभावे च, सदित्येतत्प्रयुज्यते|
प्रशस्ते कर्मणि तथा, सच्छब्दः(फ्) पार्थ युज्यते||17.26||

सत्' या परमात्म्याच्या नावाचा सत्य भावात आणि श्रेष्ठ भावात प्रयोग केला जातो. तसेच हे पार्था! उत्तम कर्मातही 'सत्' शब्द योजला जातो.

सत् या परमात्म्याच्या नावाचा सत्यभावात आणि श्रेष्ठभावात प्रयोग केला जातो तसेच हे पार्थ उत्तम कर्मातही सत् हा शब्दयोजला जातो. सद्भावाने जे कार्य होते त्यासाठी सत् हा शब्द उच्चारला जातो म्हणून शुभकार्यातच सत् हा शब्द योजला जातो. ॐ हे एकच सत्य आहे बाकी सर्व मिथ्या आहे. ज्योतिर्मय, पराशक्तीस्वरूप सत् हे नित्य आहे बाकी सर्व अनित्य या भावाने ज्या क्रिया केल्या जातील त्या सर्व क्रिया सात्विक क्रिया बनतील. मनाचा सद्भाव जागृत करण्यासाठी प्रार्थना महत्त्वपूर्ण ठरते. ॐ तत्सदिति अशा या मंत्ररूप प्रार्थनेने क्रियारंभ करावा. एक ओंकार सतनाम या भावाने केलेले यज्ञ, दान, तप या क्रिया सात्विक बनतात.

17.27

यज्ञे तपसि दाने च, स्थितिः(स्) सदिति चोच्यते|
कर्म चैव तदर्थीयं(म्), सदित्येवाभिधीयते||17.27||

तसेच यज्ञ, तप व दान यांमध्ये जी स्थिती (आस्तिक बुद्धी) असते, तिलाही सत् असे म्हणतात आणि त्या परमात्म्यासाठी केलेले कर्म निश्चयाने 'सत्' असे म्हटले जाते.

यज्ञ, दान, तप यामध्ये जी स्थिती असते तिलाही सत् असे म्हणतात आणि ज्याच्यासाठी म्हणजे ज्या परमात्म्यासाठी या यज्ञ, दान, तपादी क्रिया केल्या जातात त्या कर्मालाही सत् असेच म्हटले जाते.

17.28

अश्रद्धया हुतं(न्) दत्तं(न्), तपस्तप्तं(ङ्) कृतं(ञ्) च यत्|
असदित्युच्यते पार्थ, न च तत्प्रेत्य नो इह||17.28||

हे अर्जुना! श्रद्धेशिवाय केलेले हवन, दिलेले दान, केलेले तप आणि जे काही केलेले शुभ कार्य असेल, ते सर्व 'असत्' म्हटले जाते. त्यामुळे ते ना इहलोकात फलदायी होत ना परलोकात.

अंतिम दोन श्लोकात भगवंत म्हणतात, श्रद्धेशिवाय म्हणजे श्रद्धा नसताना केलेले हवन, दिलेले दान, केलेले तपाचरण आणि केलेले शुभकार्य असेल ते सुद्धा असत् म्हटले जाते त्यामुळे ते या इहलोकी किंवा मृत्यूनंतर परलोकात सुद्धा फलदायी होत नाही. म्हणूनच श्रद्धेशिवाय कोणतेही कार्य करू नये - श्रद्धावाँल्लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः।
भगवतप्राप्तीसाठी ॐ तत्सदिति हे सत्य स्वीकारले पाहिजे.
अब सौंप दिया इस जीवन का, सब भार तुम्हारे हाथों में।
है जीत तुम्हारे हाथों में, और हार तुम्हारे हाथों में॥

जो जग में रहूँ तो ऐसे रहूँ, ज्यों जल में कमल का फूल रहे।
मेरे सब गुण दोष समर्पित हों, करतार तुम्हारे हाथों में॥
जीवनात कमलपुष्पाप्रमाणे असावे. विशुद्ध भावाने चिखलात असूनही, चिखलाचा स्पर्शही न होऊ देता त्या ॐ तत्सत् स्वरूप, ज्योतिर्मयस्वरूप भगवंताचे अस्तित्व जाणून आपला भार त्याच्यावर सोपवून निश्चिंतपणाने सात्विक क्रिया कर्मादी करण्यात रत व्हावे. 
।। ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां(म्) योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे श्रद्धात्रयविभागयोगो नाम सप्तदशोऽध्याय:।।

प्रश्नोत्तर चर्चा:-

प्रश्न : हनुमानचालीसा मध्ये स्वयं शंकर केसरी नंदन आहेत हे सत्य आहे का?
उत्तर : स्वामी गोविंद गिरीजी महाराज सांगतात केवळ श्रद्धापूर्वक हनुमानचालीसा म्हणत रहा. प्रत्यक्ष स्वतः भगवान शंकर आहेत की आणखी कोणी याला फारसे महत्त्व नाही तेव्हा या वादविवादात न पडता श्रद्धेने हनुमानचालीसा म्हणत राहूया. त्याचा आपल्यासाठी अधिक फायदा होईल.

प्रश्न : आर्य समाजात अशी मान्यता आहे की श्राद्धविधी वगैरे कर्मकांड करण्याची गरज नाही. खरे आहे का?
उत्तर : आर्य समाजात ही बाब सांगितली असली तरीही आपल्याला आपल्या निकटवर्ती पितरांबद्दल श्रद्धाभावाने काही करण्याची इच्छा असते. त्याचप्रमाणे गयेला श्राद्धविधी केल्यानंतर इतर वेळी कर्मकांड करण्याची गरज नाही असेही म्हटले जाते तरीही आपण त्या त्या तिथीला आपल्या पितरांचे स्मरण म्हणून प्रतिमेला हार अर्पण करून प्रणाम करू शकतो. त्यांच्या नावे मिष्टान्न खाऊ घालू शकतो. श्रद्धाभावाने, फळाची अपेक्षा न ठेवता शक्य तेवढा दानधर्म करू शकतो. त्याने आपल्यालाच मानसिक समाधान लाभते.

स्मिता दीदी -
प्रश्न : दान देण्यासाठी पात्र व्यक्ती कशी ओळखायची?
उत्तर : जी व्यक्ती अत्यंत भुकेली आहे त्याला अन्नदान द्यावे, एखादा गरीब परंतु हुशार विद्यार्थी आहे त्याची शिक्षणाची जबाबदारी उचलावी. मेहनती असून सुद्धा एखाद्या व्यक्तीला काम मिळत नाही अशा व्यक्तीला सहकार्य करावे. रोटरी क्लब, सामाजिक संस्था, गरजू व्यक्ती यांना दानधर्म श्रद्धेने करावा. खूप मोठी रक्कम द्यायची असेल तर पाळेमुळे पहावीत किरकोळ दानासाठी फार विचार करू नये कारण हातांना दानाची, देण्याची सवय असली पाहिजे. गौतम बुद्ध एकदा एका स्त्रीच्या घरी भिक्षा मागण्यासाठी गेले. तिच्याकडे भिक्षा देण्यासाठी काहीही नव्हते. तिने आपली अगतिकता दाखवली तेव्हा गौतम बुद्ध म्हणाले त्या अंगणातली मूठभर माती माझ्या कटोऱ्यात घाल. त्यांच्या कटोऱ्यातले तांदूळ पाहून ती म्हणाली मी माती घालू शकणार नाही कारण त्यामुळे तुमचे तांदूळ वाया जातील तुम्हाला उपवास घडेल. गौतम बुद्ध म्हणाले तांदुळात माती गेली तर मला एक दिवसाचा उपवास घडेल परंतु तू जर मातीही नाही घातलीस तर तुझ्या हाताला दानाची, देण्याची सवयच लागणार नाही. हाताला दानाची सवय लागण्यासाठी देत जावे.

कौशिक भैया -
प्रश्न : श्राद्धसमयी कावळ्याच्या रुपात आत्मे येतात. भगवद्गीतेमध्ये सांगितले आहे की आत्मा एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. मग हे आत्मे शरीर सोडून येतात का?
उत्तर : शरीराचा त्याग करून कोणताही आत्मा येत नाही. यासाठी पण काही मर्यादित काल असतो. म्हणून तर पिताजींच्या मृत्यूनंतर आजोबांचे श्राद्ध करणे थांबवावयास सांगितले आहे. शिवाय आपल्याला कुठे माहीत असतं की त्यांच्या आत्म्याला मुक्ती मिळाली आहे की नाही. आपण फक्त श्रद्धा भावाने विधी करत रहावयाचे.

श्यामा अग्रवाल दीदी -
प्रश्न : गीतेच्या श्लोकातील ऱ्हस्वदीर्घ उच्चारांची तयारी कशी करावयाची?
उत्तर : यासाठी अनुपठणाचा मार्ग अतिशय योग्य आहे. सरावाने तयारी होऊ शकते. उच्चारांपेक्षा आचारविचार श्रेष्ठ आहेत. तेही आचरणात आणावेत.

लक्ष्मी दीदी -
प्रश्न : फसवणूक करणाऱ्या व्यक्तींप्रत कशाप्रकारे वर्तन करावे?
उत्तर : यासाठी दोन गोष्टी आहेत. दोन मार्ग आहेत. कोर्टात जाऊन आपण न्याय मिळवू शकतो. दुसरा मार्ग म्हणजे मोठ्या मनाने माफ करून टाकू शकतो. झालेले फसवणुकीचे प्रकरण विसरून जाऊ शकतो. झालेली हानी पुन्हा भरून येणार नाही परंतु मानसिक स्वास्थ्य जर नष्ट झाले तर जीवन असह्य होऊ शकते. तीच गोष्ट मनाला लावून घेऊन जीवनातला आनंद हरवून जाऊ शकतो. माफ करणे फलदायी आहे.

नीलम दीदी -
प्रश्न : गुरुमंत्र घेतला नसेल तर महादेवाच्या पूजेत ॐ नमः शिवाय जप करता येणार नाही का?
उत्तर : भगवंतांना केवळ श्रद्धाभाव अपेक्षित आहे. पूजापाठ करताना आपणच असा जप करू शकतो. श्रद्धेने दाखवलेले एखादे फळ, किंवा श्रद्धेन वाहिलेले एखादे फूल सुद्धा भगवंतांना अतिशय प्रिय असते.

कावेरी दीदी -
प्रश्न : मांसाहार वर्ज्य आहे त्यामुळे बनवणारा ही दोषी ठरतो का?
उत्तर : कर्तव्य करण्यामध्ये कोणताही दोष लागत नाही. त्यामुळे स्वतःला अपराधी, दोषी समजण्याचे कारण नाही. क्षत्रियांसाठी मांसाहार आवश्यकच समजला गेला आहे. तुम्ही स्वतः मांसाहार घेत नाही ही गोष्ट चांगलीच आहे परंतु परिवारासाठी बनवता म्हणजे तुम्ही तुमचं कर्तव्य करता त्यामुळे हा दोष तुम्हाला लागू शकत नाही.

आनंद भैय्या -
प्रश्न : एखादा पूजाविधी केल्यानंतर उपचारासाठी वापरलेले सर्व धन व इतर बाबी त्या पंडितांना द्यायच्या की इतर गरजूंना दिल्या तरी चालतील?
उत्तर : ज्या पुरोहिताने तुमच्या पूजाविधीचे उपचार केलेले आहेत, मंत्रोपचार केलेले आहेत त्या पुरोहिताचाच अधिकार त्या सर्व वस्तूंवर व धनावर असतो. त्यामुळे पूजेतील सर्व वस्तू व धन हे त्या पुरोहितालाच द्यावे. या व्यतिरिक्त दानधर्म करायचा असेल तर तुम्ही स्वेच्छेने करू शकता.
समापन प्रार्थनेनंतर विवेचन सत्राची सांगता झाली.
|| ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु ||