विवेचन सारांश
ठेवून श्रद्धा मनात | करावे गीतेचे ज्ञान प्रसारित | जेव्हा सोबत असतो भगवंत | असतो विजय निश्चित ||
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम:||
नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहम् ।
पूर्णब्रह्मपरानन्दमीशं आळन्दिवल्लभम्॥
यानंद श्रुतिमंत्र शक्ति महती ब्रह्मात्म विद्यावती
यासूत्रोदित शास्त्रपद्धतिरीति प्रद्योदिनान्तरद्युतिः।
या सत्काव्यगतिप्रसादितर्मतिर्नानागुणालंकृति:
सा प्रत्यक्ष सरस्वती भगवती मान्त्रायतां भारती॥
ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं
व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतं |
अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीमष्टादशाध्यायिनीं
अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीं ||
नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र ।
येन त्वया भारत तैल पूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः।।
परमपूज्य स्वामीजी गोविंददेव गिरिजी महाराजांना वंदन करून आणि सर्व गीताप्रेमींना अभिवादन करून विवेचन सत्राला प्रारंभ झाला.
भगवद्गीतेचा कळसाध्याय मानला गेलेल्या अठराव्या अध्यायाचे आपण चिंतन करत आहोत.
महापुरुष म्हणतात,
मलनिर्मोचनं पुंसां जलस्नानं दिने दिने।
सकृद् गीतेऽम्भसि स्नानं संसारमलनाशनम्॥
शरीराचा मळ दूर करण्यासाठी आपण दररोज पाण्याने स्नान करतो. त्याचप्रमाणे दररोज गीतेच्या तीर्थाने अंतरंग स्वच्छ करावे. बाह्य जगासोबत जो आपला दैनंदिन व्यवहार चालतो त्यामुळे काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे षड्रिपू तसेच हर्ष, शोक आणि भय यांचा विकाररूपी मळ चित्तात (Subconscious mind) एकत्रित होतात. हे विकार कसे दूर करावे? तर रोज गीतेच्या एका अध्यायाचे तरी पारायण करावे, एखाद्या तरी श्लोकाचा अर्थ जाणून घ्यावा, एखादा श्लोक कंठस्थ करावा यामुळे आपले अंतरंग शुद्ध होते आणि त्या चित्तचोर परमात्म्यासोबत एकरूप होऊ शकते. याचा अनुभव गीतेच्या साधकांना येतो.
माऊली म्हणतात,
गीता हे देवालय | त्यावरी हा कलशाध्याय ||
मंदिराच्या कळसाचे दर्शन घेतल्याने त्यातील मूर्तीविग्रहाचे दर्शन घेतल्याचे पुण्य लाभते. त्याचप्रमाणे केवळ अठराव्या अध्यायाचे चिंतन केल्याने संपूर्ण गीतेचे चिंतन केल्याचे फळ प्राप्त होते. कारण या अध्यायात पूर्ण गीतेचे सार समाविष्ट झाले आहे.
प्रत्येक जीव तीन गुणांनी बद्ध आहे आणि या गुणांच्या विविध मिश्रणामुळे (Permutations- combinations) प्रत्येक जीव दुसऱ्या जीवापेक्षा भिन्न भासतो. या सर्वांना एकाच सूत्रात बांधणारा तो सूत्रधार म्हणजे भगवंत आहे.
मत्त: परतरं नान्यत्किञ्चिदस्ति धनञ्जय।
मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव॥ (७.७ )
भगवंत म्हणतात, सर्व कणाकणात मीच आहे आणि सर्वांना अंतरंगातून मीच जोडले आहे.
फुलांच्या हारामध्ये वरवरची फुले दिसतात मात्र फुलांना एकत्र बांधून ठेवणारा धागा आपल्याला दिसत नाही. त्याचप्रमाणे सर्वांना समान सूत्रात बांधणारा तो सूत्रधार देखील आपण पाहू शकत नाही.
स्वभावजेन कौन्तेय निबद्ध: स्वेन कर्मणा ||
कर्तुं नेच्छसि यन्मोहात्करिष्यस्यवशोऽपि तत् ||१८.६० ||
पूर्वजन्मीचे संस्कार, वातावरण आणि अनुवंशिकता याच्या प्रभावामुळे प्रत्येक जण स्वभाव घेऊन जन्माला येतो. त्यामुळे एकाच आईची दोन मुलेदेखील भिन्न स्वभावाची असतात. हे संस्कार प्रयत्नपूर्वक बदलता येतात. एका लोखंडाच्या तुकड्यावर जसे संस्कार केले जातील, जसे घाव घातले जातील त्याप्रकारे त्याचे मूल्य बदलते. एकच लोखंडाचा तुकडा विविध संस्कारांमुळे खीळा बनू शकतो किंवा एखाद्या यंत्राचा, विमानाचा किंवा अवकाशयानाचाही भाग बनू शकतो.
भगवंत म्हणतात, अर्जुना तू क्षत्रिय आहेस. दिवसरात्र अभ्यास करून तू धनुर्विद्येचा अभ्यास केला आहेस. या क्षत्रियतेला स्वभावाच्या रूपात स्वतःमध्ये समाविष्ट केले आहे. या स्वभावाच्या बंधनात तू आहेस. जर तू हे युद्ध त्यागून निघून गेलास तर शत्रू तुझी निर्भत्सना करेल. ते तुला सोडणार नाहीत. इतिहासात तुझी भित्रा अशी नोंद होईल. युद्धभूमी सोडून तू कुठेही गेलास तरी युद्धाचेच चिंतन मनात सुरू राहील.
18.61
ईश्वरः(स्) सर्वभूतानां(म्), हृद्देशेऽर्जुन तिष्ठति।
भ्रामयन्सर्वभूतानि, यन्त्रारूढानि मायया॥18.61॥
Circulatory system(रक्ताभिसरण संस्था ), digestive system(पचन संस्था) अशा विविध यंत्रणा यात सुव्यवस्थित चालू असतात.
अशा यंत्रामध्ये जीवाला समाविष्ट करून मायारूपी शक्तीने भ्रमित करून तो अंतर्यामी ईश्वर हृदयामध्ये स्थित राहून हे शरीर रुपी यंत्र चालवतो.
माया (या मा सा माया -जी अस्तित्वात नसून जी भासते ती "माया" आहे) मायारूपी शक्तीच्या प्रभावामुळे आपण आपल्या शरीरालाच आपले रूप मानू लागतो आणि या शरीराशी ज्यांचे संबंध असतात त्यांना नित्य, खरे मानतो.
बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन |
तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप || (४.५)
भगवंत म्हणतात, तुझे आणि माझे अनेक जन्म झाले आहेत मात्र तुला ते लक्षात नाहीत. मात्र मी ते जाणतो कारण मी त्या मायेच्या अधीन नाही.
आपण एका ठिकाणी स्थिर बसले आहोत असे आपल्याला वाटते मात्र आपण प्रत्येक क्षणी स्वतःची आणि सूर्याची प्रदक्षिणा घालत आहोत. या सृष्टीला नियमात घालून चालवणारा कोणीतरी नियामक आहे, तोच ईश्वर आहे.
क्या धरा हमने बनाई, या बुना हमने गगन,
क्या हमारी ही वजह से बह रहा सुरमित पवन,
या अगन के हम हैं स्वामी, नियंता जगधर के,
या जगत के सूत्रधार, नियामक संसार के
ही धरा आपण बनवली आहे का? ही पृथ्वी ज्या प्रदक्षिणा घालते त्याचेही काही नियम आहेत. ३६५ दिवसात ती सूर्याची प्रदक्षिणा घालते आणि चोवीस तासात ती स्वतः भोवती प्रदक्षिणा घालते. सूर्यमालेतील इतर ग्रहगोल देखील आपापल्या कक्षांमध्ये स्थित राहून सूर्याची प्रदक्षिणा घालत असतात. अशाप्रकारे हा सर्व नियमात चालणारा संसार आहे. या सर्वांच्या आत उपस्थित असलेल्या नियामकाला ईश्वर असे म्हटले आहे.
सर्वांच्या हृदयात स्थित राहून तो ईश्वर सर्व जीवांना त्यांच्या पूर्वकर्मानुसार फिरवतो. त्या कर्माप्रमाणे आपल्याला जन्म प्राप्त होतो.
कर्मासोबत कृपेचा देखील एक नियम असतो. Software program (संगणक प्रणाली) मध्ये काही बदल करायचा आहे तर आपल्याला programmer (प्रोग्रॅमर) ला बोलवावे लागते. त्याचप्रमाणे आपल्या जीवनाच्या प्रोग्राममध्ये काही बदल हवे असतील तर त्या भगवंताचे बोट धरून चालणे आवश्यक असते.
एखाद्या कार्यालयात काही काम असेल तर तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी किंवा त्या कंपनीच्या एमडीसोबत आपली ओळख असेल तर काम लवकर होते. तर या सृष्टीचा जो मॅनेजिंग डायरेक्टर, जो सर्व मॅनेज करतो, सर्व व्यवस्था प्रस्थापित करतो त्याच्याशी आपला जन्मोजन्मीचा संबंध आहे, जो आपण विसरलो आहोत. तो संबंध परत प्रस्थापित करावा. गीतारुपी माता आणि आपले सद्गुरू ही ओळख करून देतात.
ईश्वर तो नियामक आहे जो आपल्या जीवनाला नियमात अधीन करतो आणि परमेश्वर (परम ईश्वर) आपल्यावर कृपेचा वर्षाव करतो. त्याची कृपा प्राप्त करण्यासाठी त्याच्या शरण जावे.
तमेव शरणं(ङ्) गच्छ, सर्वभावेन भारत।
तत्प्रसादात्परां(म्) शान्तिं(म्), स्थानं(म्) प्राप्स्यसि शाश्वतम्॥18.62॥
मोकों कहाँ ढूँढ़े बंदे, मैं तो तेरे पास में।
ना मैं देवल ना मैं मसजिद,ना काबे कैलास में।
त्याला कसे शरण जावे तर आपल्या आतील सर्व भावभावनांना एकत्रित करून त्याला शरण जावे.
तुम ही हो माता, पिता तुम्ही हो।
तुम ही हो बंधु, सखा तुम्ही हो॥
अशी भावना ठेवावी. तूच माता आणि तूच पिता आहेस. या देहाशी निगडित असलेले संबंध देखील खरे असतात कारण हा देहदेखील आपण आहोत. मात्र त्या देहाच्या वर आपले जे चैतन्यमयी स्वरूप आहे, त्याचा संबंध केवळ त्या परमात्म्याशी आहे. मी माझ्या शक्तीने काहीच करू शकत नाही हे जाणून सर्व काही तोच घडवून आणत आहे याची जाण ठेवावी. त्याने दिलेली बुद्धी, भावभावना याद्वारे त्याच्याशी एकनिष्ठ संबंध प्रस्थापित करावा.
आपण भगवंताशी संबंध प्रस्थापित करतो पण त्यापेक्षा आपला दृढ संबंध आपल्या शरीराशी असतो. तो आपण काही केल्या विसरत नाही.
माऊली म्हणतात,
अहो अर्जुनाचिये पांती । जे परिसणया योग्य होती ।
तिहीं कृपा करूनि संतीं । अवधान द्यावें ॥
अर्जुनाच्या पंगतीत बसणारे, त्याच्याप्रमाणे श्रोता आणि भगवंताशी संबंध प्रस्थापित करणाऱ्या सर्व संतांनी इकडे लक्ष द्यावे.
मात्र आधी अर्जुन देखील आपल्याप्रमाणेच अज्ञानी होता. युद्धभूमीवर आजूबाजूला उभे असलेल्या योद्ध्यांमध्ये अर्जुनाला आपले नातेवाईक दिसत होते.
आचार्या: पितर: पुत्रास्तथैव च पितामहा: |
मातुला: श्वशुरा: पौत्रा: श्याला: सम्बन्धिनस्तथा |
माझे आचार्य, माझे पिता, माझे पुत्र असे ‘माझे’, ‘माझे, करत देहाशी निगडित असलेले संबंध जे दूर उभे होते त्यांना तो जवळचे मानत होता आणि त्यांच्याशी आपला नित्य संबंध आहे असे तो समजत होता. त्याच्या रथासोबत त्याच्या आयुष्याचे सारथ्य करणारे प्रत्यक्ष परमात्मा यांना मात्र तो त्याक्षणी विसरला होता. भगवंताला विसरून इतर संबंधांची आठवण ठेवत आपणही तसेच वागतो. त्यामुळे मन अशांत असते. आपल्याला जे काही पद प्राप्त होते, जे नाते मिळते ते सर्व तात्कालिक असतात. देहाशी निगडीत असलेले संबंध जसे कोणाची कन्या किंवा कोणाची पत्नी हे सर्व तात्कालिक आहेत.
आपले शाश्वत संबंध ज्या परमात्म्याशी आहेत, ज्याला जीव विसरला आहे त्याची भगवंत आठवण करून देत आहेत. त्याला शरण गेल्यावर जी शांती प्राप्त होईल त्याद्वारे या संसाराच्या कोलाहलात आपण आपले दायित्व, आपले कर्तव्य चांगल्या प्रकारे पार पाडू शकू. त्याच्या सोबत नित्य संबंध प्राप्त करावा. तो संबंध तर आहेच मात्र त्यावर अज्ञानाची धूळ चढली आहे.
ठाकूर रामकृष्ण परमहंस या संबंधाचे वर्णन करताना लोखंड आणि चुंबकाचे उदाहरण देत असंत. चुंबक ज्याप्रमाणे लोखंडाला आकर्षित करतो त्याप्रमाणे कृष्ण आपल्याला आकर्षित करतो कारण कृष्ण या नावातच आकर्षण आहे. मात्र धूळ आणि चिखलाने बरबटलेला लोखंडाचा तुकडा चुंबकाद्वारे आकर्षित होणार नाही. आपले अंतरंग जसजसे गीतेच्या श्लोकांनी शुद्ध होईल तसे जीवात्मा त्या परब्रह्म कृष्णरुपी परमात्म्याकडे आकर्षित होईल.
घागरीमध्ये जणू सागर समाहित करून केवळ सातशे श्लोकांमध्ये भगवंतांनी उपनिषदांच्या ज्ञानाचे गीतामृत अर्जुनरुपी वासराला पाजले आहे.
स्मार्टफोन, स्मार्ट कार्ड प्रमाणे गीता ही स्मार्ट स्टडी आहे.
इति ते ज्ञानमाख्यातं(ङ्), गुह्याद्गुह्यतरं(म्) मया।
विमृश्यैतदशेषेण, यथेच्छसि तथा कुरु॥18.63॥
गीता हे प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातून उमटलेले शब्द आहेत त्यामुळे माऊलींनी गीतेला वेदांपेक्षाही श्रेष्ठ म्हटले आहे. भगवंत निद्रिस्त असताना निःश्वासाच्या सुरातून उमटलेले ध्वनीतरंग म्हणजे वेद. झोपेमध्ये बोललेले शब्द इतरांना नीट समजत नाहीत त्याप्रमाणे वेदांचेही आकलन सर्वांना होत नाही . ते समजण्यास कठीण आहेत. मात्र भगवद्गीता ही जागृत अवस्थेतील श्रुती आहे.
मी सांगितलेल्या ज्ञानावर डोळे बंद करून विश्वास ठेव असे भगवंत सांगत नाहीत. ते म्हणतात, त्यावर चांगल्या प्रकारे विचार करून चिंतन कर. चिंतन करून महापुरुषांनी जे सांगितले त्याचे देखील अध्ययन कर, मंथन कर. मग त्यातून ज्ञानाचे सुंदर नवनीत अर्थात लोणी प्राप्त होईल.
अमृतमंथन करताना आधी विष बाहेर निघाले आणि नंतर अमृत बाहेर पडले. कोणतेही चिंतन करताना निघालेले विष त्यागावे आणि शेवटी जे अमृत प्राप्त होते ते ग्रहण करावे. त्यानंतर तुझी जशी इच्छा असेल ते तू कर असेही भगवंत सांगतात.
आपण जीवनामध्ये आपल्यापेक्षा लहान वयाच्या लोकांना अनेक प्रकारचे ज्ञान देण्याचा प्रयत्न करतो, त्यांना बदलण्याचा प्रयत्न करतो. मात्र भगवंत अर्जुनाला बदलू इच्छित नाहीत. ही गुरु-शिष्याची जोडी अशी आहे ज्यात गुरु असे सांगत नाही की, मी जसे सांगेन तसे तुला करावे लागेल. तू माझे ऐकलं नाहीस तर तुझे वाईट होईल असे ते म्हणत नाहीत. तर ते सांगतात की, तू चांगल्या प्रकारे विचार करून मंथन कर.
राही मासूम रझा यांचा एक शेर आहे,
पत्ता भी गर हिलता है तो उसकी रज़ा से,
बंदा जो गुनेहगार है मालूम नहीं क्यों।
ही सर्व सृष्टी त्या नियामकाच्या नियमानुसार चालते. येथील झाडावरील पानेदेखील त्याच्या इच्छेने हलतात. तर जगात गुन्हेगारी का आहे?
लोक इतरांचे वाईट चिंततात कारण सत्ता ईश्वराची असते मात्र इच्छा जीवाची असते. ईश्वराच्या शक्तीचा उपयोग करून विनाश करणारे लोकदेखील या जगात आहेत आणि सृष्टीचे कल्याण करणारेही आहेत.
जी इच्छा असेल तसे कर असे सांगण्याच्या आधी भगवंतांनी अर्जुनाची विवेकबुद्धी जागृत केली आहे. सदसद्विवेकबुद्धी जागृत झाल्यावर जीव चुकीचे चिंतणार नाही.
एखाद्या गुरूने आपल्या शिष्याला किंवा मातापित्यांनी आपल्या मुलाला सर्व ज्ञान दिले. मात्र ऐकणे न ऐकणे त्याच्यातील विवेकावर अवलंबून असते. त्यामुळे कोणाला एखादी गोष्ट समजावून सांगितली जाते तेव्हा त्या गोष्टीला देखील एक मर्यादा असते. ती मर्यादा भगवंत समजून सांगत आहेत. बऱ्याचदा आपल्याला असे वाटते की, समोरचा त्याच्या हिताची गोष्ट का ऐकत नाही! त्यामुळे आपण व्यथित होतो. अशावेळी व्यथित होऊ नये. सांगून सोडून द्यावे. मात्र त्याचवेळी आपण त्या चांगल्या गोष्टीचा अंगीकार केला तर त्या चांगल्या बदलाचा परिणाम तरंगांच्या रुपात आपल्या आजूबाजूच्या लोकांवरही होतो. आपण अशा नैष्कर्म्य सिद्धी अवस्थेला प्राप्त होऊ शकतो जेथे केवळ आपल्या असण्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि आजूबाजूला चांगले कार्य घडते.
सर्वगुह्यतमं(म्) भूयः(श्), शृणु मे परमं(म्) वचः।
इष्टोऽसि मे दृढमिति, ततो वक्ष्यामि ते हितम्॥18.64॥
केवळ भक्तच भगवंताची भक्ती करत नाहीत तर भगवंताचेही तितकेच प्रेम भक्तावर असते. भक्ती म्हणजे परम प्रेम - Unconditional love. ज्यात कोणत्याच अटी नसतात. बदल्यात काही मिळाले तरच मी प्रेम करेन असा भाव त्यात नसतो.
माऊली म्हणतात,
मुक्तीवरील चौथी भक्ती जाण
भक्ती ही मुक्तीपेक्षा ही श्रेष्ठ असते.
भक्तच भगवंताची भक्ती करत नाही. गुरु शिष्याची, शिष्य गुरुची, भक्त भगवंताची भक्ती असते.
माऊली म्हणतात,
मग याहीवरी पार्था । माझ्या भजनीं आस्था ।
तरी तयातें मी माथां । मुकुट करीं ॥ २१४ ॥
सर्वतोपरी ज्ञान प्राप्त केल्यावरही जो भक्ती त्यागत नाही, भगवंतावर परमप्रेम करतो त्याला भगवंत माथ्यावर मुकुटाप्रमाणे धारण करतात.
पुढील श्लोकात नवव्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकातील चरणाची पुनरावृत्ती आली आहे.
मन्मना भव मद्भक्तो, मद्याजी मां(न्) नमस्कुरु।
मामेवैष्यसि सत्यं(न्) ते, प्रतिजाने प्रियोऽसि मे॥18.65॥
गेल्या विवेचनात आपण हे जाणून घेतले,
संत कबीर म्हणाले,
चलती चक्की देख के, दिया कबीरा रोये ।
दो पाटन के बीच में, साबुत बचा न कोए ॥
चक्कीमध्ये धान्याचा एक कणही वाचत नाही. तसेच संसाराच्या चक्कीचे आहे.
त्यावर त्यांचे पुत्र कमाल सकारात्मकतेने म्हणाले,
चलती चकिया देखि के, हंसा कमाल ठठाय।
कीले सहारे जो रहा, ताहि काल न खाय।।
जो चक्कीच्या केंद्रस्थानी जातो तो कण नक्कीच वाचतो.
मंदिरामध्ये भगवंताच्या मूर्तीला प्रदक्षिणा घालताना त्याला आपण केंद्रस्थानी ठेवतो. महाराष्ट्रामध्ये आरतीच्या वेळी स्वतः भोवती परिक्रमा घालण्याची प्रथा आहे. आपल्यातील परमात्म्याला केंद्रस्थानी ठेवून त्याच्या भोवती परिक्रमा करणे हा त्यामागचा उद्देश आहे.
पण त्या भगवंतामध्ये मन गुंतवून, केवळ एका ठिकाणी बसले तर काय उपयोग! या सृष्टीचे कार्य कोण करेल? जो भक्त बनून प्रेमपुर्वक या सृष्टीचे कार्य करेल ते सर्वतोपरी कार्य असेल. असे केले तर त्याला सुख प्राप्त होईल.
माऊली म्हणतात,
तरी बाह्य आणि अंतरा । आपुलिया सर्व व्यापारा ।
मज व्यापकातें वीरा । विषयो करीं ॥
तरी अर्जुना, तू आपल्या सर्व बाहेर (इंद्रियांकडून) आणि आतून (मनादिकांकडून) होणार्या कर्मांना, मी जो व्यापक त्या मला विषय कर.
बाह्य आणि अंतरंगात केला जाणारा सर्व व्यवहार त्या भगवंतासाठी करावा आणि तो त्यालाच अर्पण करावा.
अधून-मधून ही आठवण ठेवावी की, आपण सर्व कार्य का करत आहोत? कोणासाठी करत आहोत? त्या भगवंताने आपल्याला येथे का पाठवले आहे? त्याची माझ्याकडून काय अपेक्षा आहे?
माऊली म्हणतात,
पैं भक्ति एकी मी जाणें । तेथ सानें थोर न म्हणे ।
आम्ही भावाचे पाहुणे । भलतेया ॥
भगवंत लहान-मोठे, सानथोर असा भेदभाव करत नाहीत तर केवळ भक्ती बघतात.
माझा भाव न जाणणारे आपसात भांडणे करतात. मी सर्वांचेच कल्याण इच्छितो मात्र मनुष्य भगवंताच्या ऊर्जेने कार्य करतो, भगवंतासाठी करत नाही. त्याच्यावरील संस्काराप्रमाणे वागतो. म्हणून सृष्टीमध्ये सर्व भेद निर्माण होतात.
माऊली म्हणतात,
तूं मन हें मीचि करीं । माझिया भजनीं प्रेम धरीं ।
सर्वत्र नमस्कारीं । मज एकातें ॥
चाक त्याच्या ॲक्सेस भोवती फिरते मात्र केंद्रबिंदू स्थिर असतो. मन, बुद्धी लावून, विचारांचे आदान प्रदान करून त्या भगवंताची सेवा केली तर त्यालाच प्राप्त करू. जेवढे त्याच्यासोबत राहू त्याच्याशी आपला अनन्य संबंध बनतो.
सर्वधर्मान्परित्यज्य, मामेकं(म्) शरणं(म्) व्रज।
अहं(न्) त्वा सर्वपापेभ्यो, मोक्षयिष्यामि मा शुचः॥18.66॥
अधर्म – जे करू नये, जे अकर्तव्य आहे, ज्याने सृष्टीचे अकल्याण होते असे कर्म
जर धर्म आणि अधर्म यांना ओळखण्यात तुझी गल्लत होत असेल तर त्या द्वंद्वांचा त्याग करून मला शरण ये. मी तुला तुझ्या सर्व पापातून मुक्त करेन. अर्जुना, तुझ्या कुळाचा नाश करण्याचे पाप तुला लागेल असे तुला वाटते पण जर तू भगवंताच्या शरणात येऊन ते युद्ध कर्तव्य म्हणून करशील, धर्मसंस्थापनेसाठी करशील तर जीवनातील चुकीच्या संकल्पना, चुकीच्या धारणा, अशुद्धी यापासून मी तुला मुक्त करेन.
जेव्हा दोन धर्म, दोन कर्तव्य एक वेळेस समोर येतात त्यावेळी कोणत्या धर्माची निवड करावी असे द्वंद्व मनात जागृत होते. एखादा सैनिक सुट्टी घेऊन नुकताच स्वतःच्या लग्नासाठी घरी आलेला असताना सीमेवर युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे सुट्टी रद्द करून त्याला आपले कर्तव्य बजावण्यासाठी जावे लागते. दुसरा सैनिक आईच्या सेवेसाठी घरी आला आणि त्याला भारतमातेच्या सेवेसाठी परत जावे लागते. अशा दोन कर्तव्यांमध्ये जेव्हा मनात द्वंद्व उभे राहते की, कोणत्या धर्माचे पालन करावे तेव्हा ज्याने सर्वांचे कल्याण होईल असा व्यापक धर्म आपलासा करावा असा गीतेचा संदेश आहे. केवळ देहधर्माशी निगडित राहू नये.
अशी अनेक द्वंद्वे आपल्याही आयुष्यात नेहमी येत असतात. अशावेळी भगवंताला शरण जावे आणि मनात भावना ठेवावी की, माझी विवेकबुद्धी जागृत करावी.
माऊली म्हणतात,
सुवर्णमणि सोनया । ये कल्लोळु जैसा पाणिया ।
तैसा मज धनंजया । शरण ये तूं ॥
सोन्याने बनवलेला मणी सोन्यासोबत एकरूप होतो. समुद्रात उठलेल्या लाटा जशा समुद्रात विलीन होतात त्याप्रमाणे त्या सृष्टीकर्त्याला शरण जावे.
इदं(न्) ते नातपस्काय, नाभक्ताय कदाचन।
न चाशुश्रूषवे वाच्यं(न्), न च मां(म्) योऽभ्यसूयति॥18.67॥
सोने तापवले जाते तेव्हा त्यातील अशुद्धी नष्ट होऊन ते शुद्ध बनते.
गीता शिकण्यासाठी, दररोज वर्गात उपस्थित राहण्यासाठी, याच्या विविध परीक्षा पास होण्यासाठी देखील साधक काही ना काही परिश्रम करून तप करतात.
मात्र ज्याची हे करण्याची इच्छा नाही तो म्हणेल की, श्लोक शिकून, विवेचन ऐकून मला काहीच उपदेश मिळाला नाही, मला काहीच मार्गदर्शन लाभले नाही.
ज्याच्या मनात ईश्वराप्रती प्रेम आणि भक्ती नाही, जो नास्तिक आहे त्याला हे सांगून उपयोग नाही कारण या ज्ञानावर तो विश्वास ठेवणार नाही. तो म्हणेल, कर्म करा फळाची अपेक्षा करू नका असे शक्य आहे का! त्यामागची भावना तो समजून घेणार नाही. फळाच्या अपेक्षेने आपली भावना, आपले मन कलुषित होते आणि तुलनेमध्ये अडकून बसते. तुलनात्मक जीवन जगताना आनंदाचा मार्ग बाजूला राहतो. शोकाकुल होऊ नका, फळाकडे बघू नका, चालत राहा त्यामुळे तुम्ही नवीन सृजन करू शकाल.
ज्याला हे ऐकण्याची इच्छा नाही त्यालाही हे सांगू नका. काही लोक विवेचनात उपस्थित असतात मात्र केवळ शब्द कानावर पडत असतात आणि त्यांचे लक्ष नसते.
भगवंत म्हणतात, जो माझी असूया करतो, दोषदृष्टी ठेवतो त्यालाही हे सांगू नये. काही लोक चांगले कर्म करतात मात्र ईश्वराला मानत नाहीत. आपल्या शरीर यंत्रणेला चालवणारी एखादी नियामक शक्ती आहे हेही ते मानत नाहीत. त्यांना देखील हे रहस्य सांगू नये.
ठाकूर रामकृष्ण परमहंस म्हणत, जेव्हा सर्व डब्बे तपासून पाहिले आणि त्यात कुठेही साखर नसेल तरच घरात साखर शिल्लक नाही हे आपण म्हणू शकतो.
जर सृष्टीमध्ये प्रत्येक ठिकाणी त्याला न शोधता सरळ भगवंत नसतोच असे सांगितले तर तुम्ही त्याला सर्व ठिकाणी शोधण्याचा प्रयास तरी केला आहे का याचा विचार करावा. त्याला शोधले तर तो प्रत्येक क्षण आपल्या सोबत असतो.
जेथे जातो तेथे तू माझा सांगाती। चालविसी हाती धरोनिया।
चालो वाटे आम्हा तुझासी आधार। चालविसी भार सवे माझा।। - संत तुकाराम महाराज
जेथे मी जातो, तिथे तू आहेसच आणि तुझ्याच शक्तीने मी चालतो.
ज्यांची दोषदृष्टी आहे त्यांनादेखील हे रहस्य सांगू नये कारण ते काही ना काही दोष काढतीलच.
य इमं(म्) परमं(ङ्) गुह्यं(म्), मद्भक्तेष्वभिधास्यति।
भक्तिं(म्) मयि परां(ङ्) कृत्वा, मामेवैष्यत्यसंशयः॥18.68॥
न च तस्मान्मनुष्येषु, कश्चिन्मे प्रियकृत्तमः।
भविता न च मे तस्माद्, अन्यः(फ्) प्रियतरो भुवि॥18.69॥
इतरांना गीता का समजावून सांगावी, का शिकवावी? स्वतःला खूप ज्ञान आहे म्हणून नव्हे तर भगवंताचे प्रिय बनवण्यासाठी शिकवावी.
माऊली म्हणतात,
गीता मातेसामान | मुमुक्षू बाळ हिंडते चुकून |
माय लेकराचे करणे मिलन | स्वभाव असतो संतांचा ||
[गीता निष्कपट माय । चुकोनि तान्हें हिंडे जें वाय ।
तें मायपूता भेटी होय । हा धर्म तुमचा ॥ ]
गीता ही माता आहे, ती आपल्या चैतन्य स्वरूपाची ओळख करून देते. मुमुक्षू अर्थात आपल्या दुःखापासून मुक्तीची ज्यांची इच्छा आहे असे लोक इकडे तिकडे त्याच्या शोधार्थ फिरत असतात. मात्र अशा चुकलेल्या बाळांचे गीता मातेशी मीलन करून देणे हा संतांचा स्वभाव आहे.
सर्वांना हे ज्ञान जाणून घेणे, गीतेचे शुद्ध उच्चारण करणे शक्य नाही. मात्र केवळ अध्ययन केले तरी पुरेसे आहे.
अध्येष्यते च य इमं (न्), धर्म्यं (म्) संवादमावयोः।
ज्ञानयज्ञेन तेनाहम्, इष्टः (स्) स्यामिति मे मतिः॥18.70॥
श्रद्धावाननसूयश्च, शृणुयादपि यो नरः।
सोऽपि मुक्तः(श्)शुभाँल्लोकान्, प्राप्नुयात्पुण्यकर्मणाम्॥18.71॥
कच्चिदेतच्छुतं(म्) पार्थ, त्वयैकाग्रेण चेतसा।
कच्चिदज्ञानसम्मोहः(फ्), प्रनष्टस्ते धनञ्जय॥18.72॥
कारण ऐकणे ही कला आहे - Listening is an art.
सद्गुरुकडून जे ज्ञान आपण ऐकतो ते किती एकाग्रतेने ग्रहण केले हे आपल्या एकाग्रतेवर अवलंबून असते.
अत्यंत प्रेमाने एखादी आई आपल्या मुलाला विचारते तसे भगवंत इथे अर्जुनाला विचारत आहेत. युद्धभूमीवर चालू असलेल्या रणवाद्यांच्या कोलाहलात तुझे चित्त माझ्या वचनांवर एकाग्र झाले होते का?
आपल्या जीवनाच्या संघर्षपूर्ण युद्ध भूमीमध्ये परमात्म्याचे हे वचन कशाप्रकारे एकाग्रचित्त होऊन आपण ऐकू शकतो?
जर तू ऐकले असशील तर अज्ञानामुळे जो मोह तुझ्या मनात प्रविष्ट झाला होता की, हे सर्व शत्रुपक्षातील लोक माझे आहेत. त्यामुळे त्यांना मी कसे मारू? तो तुझा मोह नष्ट झाला का?
अशा सुंदर प्रश्नाचे उत्तर अर्जुनदेखील तितक्याच मधुरतेने देत आहे.
अर्जुन उवाच
नष्टो मोहः(स्) स्मृतिर्लब्धा, त्वत्प्रसादान्मयाच्युत।
स्थितोऽस्मि गतसन्देहः(ख्), करिष्ये वचनं(न्) तव॥18.73॥
आयुष्यात कोणाचा हात धरून ठेवावा? जो बदलतो असा परिवर्तनशील संसार की जो बदलत नाही असा अपरिवर्तनशील परमात्मा.
अशा अच्युत परमात्म्याने दिलेला प्रसाद देखील अच्युत आहे.
अर्जुन म्हणतो, माझी स्मृती परत आली आहे. हा देह आणि या देहाशी निगडित असलेले संबंध केवळ एवढाच माझा संबंध नाही. तर हे अच्युत, जन्मजन्मांतरीचा माझा संबंध तुमच्यासोबत आहे. तुम्ही माझे साथी तर मला कशाची भ्रांती आहे.
सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति |
वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते ||
गाण्डीवं स्रंसते हस्तात्त्वक्चै व परिदह्यते |
न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मन: ||
पहिल्या अध्यायात हताश अर्जुन म्हणतो, माझ्याकडून उभे राहवत नाही आणि माझे धनुष्य माझ्या हातातून गळून पडत आहे. असे म्हणत तो रथाच्या मागील बाजूस जाऊन बसला. तोच अर्जुन आता धनुष्याचा टणत्कार करत आपले कर्तव्य बजावण्यासाठी उभा राहिला आहे. हे गीतेचे महात्म्य आहे. शोकाकुल मनुष्यही जीवनातील अनेक घटनांमुळे हताश होतो. त्या डिप्रेशन मधून अर्जुनाला बाहेर काढून गीतेने आपल्या कर्तव्यपथावर स्थित केले आहे.
सञ्जय उवाच
इत्यहं(म्) वासुदेवस्य, पार्थस्य च महात्मनः।
संवादमिममश्रौषम्, अद्भुतं(म्) रोमहर्षणम्॥18.74॥
व्यासप्रसादाच्छ्रुतवान्, एतद् गुह्यमहं(म्) परम्।
योगं(म्) योगेश्वरात्कृष्णात्, साक्षात्कथयतः(स्) स्वयम्॥75॥
राजन्संस्मृत्य संस्मृत्य, संवादमिममद्भुतम्।
केशवार्जुनयोः(फ्) पुण्यं(म्), हृष्यामि च मुहुर्मुहुः॥18.76॥
तच्च संस्मृत्य संस्मृत्य, रूपमत्यद्भुतं(म्) हरेः।
विस्मयो मे महान् राजन्, हृष्यामि च पुनः(फ्) पुनः॥18.77॥
अंध धृतराष्ट्र ज्याचे ज्ञानचक्षु बंद आहेत त्याला संजय सांगत असलेल्या भगवंताच्या मोहक रुपाबद्दल ऐकण्यात काहीही रस नव्हता. तो केवळ हे जाणण्यास उत्सुक होता की, माझ्या पुत्रांचा युद्धात विजय होईल का? कारण त्यांच्या बाजूला पांडवांपेक्षा अधिक सेना आणि मोठमोठे सेनानी होते. त्यावर संजय म्हणतो,
यत्र योगेश्वरः(ख्) कृष्णो, यत्र पार्थो धनुर्धरः।
तत्र श्रीर्विजयो भूति:(र्), ध्रुवा नीतिर्मतिर्मम॥18.78॥
भगवद्गीता भक्तीसोबत आपल्या विवेक दृष्टीचे जागरण करते.
संत कबीर म्हणतात,
कहो कबीर मैं सौ गुरु पाया,
ज्या का नाम विवेक रे।
मी त्या गुरुची प्राप्ती केली ज्याचे नाव विवेक आहे.
बरोबर काय चूक काय हे सांगणारा आपल्या आतील आवाज अर्थात सदसद्विवेकबुद्धी जागृत करणारा हा ग्रंथ आहे.
There is a voice inside of you That whispers all day long,
"I feel this is right for me, I know that this is wrong."
No teacher, preacher, parent, friend Or wise man can decide
What's right for you--just listen to The voice that speaks inside.
― Shel Silverstein
ज्ञान अपंग असते कर्माविना आणि कर्म आंधळे असते ज्ञानाविना ! कर्म ज्ञानाच्या प्रकाशात जेव्हा घडते तेव्हा ते सर्वांच्या कल्याणासाठी होते आणि कर्म अज्ञाननिर्मित मोहामुळे घडते तेव्हा ते सृष्टीच्या विनाशासाठी कारणीभूत ठरते.
जय नामक इतिहास महाभारताचे सार असलेली ही गीता हेच सांगते की, जिथे योगेश्वर कृष्ण अर्थात आपली विवेक दृष्टी आहे (mind fitness) आणि त्यादृष्टीने आपले कर्तव्य पार पाडणारा अर्जुन (Body Fitness) आहे तिथे विजय निश्चित आहे.
गुरुदेवांना वंदन करून विवेचनाचे समापन करण्यात आले.
प्रश्न - भगवान वेदव्यास तर युद्धभूमीवर उपस्थित नव्हते तर त्यांनी गीता केव्हा आणि कशी लिहिली?
विवेचक - वेदव्यास चिरंजीव आहेत. ते सर्व समयी प्रकट होतात. ही सृष्टी जोपर्यंत आहे आणि जेव्हा सृष्टीचे पुन्हा निर्माण होईल तेव्हाही ते असतील. कारण व्यास हे एक पद आहे. परमात्मा व्यास रूपामध्ये स्थित असतात.
जशी वर्तुळाच्या दोन्ही टोकांना व्यास जोडतो तसेच स्थूल आणि सूक्ष्म या आपल्या जीवनातील अंगांना जोडणारे व्यास हे परमात्म्याचे स्वरूप आहेत.
आपल्याला वाटते की, मुखातून शब्द बाहेर पडले की तेथेच नष्ट होतात. मात्र शब्द या ध्वनीलहरी आहेत. त्या कधीच नष्ट होत नाहीत. आकाशामध्ये कायम राहतात. कारण शब्द हा आकाशाचा विषय आहे.
त्यामुळे गुरुदेव म्हणतात की, कोणी ऐकायला नसेल तरी बोला. घरातल्या तुळशीच्या रोपाला सांगा. कारण ते शब्द नष्ट न होता आकाशात राहतील आणि ज्याची बुद्धी वैश्विक अनुसंधान साधत ते ग्रहण करण्याची पात्रता राखते त्याच्यापर्यंत ते नक्कीच पोचतील.
वेदव्यास जिथे कुठे उपस्थित होते तिथे त्यांनी या तरंगांना ग्रहण केले. आणि भगवद्गीतेच्या माध्यमातून ते ज्ञान सर्व सामान्यांसाठी संस्कृतमध्ये मांडले.
वैज्ञानिक वैश्विक बुद्धी (कॉस्मिक इंटेलिजेंस) सोबत एकरूप होऊन विविध शोध लावतात. त्याचप्रमाणे ऋषीमुनींनी आपल्या बुद्धिमत्तेने ही तरंगे ग्रहण करून अनेक प्रकारचे ग्रंथ लिहिले.
मेघनाताई
प्रश्न - बर्याचदा द्वंद्व निर्माण होते की, हे करावे की, ते करावे. पटकन निर्णय घेता येत नाही. असे का होते?
विवेचक – अनेकदा आपल्याला आपल्या निर्णयाची भीती वाटते. आपल्याला अनुकूल फळच मिळावे अशी इच्छा असते. मग त्याचक्षणी दुसरा विचार मनात येतो की, जर अनुकूल फळ मिळाले नाही तर काय? हे करावे की ते करावे असे पहिले द्वन्द्व मनात असताना अनुकूल फळ मिळाले नाही तर काय असे दुसरे द्वन्द्व मनात चालू होते. अशावेळी निर्णयाच्या परिणामांना भगवंतावर सोपवावे आणि त्यांच्यासमोर बसून निश्चय करावा की कुठलाही निर्णय घेतला तरी त्यावर आपण अढळ राहू. त्याचा जो काही परिणाम असेल तो त्या भगवंताचा प्रसाद समजून ग्रहण करू. असे केल्याने मन शांत होईल आणि हळूहळू योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. प्रतिकूल फळ मिळाले तरी त्याचे मंथन केल्यावर जाणीव होईल की, तो निर्णय योग्य होता आणि तो आपल्याला काहीतरी शिकवून गेला आहे.
मला हे हवे अशी आज्ञा भगवंताला देऊ नये तर माझ्यासाठी कल्याणकारी काय आहे ते द्यावे अशी विनंती करावी. कालांतराने आपले कल्याण कशात आहे या बाबतीत बुद्धीचे जागरण होऊ लागते.
समारोपाची प्रार्थना आणि हनुमान चालीसेने सत्राची सांगता झाली.