विवेचन सारांश
एकच लक्ष्य - परमात्मा

ID: 7141
मराठी
रविवार, 01 जून 2025
अध्याय 7: ज्ञानविज्ञानयोग
2/2 (श्लोक 12-30)
विवेचक: गीता विशारद श्री श्रीनिवास जी वर्णेकर


परंपरेनुसार प्रारंभीची प्रार्थना म्हणून दीपप्रज्वलन करण्यात आले.
वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम्।
देवकीपरमानन्दं कृष्णं वंदे जगद्गुरुम्॥
गुरूवंदना करण्यात आली
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु र्गुरुर्देवो महेश्वरः।
गुरूर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥
जगद्गुरू श्रीकृष्णांना वंदन करण्यात आले.
ॐ कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने।
प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः॥
सद्गुरू ज्ञानेश्वरांना वंदन करण्यात आले.
नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहम्।
पूर्णब्रह्मपरानन्दमीशं आळन्दिवल्लभम्॥
भारतमातेला वंदन करण्यात आले.
रत्नाकरा धौतपदां हिमालय किरीटिनीम्।
ब्रह्मराजर्षि रत्नाढ्यां वन्दे भारत-मातरम्॥
भगवद्गीतेला वंदन करण्यात आले.
ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयम्
व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारते।
अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीमष्टादशाध्यायिनीम्
अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्॥
जगद्गुरू वेदव्यासांना वंदन करण्यात आले.
नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र।
येन त्वया भारत तैल पूर्णः प्रज्वलितो ज्ञानमय प्रदीपः॥

यानंतर परमपूज्य श्री गोविंदेवगिरीजी महाराज याना वंदन करून व सर्व गीता साधकांचे अभिवादन करून सत्राची सुरुवात झाली.

या सातव्या अध्यायामध्ये आपण ज्ञानविज्ञानयोग जाणून घेत आहोत. या अध्यायाचे महत्त्व पहिल्याच श्लोकातून 'समग्र ज्ञान' या शब्दातूनच प्रतीत होते.
मय्यासक्तमनाः पार्थ योगं युञ्जन्मदाश्रयः।
असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु॥
(हे पार्था! अनन्य प्रेमाने मन माझ्या ठिकाणी आसक्त करुन तसेच अनन्य भावाने माझा आश्रय घेऊन, योगयुक्त होऊन तू ज्यायोगे संपूर्ण विभूती, शक्ती, ऐश्वर्यादी गुणांनीयुक्त, सर्वांचा आत्मा असणाऱ्या मला निःसंशयपणे जाणशील, ते ऐक.)

प्रकृती आणि प्रपंच याविषयी या अध्यायामध्ये सांगितले गेले आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूते आणि मन, बुद्धी, अहंकारसहित ही अष्टधा प्रकृती, हिलाच अपरा प्रकृती म्हणतात हे आपण पाहिले. ही अचेतन प्रकृती आहे.

याशिवाय जिच्या योगे ही अपरा प्रकृती धारण केली जाते अशी जीवरूप म्हणजेच सचेतन प्रकृती ही परा प्रकृती आहे. परा आणि अपरा प्रकृती मिळून ही सृष्टी बनलेली आहे. तर मग परमात्मा कोण आहे? या प्रश्नाचे उत्तर जाणण्याची लोकांना उत्सुकता असली तरी भगवंत म्हणतात त्याप्रमाणे कश्चिद्यतति सिद्धये म्हणजेच हजारांमध्ये कोणा एकालाच या प्रश्नाचे उत्तर जाणण्यासाठी अभ्यास करण्याची इच्छा होते.

परमात्म्यापासूनच तर प्रकृतीची निर्मिती झाली आहे. त्यामुळे परमात्मा सृष्टीत सर्वत्र आहे. भगवंत म्हणतात,
अहं कृत्स्नस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा।
माझ्यापासूनच हे जग निर्माण झाले आहे आणि माझ्यातच ते विलीन होते. मला सोडून या संसारामध्ये दुसरे काहीच नाही.”

संत ज्ञानेश्वरांनी याचे फार सुंदर स्पष्टीकरण केले आहे. ते म्हणतात- सुवर्णाचे मणी सोन्याच्या तारेमध्ये ओवावेत तशी ही सृष्टी परमात्म्यामध्ये ओवली गेली आहे.

पुढे भगवंत म्हणतात- या संसारामध्ये मला पहायचे असेल तर माझ्या विभूती बघा. 'रसोऽहमप्सु'- या सृष्टीमध्ये रसभरी फळे आहेत. या फळांमध्ये रस मी आहे. येथे भूतमात्रांमध्ये जीवन मी आहे. तपस्वी लोकांचे तप बघून आपण त्यांच्यापुढे नतमस्तक होतो. त्यांचे तप मी आहे.

या विश्वामध्ये ज्या ज्या वस्तू निर्माण झाल्या त्यांचे बीज परमात्माच आहे, आणि ते कधीपासून आहे? तर ते सनातन आहे. त्याचा आदि कोणीच जाणू शकत नाही. श्रेष्ठ वैज्ञानिक, संशोधक, गणिती हे सर्व बुद्धिमान असतात. आपण त्यांचे स्मरण करतो. त्यांच्यामध्ये बुद्धीरूपात भगवंतच विराजमान असतात. संत महात्म्यांच्या सहवासात आपण त्यांच्या तेजाची अनुभूती घेतो. हे तेज देखील परमात्म्याचे स्वरूप आहे.

धर्माच्या विरोधात नसलेली म्हणजेच धर्माला अनुकूल अशी कामना हीसुद्धा भगवंतस्वरूप आहे. उदाहरणार्थ, एखाद्या गृहस्थासाठी कुटुंब असावे, राहण्यासाठी घर असावे अशा इच्छा असणे चुकीचे नाही, परंतु यासाठी लागणारे धन मी कोणत्याही मार्गाने मिळवण्याची इच्छा धरणे हे विपरीत आहे. अशी कामना धर्माविरुद्ध आचरण करण्यास प्रवृत्त करते. 

7.12

ये चैव सात्त्विका भावा, राजसास्तामसाश्च ये।
मत्त एवेति तान्विद्धि, न त्वहं(न्) तेषु ते मयि॥7.12॥

आणखीही जे सत्वगुणापासून, रजोगुणापासून आणि तमोगुणापासून उत्पन्न होणारे भाव व पदार्थ आहेत, ते सर्व माझ्यापासूनच उत्पन्न होणारे आहेत, असे तू समज. परंतु वास्तविक पाहता त्यांच्यात मी आणि माझ्यात होणारे ते नाहीत.

संसार ही त्रिगुणात्मिका प्रकृती आहे. सत्त्व, रज आणि तम हे प्रकृतीचे तीन गुण आहेत. या तीन गुणांपासूनच प्रकृतीचे जे सात्त्विक, राजस आणि तामस भाव निर्माण होतात ते गुणात्मक भावदेखील भगवंतच निर्माण करतात.‌ हा सारा संसारच त्रिगुणांनी बनलेला आहे.

सूक्ष्मतम अशा परमाणूमध्ये देखील काय आहे? त्यातही इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे आहेतच. इलेक्ट्रॉन सतत फिरत असतात. ते रजोगुणाचेच प्रतीक आहेत. प्रोटॉन हे इलेक्ट्रॉन वर नियंत्रण ठेवतात. ते सत्त्वगुणाचे प्रतीक आहेत आणि न्यूट्रॉन हे तटस्थ असतात. ते काहीच करत नाहीत ते तमोगुणाचे प्रतीक आहेत.

पण पुढे भगवंतांनी सांगितले की वास्तविक पाहाता त्या त्रिगुणांमध्ये भगवंत नाहीत आणि भगवंतांमध्येही ते त्रिगुण नाहीत. हे कसे शक्य आहे?

माऊली स्पष्टीकरण करतात,
सत्त्वरजतमापासून । जे विकार झाले उत्पन्न ।
ते झाले माझ्यापासून । हे जाण तू अर्जुन ॥
रसाने परिपूर्ण । असतो तो बीज कण ।
परी त्याचाच अंकुर होऊन । होय काष्ठ ॥
मग तया काष्ठात । असते का बीजत्व
तयाचे अंकुरण । न होत कधी ॥
बीजापासून अंकुर फुटून त्याचे रोप, रोपाचा वृक्ष बनतो आणि वृक्षापासून लाकूड बनते, मात्र त्या लाकडात बीज नसते त्यामुळे त्या लाकडाला परत अंकुर फुटत नाही. त्याचप्रमाणे भगवंतांनी त्रिगुण निर्माण केले पण त्या त्रिगुणांमध्ये भगवंत नसतात.
सुवर्णाचे मणी केले । ते सुवर्ण सूत्रात ओवले
तैसे जग मी हे धरले । सबाह्य अभ्यंतरी ॥
सोन्याचे मणी करून ते सोन्याच्या धाग्यात ओवावेत त्याप्रमाणे भगवंतांनी हे जग आतून आणि बाहेरून धारण केलेले आहे.

तो धागाही सोनेरी, ते मणीही सोनेरी आणि सोनेरी धाग्यात सोनेरी मणी ओवून बनलेली माळही सोनेरी आहे तर ही बनलेली माळ आहे की सोने आहे? उत्तर असे आहे की ती माळ आहे आणि तीही सोन्याची आहे. तिचे मूळ रूप सोने आहे आणि दृश्य रूप माळ आहे. त्याचप्रमाणे, हे दृश्य स्वरूपातील जग आहे, परंतु या जगाला एकत्र बांधणारा, आतून आणि बाहेरून धारण करणारा परमात्मा ते बनवणारा असूनही दिसत नाही. तो कशामुळे दिसत नाही?

7.13

त्रिभिर्गुणमयैर्भावै:(र्), एभिः(स्) सर्वमिदं(ञ्) जगत्।
मोहितं(न्) नाभिजानाति, मामेभ्यः(फ्) परमव्ययम्॥7.13॥

गुणांचे कार्य असणाऱ्या सात्विक, राजस आणि तामस या तिन्ही प्रकारच्या पदार्थांनी हे सारे जग- प्राणीसमुदाय मोहित झाले आहे. त्यामुळे या तिन्ही गुणांच्या पलीकडे असणाऱ्या अविनाशी अशा मला ते ओळखत नाही.

लोक परमात्म्याला का पाहू शकत नाहीत या प्रश्नाचे उत्तर हे आहे की गुणांचे कार्य असणाऱ्या सात्त्विक, राजसी आणि तामसी प्रकारच्या पदार्थांनी हे सारे लोक मोहित (hypnotized) झाले आहेत. त्यामुळे या तिन्ही गुणांच्या पलीकडे असणाऱ्या अविनाशी अशा परमात्म्याला ते ओळखत नाहीत.  या तीन गुणांचा खेळ या संसारामध्ये अखंड चालू असतो आणि आपण त्यात इतके मोहित होऊन जातो की आपल्याला तोच खरा वाटू लागतो. या गुणांच्या पलीकडे आपल्याला दुसरे काही दिसतच नाही. या गुणात्मक भावांमध्ये फसले गेल्यामुळे त्याच्या पाठी जो परमात्मा आहे तो आपल्याला दिसत नाही.

परमात्म्याच्या मायेच्या या तीन गुणांच्या प्रभावामुळे माणूस त्या अव्यक्त, अविनाशी परमात्म्याला ओळखू शकत नाही. भगवंतांनीच निर्माण केलेली माया त्यांच्या आणि जीवाच्या मध्ये येते. ही माया पार करणे सरळ व सोपे नाही.

7.14

दैवी ह्येषा गुणमयी, मम माया दुरत्यया।
मामेव ये प्रपद्यन्ते, मायामेतां(न्) तरन्ति ते॥7.14॥

कारण ही अलौकिक अर्थात् अति अद्भुत त्रिगुणात्मक माझी माया पार होण्यास कठीण आहे. परंतु जे केवळ मलाच निरंतर भजतात, ते या मायेला ओलांडून जातात म्हणजे संसार तरुन जातात.

येथे दैवी, त्रिगुणात्मक प्रकृतीलाच माया म्हटले आहे. प्रकृतीचेच दुसरे नाव माया आहे. जादूगार जादू करतो, संमोहन करतो, यालाही माया म्हटले जाते. सामान्य जादूगार जेव्हा आपले मायाजाल पसरवतो तेव्हा बहुतेक लोक त्यात फसतात. इथे माया ही तर भगवंतांनीच केलेली जादू आहे त्यामुळे यात फसणार नाही असा मनुष्य विरळाच.

मृगजळ म्हणजे हवेच्या वेगवेगळ्या तापमानामुळे आणि घनतेमुळे प्रकाशाचे अपवर्तन होते, हे अपवर्तन प्रकाशाची दिशा बदलू शकते, ज्यामुळे वस्तू किंवा आकाशाची प्रतिमा विस्थापित किंवा विकृत दिसते. त्यामुळे दूरच्या वस्तूंची किंवा आकाशाची अगदी खरी वाटणारी प्रतिमा दिसते. ही प्रतिमा पाण्यासारखी दिसते आणि लोकांना अनेकदा ते पाणी आहे असे वाटते. त्यामुळे दृष्टीभ्रमाला मृगजळ हे नाव पडले आहे. मायेमुळे माणसाला असेच दृष्टीभ्रम होत असतात.

परंतु भगवंत म्हणतात, “(मम माया दुरत्यया) माझी तरून जाण्यास फार कठीण असलेली माया (ये माम्‌ एव प्रपद्यन्ते ते एताम्‌ मायाम्‌ तरन्ति) जे केवळ मलाच शरण येतात, ते या मायेला ओलांडून जातात”, अर्थातच जे केवळ भगवंतांनाच शरण आले आहेत, तेच या भवसंसारातून तरून जातात. 

परमात्म्याची ही अति अद्भुत त्रिगुणात्मक माया पार करण्याचा एकमेव मार्ग आहे, शरणागती! ज्याने हे मायाजाल रचले आहे, त्या परमात्म्यालाच जो संपूर्णपणे शरण जातो, तोच या मायेला पार करतो. माया पार करून जाणे म्हणजे या मोहपाशातून मुक्त होणे. जेव्हा माणूस मोहमायेच्या पलीकडचा विचार करतो तेव्हा त्याला भगवत्प्राप्ती होते.

माया तरुन जाण्याच्या या समस्येवर काहीही उपाय (solution) नाही, केवळ विघटन (dissolution) आहे. वास्तवात माया अशी काही समस्या आहे का? There is no solution for the problem. कारण तिथे Problem च नाही. There needs to be only dissolution of the delusion. मायेमुळे भवसागर पार करायला रस्ता मिळत नाही तर मायाच नष्ट होते. माया म्हणजे केवळ एक भ्रमाचे धुके आहे, ते विरले की परमात्मा लख्खपणे दिसू लागतो, हे लक्षात आलं की हा मोठा प्रश्न सुटतो.

जेव्हा मनुष्य केवळ परमात्म्यालाच संपूर्णपणे शरण जातो तेव्हा हे भ्रमाचे धुके विरू लागते. पण मायेचा प्रभावच इतका गहन आहे की तिच्या प्रभावाखाली काही माणसं परमात्म्याचा आश्रयही घेत नाहीत. मग कोण परमात्म्याचा आश्रय घेत नाही आणि कोण परमात्म्याचा आश्रय घेतो? आश्रय घेणारे आणि आश्रय न घेणारे लोक कोणत्या प्रकारचे असतात? 

7.15

न मां(न्) दुष्कृतिनो मूढाः(फ्), प्रपद्यन्ते नराधमाः।
माययापहृतज्ञाना, आसुरं(म्) भावमाश्रिताः॥7.15॥

मायेने ज्यांचे ज्ञान हिरावून घेतले आहे, असे आसुरी स्वभावाचे, मनुष्यांत नीच असणारे, दुष्ट कर्मे करणारे मूर्ख लोक मला भजत नाहीत.

खरे तर भगवंतांनी सर्व सृष्टीतील दिव्यत्व जसे की पाण्यामधील रस, चंद्र - सूर्यांमधील प्रकाश, सर्व वेदांमधील ओंकार, आकाशातील शब्द‌ व पुरुषांमधील पौरुषत्व यामध्ये परमात्म्याला पहायला सांगितले आहे. पण सामान्य माणूस हे बघू शकत नाही कारण सामान्य माणसाची बुद्धी आणि अहंकार त्याला असे करू देत नाहीत. भगवंतांची भक्ती कोण करतं, भगवंतांना संपूर्णपणे शरण कोण जातं आणि भगवंतांची भक्ती कोण करत नाही अशा लोकांची माहिती भगवंत आता सांगतात,

मायेच्या प्रभावामुळे ज्यांच्या ज्ञानाचे अपहरण झालेले असते ते लोक या संसारात पूर्णपणे बुडालेले असतात. असे लोक भगवंतांना कधीच शरण येत नाहीत. काही नराधम आपल्याच अहंकारात जगत असतात. त्यांना तर ज्ञान मिळवण्याची साधी प्रेरणासुद्धा होत नाही! हे सर्व लोक आसुरी संपदा धारण करणारे असतात. याविषयी सोळाव्या अध्यायामध्ये विस्ताराने वर्णन केले गेले आहे
दम्भो दर्पोऽभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च ।
अज्ञानं चाभिजातस्य पार्थ सम्पदमासुरीम्‌ ॥
हे पृथापुत्र! पाखंड, घमेंड, अभिमान, क्रोध, निष्ठुरता आणि अज्ञानता ही सारी आसुरी स्वभाव (गुण) घेऊन जन्माला आलेल्या मनुष्याची लक्षणे आहेत.
चिन्तामपरिमेयां च प्रलयान्तामुपाश्रिताः ।
कामोपभोगपरमा एतावदिति निश्चिताः ॥ 
ते आमरणान्त असंख्य चिंतांचे ओझे घेतलेले विषयभोग भोगण्यात तत्पर असलेले, हाच काय तो आनंद आहे, असे मानणारे असतात. 
इदमद्य मया लब्धमिमं प्राप्स्ये मनोरथम्‌ ।   
इदमस्तीदमपि मे भविष्यति पुनर्धनम्‌ ॥
ते विचार करतात की, मी आज हे मिळविले आणि आता मी हा मनोरथ पूर्ण करीन. माझ्याजवळ हे इतके द्रव्य आहे आणि पुन्हा सुद्धा हे मला मिळेल.
असौ मया हतः शत्रुर्हनिष्ये चापरानपि ।   
ईश्वरोऽहमहं भोगी सिद्धोऽहं बलवान्सुखी ॥ 
या शत्रूला मी मारले आणि त्या दुसऱ्या शत्रूंनाही मी मारीन. मी ईश्वर आहे, ऐश्वर्य भोगणारा आहे. मी सर्व सिद्धींनी युक्त आहे आणि बलवान तसाच सुखी आहे. 

काही लोक मात्र दैवीसंपदा घेऊन जन्माला येतात आणि अशा दैवी प्रकृतीच्या लोकांचे देखील चार प्रकार असतात. ते पुढील श्लोकात पाहू.

7.16

चतुर्विधा भजन्ते मां(ञ्), जनाः(स्) सुकृतिनोऽर्जुन।
आर्तो जिज्ञासुरर्थार्थी, ज्ञानी च भरतर्षभ॥7.16॥

हे भरतवंशीयांमध्ये श्रेष्ठ अर्जुना! उत्तम कर्मे करणारे अर्थार्थी, आर्त, जिज्ञासू आणि ज्ञानी असे चार प्रकारचे भक्त मला भजतात.

सुकृतिनः सत्कर्मे करणारे लोक ज्या कारणांसाठी भगवंतांना शरण येतात, त्या कारणांनुसार या भक्तांचे चार प्रकार भगवंत सांगतात:-

आर्त भक्त - जेव्हा मनुष्य अशा काही गहन संकटात सापडतो, ज्यातून सुटका होण्यासाठी अन्य काहीही मार्ग नसतो तेव्हा तो भगवंतांना पुकारतो. महाभारतामध्ये वस्त्रहरण प्रसंगी द्रौपदीने जेव्हा हा अनुभव घेतला की तिचे पाच पराक्रमी पती किंवा भीष्म, द्रोण, विदुर आदी सभेतील सर्व ज्येष्ठ तिची काहीच मदत करू शकत नाहीत तेव्हा तिने भगवंतांना आर्ततेने पुकारले होते आणि भगवंतही लगेच धावून आले. भगवंत म्हणतात संकटात का होईना ते माझे स्मरण करतात आणि माझे भक्त होऊन जातात.

जिज्ञासू भक्त - ज्याला परमात्मा कसा आहे हे जाणायचे आहे, ज्याच्या मनात परमात्म्याला प्राप्त करायचे आहे, ही तळमळ, हा एकच ध्यास असते तो त्यासाठी भगवद्गीता शिकतो, शास्त्रे जाणून घेतो. त्यासाठी ग्रंथ वाचतो, संतांच्या सहवासात जातो, त्याला जिज्ञासू भक्त म्हणतात. स्वामी विवेकानंद असे जिज्ञासू भक्त होते. विवेकानंद जिकडे तिकडे फिरत होते आणि ज्याला त्याला विचारत होते की तुम्ही परमेश्वर पाहिला आहे काय. जेव्हा ठाकूर रामकृष्ण यांच्याशी त्यांची भेट झाली तेव्हा त्यांनाही विवेकानंदांनी हाच प्रश्न विचारला. ठाकूर म्हणाले, "हो मी पाहिला आहे परमेश्वर. अगदी असाच जसा मी तुला आत्ता पाहतो आहे." नंतर त्यांनी ठाकूर रामकृष्ण यांनाच आपले गुरु मानले.

अर्थार्थी भक्त - काही लोक सुख संपत्तीची इच्छा धरतात आणि काही लोकांची भगवंतांवर केवळ आपली कामनापूर्ती व्हावी यासाठी श्रद्धा असते आणि त्यासाठीच ते भगवंताची पूजा करीत असतात. केवळ अर्थप्राप्तीसाठी का होईना ते भगवंताचे स्मरण करतात म्हणून ते देखील भक्त म्हणूनच ओळखले जातात.

ज्ञानी भक्त - हे परमात्म्याला जाणत असतात. परमात्म्याशिवाय मला दुसरे काहीच नको हे जो जाणतो तो खरा ज्ञानी भक्त होय.  
सकाळी बालक झोपलेला असतो तेव्हा वडील कामावर निघून जातात आणि रात्री उशिरा जेव्हा वडील कामावरून परत येतात तेव्हाही बालक झोपलेलाच असतो. रविवारी सुट्टीच्या दिवशी वडील मुलासाठी खूप सारी खेळणी घेऊन येतात तेव्हा तो म्हणतो, 'मला खेळणी नको. मला तुम्ही हवे आहात.' बालक जाणत असतो की हे माझे वडील आहेत आणि त्याला त्यांचे प्रेमच फक्त पाहिजे असते.
तसेच ज्ञानी भक्ताला सुद्धा परमात्म्याचे प्रेमच हवे असते. त्याला अन्य काही नको असते.

ज्ञानी भक्त कसा असतो? माऊली म्हणतात,
त्या ज्ञानाच्या प्रकाशाने । मीच आत्मा हे तो जाणे ।
आणि मीही त्यास आत्मा बोले । उचंबळोनि ॥
ज्ञानाच्या प्रकाशाने त्याच्या ठिकाणचा द्वैताद्वैतरूपी अंधार नाहीसा होऊन मीच परमात्मा हे तो जाणतो व नंतर ब्रह्मैक्याने तो मद्रूप (म्हणजे माझ्याशी, परमात्म्याशी एकरूप) होतो.

या चारही प्रकारच्या भक्तांमध्ये कोणता भक्त श्रेष्ठ आहे हे पुढील श्लोकामध्ये भगवंत सांगत आहेत.

7.17

तेषां(ञ्) ज्ञानी नित्ययुक्त, एकभक्तिर्विशिष्यते।
प्रियो हि ज्ञानिनोऽत्यर्थम्, अहं (म्) स च मम प्रियः॥7.17॥

त्यांपैकी नेहमी माझ्या ठिकाणी ऐक्य भावाने स्थित असलेला अनन्य प्रेम-भक्ती असलेला ज्ञानी भक्त अति उत्तम होय. कारण मला तत्वतः जाणणाऱ्या ज्ञानी माणसाला मी अत्यंत प्रिय आहे आणि तो ज्ञानी मला अत्यंत प्रिय आहे.

ज्ञानी भक्त हा नित्ययुक्त असतो. केवळ संकटामध्ये अथवा काही कामनापूर्तीसाठी किंवा भगवंतांना जाणून घेण्यासाठी अशी त्याची भक्ती तेवढ्यापुरती नसते, तर भगवंतांचे समग्रपणे यथार्थ ज्ञान झाल्यावरही तो सतत त्यांच्या चिंतनामध्ये व्यग्र असतो. दुसरे कोणतीच आकर्षण त्याला त्यांच्यापासून दूर करत नाही, अशी त्याची एकनिष्ठ भक्ती असते आणि म्हणूनच ज्ञानी भक्त हा विशेष आहे.

ज्ञानेश्वर माऊली म्हणतात,
एर्‍हवीं ज्ञानिया जो म्हणिजे । तो चैतन्यचि केवळ माझें ।
हें न म्हणावें परि काय कीजे । न बोलणें बोलों ॥
वास्तविक पाहिले तर ज्ञानी म्हणून जो म्हणतात, तो माझा केवळ आत्माच आहे, ही गोष्ट शब्दांनी सांगण्यासारखी नाही. परंतु काय करावे ? ही न बोलण्यासारखी गोष्ट पण तुला सांगितली.

7.18

उदाराः(स्) सर्व एवैते, ज्ञानी त्वात्मैव मे मतम्।
आस्थितः(स्) स हि युक्तात्मा, मामेवानुत्तमां(ङ्) गतिम्॥7.18॥

हे सर्वच उदार आहेत. परंतु ज्ञानी तर साक्षात माझे स्वरुपच आहे, असे माझे मत आहे. कारण तो माझ्या ठिकाणी मन-बुध्दी असणारा ज्ञानी भक्त अति उत्तम गतिस्वरुप अशा माझ्यामध्येच चांगल्याप्रकारे स्थित असतो.

आर्त भक्त संकट असेपर्यंत भगवंतांचे स्मरण करतो. त्यानंतर तो त्यांना विसरूनही जाऊ शकतो. भगवंतांबद्दलची जिज्ञासा पूर्ण झाल्यानंतर जिज्ञासू भक्त ही त्यांना विसरून जाऊ शकतो. अर्थार्थी भक्त आपली इच्छा पूर्ण करण्यापुरते भगवंतांचे स्मरण करतो. इच्छा पूर्ती झाली की त्याला भगवंतांचे विस्मरण होते. एकदा एका जोडप्याला सिनेमाला जायचे होते. परंतु पार्किंगसाठी जागा मिळणार नाही असे वाटून पती नाही म्हणाला. पत्नीने देवाची प्रार्थना केली की आम्हाला एक तरी पार्किंग लॉट मिळू दे. शेवटी एकदाचे ते दोघे सिनेमागृहात गेले. योगायोगाने एकच पार्किंग शिल्लक होते, तेव्हा ते म्हणाले, 'अरेवा! आपल्याला एक पार्किंग मिळाले.' काम झाले, भगवंतांचा विसर पडला!

ज्ञानेश्वर माऊली म्हणतात,
आर्त तो दु:खवारणार्थ । जिज्ञासु ज्ञानप्राप्त्यर्थ ।
अर्थार्थी तो अर्थसिद्ध्यर्थ । भजतो मला ॥
परंतु त्या चौथ्यास काही । कर्तव्य उरलेले नाही ।
म्हणून खरा भक्त पाही । ज्ञानी तो ॥
म्हणून आपापल्या हितासाठी । कोणीही करितो माझी भक्ति ।
परी मी ज्यावरी करतो प्रीती । ऐसा एक ज्ञानीच तो ॥
त्यात जो आर्त आहे, तो पीडेच्या निमित्ताने भक्ती करतो, व जो जिज्ञासु आहे तो जाणण्याकरताच भक्ति करतो. त्यातील तिसरा जो आहे तो अर्थप्राप्तीची इच्छा करतो. मग राहिलेल्या चौथ्याच्या ठिकाणी काहीच कर्तव्य नसते, म्हणून अर्जुना, जो ज्ञानी आहे तोच एक भक्त आहे असे समज. म्हणून आपापल्या हिताच्या इच्छेने वाटेल तो भक्त चिकटतो, परंतु मीच ज्याच्यावर प्रेम करतो असा त्यापैकी एक ज्ञानी भक्त होय. 

भगवंतांना केवळ भगवंतच जाणू शकतात. ज्ञानी भक्त भगवंतांना समग्रपणे जाणत असतो, त्यामुळे तो भगवंतस्वरूप बनतो. तो जाणून असतो की ज्ञानविज्ञानाचा पाया भक्तीच आहे. भक्ती शिवाय ज्ञान प्राप्त होत नाही आणि म्हणूनच ज्ञानी भक्त निरंतर भगवंतांचे स्मरण करतो. असा भक्त भगवंतांना सर्वात प्रिय आहे.

संत तुकारामांना पांडुरंगाचे दर्शन घडले असे कधीही बोलले जात नाही. ते भगवंतांशी एकरूप झाले.
आधी होता संतसंग। तुका झाला पांडुरंग ।
त्याचे भजन राहिना । मुळ स्वभाव जाईना ॥
संत तुकाराम भगवंताशी एकरूप झाल्यावर सुद्धा त्याचे भजन चिंतन करत असत. खरे ज्ञानी भक्त हे असे असतात! ज्ञान मिळण्यापूर्वी उपासना केली जाते आणि ज्ञानप्राप्तीनंतर सुरू रहाते ती भक्ती असते.

काही लोकांच्या मुला-मुलींचे विवाह झाले असले तरी त्यांची प्रवृत्ती दुसऱ्यांच्या मुला-मुलींचे विवाह जमवायची असते. यात त्यांचा काहीही स्वार्थ नसतो, ते इतरांसाठी खटपट करत रहातात.
सर्वभूतहिते रताः।
त्याला स्वतःसाठी काहीही नको असते पण तो सर्वांच्या हितासाठी काम करत राहतो. तो सर्वांमध्ये देव पाहतो. तो सर्वांच्या कल्याणासाठी काम करत राहतो.
सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः।
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद्दुःखभाग्भवेत्॥
हे तो काहीही बोलत नसला तरी प्रत्यक्ष आचरणात आणतो. हे सारे जग भगवंताचे स्वरूप आहे हे जाणून निरपेक्ष प्रेम करायला शिकावे व भगवंतांना सर्वात प्रिय असलेला ज्ञानी भक्त बनावे. 

7.19

बहूनां(ञ्) जन्मनामन्ते, ज्ञानवान्मां(म्) प्रपद्यते।
वासुदेवः(स्) सर्वमिति, स महात्मा सुदुर्लभः॥7.19॥

पुष्कळ जन्मांच्या शेवटच्या जन्मात तत्वज्ञान झालेला पुरुष ‘सर्व काही वासुदेव' च आहे, असे समजून मला भजतो, तो महात्मा अत्यंत दुर्मिळ आहे.

आठव्या अध्यायात भगवंतांनी म्हटलेले आहे,
अनन्यचेताः सततं यो मां स्मरति नित्यशः ।
तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः ॥
जो पुरुष माझ्या ठिकाणी अनन्यचित्त होऊन नेहमी पुरुषोत्तमाचे स्मरण करतो, त्या नित्य माझ्याशी युक्त असलेल्या योग्याला भगवंत सहज प्राप्त होतात. परंतु असा ज्ञानी भक्त दुर्लभ आहे आणि असा भक्त जर भेटला तर साक्षात परमात्मा मिळाला असे समजावे.

भक्ती आणि उपासना यामध्ये फरक आहे. अनेक जन्मांच्या साधनेनंतर भगवंतांची भक्ती प्राप्त होते. भक्ती प्राप्त होण्यासाठी जी पूजारुपी भक्ती केली जाते ती उपासना होय. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर जी भक्ती प्राप्त होते ती ज्ञानोत्तर भक्ती होय. भगवंत म्हणजे माझे चैतन्यस्वरूप आहेत, अशी ती भक्ती होय.

अनेक जन्मांच्या साधनेनंतर तत्त्वज्ञान प्राप्त करून घेऊन शेवटी
वासुदेवः सर्वमिति।
हे सर्व विश्व म्हणजे वासुदेव होय असा निष्कर्ष काढून भगवंतांना शरण आलेला असा महात्मा अत्यंत दुर्लभ असतो. भगवंतांना प्राप्त करण्यासाठी, अनेक जन्म घ्यावे लागतात आणि ज्ञान मिळवावे लागते. जन्मजन्मांतरीची योगसाधना किंवा कर्मयोगाचे आचरण किंवा स्वाध्याय या सगळ्याचा परिपाक सरतेशेवटी ज्ञानप्राप्तीमध्ये होतो. आता हे ऐकून भीती वाटू शकेल की जन्मजन्मांतर म्हणजे किती जन्म? परंतु यामुळे घाबरून जायचं कारण नाही. जर का आपली पुरेशी साधना पूर्वीच्या जन्मांमध्ये झाली असेल तर कदाचित या जन्मीही आपल्याला ज्ञानप्राप्ती होऊ शकते असा सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. आपले अनेक जन्म झाले आहेत व आपल्याला या जन्मीच भगवंतांना प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 

महाभारतात भगवंतांनी भौतिक स्वरूपात प्रकट होऊन अर्जुनाला उपदेश केला होता. आपल्याला प्रश्न पडतो की आपल्याला कोण उपदेश करेल? आपल्याला भगवद्गीता मिळाली आहे. तीच आपल्याला आपल्या अंतिम ध्येयापर्यंत घेऊन जाऊ शकते.
जयतु जयतु गीता वाङ्मयी कृष्णमूर्तिः।
भगवंतांचे वाङ्मयीन रूप गीतेच्या रूपाने अस्तित्वात आहे. आता आपल्याला गीतेचा मारू प्राप्त झाला आहे, तेव्हा आपण त्या भगवंताची खूप लवकर प्राप्ती करू शकतो.

सहाव्या अध्यायात भगवंतांनी आपल्याला हे आश्वासन दिले आहे की कोणत्याही जन्मी केलेली अल्पसाधनाही कधी व्यर्थ जात नसते. पुढच्या जन्मी या जन्मीची अधुरी साधना पुढे सुरू होते. जन्मजन्मांतरीची ही दीर्घ साधना आहे, पण निश्चितच फलदायी आहे. अशा दीर्घ साधनेनंतर ज्ञानाची प्राप्ती झाली की तो ज्ञानी संपूर्णपणे समर्पित भक्त बनतो. त्याला जिथं तिथं फक्त परमात्माच दिसतो. जन्मजन्मांतरीच्या साधनेनंतर हे फळ मिळत असल्यामुळे असे ज्ञानी भक्त दुर्लभच असतात. अशा ज्ञानी भक्तांची
जे जे भेटे भूत । ते ते मानीजे भगवंत ।
हा भक्तियोगु निश्चित । जाण माझा ॥
जो जो प्राणी दिसेल, तो तो प्रत्यक्ष परमात्मा आहे असे समजावें. हा माझा भक्तियोग आहे असे निश्‍चित समज. अशी परिस्थिती झालेली असते.

7.20

कामैस्तैस्तैर्हृतज्ञानाः(फ्), प्रपद्यन्तेऽन्यदेवताः।
तं(न्) तं(न्) नियममास्थाय, प्रकृत्या नियताः(स्) स्वया॥7.20॥

त्या त्या भोगांच्या इच्छेने ज्यांचे ज्ञान हिरावून घेतले आहे असे लोक आपापल्या स्वभावाने प्रेरित होऊन निरनिराळे नियम पाळून इतर देवतांची पूजा करतात.

त्या त्या भोगांच्या इच्छेने ज्यांचे ज्ञान हिरावून घेतले आहे असे लोक जन्मजन्मांतरीच्या प्राप्त झालेल्या संस्कारांनी बनलेल्या स्वभावाने नियंत्रित होऊन त्या त्या स्वभावानुसार निरनिराळे नियम पाळून इतर देवतांची पूजा करतात.

काहीही कार्याचा प्रारंभ करत असताना 
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥
अशी प्रार्थना करत कार्य निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी गणपतीचे पूजन केले जाते. तसेच धनप्राप्तीसाठी लक्ष्मी, बलप्राप्तीसाठी मारुती, शक्तीसाठी दुर्गा माता, कलांमध्ये प्राविण्य मिळावे म्हणून सरस्वती माता अशी विविध देवतांची वेगवेगळ्या इच्छापूर्तींसाठी उपासना केली जाते आणि मग गणपतीला दुर्वा आणि मोदक, मारुतीला रुई, शंकराला बेल, विष्णूला तुळस अशाप्रकारे ज्या ज्या देवतेला जे जे काही प्रिय आहे ते ते त्या देवतेला अर्पण केले जाते.

गणितातील एक सूत्र (formula) आहे: A = B, याचाच अर्थ असा
ही होतो की  B = A. जेव्हा आपण वासुदेवमिती म्हणतो तेव्हा त्यात वासुदेवच सर्व काही आहे असा हट्टाग्रह नसून सर्व काही वासुदेव आहे आणि वासुदेव सर्व काही आहे असे दोन्हीही अर्थ होतात. एका कवीने म्हटल्याप्रमाणे,
तेरे नाम अनेक तू एक ही है
तेरे रुप अनेक तू एक ही है।
माझी ज्याच्यावर श्रद्धा आहे तोच परमात्मा आहे असे मानणे योग्य नाही. परमात्म्याची अनेक रूपे आहेत. भगवान शिव, श्रीगणेश, दुर्गामाता ही सर्व परमात्म्याची रूपे आहेत.
यं वैदिका मन्त्रदृशः पुराणा इन्द्रं यमं मातरिश्वानमाहु:।
वेदान्तिनोऽनिर्वचनीयमेकं यं ब्रह्मशब्देन विनिर्दिशन्ति॥
शैवायमीशं शिवइत्यवोचन् यं वैष्णवा विष्णुरिति स्तुवन्ति।
बुद्धस्तथाऽर्हन्निति बौद्धजैनाः सत्-श्री-अकालेति च सिक्खसन्तः॥
शास्तेति केचित् प्रकृतिः कुमारः स्वामीति मातेति पितेति भक्त्या।
यं प्रार्थयन्ते जगदीशितारं स एक एव प्रभुरद्वितीयः॥
प्राचीन काळातील ज्या ऋषींनी मंत्र पाहिले होते ते त्यांना इंद्र, यम, मातृश्व (वैदिक देवता) असे संबोधत असत, ज्याला वेदांती ब्रह्मा या शब्दाने संबोधतात, ज्याची शैव लोक शिव आणि वैष्णव लोक विष्णू म्हणून स्तुती करतात. ज्याला बौद्ध आणि जैन लोक बुद्ध आणि अर्हत म्हणतात आणि शीख संत त्यांना सत् श्री अकाल म्हणतात, विश्वाचा स्वामी ज्याला काही शास्त्र म्हणतात, काही प्रकृती म्हणतात, काही कुमारस्वामी म्हणतात आणि काही स्वामी, माता, पिता म्हणतात आणि भक्तीने त्याची प्रार्थना करतात, तो देव एक आणि अतुलनीय आहे.

आपल्या वेगवेगळ्या कामनांना अनुसरून आपण भगवंतांची वेगवेगळ्या रूपांमध्ये पूजा करतो. आपण भगवंतांच्या त्या बाह्य रूपांत अडकतो, त्या रूपांना वेगळे मानतो आणि म्हणून आपण भगवंतांना शीघ्र प्राप्त करू शकत नाही.

7.21

यो यो यां(म्) यां(न्) तनुं(म्) भक्तः(श्), श्रद्धयार्चितुमिच्छति।
तस्य तस्याचलां(म्) श्रद्धां(न्), तामेव विदधाम्यहम्॥7.21॥

जो जो सकाम भक्त ज्या ज्या देवतास्वरुपाचे श्रध्देने पूजन करु इच्छितो, त्या त्या भक्ताची त्याच देवतेवरील श्रध्दा मी दृढ करतो.

आपल्या कामनापूर्तींसाठी ज्या देवतांची उपासना आपण ज्या श्रद्धेने  करतो, त्या देवतांबद्दल ती श्रद्धा साक्षात भगवंतच आपल्या मनात जागृत करत असतात. गणेशोत्सवात गणेशोपासना, नवरात्रीत दुर्गामाता, लक्ष्मीमाता, सरस्वतीमाता या मातृकांची उपासना, या सर्व उपासनानचे प्रेरणा स्रोत साक्षात भगवंत आहेत, ही मूलभूत बाब भगवंत स्वतः सांगत आहेत.

ज्याप्रमाणे बालकाचे हृदय माताच जाणते, बाळाच्या भुकेची, झोपेची, खेळाची जाणीव केवळ मातेलाच होते त्याचप्रमाणे आपल्या भक्ताची कामना जाणून त्याच्या अंतःकरणात त्या त्या देवतेच्या उपासनेची श्रद्धा जागृत करून त्या आराध्य देवतेची उपासना करण्याची प्रेरणा देणारे एकमेव स्वयं भगवंतच आहेत, हे गुपित भगवंत इथे प्रकट करतात. उदाहरणार्थ भक्ताची शक्ती सामर्थ्याची गरज ओळखून भगवंत त्याच्या अंतःकरणात हनुमंताची उपासना करण्याची प्रेरणा निर्माण करतात. वास्तविक हनुमंत हेही भगवंताचेच स्वरूप आहेत.

एखाद्या शासकीय कामासाठी आपल्याला संबंधित कार्यालयातच जावे लागते. जमिनीसंबंधीच्या कामासाठी त्या संबंधित कार्यालयात गेलो तरच आपले काम होऊ शकते. त्याऐवजी आपण पोलीस कमिशनरच्या कार्यालयात गेलो तर आपले काम होऊ शकणार नाही. या कामासाठी थेट पंतप्रधानांकडे जाण्यातही काही हशील नाही. त्याप्रमाणे कोणत्या इच्छेसाठी कोणत्या देवतेची उपासना करायची याची अचूक प्रेरणा भगवंत स्वतः आपल्या हृदयात निर्माण करत असतात.

आपल्या घरात मीटरमध्ये जी वीज येते ती कशी येते? जिथे वीजनिर्मिती केंद्र आहे तिथे ती निर्माण होते. तेथून मुख्य जनित्रातून (generator) मधून रोहित्राद्वारे (transformer) खांबांवरून जाणाऱ्या तारांमधून घरातील मीटरपर्यंत पोहोचते. या मीटरद्वारे घरात येणारी वीज वेगवेगळ्या खोल्यात जोडलेल्या विजेच्या दिव्यांमधून प्रकाश देते. आपण घरात आपल्याला जेवढ्या विद्युत दाबाची (voltage) गरज आहे त्यानुसारच वीज घेतो. ही वीज तर प्रामुख्याने जनित्रातून आलेली असते हीच बाब आपण विसरत असतो. त्याचप्रमाणे आपल्याला उपासना करण्याची प्रेरणा देणारा भगवंत आणि आपण ज्याची उपासना करतो ते भगवंताचे रूप दोन्हीही एकच आहेत या बाबी ध्यानात ठेवल्या पाहिजेत. इथे अजून एक महत्त्वपूर्ण बाब लक्षात घेतली पाहिजे. आपण ज्या आराध्य देवतेची उपासना करतो केवळ त्याच रूपाला सामर्थ्यशाली मानतो. अन्य देवता गौण समजतो. हा आपपरभाव सोडून भगवंत एकच आहे हा भाव मनी ठेवावा.

सर्व देव हे देखील भगवंतांचीच रूपे आहेत. भगवंत वेगवेगळ्या देवांच्या रूपात प्रकट झाले आहेत. देवांची पूजा करण्यासोबतच, आपण हे देखील जाणून घेतले पाहिजे की ते देवाचे कार्य करत आहेत. सर्व देवांबद्दल तसेच सर्व धर्मांबद्दल समादर (समान आदर) असला पाहिजे. 
सर्वधर्मसमभाव नाही तर सर्वधर्मसमादर असावा.
सर्व महिलांचा आदर केला पाहिजे. माझी आई ही माझीच आई आहे. इतर महिलांचा माझ्या आईसारखा आदर केला जाऊ शकतो पण त्या महिला माझी आई असू शकत नाहीत. तसेच आपण इतर धर्मांना आपल्या धर्माप्रमाणेच आदर देऊ शकतो पण त्यांना आपला धर्म मानू शकत नाही.

स्वामी विवेकानंदांनी शिकागोतील आपल्या प्रसिद्ध भाषणात म्हटले होते -
रुचिनां वैचित्र्यादृजुकुटिलनानापथजुषाम्।
नृणामेको गम्यस्त्वमसि पयसामर्णव इव॥
= शिवमहिम्नस्तोत्रम् =
हे प्रभो, जसे विभिन्न जलप्रवाहांचे अंतिम ठिकाण सागर आहे, तसेच आपापल्या अलग अलग आवडीनुसार विभिन्न सरळ वा वक्र मार्गांनी जाणार्‍या सर्व माणसांचे अंतिम ठिकाण तुम्हीच आहात.
प्रत्येक जण आपल्या आवडीप्रमाणे इच्छेप्रमाणे वेगवेगळ्या देवतांची पूजा करत असला तरी ती सर्व एकाच परमात्म्याची रूपे आहेत. हीच तर आमची शिकवण आहे. भारतातील लोक लहानपणापासून हा श्लोक म्हणतात. निरनिराळ्या लोकांना निरनिराळ्या गोष्टीत रुची आणि इच्छा असते त्यानुसार ते वेगवेगळ्या देवतांची पूजा करतात, पण त्या देवता परमात्म्याचीच विविध रूपे आहेत. अथर्वशीर्ष म्हणताना आपण
त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं।
वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुव: स्वरोम्॥
असे म्हणतो तेव्हा त्या गणेशामध्येच ही सर्व रूपे बघत असतो. म्हणूनच ज्या प्रकारची इच्छा किंवा आवड त्याप्रमाणे अनेक देवता आपल्या धर्मात आहेत. जी देवता आवडेल व जिची पूजा करायची प्रेरणा भगवंताकडून मिळेल त्या देवतेची पूजा करून सुद्धा परमात्म्याची भक्ती करता येते ही भारतीय संस्कृतीची एक विशेषता आहे.

7.22

स तया श्रद्धया युक्त:(स्), तस्याराधनमीहते।
लभते च ततः(ख्) कामान्, मयैव विहितान्हि तान्॥7.22॥

तो त्या श्रद्धेने युक्त होऊन त्या देवतेचे पूजन करतो आणि त्या देवतेकडून मीच ठरविलेले ते इच्छित भोग निश्चितपणे मिळवितो.

साधक त्या श्रद्धेने युक्त होऊन त्या देवतेचे पूजन करून त्या देवतेकडून भगवंतांनीच निश्चित केलेले त्याच्या इच्छेचे फळ निश्चितपणे मिळवितो. कलेक्टरसारख्या अनेक व्यक्तींना राष्ट्रपती वेगवेगळे अधिकार देत असतात. तसेच देवतांना भगवंत अधिकार देतात. त्यांच्याकरवी साधकांच्या उपासनेचे योग्य ते तात्कालिक फळ देतात. पण त्या फलप्राप्तीतून चिरस्थायी लाभ होतात का?

7.23

अन्तवत्तु फलं(न्) तेषां(न्), तद्भवत्यल्पमेधसाम्।
देवान्देवयजो यान्ति, मद्भक्ता यान्ति मामपि॥7.23॥

पण त्या मंदबुध्दी लोकांचे ते फळ नाशिवंत असते. तसेच देवतांची पूजा करणारे देवतांना प्राप्त होतात आणि माझे भक्त, मला कसेही भजोत, अंती मलाच येऊन मिळतात.

ही फळं चिरस्थायी नसतात. कारण त्या भौतिक सुखाचा लाभ देणार्‍या फळांमधून मिळणारे सुख चिरस्थायी नसते. भौतिक सुखाची एक कामना पूर्ण झाली तरी त्यानंतर अशा इतर अनेक भौतिक कामना निर्माण होतच रहातात. भौतिक सुखांना आरंभ आणि अंत असतो. भगवंतांचे भक्त भगवंतांनाच प्राप्त करून घेतात. भगवंतांची प्राप्ती म्हणजे सच्चिदानंद! आनंद चिरस्थायी असतो. त्याला आरंभ आणि अंत नसतो. 

7.24

अव्यक्तं(म्) व्यक्तिमापन्नं(म्), मन्यन्ते मामबुद्धयः।
परं(म्) भावमजानन्तो, ममाव्ययमनुत्तमम्॥7.24॥

मूढ लोक माझ्या सर्वश्रेष्ठ, अविनाशी अशा परम भावाला न जाणता मन-इंद्रियांच्या पलीकडे असणाऱ्या, सच्चिदानन्दघन परमात्मस्वरूप मला मनुष्याप्रमाणे जन्म घेऊन प्रगट झालेला मानतात.

भगवंतांच्या सर्वश्रेष्ठ, अविनाशी अशा परम भावाला न जाणणारे निर्बुद्ध लोक अव्यक्त (मन-इंद्रियांच्या पलीकडे असणाऱ्या) भगवंतांना व्यक्त (मनुष्याप्रमाणे जन्म घेऊन प्रगट झालेला) मानतात.

आपण सामान्य माणसं परमात्म्याचे परम स्वरूप न जाणता फक्त त्याचे रूप बघून तेच सत्य आहे असे समजून घेतो. ज्या रूपात आपण त्याला बघतो ते रूप मात्र सत्य आणि बाकी सगळं मिथ्या आहे असे आपण समजतो. भगवंताचे कुठलेही रूप परमात्म्याचे स्वरूप आहे ही गोष्ट आपण समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

अलिकडे इमारतींवर परावर्तक काचा बसवता. या काचेवर विशेष लेप असतो, जो प्रकाशास आणि उष्णतेला परावर्तित करतो. त्यामुळे, या काचेतून जास्त प्रकाश आत प्रवेश करत नाही आणि इमारतीचे तापमान कमी राहते,  ग्लास म्हणतात या काचेचा चष्मा जे लोक लावतात त्यांना बाहेरचे जग दिसू शकते परंतु इतर लोकांना मात्र चष्मा घालणाऱ्याचे डोळे दिसू शकत नाहीत. भगवंतांची माया या परावर्तक काचेसमान असते. मायेमुळे आपण त्यांना पाहू शकत नाही.

भगवान श्रीराम, भगवान श्रीकृष्ण यांना व्यक्तीच्या रूपात न पाहता त्यांचा परमभाव, त्यांचे अंतरंग पहावे. आपण म्हणतो,
गुरु: साक्षात परब्रह्म॥
परंतु हे केवळ बोलण्यापुरते असते. आपण गुरूमध्ये खरोखरच परब्रह्म बघतो का याचे आपणच चिंतन करणे आवश्यक आहे.

7.25

नाहं(म्) प्रकाशः(स्) सर्वस्य, योगमायासमावृतः।
मूढोऽयं(न्) नाभिजानाति, लोको मामजमव्ययम्॥7.25॥

आपल्या योगमायेने लपलेला मी सर्वांना प्रत्यक्ष दिसत नाही. म्हणून हे अज्ञानी लोक जन्म नसलेल्या, अविनाशी, मला परमेश्वराला जाणत नाहीत. अर्थात् मी जन्मणारा-मरणारा आहे, असे समजतात.

सर्वांना भगवंतांचे ज्ञान होत नाही, कारण गुणांनी युक्त अशा मायेने हे सर्व जग आच्छादलेले असल्यामुळे जगाच्या दृष्टीने भगवंत लपलेले आहेत, सर्वांना प्रत्यक्ष दिसत नाहीत, म्हणूनच हे मूढ लोक जन्मरहित व नाशरहित अशा भगवंतांना जाणत नाहीत, ते भगवंतांना जन्मणारा-मरणारा आहे, असे समजतात. ही भगवंतांची माया अशी आहे की यशोदा मैय्यालाही त्यांनी विश्वरूपदर्शन दिले, तथापि पुन्हा तिला मायेने झाकले, अन्यथा मैया आपल्या कान्ह्यावर मातृप्रेमाचा वर्षाव करण्याऐवजी कान्ह्यातील परमात्म्याची पूजा करू लागली असती.

7.26

वेदाहं(म्) समतीतानि, वर्तमानानि चार्जुन।
भविष्याणि च भूतानि, मां(न्) तु वेद न कश्चन॥7.26॥

हे अर्जुना! पूर्वी होऊन गेलेल्या, वर्तमान काळातील आणि पुढे होणाऱ्या सर्व प्राण्यांना मी जाणतो. पण श्रध्दा-भक्ती नसलेला कोणीही मला जाणत नाही.

भगवंतांनी अर्जुनाला विश्वरूपदर्शन दिले तेव्हा स्वतःची ओळख दिली होती, कालोऽस्मि (मी काळ आहे.) पूर्वी होऊन गेलेल्या, सध्या अस्तित्वात असलेल्या आणि पुढे होणाऱ्या सर्व सजीवांना भगवंत जाणतात. पण श्रद्धा व भक्ती नसलेला कोणीही भगवंतांना जाणत नाही.

आता वैज्ञानिक युगात ही गोष्ट कशी पटेल? तथापि आईन्स्टाईननेच एक सिद्धांत मांडला होता. एका लांबलचक आगगाडीची कल्पना करा, जिच्या ड्रायव्हरने हिरवा दिवा दाखवला तर गार्डाला तो दिवा दिसायला दोन महिन्यांचा अवधी लागेल इतकी ती गाडी लांबलचक आहे. आता जो कोणी अशा ठिकाणी उभा आहे जिथून त्याला इंजिन आणि गार्डाचा डबा दोन्ही दिसू शकत आहेत तर एकाच वेळी तो भूतकाळ (ड्रायव्हरने दाखवलेला हिरवा दिवा) आणि भविष्यकाळ (गार्ड पहाणार असलेला हिरवा दिवा) वर्तमानातच बघणार नाही का?

परंतु कोणीही मला जाणत नाही असे भगवंत का म्हणतात? ज्ञानी भक्त तर भगवंतांना जाणतो ना? ज्ञानी भक्त भगवंतांना जाणतो कारण तो भगवंतांच्या परमभावाला प्राप्त झालेला असतो. आकाशाची लांबी रुंदी आकाशच जाणू शकते. त्याचप्रमाणे परमात्म्याचे स्वरूप परमात्माच जाणू शकतो आणि ज्याने परमात्म्याच्या भक्तीची प्राप्ती केलेली आहे, तो ज्ञानी भक्त स्वतःच परमात्मास्वरूप झालेला आहे त्यामुळे तो त्यांना जाणू शकतो अन्य कोणीही जाणू शकत नाहीत.

7.27

इच्छाद्वेषसमुत्थेन, द्वन्द्वमोहेन भारत।
सर्वभूतानि सम्मोहं(म्), सर्गे यान्ति परन्तप॥7.27॥

हे भरतवंशी अर्जुना! सृष्टीत इच्छा आणि द्वेष यांमुळे उत्पन्न झालेल्या सुख-दुःखरुप द्वंद्वाच्या मोहाने सर्व प्राणी अत्यंत अज्ञानाला प्राप्त होतात.

जीवनातील द्वंद्व म्हणजे जीवनातील परस्परविरोधी परिस्थिती. संसारात इच्छा किंवा द्वेष, आवड किंवा नावड यांमुळे उत्पन्न झालेल्या सुख-दु:ख किंवा मान-अपमान इत्यादी द्वंद्वांमुळे सर्व सजीव अत्यंत संमोहित होतात. संमोहित म्हणजे काय? आपण सिनेमा बघतो. त्यात इतके एकरूप होतो की दुःखद प्रसंग आला तर डोळ्यात अश्रू येतात. खलनायक नायिकेला त्रास देत असेल तर आपले हात त्वेषाने त्याला मारायला शिवशिवत असतात आणि शेवटी नायक-नायिकेचे मिलन झाले की आपल्यालाच अतिशय आनंद होत असतो. आपल्याला माहीत असते की हे सगळे खोटे आहे तरी आपण त्यात इतके रंगून जातो. ही संमोहित अवस्था असते! जीवनामध्ये आपल्या इच्छा किंवा द्वेष, आवड किंवा नावड यांच्यामुळे आपण असेच संमोहित होतो आणि आपल्याला वास्तवाचे भान राहत नाही.

7.28

येषां(न्) त्वन्तगतं(म्) पापं(ञ्), जनानां(म्) पुण्यकर्मणाम्।
ते द्वन्द्वमोहनिर्मुक्ता, भजन्ते मां(न्) दृढव्रताः॥7.28॥

परंतु निष्कामभावाने श्रेष्ठ कर्मांचे आचरण करणाऱ्या ज्या पुरुषांचे पाप नष्ट झाले आहे, ते राग-द्वेषाने उत्पन्न होणाऱ्या द्वंद्वरुप मोहापासून मुक्त असलेले दृढनिश्चयी भक्त मला सर्व प्रकारे भजतात.

निष्कामभावाने श्रेष्ठ कर्मांचे आचरण करणाऱ्या ज्या पुरुषांचे पाप नष्ट झाले आहे, ते राग-द्वेष यांनी उत्पन्न होणाऱ्या द्वंद्वरूप मोहापासून मुक्त असलेले दृढनिश्चयी भक्त भगवंतांची भक्ती करतात. कोणत्याच बाह्य आकर्षणाचा दृढनिश्चयी भक्तांवर काहीही परिणाम होत नाही. त्यांच्या जीवनाचे परमेश्वर प्राप्तीचे असे एकच ध्येय असते व त्याकडे ते मार्गक्रमणा करीत असतात. आपल्या दृढनिश्चयामुळे जीवनातील सर्व द्वंद्वापासून ते मुक्त असतात. ते सतत निष्काम भावाने आपली कर्मे करीत राहतात, त्यांना स्वतःसाठी काही नको असते. परमात्म्याची प्राप्ती हेच ध्येय असलेल्या व त्यांचेच भजन करणाऱ्या अशा भक्तांची सारी पापे नष्ट होतात.

7.29

जरामरणमोक्षाय, मामाश्रित्य यतन्ति ये।
ते ब्रह्म तद्विदुः(ख्) कृत्स्नम्, अध्यात्मं(ङ्) कर्म चाखिलम्॥7.29॥

जे मला शरण येऊन वार्धक्य व मरण यांपासून सुटण्याचा प्रयत्न करतात ते पुरुष, ते ब्रह्म, संपूर्ण अध्यात्म आणि संपूर्ण कर्म जाणतात.

जे भगवंतांना शरण येऊन वार्धक्य व मरण यांपासून म्हणजेच जन्ममृत्यूरुपी या भवसागरातून मुक्त होण्याचा प्रयत्न करतात, ज्यांच्याकडे कामासक्ती नसून ध्येयासक्ती असते, ते लोक ब्रह्म, संपूर्ण आत्मज्ञान आणि संपूर्ण कर्म जाणतात.

7.30

साधिभूताधिदैवं(म्) मां(म्), साधियज्ञं(ञ्) च ये विदुः।
प्रयाणकालेऽपि च मां(न्), ते विदुर्युक्तचेतसः॥7.30॥

जे पुरुष अधिभूत, अधिदैव व अधियज्ञ यांसह (सर्वांच्या आत्मरुप अशा) मला अंतकाळीही जाणतात, ते युक्त चित्ताचे पुरुष मला जाणतात, म्हणजे मला येऊन मिळतात.

जे लोक त्यांच्या ध्येयासाठी समर्पित असल्यामुळे मृत्युची वेळ आल्यावर विचलित होत नाहीत ते अधिभूत, अधिदैव व अधियज्ञ यांच्यासह सर्वांचे आत्मरूप अशा भगवंतांना अंतकाळीही जाणतात आणि ते भगवंतांशी जोडलेले लोक भगवंतांनाच येऊन मिळतात.

भारतमातेला स्वतंत्र करण्याची उत्कटतेने कामना बाळगणारे क्रांतिकारक मृत्यू समीप असतानाही विचलित झाले नाहीत कारण ते त्यांच्या ध्येयाशी समर्पित होते आणि दृढनिश्चयी होते.

या श्लोकात भगवंतांनी अधिभूत, अधिदैव व अधियज्ञ आदी नव्या पारिभाषिक संज्ञा वापरलेल्या आहेत. कुठल्याही शास्त्राची एक परिभाषा असते. ती समजून घेण्यासाठी त्यातील पारिभाषिक शब्द आणि त्यांचे अर्थ समजून घ्यावे लागतात. या पुढील अक्षरब्रह्मयोग या आठव्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकात अर्जुन भगवंतांना याच संज्ञाबद्दल विचारणा करणार आहे, तेव्हा भगवंत याबद्दल संपूर्ण स्पष्टीकरण देतीलच. तूर्तास हा सातवा अध्याय इथेच समाप्त होत आहे.

ॐ तत्सदिति श्रीमद्‌भगवद्‌गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
ज्ञानविज्ञानयोगो नाम सप्तमोऽध्यायः॥

ॐ हे परमसत्य आहे. याप्रमाणे श्रीमद्‌भगवद्‌गीतारूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील ज्ञानविज्ञानयोग नावाचा हा सातवा अध्याय समाप्त झाला.

ईश्वरचरणी वंदन करून हा सुंदर ज्ञानविज्ञानयोग नामक अध्याय समाप्त झाला. हे विवेचन भगवंतालाच अर्पण करून विवेचन समाप्त झाले.

प्रश्नोत्तर सत्र

प्रश्न 
राधेश्याम जी:- भगवंतांना शरण जावे असे आपण वारंवार ऐकत म्हणत आलो आहोत पण ही शरणागती नेमकी कशी असते?
उत्तर:- शरणागती ही केवळ एकदाच खऱ्या अर्थाने शरणागती होते, ज्यावेळी आपल्या मनात सर्व काही सोडून मला फक्त भगवंतच हवे ही भावना असते आणि आपण स्वतःला संपूर्णपणे भगवंतांच्या हवाली केलेली असते. भगवंत जे काही करतील ते होईल या भावनेने जेव्हा आपण आपले कर्तव्य कर्म करत असतो, तेव्हा ती संपूर्ण शरणागती (ज्याला प्रपत्ती म्हणतात) ती असते. अन्यथा आपण वारंवार शरण जात असतो पण ते आपल्या कामनापूर्तीसाठी असते. एखाद्या  नेहमी आपले व्यसन सोडणार्‍या व्यसनाधीन व्यक्तीच्या व्यसनमुक्तीप्रमाणे तात्कालिक शरणागती असते. आपण जेव्हा भगवत्प्राप्तीसाठी शरणागत होतो तेव्हा खऱ्या अर्थाने संपूर्णपणे शरणागत होतो. मग वारंवार शरण जायला लागत नाही. 

प्रश्न 
वीणा जी:- आपण आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी असे भक्तांचे प्रकार सांगितलेले आहेत. मी माझ्या खोलीमध्ये सर्वत्र श्रीकृष्णाचे फोटो लावलेले आहेत आणि त्याची चिंतन करतच माझी सर्व कामे सुरू असतात. माझी भक्ती कशा प्रकारची म्हणावी?
उत्तर:- बाराव्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे जर आपण आपले संपूर्ण कर्तव्यकर्म भगवंतांचेच काम करत असल्याप्रमाणे भगवंतांना साक्षी ठेवून करत असलो आणि त्या कर्माचे कर्तेपण सोडून देऊन त्या कर्माचे फळ भगवंतांनाच अर्पण करत असलो तर ती संपूर्ण शरणागती आहे. तुम्ही तशा प्रकारची भक्ती करण्याचा प्रयत्न करत असलात तर ते चांगलेच आहे.

प्रश्न 
दीनू जी:- आर्त या शब्दाचा अर्थ काय? आर्त म्हणजे स्मरण असते का?
उत्तर:- जेव्हा मनुष्य अशा काही गहन संकटात सापडतो, ज्यातून सुटका होण्यासाठी त्याचे बळ अपुरे असते आणि त्याला सुटकेसाठी अन्य काहीही मार्ग नसतो तेव्हा तो निर्वाणीचा उपाय म्हणून भगवंतांना तळमळीने पुकारतो, अशा भक्तीला आर्त भक्ती म्हणतात. ही भक्ती ही वाईट म्हणता येत नाही, निदान ह्या निमित्ताने तरी भगवंतांची आठवण होते.

प्रश्न 
रजनीश जी:- भगवंत म्हणतात की त्यांच्यापासूनच गुण निर्माण झालेले आहेत पण त्या गुणांमध्ये ते नाहीत. यातून आपण काय बोध घ्यायचा आहे?
उत्तर:- समुद्राच्या पाण्यामध्ये वाऱ्यामुळे ऊर्जा येण्याने लाट निर्माण होते, ही समुद्राच्या पृष्ठभागावर तयार होणारी एक अस्थायी हालचाल आहे, अशा लाटा म्हणजे समुद्र नसतो तर समुद्राचे पाणी म्हणजे समुद्र असतो. त्याचप्रमाणे गुण भगवंतांपासून निर्माण झाले असले तरी त्या गुणांमध्ये भगवंत नसतात, ते गुणांच्या पलिकडे, गुणातीत असतात. चौदाव्या अध्यायात भगवंतांनी अर्जुनाला व आपल्याला गुणातीत व्हायला सांगितले आहे कारण जो गुणातीत झाला तो व्यक्ती न रहाता जणू परमात्मा बनतो.

प्रश्न 
दीप्ती जी:- भगवंत आपल्या सर्वांमध्ये आहेत, आपल्याला पाहू शकतात पण तरीही आपण भगवंत नाही हे कृपया स्पष्ट करावे.
उत्तर:- मघाशी आपण समुद्र आणि लाटांची चर्चा केली. तेच उदाहरण घेऊ या. आपण समुद्रात निर्माण होणाऱ्या लाटांप्रमाणे भगवंतांपासून निर्माण झालो तरी भगवंत गुणातीत असल्यामुळे आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. दुसरे असे की संकटसमयी आपल्याला भगवंतांचे स्मरण बळ देते. मन कुविचारांपासून मुक्त करण्यासाठी भगवंतांचे नामस्मरण सहाय्यक ठरते. यावरून आपण भगवंत नाही हे लक्षात येते.


समारोपाच्या प्रार्थनेने सत्राची सांगता झाली.
योगेशं सच्चिदानंद वासुदेवं व्रजप्रियम्।
धर्मसंस्थापकं वीरं कृष्णंवन्दे जगद्गुरुम्॥
॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥