विवेचन सारांश
श्रद्धा, आहार आणि यज्ञाचे तीन प्रकार

ID: 8966
मराठी
शनिवार, 28 फेब्रुवारी 2026
अध्याय 17: श्रद्धात्रयविभागयोग
1/3 (श्लोक 1-12)
विवेचक: गीता प्रवीण कविता जी वर्मा


परंपरेनुसार प्रारंभिक प्रार्थना आणि दीपप्रज्वलनाने विवेचनाचा शुभारंभ झाला.

सदा शिव समारम्भां शङ्कराचार्य मध्यमाम् ।
अस्मदाचार्य पर्यन्तां वन्दे गुरु परम्पराम् ॥
ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं
व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् ।
अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं
अंब त्वां अनुसंदधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् ॥

'ॐ पार्थाय प्रतिबोधितां' या श्लोकात शंकराचार्यांनी भगवद्गीतेला माता असे संबोधित केले आहे.
  जेव्हा आपल्याला काही कारणाने खूप दुःख होते तेव्हा आपल्याला आपल्या आईच्या कुशीची आठवण येते. भगवद्गीतेचा आरंभही अर्जुनविषादयोगाने, अर्थात् अर्जुनाच्या दुःखाने, विषादाने, द्वंद्वाने झालेला आहे. योग्य, अयोग्य, नित्य– अनित्य वस्तू यांविषयीचा अर्जुनाचा विवेक जेव्हा नष्ट झाला, त्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला भगवद्गीतेचा उपदेश केला.
  आपल्याला जेव्हा काही मार्ग दिसत नसेल, एखाद्या समस्येचे उत्तर सापडत नसेल, सर्वत्र अंधःकार झाल्यासारखे भासत असेल तेव्हा आपण भगवद्गीतेला शरण जायला हवे; निश्चितपणे हृदयात प्रकाश जागृत होईल.
  महात्मा गांधीजींनीही म्हटले होते की, “काय योग्य आहे हे जेव्हा मला अजिबात सुचत नाही तेव्हा मी भगवद्गीतेला शरण जातो.”
  हा भाव आपल्यातही जागृत व्हावा यासाठी जो गुण आपल्यात असणे आवश्यक आहे तो म्हणजे श्रद्धा. व्यक्ती भक्त असो, ज्ञानी असो वा कर्मयोगी, तिच्यामध्ये श्रद्धा असायलाच हवी. भक्तीयोगासाठीच नव्हे तर ज्ञानयोगासाठीही श्रद्धेची बैठक असणे आवश्यक आहे.
  ‘सदाशिव समारम्भाम्’ हा श्लोक म्हणताना आपण संपूर्ण गुरुपरंपरेचे स्मरण करत असतो. स्वतः ज्ञानयोगी असलेल्या आदि शंकराचार्यांची देव आणि गुरु यांवर अतूट श्रद्धा होती.
  श्रद्धा ही आध्यात्मिक जीवनाची सर्वात प्रारंभिक आणि आवश्यक पायरी आहे. श्रद्धेशिवाय आयुष्यात काहीही प्राप्त करणे अशक्य आहे.
  कोणत्याही शास्त्रीय ग्रंथाची सुरुवात मंगलाचरणाने करण्याची प्रथा आहे. आपला ग्रंथ निर्विघ्नपणे पूर्ण व्हावा ही यामागची भावना असते. कार्य सफल व्हावे यासाठी प्रारंभी देव आणि गुरु यांची उपासना केली जाते. देव, गुरु, शास्त्र, ग्रंथ यांच्यावरील श्रद्धेमुळे आध्यात्मिक जीवनात त्यांची कृपा प्राप्त होते.
    शंकराचार्यांचे एक शिष्य तोटकाचार्य हे ग्रंथांच्या अध्ययनापेक्षा शंकराचार्यांच्या सेवेत अधिक रत असत. एकदा शंकराचार्य अध्यापनासाठी बसले होते, अन्य सर्व शिष्य उपस्थित होते परंतु तोटक तिथे नव्हते. ते गुरुसेवेच्या कार्यात व्यस्त होते. उपस्थित शिष्यांनी शंकराचार्यांना शिकविण्यास सुरू करण्याबद्दल सुचविले. परंतु शंकराचार्यांनी तसे केले नाही.
  परीक्षेच्या वेळी तोटकांना प्रश्न पडला की, अन्य विद्वान शिष्य श्लोक, स्तोत्र यांची रचना करू शकतात, त्यांच्या तुलनेत आपला कसा निभाव लागेल? कोणत्याही ग्रंथाचे, शास्त्राचे अध्ययन त्यांनी केलेले नव्हते. त्यांचे संस्कृत भाषेवरही प्रभुत्त्व नव्हते. परंतु गुरू शंकराचार्यांसमोर मनोभावे हात जोडून उभे राहताच त्यांच्या मुखातून आपोआप एका सुंदर स्तोत्राची निर्मिती झाली. ‘तोटकाष्टकम्’ या नावाने हे स्तोत्र प्रसिद्ध आहे आणि या स्तोत्राच्या निर्मितीनंतर ‘तोटकाचार्य’ या नावाने तोटक ओळखले जाऊ लागले.
    कोणत्याही विषयाबद्दल जेव्हा आपल्या मनात श्रद्धा असते तेव्हा ते कार्य करण्याची शक्ती आपले मन निर्माण करते. मानवी मन हे अत्यंत अद्भुत आहे. आपले मन प्रेरित झाले तर काहीही करण्याची असीम शक्ती आपल्यात येते. पण आपलीच प्रेरणा कधी कधी कमी पडते आणि उत्साहाच्या कमतरतेमुळे आपण आपल्या सामर्थ्याचा पूर्ण उपयोग करत नाही.
  ब-याचदा चुकीच्या ठिकाणी आपण आपल्या शक्तीचा गैरवापर करतो, तर कधी उत्साहाच्या अभावामुळे आपण तिचा वापरच करत नाही.
  पहाटे लवकर उठून व्यायाम करणे आवश्यक आणि लाभदायक आहे हे आपणा सर्वांना माहीत आहे. पण कुठेतरी याविषयीची श्रद्धा कमी पडल्यामुळे काहीजण हे नियमितपणे करू शकत नाहीत. मात्र ज्यांच्यात श्रद्धा असते ते हे सर्व करू शकतात. ज्या कार्यावरची श्रद्धा ठाम असेल, ते करणे कठीण राहत नाही.
  भगवद्गीता हे एक असे शास्त्र आहे ज्यात विश्वाच्या सर्व सिद्धांतांचा समावेश केला गेलेला आहे. साक्षात परब्रह्मस्वरूप असलेल्या भगवान श्रीकृष्णांच्या मुखातून प्रकट झालेल्या भगवद्गीतेचे जेव्हा आपण अनुसरण करतो, तेव्हा आपल्या जीवनाची लय, दिशा, जीवनाचा प्रत्येक क्षण सकारात्मकतेने भरून जातो. दुःख हा प्रत्येकाच्या जीवनाचा अपरिहार्य भाग आहे, परंतु भगवद्गीतेच्या अनुसरणाने दुःखाला बाजूला सारून आपल्या मार्गावर पुढे जात राहण्याची शक्ती प्राप्त होते.
    आपल्यात श्रद्धा असेल तर भगवद्गीतेची ही शक्ती आपल्यालाही प्राप्त होऊ शकेल.
श्रद्धावान् लभते ज्ञानं तत्पर: संयतेन्द्रिय: |
ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति ||४.३९||
भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायात भगवानांनी सांगितले आहे, की ज्ञानप्राप्तीसाठी सुद्धा श्रद्धा आवश्यक आहे.
याच अध्यायात भगवान पुढे सांगतात की, अश्रद्ध व्यक्तीचा विनाश निश्चित आहे. श्रद्धेच्या अभावामुळे मनुष्याच्या मनात निर्माण होणारा संशय त्याला विनाशाकडे घेऊन जातो.

सोळाव्या अध्यायाच्या समाप्तीस भगवान सांगतात,
य: शास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारत: |
न स सिद्धिमवाप्नोति न सुखं न परां गतिम् ||१६.२३||
शास्त्रविधींचे पालन न करता जे केवळ आपल्या मर्जी आणि सोयीनुसार कार्य करत राहतात, त्यांना ना सिद्धी प्राप्त होते, ना सुख, ना परमगती (मोक्ष).
तस्माच्छास्त्रं प्रमाणं ते कार्याकार्यव्यवस्थितौ |
ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिहार्हसि ||१६.२४||
  भगवान सांगतात की, शास्त्राला सर्वश्रेष्ठ प्रमाण मानून त्यानुरूप कार्य करावे.

  याप्रकारे श्रद्धा ठेवून अनुसरण्यास नेमके कोणते शास्त्र योग्य आहे असा प्रश्न येथे उपस्थित होऊ शकतो. आपण संपूर्ण श्रद्धापूर्वक एखादे कार्य करत असलो, परंतु जर आपल्याला शास्त्राची पूर्ण माहिती नसेल तर अशा कार्याचे फलस्वरूप काय असेल? या आणि अशा सर्व प्रश्नांची उत्तरे पुढे भगवान देतात.


17.1

अर्जुन उवाच
ये शास्त्रविधिमुत्सृज्य, यजन्ते श्रद्धयान्विताः|
तेषां(न्) निष्ठा तु का कृष्ण, सत्त्वमाहो रजस्तमः||17.1||

अर्जुन म्हणाला, हे कृष्णा! जी माणसे शास्त्रविधीला सोडून श्रद्धेने युक्त होऊन देव देविकांचे पूजन करतात, त्यांची मग स्थिती कोणती? सात्विक, राजस की तामस?

अर्जुन भगवान श्रीकृष्णांना म्हणतो, “आपण सांगितल्याप्रमाणे शास्त्राला प्रमाण मानून कार्य केले गेले पाहिजे. पण बरेचदा असे होते की श्रद्धा असूनही लोक शास्त्रोक्त विधींचे संपूर्ण अनुसरण करू शकत नाहीत.”
असे होण्याची विविध कारणे असू शकतात.
  काही लोकांनी शास्त्राच्या विधींचे संपूर्ण अध्ययन केलेले नसते. त्यामुळे शास्त्रात नेमके काय सांगितले गेले आहे याचे अचूक ज्ञान त्यांच्याकडे नसते. शास्त्र समजून घेण्यासाठी लागणारी कुशाग्र बुद्धिमत्ताही सर्वांकडे नसते. त्यामुळे शास्त्र श्रद्धापूर्वक वाचूनही बरेचजण त्यांचा योग्य आणि संपूर्ण अर्थ समजू शकत नाहीत. परिणामतः श्रद्धावंत असूनही त्यांच्याकडून क्रियेत चूक होऊ शकते.
   अर्जुन येथे विचारतो, “हे कृष्णा, अशा लोकांची निष्ठा कोणत्या प्रकारची मानावी, सत्त्व, रज अथवा तमोगुणी?”

"गुरुपदिष्टवेदान्तवाक्येषु विश्वासः श्रद्धा" (विवेकचूडामणि)
गुरुद्वारे सांगितलेल्या वचनांवर विश्वास हीच श्रद्धा आहे. परंतु, कुशाग्र बुद्धी नसल्याने आपण अजाणतेपणी चुका करतो. अशावेळी आपली निष्ठा कोणत्या श्रेणीत येईल?
    सत्त्व, रज आणि तमोगुणांविषयी चौदाव्या अध्यायात भगवंतांनी विस्तृतपणे सांगितले आहे.

भगवद्गीतेचे अध्ययन करीत असताना ‘गुणत्रयविभागयोग’ अध्यायात वर्णन केलेल्या गुणांविषयी आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे.


17.2

श्रीभगवानुवाच
त्रिविधा भवति श्रद्धा, देहिनां(म्) सा स्वभावजा|
सात्त्विकी राजसी चैव, तामसी चेति तां(म्) शृणु||17.2||

श्री भगवान म्हणाले, मनुष्यांची ती शास्त्रीय संस्कार नसलेली, केवळ स्वभावतः उत्पन्न झालेली श्रद्धा सात्विक, राजस व तामस अशा तीन प्रकारचीच असते . ती तू माझ्याकडून ऐक.

भगवंत सांगतात, श्रद्धा ही स्वभावानुसार उत्पन्न होत असते.
स्वभावजा श्रद्धा एखाद्या व्यक्तीची पूर्व जन्मातील संस्कारांनुसार श्रद्धा उपजत आलेली असते. काही मुलांमध्ये लहानपणापासूनच पूजा करण्याचा, गुरुजनांना प्रणाम करण्याचा स्वभाव असतो. ही श्रद्धा गतजन्मानुसार आलेली असते. ज्या वातावरणात आपली जडणघडण होते, त्यानुसार श्रद्धा विकसित होते.
शास्त्रजा श्रद्धा- शास्त्रांच्या अध्ययनातून अशी श्रद्धा उत्पन्न होत असते.
श्रद्धा तीन प्रकारची असते - सात्त्विक श्रद्धा, राजसिक श्रद्धा आणि तामसिक श्रद्धा.

भगवंत म्हणतात,
न तदस्ति पृथिव्यां वा दिवि देवेषु वा पुनः।

सत्त्वं प्रकृतिजैर्मुक्तं यदेभिः स्यात्त्रिभिर्गुणैः ||१८.४०||
सात्त्विक, राजसिक आणि तामसिक हे तिन्ही गुण प्रत्येक ठिकाणी विद्यमान आहेत.


17.3

सत्त्वानुरूपा सर्वस्य, श्रद्धा भवति भारत|
श्रद्धामयोऽयं(म्) पुरुषो, यो यच्छ्रद्धः(स्) स एव सः||17.3||

हे भारता! सर्व माणसांची श्रद्धा त्यांच्या अंतःकरणानूरुप असते. हा पुरुष श्रद्धामय आहे. म्हणून जो पुरुष ज्या श्रद्धेने युक्त आहे तो स्वतःही तोच आहे. (अर्थात त्या श्रद्धेनुसार त्याचे स्वरुप असते.)

भगवंत सांगतात, आपलं सत्व म्हणजेच, अंत:करण ज्याप्रकारे असेल, त्यानुसार जी श्रद्धा उत्पन्न होते, ती सात्त्विक श्रद्धा. ज्या प्रकारची श्रद्धा असेल, त्या प्रकारेच ती व्यक्ती घडते. अध्यात्मिक प्रवृत्तीची श्रद्धा असेल, तर त्या प्रकारेच विचार मनात येतात. त्यानुसारच कर्म केले जातात. राजसिक श्रद्धा असणारी व्यक्ती, नेहमी कार्यक्रमांना जाणे, अलंकार-आभूषण घालणे शृंगार करणे इ. राजसिक क्रिया करते. कोणतेही कर्म करण्यासाठी प्रेरणा आवश्यक असते. प्रेरणा ही श्रद्धेतून उत्पन्न होत असते. ज्या वस्तूवर, विषयावर, गुणावर श्रद्धा असेल, त्यानुसार श्रद्धा विकसित होईल. अशा प्रकारे श्रद्धा सात्त्विक असेल तर आयुष्यसुद्धा सात्त्विक होईल. त्यानुषंगाने एक कथा पाहू या.
एकदा एक राजा त्याच्या राज्यात ‘द्वारकाधीश’ यांची एकमेवाद्वितीय मूर्ती स्थापन करू इच्छितो. ज्या मूर्तीच्या दर्शनासाठी, इतर देशातूनही भाविक यावेत अशी त्याची आकांक्षा असते. त्यासाठी राजा घोषणा करतो की, एका सुंदर मंदिराचे निर्माण करून, त्यात भगवंताच्या अत्यंत सुंदर, विलोभनीय प्रतिमेची प्रतिष्ठापना करण्यासाठी, कोणी मूर्तीकार असेल तर त्याने येऊन आपल्यातली कला दाखवावी. भगवंताची अशी एकमेवाद्वितीय मूर्ती, जो कोणी बनवेल त्याला मोठे बक्षीस देण्यात येईल. एक प्रसिद्ध मूर्तीकार हे आव्हान स्विकारतो. मूर्तीकाराला दगडांसोबत संवाद साधायची एक खास कला अवगत असते. मूर्तीकार राजासमोर अट ठेवतो की, “मूर्ती घडविण्यासाठी एक विशेष प्रकारचा दगड हवा आहे. आपले सैनिक दूरवरुन वेगवेगळे दगड आणतील. त्याचे निरिक्षण करुन मला हवा तसा दगड मिळेल, तेव्हाच मूर्ती घडविण्यास आरंभ करीन.” मूर्तीकाराची ख्याती संपूर्ण राज्यात असल्याने, राजा अट मान्य करतो. त्यानुसार राजाचे सैनिक राज्यात, तसेच राज्याबाहेरही जाऊन, शेकडो दगड गोळा करुन आणतात. मूर्तीकार त्या सर्वांतून चार वेगवेगळे दगड निवडतो आणि त्यावर आवश्यक क्रिया करण्यास सुरुवात करतो.
पहिल्या दगडावर क्रिया सुरु करताच तो दगड सांगतो, “मला आकार नको देऊस. मी हे घाव सहन करु शकत नाही.” मूर्तीकार त्या दगडाला बाजूला ठेवतो. दुसरा दगड घेऊन त्यावर क्रिया सुरु करतो. काही दिवसांनी दगड चमकू लागतो मात्र त्यालासुद्धा घाव सहन न झाल्याने तो मूर्तीकाराला विनंती करतो, “ही चमक मला नको. मला कोणताही देव बनायचे नाही.” दुस-या दगडालाही मूर्तीकार बाजूला ठेवतो. मग तिस-या दगडावर काम सुरु करतो. जवळपास सहा महिने काम सुरु असते. मात्र हा दगड सुद्धा हार मानतो आणि म्हणतो की, "मला कोणताही आकार नको. मला सहन होत नाही." तिसरा दगड सुद्धा मूर्तीकार बाजूला ठेवतो. चौथा दगड हातात घेताच मूर्तीकाराला सात्त्विक स्पंदनं जाणवतात. दगड मूर्तीकाराला म्हणतो, “तुम्हाला जसा आकार द्यायचा, तसा आकार मला द्या. तुम्हाला हवे तसे मला घडवा मी पूर्णतः समर्पित आहे. माझ्यासारख्या दगडाला तुम्ही 'द्वारकाधीश' सारख्या दैवतामध्ये रुपांतरित कराल, यापेक्षा मोठे माझ्यासाठी काहीही नाही. त्यामुळे सर्व घाव सहन करायला मी तयार आहे.” मूर्तीकार त्या दगडापासून वर्षभरात एक मनोहारी भगवंताची प्रतिमा निर्माण करतो. ती मूर्ती पाहून राजा प्रसन्न होऊन मूर्तीकाराचा सन्मान करतो. अशा प्रकारे फक्त एका दगडामध्ये पूर्ण समर्पित भाव असल्याने, त्यापासून भगवंताची मूर्ती बनवून त्याची गाभाऱ्यात स्थापना केली होते. इतर दगड मात्र त्यांच्या सहन क्षमतेप्रमाणे मंदिराच्या वेगवेगळ्या भागात वापरले जातात.
ज्याने जेवढे सहन केले, जेवढे तप केले तो तेवढा उजळून निघतो.
सूर्योदयाच्या वेळेस सुरुवातीला, सूर्य थोडा थोडा क्षितिजापासून वर येतो. तेव्हा थोडाच प्रकाश पसरतो. काही वेळानंतर आकाशात सूर्य जेव्हढा वर जातो, तेव्हढा तापतो आणि तेव्हढाच त्याचा प्रकाशही वाढतो. तसंच आपलंही आहे. जेव्हढे आपण तप करू, मेहनत करू तेव्हढी आपली प्रगती होईल. मेहनत करणे, तप करणे हे श्रद्धेशिवाय शक्य नाही. जेव्हा श्रद्धापूर्वक क्रिया केली जाते, तेव्हा मेहनत ही, मेहनत वाटत नाही. सर्व गोष्टी सहज घडतात.
आवड आणि श्रद्धा या वेगवेगळ्या आहेत. एखादी कृती करताना रुची नसेल, मात्र श्रद्धापूर्वक करत असाल, तर त्यात नक्की आवड निर्माण होते. मानवी मन हे अत्यंत शक्तीमान आहे. आपण पाहिजे तेव्हा आपलं मन हवं तिथे गुंतवू शकतो. आवड निर्माण करु शकतो. आगपेटी आणि त्यातली काडी यांत अग्नी वरवर पाहता दिसत नाही. मात्र घर्षण करताच अग्नी प्रकट होतो. त्याचप्रमाणे श्रद्धापूर्वक एखादी कृती करताना, आवड निर्माण होऊ शकते. म्हणून श्रद्धा अत्यंत महत्वाची आहे. जसे अंतःकरण असेल तशीच श्रद्धा असते. श्रद्धा कशी वाढवावी? सात्त्विक क्रिया करुन सात्त्विक श्रद्धा वाढते.




17.4

यजन्ते सात्त्विका देवान्, यक्षरक्षांसि राजसाः|
प्रेतान्भूतगणांश्चान्ये, यजन्ते तामसा जनाः||17.4||

सात्विक माणसे देवांची पूजा करतात. राजस माणसे यक्ष-राक्षसांची तसेच जी इतर तामस माणसे असतात, ती प्रेत व भूतगणांची पूजा करतात.

आपल्या दिवसाची सुरुवात पूजापाठाने होते, उपासनेने होते. आपल्या श्रद्धेवर ठरते की, आपण कोणाची उपासना करतो. भगवंत सांगतात की, जो देवतांची पूजा करतो, तो सात्त्विक असतो. तसेच यक्ष आणि राक्षसांचे पूजन करणारे, राजसिक असतात. राजसिक प्रवृत्तीला कामना पूर्ण करण्याची उत्कट भावना असते. त्यामुळे लवकर पूर्ण व्हावी, म्हणून ते यक्ष-राक्षसांचे पूजन, उपासना करतात. तामसिक लोक प्रेत आणि भूतगणांची पूजा करतात. तामसिक लोक एखाद्या व्यक्तीला हानी व्हावी म्हणून प्रेत-भूतगणांची पूजा, अनुष्ठान करतात.


17.5

अशास्त्रविहितं(ङ्) घोरं(न्), तप्यन्ते ये तपो जनाः|
दम्भाहङ्कारसंयुक्ताः(ख्), कामरागबलान्विताः||17.5||

जी माणसे शास्त्रविधी सोडून केवळ मनाच्या कल्पनेप्रमाणे घोर तप करतात तसेच दंभ, अहंकार, कामना, आसक्ती आणि बळाचा अभिमान यांनी युक्त असतात,

अशास्त्रविहितं घोरं म्हणजे, शास्त्र विधी सोडून अशास्त्रीय पद्धतीने घोर तप करतात. घोर तप म्हणजे अनेकदा वैष्णोदेवीचा डोंगर चढताना, भक्त गुडघे टेकून डोंगर चढतात. शास्त्रामध्ये असे कुठेही करायला सांगितलेले नाही. आपल्या घरी कोणी रक्तबंबाळ अवस्थेत भेटायला आले तर आपल्या मनाला ते चांगले वाटेल का? मग भगवंताला आपण अशा अवस्थेत भेटायला कसे जाऊ शकतो? अगदी शुद्ध मनाने आपण त्यांच्या समोर उपस्थित राहायला हवे.
मंदिरात जाण्यापूर्वी, पूजा करण्यापूर्वी पूर्ण श्रृंगार करून भगवंतांच्यासमोर बसण्याची परंपरा आहे. अर्थात पूर्ण संतोषभावाने, प्रसन्नतापूर्वक पूजा करावी. मात्र आजकाल वेळ नाही असे कारण देऊन लोक आधी पटकन पूजा आटपतात आणि नंतर श्रृंगार करतात. जेव्हा शरीरातून रक्त वाहत असेल, मन प्रसन्न नसेल अशावेळी भगवंतांच्यासमोर जाणे योग्य नाही. यालाच भगवंतांनी अशास्त्रविहितम् घोरम् म्हटले आहे. जे लोक अशा प्रकारची उपासना करतात त्यांचा उद्देश दंभ आणि अहंकार असतो.
दंभ म्हणजे इतरांना दाखवण्यासाठी उपासनेचे प्रदर्शन करणे जेणेकरून आजूबाजूचे लोक पाहतील की, हा किती धार्मिक आहे!
आतून अहंकार असेल की, मी फार बलशाली आहे, समर्थ आहे, अशी भावना असल्यास, ती व्यक्ती अशा प्रकारचे घोर तप करते. यामागे दंभ, अहंकार, काम, राग-बळावलेली कामना अशी दोन-तीन उद्दिष्टे असतात. शरीराला कष्ट देऊन, रक्तरंजित होऊन भगवंताची उपासना केल्यास ते आपली मनोकामना लवकर पूर्ण करतील तर ही चुकीची समजूत आहे.

पुढे भगवंत याच गोष्टीबद्दल बोलतात.

17.6

कर्शयन्तः(श्) शरीरस्थं(म्), भूतग्राममचेतसः|
मां(ञ्) चैवान्तः(श्) शरीरस्थं(न्), तान्विद्ध्यासुरनिश्चयान्||17.6||

जे शरीराच्या रुपात असलेल्या भूतसमुदायाला आणि अंतःकरणात राहणाऱ्या मलाही कृश करणारे असतात, ते अज्ञानी लोक आसुरी स्वभावाचे आहेत, असे तू जाण.

भगवंत सांगतात, आपल्या शरीराला, इंद्रियांच्या समूहाला जे हानी पोचवतात ते पूर्णपणे अज्ञानी आहेत, त्यांच्यात विवेकशक्ती नसते. ते जणू दुष्टच आहेत. कारण
ते आपल्या शरीराच्या आत  स्थित परमात्म्यालाही हानी पोहोचवत आहेत. ते निश्चितच
आसुरी आहेत असे समजावे.

17.7

आहारस्त्वपि सर्वस्य, त्रिविधो भवति प्रियः|
यज्ञस्तपस्तथा दानं(न्), तेषां(म्) भेदमिमं(म्) शृणु||17.7||

भोजनही सर्वांना आपापल्या प्रकृतीप्रमाणे तीन प्रकारचे प्रिय असते. आणि तसेच यज्ञ, तप आणि दानही तीन प्रकारची आहेत. त्यांचे हे निरनिराळे भेद तू माझ्याकडून ऐक.

आहार, यज्ञ, दान आणि तप हे तीन प्रकारचे आहेत- सात्विक, राजस आणि तामस.
आहाराबरोबरच यज्ञ, दान आणि तप ह्याबद्दल भगवान विस्ताराने सांगतात.
यज्ञ, दान आणि तप हे गृहस्थाश्रमासाठी अनिवार्य आहे.
अठराव्या अध्यायात भगवान सांगतात,
यज्ञदानतपःकर्म न त्याज्यं कार्यमेव तत्।
यज्ञो दानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम्॥१८.५||
मनुष्य कोणत्याही परिस्थितीत यज्ञ, दान आणि तप ह्याचा त्याग करू शकत नाही.
सर्वात आधी मनुष्याचा आहार आणि त्याप्रमाणे असणारी त्याची वृत्ती ह्याबद्दल भगवान म्हणतात,






17.8

आयुः(स्) सत्त्वबलारोग्य, सुखप्रीतिविवर्धनाः|
रस्याः(स्) स्निग्धाः(स्) स्थिरा हृद्या, आहाराः(स्) सात्त्विकप्रियाः||17.8||

आयुष्य, बुद्धी, बळ, आरोग्य, सुख आणि प्रीती वाढविणारे, रसयुक्त, स्निग्ध, स्थिर राहणारे, स्वभावत: मनाला प्रिय वाटणारे असे भोजनाचे पदार्थ सात्विक पुरुषांना प्रिय असतात.

पहिल्यांदा भगवान सात्विक आहार कसा असतो ते सांगतात. सात्विक भोजन करणारा सात्विक असतो किंवा सात्विक मनुष्याला सात्विक भोजन आवडते. त्याच्यासमोर राजस किंवा तामस भोजन आले, तरी ते त्याला आवडत नाही. तसे भोजन तो ग्रहण करत नाही. आपले स्वामीजी दौऱ्यावर असताना काही वेळा भक्तगण त्यांना पिझ्झा, बर्गर असे आधुनिक खाद्यपदार्थ देतात, पण स्वामींना असा आहार आवडत नाही, ते असा आहार कधीच घेत नाहीत.
सात्विक भोजन म्हणजे काय?
जे अन्न खाल्यामुळे आपले आयुष्य वाढेल, राग,द्वेष कमी होऊन सात्विकता वाढेल, बुद्धी योग्य दिशेने काम करेल, शारीरिक, मानसिक शक्ती वाढेल. आपले भोजन सुख आणि प्रेम वाढविणारे असावे.
रसयुक्त म्हणजे फळ, कंदमूळ आहारात जास्त प्रमाणात असावीत. लोणी, तूप असे दुग्धजन्य पदार्थ आहारात अवश्य असावेत. स्निग्ध पदार्थ सेवन केल्यामुळे शरीरातील आर्द्रता टिकून राहते. आपण सहज बोलून जातो की लहानपणी आमच्या आजीनी भरविलेले तूप आता अंगावर दिसू लागले आहे. भगवान सांगतात आहार असा असावा की तो दीर्घकाळ उपयुक्त ठरेल. आणि जो शरीरासोबत मनाला स्थिरता देईल.

17.9

कट्वम्ललवणात्युष्ण, तीक्ष्णरूक्षविदाहिनः|
आहारा राजसस्येष्टा, दुःखशोकामयप्रदाः||17.9||

कडू, आंबट, खारट, फार गरम, तिखट ,कोरडे, जळजळणारे आणि दुःख, काळजी व रोग उत्पन्न करणारे भोजनाचे पदार्थ राजस माणसांना आवडतात.

ह्या श्लोकात भगवान राजस भोजन कसे असते त्याचे वर्णन करतात.
कटू म्हणजे कडू, आम्ल म्हणजे आंबट, लवण म्हणजे खारट, अति उष्ण म्हणजे गरम आणि तिखट. इथे अति हा शब्द सगळ्या प्रकारच्या पदार्थांसाठी वापरला आहे. अति कडू, अति खारट आणि अति तिखट पदार्थ खाऊ नयेत. ब्रेड सारखे कोरडे पदार्थ खाऊ नयेत. कोरड्या पदार्थांनी पोटाला त्रास होते.
अशा तऱ्हेचे पदार्थ नेहमी खाणारी व्यक्ती तामसी होय किंवा तामसी माणसाला अशाप्रकारचे भोजन अंत्यत प्रिय असते.
ह्याचा अर्थ असा नाही की कधीच खाऊ नयेत, तर आहारात त्याचे प्रमाण कमी असावे. हळूहळू सात्विकतेकडे वळावे.

17.10

यातयामं(ङ्) गतरसं(म्), पूति पर्युषितं(ञ्) च यत्|
उच्छिष्टमपि चामेध्यं(म्), भोजनं(न्) तामसप्रियम्||17.10||

जे भोजन कच्चे, रस नसलेले, दुर्गंध येणारे, शिळे आणि उष्टे असते, तसेच जे अपवित्रही असते, ते भोजन तामसी लोकांना आवडते.

यातयामम् - याम म्हणजेच तीन तासांचा एक काळ. तीन तासांपूर्वी बनवलेले भोजन तामसिक बनते. म्हणून भोजन बनवल्यावर तीन तासांच्या आत ग्रहण करण्याचा प्रयत्न असावा.
गतरसम्   - रसहीन. ज्याच्यातला रसरशीतपणा निघून गेला आहे असे. पाकिटात मिळणारे भोजन (पॅकेट फूड). १०-२० दिवसानंतर त्यातील सगळा रस नष्ट होतो. ते तामसिक भोजन होय.
पूति- दुर्गंधीयुक्त. काही पदार्थांची लांबूनच दुर्गंधी येते.
पर्युषितम् - शिळे पदार्थ. रात्रीभर फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी खाल्ले तर ते तामसिक भोजन होय.
उच्छिष्टम् - उष्टे. एकाच ताटात अनेक लोकांनी मिळून जेवण केले तर ते उष्टे होते. शास्त्रानुसार ते चांगले भोजन नाही.
अमेध्यम् - अपवित्र मांसाहारी भोजन. हे तामसिक भोजन होय. असे भोजन तामसिक लोकांना आवडते किंवा असे भोजन करणारे लोक तामसिक बनतात.

17.11

अफलाकाङ्क्षिभिर्यज्ञो, विधिदृष्टो य इज्यते|
यष्टव्यमेवेति मनः(स्), समाधाय स सात्त्विकः||17.11||

जो शास्त्रविधीने नेमून दिलेला यज्ञ करणे कर्तव्य आहे, असे मनाचे समाधान  करुन फळाची इच्छा न करणाऱ्या पुरुषाकडून केला जातो, तो सात्विक यज्ञ होय.

      आता भगवंत यज्ञाविषयी सांगत आहेत.
सात्विक यज्ञ- अफलाकांक्षी म्हणजेच फळाची इच्छा न धरता केलेला यज्ञ किंवा कार्य. यज्ञ या शब्दाचा अर्थ फक्त हवन नाही तर आपण दिवसभर जे क्रियाकर्म करतो ते. सर्व कर्म भगवंतासाठी, त्याला प्रसन्न करुन घेण्यासाठी कोणताही स्वार्थ न ठेवता केले तर तेदेखील यज्ञ आहे.
    गीता परिवारात सगळेच गीतासेवी नि:स्वार्थ भावनेने काम करत आहेत. कोणी प्रशिक्षक, कोणी तांत्रिक सहाय्यक, ग्रुप ॲडमिन, मेसेज फारवर्डिंग अशा अनेक सेवा हजारो गीतासेवी दिवसरात्र देत आहेत. हासुद्धा या कार्यकर्त्यांचा एक यज्ञच आहे. कारण त्यासाठी त्यांना काही पारितोषिक, मानसन्मान, मोबदला दिला जात नाही. पण ते नि:स्वार्थ भावनेने कार्य करतात. का? श्रीकृष्णप्रीत्यर्थम् या भावनेने केलेले कार्य यज्ञच संबोधिले जाते. आपण भाग्यवान आहोत कारण आपण या महायज्ञाचा एक भाग आहोत.
फळाची इच्छा न धरता वेदशास्त्रयुक्त जे कर्म केले जाते तेव्हा ते सात्विक यज्ञ बनते. वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे न करता आपल्या मनाप्रमाणे, सोयीनुसार करणे हे अविधिपूर्वक आहे. माझे कार्य, माझी सेवा, माझे कर्तव्य या भावनेने केलेल्या कार्याला सात्विक यज्ञ म्हटले जाते.
        कर्तव्यभावना आणि कार्य(कर्म) यात खूप अंतर आहे. बिझनेसमन त्याचे काम करताना कर्तव्यभावनेने करतो. अशावेळी तो वेळ पाहत नाही की, ८ तास झाले आता माझी ड्यूटी संपली. लक्ष्य पूर्ण करणे हे त्याचे ध्येय असते. मात्र त्याच्याच काम करणारा नोकरदार फक्त आपले ८ तासांचे काम पूर्ण झाले की नाही हे पाहतो. त्याची कर्तव्यभावना सीमित असते. ती चुकीची नाही.
जेव्हा हे आपले काम आहे, ते आपल्यालाच पूर्ण केले पाहिजे या भावनेने केले जाते ते कार्य सात्विक यज्ञ समजले जाते.

17.12

अभिसन्धाय तु फलं(न्), दम्भार्थमपि चैव यत्|
इज्यते भरतश्रेष्ठ, तं(म्) यज्ञं(म्) विद्धि राजसम्||17.12||

परंतु हे अर्जुना! केवळ दिखाव्यासाठी किंवा फळ नजरेसमोर ठेवून जो यज्ञ केला जातो, तो यज्ञ तू राजस समज.

फळावर दृष्टी ठेवून जेव्हा आपण काही काम करतो, बदल्यात काय मिळेल याचा विचार करतो तेव्हा आपल्यातील राजसिक गुण जागृत होतो. खोट्या अभिमानाने केलेले कर्म देखील राजसिक असते. भगवद्गीतेचे अठरा अध्याय कंठस्थ केले, पण स्वतःसाठी नाहीतर लोकांना दाखवण्यासाठी असतील तर हा दंभ आहे. तो राजस यज्ञ होय. सात्विक आणि राजसिक यज्ञ परस्परविरोधी आहेत.
तामसिक यज्ञ आणि तप याबद्दल पुढील सत्रात जाणून घेऊ.
प्रश्नोत्तरे

उषा ताई
प्रश्न - शास्त्र म्हणजे काय?
विवेचक :-शास्त्र म्हणजेच चतुर्दश विद्यास्थानचार वेद(ऋग्वेद , यजुर्वेद , सामवेद आणि अथर्ववेद), सहा वेदांग (शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, ज्योतिष आणि छंद) आणि चार उपांग (मीमांसा, न्याय, पुराण आणि धर्मशास्त्र)


प्रश्न - दम्भाहङ्कारसंयुक्ताः(ख्), कामरागबलान्विताः(१७.५) या ओळीचा अर्थ परत एकदा सांगाल का?
विवेचक – दंभ म्हणजे दिखावा आणि अहंकार म्हणजे मी श्रेष्ठ आहे अशी भावना. अशा लोकांचे एकाच उद्दिष्ट असते- आपल्या कामना आणि आसक्ती पूर्ण करणे. असते.अशा इच्छा,राग,कामनेने युक्त असतात तो दंभाहंकार होय.

 
कैलास दादा
प्रश्न- साधारण मनुष्याला श्रद्धाभाव असतो पण पूजेचे,यज्ञाचे शास्त्र माहित नसते. अशा परिस्थितीत काय करायचे?
विवेचक - शास्त्रविधी माहित नाही पण श्रद्धापूर्वक पूजा केल्यास त्याचे पूर्ण फळ मिळेल. पण शास्त्र माहित आहे पण मनात श्रद्धाभाव नसेल तर त्याला फळ मिळणार नाही. मनातील भावनेला महत्त्व आहे.

प्रश्नोत्तरानंतर समापन प्रार्थना आणि हनुमान चालीसाने या विवेचनाची सांगता झाली.

||श्रीकृष्णार्पणमस्तु ||